‘ काळोखाची रजनी होती,
हृदयीं भरल्या होत्या खंती...
विमनस्कपणें स्वपदें उचलित ’
असे काही तरी पुटपुटत चाललो होतो नारायण पेठच्या गेटावरून.
रात्रीची वेळ. आठ सवाआठाचा सुमार. नुकतेच. ‘ सतारीचे बोल ’ हे काव्य व ते लिहिणारा भाग्यशाली कवी, यांबद्दल आमचे दोघांचे बोलणे झालेले. पण समाधान वाटण्याऐवजी, काय कारण असेल ते असो, जीवाला जे काही दडपल्यासारखे झाले होते ते विलक्षणच !
येता येता कबुतरखान्यापाशी आलो असेन, तो कशाची तरी आठवण होऊन, भुतासारखा मागेच फिरलो मी. आणि पाठीमागच्या रस्त्याने - मेहेंदळ्यांच्या मारुतीवरून सावकाशपणे जड चित्ताने ॐ कारेश्वराच्या देवालयाजवळ आलो. आत जाऊन - एकटा, अगदी एकटा होतो मी - देवाचे दर्शन घेतले, अन् हृदयी भरलेल्या खंती देवापुढे मांडून, काळमहाराजांच्या समाधीकदे वळलो. श्रीदत्तात्रेयाचे दर्शन घेतले आणि कमानीतून पलीकडे जाऊन घाटावरील एका पायरीवर बसलो.
समोरच स्मशानात एक चिता पेटलेली. ज्वाळांच्या व धुराच्या लोटात कंप पावणारे ते पलीकडचे शिवालय पाहून भीतीच वाटली ! पण ती क्षणभरच. कारण ‘ सुटला अखेरचा ! ’ असे मनात येताच बरेचसे समाधान वाटले !
चिता चांगली खालपर्यंत जळत आलेली. तेव्हा निरोप द्यायला आलेले कशाला राहतील तिथे ? ‘ बाबा रे ! तू कोणीही ऐस. हा मी तुला नमस्कार करतो, आणि थोडावेळ या इथेच पायरीवर बसतो ! ’ असे म्हणून त्या चितेला, पलीकडील देवालयाला, आणि... क्षणभर एका जागेकडे निरखून पाहून त्या पवित्र भूमीलाही वंदन केले ! हो, तीच ती जागा. माझे अत्यंत जीवाचे माणूस ! त्याच जागेवर त्याला शेवटचा निरोप दिला...
पाच मिनिटे झाली - दहा झाली - बसणार तरी किती वेळ ? पण... अंतःकरण इतके जड झालेले - इतके भरून आलेले - की, काही केल्या तिथून उठवेच ना ! समोर दिसणारे दृश्य, मागच्या आठवणीचे काहूर आणि ‘ पुढे काय ? ’ हा भयंकर पेच, यांनी जीव खरोखर रडकुंडीस आला ! नको ! अगदी नकोसे झाले !
इतक्यात ‘ जिवास कां बा असा त्राससी ?...
धीर धरी रे, धीरापोटी असतीं मोठीं फळें गोमटी । ’
हे उद्गार कानी पडले, आणि... आणि तसाच घराकडे वळलो ! कारण भटकणार - भटकणार तरी किती वेळ ?
कसेबसे जेवण उरकून खोलीत आलो. दिवा लावला आणि सहज एक पुस्तक दिसले, ते हाती घेतले, पहातो तो, ते माझे अत्यंत आवडते पुस्तक ! त्यातील : The Solitary Reaper, To A Highland Girl, Ode On The Intimations Of Immortality अशी ही दोनतीन काव्ये वाचली. त्यातही शेवटले वाचले, तेव्हा काही विलक्षणच वाटले !
ते पुस्तक ठेवले आणि जवळच दुसरे होते ते उचलले. त्यातील ‘ रांगोळी घालताना पाहून ’ हे काव्य वाचले आणि माझ्या वाडत्या काव्याकडे वळलो !
कोणते बरे ते ?
अहाहा ! ते म्हणायला लागलो की, ‘ बालकवी ’ यांची प्रसन्न मूर्ती तात्काळ डोळ्यांपुढे उभी राहते ! माझे हे आवडते काव्य ‘ हरपले श्रेय ’, कसे अगदी ते तल्लीन होऊन म्हणत !
थोडेफार त्यांच्यासारखे म्हणावे - निदान म्हणता आले तर पहावे - अशी माझी आपली नेहमीचीच हौस ! ‘ त्रिखंड हिंडुनि धुंडितसे , न परि हरपलें तें गवसें ! ’
असे म्हणत म्हणत... चाललो पुढे. वाचता वाचता शेवटले कडवे म्हटले, आणि बसलो तेच गुणगुणत ! डोळ्यांवर झापड आली, तशी, ‘ चला निजावेच आता, सकाळी लवकर उठायचे आहे. ’ असे म्हणून पुस्तक ठेवले, दिवा मालवला आणि पडलो अंथरूणावर.
तरी - किती वेळ अन् काय - आपले चाललेच होते,
‘ न परि हरवलें तें गवसें...
म्हणुनि जीव पांखडीतसें... पांखडीतसें... पांखडीतसें... ’
किती स्वच्छ... बहारीचे चांदणे ! छे ! भूलोकात कुठून असे दिसायला ! आसपासचे कसे रेखीव आणि दिव्य दिसत होते ! पण... पण कुठे तरी चाललो होतो मी. बरोबर कुणी होते म्हणावे, तर... मला नाही वाटत कोणी होतेसे. पाचदहा पावले गेलो नाही तो समोरच एक मोठी थोरली इमारत ! केवढी प्रचंड, आणि पांढरी शुभ्र ! थक्क होऊन पहाता राहिलो तिच्याकडे...
इतक्यात समोरून एक माणसाची आकृती आली. ‘ कोण ते ? ’ म्हणून पाह्यला जातो, तो केवढे आश्चर्य ! अगदी माझ्यासारखे... मीच तो म्हटले तरी चालेल ! पण मी तर चाललो होतो... मग हा दुसरा मी कोण ?...
गोंधळून जाऊन मी काही बोलणार, तोच ती व्यक्ती हाताने खुणवून मला म्हणाली, ‘ बोलायचे, मग अगदी हळू बोल. आत एकदम कोणी जाऊ नये म्हणून मी इथे... ’
‘ आतमध्ये कोणी जाऊ नये ? का बरे ? ’
‘ तसे नव्हे रे ! जायला हरकत नाही ! पण... ’
‘ चमत्कार आहे ! हरकत नाही म्हणतोस, अन् जाऊ तर देत नाहीस, तेव्हा समजावे तरी काय ? ’
‘ थांब ! ’ असे म्हणून ती बोलणारी व्यक्ती जवळ अगदी माझ्याजवळ आली, व कानात कायसेसे पुटपुटली.
तोच ‘ खरेच ! या इथे, ते दोघे... ? ’ असे मी बोलून गेलो.
‘ अरे हे काय ! केवढ्या मोठ्याने बोललास ! त्यांना त्रास होईल ना ! हां, ऐक, ते काही तरी म्हणत आहेत. चल लवकर, त्या तिथे आपण दाराशी बसू... ’
मनात म्हटले, ‘ किती धन्य मी ! आज काय ऐकायला सापडते आहे हे ! पण... मी स्वप्नात तर... ? ’
कुणास ठाऊक त्यांचे ते किती वेळ चालले होते ते ! पण अजून माझ्या कानात त्यांचे ते म्हणणे घुमते आहे ! त्या उभयतांची किती गंभीर आणि अस्खलित वाणी ती ! काव्येही स्वतःचीच, आणि म्हणणारेही तेच ! एकाने आपले इंग्रजी काव्य म्हणावे, तर लगेच दुसर्याने मराठी ! हो, पण आंग्लकवीला मराठी काव्ये कशी समजत होती ? -
जाऊ द्या ते ! समजत होती एवढे खरे. म्हणता म्हणता ते थांबले, आणि...
‘ खरोखर ? किती आनंद आहे इथे ! ’
‘ आणि दोघेही आपण एकाच वृत्तीचे ! मग काय ! ’
‘ क्षमा असावी ! आपण माझे गुरू आपल्याइतकी तन्मयता आणि दिव्यदृष्टी... ’
‘ जाऊ द्या ते ! आपण जिवलग स्नेही तर खरे ? ’
‘ हो, ते मात्र... ’
‘ तसे कशाला ! उभयतांची आपली एक - दोन काव्येच घेऊ. मात्र असे, माझ्या आवडत्या ओळी आपण म्हणायच्या, आणि उलट मीही आपल्या... ’
‘ वा ! फारच छान ! करावी आपण सुरवात ’ ।
‘ तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना
अन्तर्दृष्टि पुढूनियां सरकल्या, संतोष झाला मना ! ’
' Joy have I had... and going hence
In spots like these it is we prize
I bear away my revompense
Our memory, feel that she hath eyes. '
‘ होती मंजुल गीत गात वदनीं अस्पष्ट कांहींतरी,
गेला दाटुनि शांत तो रस अहा तेणें मदभ्यंतरीं. ’
' I saw her singing at her work,
And o'er the sickle bending, -
I listened, motionless and still;
And, as I mounted up the hill,
The music in my heart I bore. '
‘ तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारीं अहा पातली,
रांगोळी मग... ’
' A face with gladness overspread !
Soft smiles, by human kindness bred. '
‘ नाते स्नेह निदान ओळख जरी येथें मला आणिखी,
होतों मी तर पाद सेवुनि तुझे रम्य स्थळीं या कृती ! ’
' O happy pleasure ! here to dwell
Beside thee in some heathy dell;
Adopt your homely ways, and dress,
A shepherd, thou a shepherdess,
But I could frame a wish for thee !
More like a grave reality;
Thou art to me but as a wave
Of the wild sea; and I would have
Some claim upon thee, If I could,
Though but of common neighbourhood
What jyo to hear thee, and to see !
The elder brother I would be,
Thy father - anything to thee ! '
‘ बोला, बोला आता, आपण परम स्नेही आहोत की नाही ? ’
‘ आहोत खरेच ! ’
‘ तसे कशाला ! आणखी घ्या ! ’
‘ त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,
न परि हरपलें तें गवसें ! ’
' Whither is fled the visionary gleam ?
Where is it now, the glory and the dream ? '
‘ लुटूपटीच्या घरादारीं
लटकीच जाहल्यें संसारी;
तेव्हांचें सुख तें आता
खर्या घरींही न ये हाता ! ’
' The glory and the greshness of a dream
It is not now as it hath been of yore;
Turn wheresoe'er I may,
By night or day,
The things which I have seen
I now can see no more. '
‘ किरण झरोक्यांतुनी पडे
अणूसवें त्यांतून उडे -
परोक्षविषयीं मन माझें
विसरुनियां अवघीं काजें, ’
थांबा ! आणखी आहे.
‘ जेथे ओढे वनराजी
वृत्ति रमे तेथें माझी;
कारण कांहीं साक्ष तिथें
मम त्या श्रेयाची पटते;
म्हणुनी विजनीं मी जात्यें,
स्वच्छन्दें त्या आळवित्यें !
' Amd O, ye fountains, meadows, hills,
and groves,
Forebode not any severing of our loves,
Yet in my heart of hearts I feel your
might;
I only have relinquished one delight
To live beneath your more habitual
sway.
I love the brooks which down their
channels fret,
Even more than when I tripp'd lightly as they;
The innocent brightness of a newborn day
Is lovely yet; - '
‘ जनमर्यादा धरुनि कसें
अमर्याद तें मज गवसें ? ’
' Our souls have sight of that immortal
sea
Which brought us hither; - '
' Our souls have sight... Our souls have sight ! '
दोघेही ते बरोबरच म्हणायला लागले ! त्यांच्याबरोबर आम्हीही दोघे.
' Our souls have sight...
Our souls have sight ! '
असे म्हणत आनंदाने हेलकावे घ्यायला लागलो ! -
‘ झपूर्झा ! गडे झपूर्झा !! ’ ' Our souls have sight ! ’ असे म्हणत जे हेलकावे - जे हेलकावे घ्यायला लागलो...
तो त्यातच जागा झालो !
उठलो, खिडकी उघडली, आणि... काय दिसले ?
शुभ्र वस्त्र परिधान केलेली, भाली कुंकुमतिलक, नाकात चांगलीशी नथ, डोक्यावरून पदर घेतलेला व हातात पूजापात्र अशा थाटाने देवदर्शनास चाललेली आर्य स्त्री !
पहाताच -
तत्त्वें मंगल सर्वही विहरतीं स्वर्गीं तुझ्या या, अये
आर्ये ! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वयें;
असे स्वस्तःशी गुणगुणत त्या साध्वीला नमस्कार केला, व अरुणोदयाची शोभा पहात, व स्वप्नातील ते कोण बरे दोघे ? खरेच, त्यांचे दर्शन कसे नाही झाले आपल्याला ? असा विचार करीत करीत कितीतरी वेळ उभाच होतो मी !
२ मार्च १९१९
‘ रत्नाकर ’ जानेवारी १९२७