भगवान गोपालकृष्ण - अध्याय ९ वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: । सद्गुरु केशवदत्तांना । ठेऊनी मागें आनंदवना । वंदूनी गुरु गोविंदचरणा । धुळ्यास आले पराडकर ॥१॥
हा कथावृत्तांत विविध । निवेदिला मी विस्तृत । गताध्यायीं सुबोध । अति सुरस तुम्हांसी ॥२॥
हेंच रम्य आनंदवन । भक्ति-प्रेमाचे विंधान । केशवाच झाले कैवल्यधाम । रमले तात्काळ गुरुचरणी ॥३॥
शुध्द विचारांची पेरणी । झाली होती बालपणीं । तेणें विवेकाचे तरारोनी । पीक आले उमाप ॥४॥
मुखीं राधे गोविंद । हरि भजनाचा नित्य छंद । संत साहित्यीं सदा दंग । वृत्ती केशवांची शैशवी ॥५॥
अभंग गाथा तुकयाची । पारायणे ज्ञानेश्वरीची । गाईली गाणी संतांची । भक्तीप्रेमें बालपणीं ॥६॥
याच वृत्तीतून जीवन । आगळे झाले निर्माण । आत्मानंदाची अमृत खूण । मिळाली होती केशवांना ॥७॥
सत्पुरुषांची विविध दर्शनें । झाली होती पूर्वपुण्यें । लाभली तेणें सुखनिधानें । विवेक वैराग्य भक्तीची ॥८॥
भक्तिप्रेमाची सुरेल धून । गोकुळीं वृदांवनी ऐकून । झाले होते तयांचे मन । श्रीकृष्णमय प्रत्यक्ष ॥९॥
गोविंद गुरुंच्या सान्निध्यात । राहिले मग केशवदत्त । आनंद-संगम आनंदात । आनंदवनीं जाहला ॥१०॥
इच्छा प्रबल अंतरीची । दीक्षा योगानंदाची । मिळावी मनीषा केशवांची । परिपूर्ण झाली गोविंदकृपें ॥११॥
गुरुशिष्यांची बैठक । होऊं लागली अति गुप्त । शांत आणि निवांत । निर्वातीच्या एकांतीं ॥१२॥
याच एकांतवासांत । चाले तयांचा परिसंवाद । योग संन्यास आध्यात्म । विषय असे चर्चेचा ॥१३॥
कधिं लाऊनी त्राटक । आसनस्थ व्हावे एकटक । योग विद्येचे सुखद । धडे घ्यावे गुरुपाशी ॥१४॥
लागावी कधीं प्रेमसमाधी । वृत्ती निमावी निजानंदी । सहज भाव ब्रह्मांनंदी । घटिका घटिका उतरो नये ॥१५॥
आनंद आत्मा ज्योतिरूपें । व्यापून राहे सुक्ष्मत्वें । दिसती परी स्थिरत्वे । नेत्रकमळीं देहाच्या ॥१६॥
यास्तव गुरु गोविंद । घेऊनी केशवांना सन्मुख । देखें म्हणती एकटक । नेत्रीं माझ्या शिष्यवरा ॥१७॥
उभयंताचा होता दृष्टीभेद । भावतरंग उठती सुखद । देखती अपूर्व आत्मानंद । नेत्री गोविंद गुरुंच्या ॥१८॥
सद्गुरु आपल्या नयनांतून । सहजे करितात प्रक्षेपण । भक्ति, सिध्दि आध्यात्मज्ञान । परम शिष्यांच्या अंतरी ॥१९॥
येणे रिती काहीं दिवस । राहोनी सद्गुरु सान्निध्यास । तपसाधना योग्याभ्यास । आनंदे केला केशवांनी ॥२०॥
सूर्यचंद्रानी नित्य उगवावें । सरितेने नित्य वाहावे । पंचभूतानी कार्यरत असावें । नियम सृष्टीचा परोपकारी ॥२१॥
सुपुष्प फूलतें वेलीवर । प्रफुल्ल होऊनी सुंदर । सुगंध देते निरंतर । आनंददायक परासी ॥२२॥
तारांगणीची नक्षत्रे । चमकतीं बहु सतेजे । प्रकाश देती निरपेक्षे । पांथासी अंधारी निशेच्या ॥२३॥
परोपकारार्थ जीवन । साधावें सकलांचे कल्याण । हेंच सत्पुरुषाचे लक्षण । सांगती संत या जगीं ॥२४॥
सद्गुरु केशवाचे येणे । महाराष्ट्र देशी याच कारणें । दीनोधारार्थ जीवन जगणें । नि:स्वार्थ भाव अंतरीचा ॥२५॥
सोनगीर करून मूळ पीठ । श्रीसद्गुरु केशवदत्त । फिरुं लागले धर्मप्रचारार्थ । गोविंद गुरुंच्या आज्ञेने ॥२६॥
गुरु गोविंदानी एके दिनीं । स्वहस्ते उचलोनी । ज्ञानेश्वरी आदरे करोनी । दिली हाती केशवांच्या ॥२७॥
म्हणाले प्रिय शिष्यवरु । आम्हांसी करा निरुपण । पंधराव्या आध्यायाचे प्राज्ञु । श्रवणे इच्छा तुम्हां मुखीं ॥२८॥
गुरु गोविंदांची आज्ञा प्रमाण । शिरोधार्थ मानून । केशवदत्त जाहले धन्य । फळ आले तपासी ॥२९॥
मग केशवांनी उठोनी । गोविंद गुरुंच्या चरणीं । ठेविले मस्तक तत्क्षणी । साश्रू नयनांनी आदरें ॥३०॥
होवोनी मग आसनस्थ । अवलोकिले श्रोते समस्त । उघडोनी ज्ञानेश्वरीचे पृष्ठ । गुरु स्तवनासी आरंभिले ॥३१॥
शुध्द करोनी आपुले मन । चित्ती असो सावधान । हृदयीं साठवावे चरण । सद्गुरुचे निरंतर ॥३२॥
दृढ भक्तिची ओंजळ । चरणीं अर्पावी निर्मळ । अष्ट भावाचे सत्विक कमळ । वाहावे तयासी प्रितीनें ॥३३॥
अहंकार निराभिमान । निज शरीर निज प्राण । भोग मोक्ष ज्ञान-अज्ञान । लिंबलोण करूं तयावरी ॥३४॥
यास्तव सकल सुजन । धरा आदरे सद्गुरु-चरण । भव दु:खाचे निवारण । होईल तेणे नि:शंक ॥३५॥
ही नव्हे मम वाणी । आहे सलगीची सांगणी । अमोल आणि देखणी । ज्ञानदेव माऊलीची ॥३६॥
गुरुमुखीचे ज्ञानामृत । श्रवणीं पडतां सुखद । मावे न हृदयीं आनंद । चिरंतन सुखाचा ॥३७॥
गुरुचरणांची सेवा । मार्ग एकलाची मानवा । अन्य न लागे शोधावा । मोक्षप्राप्ती कारणें ॥३८॥
उदयाचली येतां दिनकर । प्रकाशे अवघे चराचर । तैसेच सुभाग्ये गुरुवर । उजळती ज्ञान वर्षती ॥३९॥
पाझरे जैसा सोमकांत । शीतल चंद्रिका प्रशांत । तेवी सद्गुरु कृपावंत । ज्ञानप्रकाश वर्षती ॥४०॥
म्हणोनी विनंती श्रोतेजन । विनम्रे धरा गुरुचरण । तेणेची उध्दरण । होईल म्हणाले केशव ॥४१॥
सहजब्रह्म यावे वाचे । भाग्य ऐसे सुखाचे । मिळेल परम आनंदाचे । गुरु पदाबुंज-पराग लाभतां ॥४२॥
असोनी जरी संसारी । सद्गुरु जया अंगीकारी । होतो तयास मोक्षकारी । तोच संसार गुरुकृपें ॥४३॥
श्रीसद्गुरुचा महिमा । नकळे अगमा निगमा । तो केवी तुम्हां आम्हां । कळेल सांगा श्रोते हो ॥४४॥
शिशीरीं गळावी जीर्ण पानें । परी बसंती यावी नव्याने । तैसेचे श्रीगुरुकृपेने । अज्ञानाचें ठायीं ज्ञान फुले ॥४५॥
सरोजी फुलावी लक्षकमळें । दशदिशा भराव्या परिमळे । तेविच सौरभ दरवळे । गुरुकृपे ज्ञानाचा ॥४६॥
सकल देवादिदेवांत । गुरुचे असे श्रेष्ठत्व । बुध्दिचे म्हणती आदित्य । प्रत्यक्ष देवहि तयांना ॥४७॥
आज आम्हीं बहु भाग्यवंत । गहिंवरोनी म्हणाले केशवदत्त । कां कीं गुरुकृपेचा सुभद ।
अमृतघट मिळाला आम्हांसी ॥४८॥
गुरुकृपादृष्टी सदैव । आहे उदार आणि निर्मळ । दु:खविरहित निरंतर । आनंददायक सकलांसी ॥४९॥
सकल विषयांपासून । पराङगमुख व्हावे चंचल मन । यासाठीं एकले साधन । लीन होणे गुरुपदीं ॥५०॥
म्हणोनी गुरुदेवता आमुची । मायमाऊली सुखाची । पखरण करी शांतीची । ज्ञानदेव सांगती स्वमुखें ॥५१॥
श्रेयसाच्या वाटुलीवर । जीवास धरून हळुवार । कैवल्यानंदाची सुरवाड । लेवविती लेणी साधकासी ॥५२॥
चित्सूर्य प्रभाप्रज्ञासूर्य । प्रेमार्द समस्त सुवर्म । ज्ञान सविता रविंद्रबोध । संबोधिती ज्ञानदेव निवृत्तीनां ॥५३॥
साहित्य सोनियाचिया खाणी । उघडोनी देशियेचिया क्षोणी । जे झाले संत मुकुटमणी । कृतार्थ म्हणती गुरुकृपे ॥५४॥
सर्व सुखाचे आगरु । जरी रखुमादेवीवरु । तरी कृपावंत सद्गुरु । वेगळा नसे तयाहुनी ॥५५॥
न होती जैं गुरुकृपा । कवणेरिती ज्ञानदीपा । उजळीले असते मायबापा । निवृत्तीस म्हणती ज्ञानदेव ॥५६॥
सद्गुरुसारिखा अनन्य । सोयरा नाहीं सज्जन । वैकुंठीचे दाखवी निधान । पांग फेडी प्रपंचाचा ॥५७॥
शिष्य सद्गुरुचे भवन । म्हणे मी, आपण होऊन । किंकर दारीचा उभा राहीन । दास्यत्व गुरुचे करावया ॥५८॥
दारीचा होईन उंबरठा । द्वारपालाचा घेऊन वसा । पुरविन अंतरीची घिंवसा । गुरुचरण लागावे कायेसी ॥५९॥
माऊलीच्या होईन पादुका । पायीच ठेविन मीच त्यांच्या । छत्रही धरीन मस्तकीं तयांच्या ।
मीच केवळ शिष्य म्हणे ॥६०॥
मीच होऊन तेज दिवटी । चालेन तयाच्या पुढती । मार्ग आणि मार्गदर्शत्वी । मीच असेन एकटा ॥६१॥
अद्वितिय ऐसे भावतरंग । सुखे हेलावती अंतरंग । शिष्योत्तमाचे मनोगत । विशोधित किती श्रोते पहा ॥६२॥
गुरुचे व्हावे आसन । अलंकार परिधान । चंदनही होऊन आपण । स्वयं व्हावे उपचार ते ॥६३॥
मीच व्हावे स्वयंपाकी । मीच व्हावे वाढपी । ओवाळावीं पंचारती । मीच आपुल्या हातानें ॥६४॥
ताट मीच काढावें । शयन-घर झाडावे । चरण संवाहन करावे । मी मीच म्हणे शिष्यवर ॥६५॥
गुरुप्रेमाची ऐसी ख्याती । ज्ञानदेव सुखे गाती । ठायीं ठायीं भावार्थ दीपिकी । श्रोते परिसा स्वानंदे ॥६६॥
गुरुक्षेत्र गुरुदेवता ।
गुरुमाता गुरुपिता ।
जो गुरुसेवे परौता ।
मार्गु नेणे ॥ ज्ञानेश्वरी ॥१३:४४५
ज्ञाननाथांची गुरुप्रीति । श्रोते तुम्हां वर्णू किती । थिटी पडेल माझी मती । गहिवरोनी म्हणाले केशव ॥६७॥
सद्गुरुवंदन सद्गुरुस्तवन । या संबधीचे विवेचन । अति रसाळ आणि सुवर्म । अमृतानुभवी केले ज्ञानदेवे ॥६८॥
म्हणती शिष्य आणि गुरुनाथु । या दोहो शब्दांचा अर्थु । श्रीगुरुच परि होतु । दोन्ही ठायीं ॥६९॥
सुवर्ण आणि अलंकार । मधुरता आणि साखर । अलग असती बाह्यांतर । परी अंतर्भाव दोहोंचा एकची ॥७०॥
कापूर आणि कर्पूर गंध । गुळ गोडी एकसंघ । भासती जरी अलग अलग । गुरुशिष्य तेवीच जाणावे ॥७१॥
वाग-ओघ ऐसा सुखद । वाहात होता संतत । श्रवणीं कर्ण झाले सुमोद । भाग्यवंत श्रोत्यांचे ॥७२॥
प्रवचनीं झाले सकल दंग । भक्ती-प्रेमा दाटला रंग । महाराज श्रीगुरुगोविंद । तल्लीन झाले निजानंदी ॥७३॥
अद्वैताच्या सुखाची । व्हावया शिष्या अनुभूती । निर्मिती गुरु द्वैतस्थिती । रोहीणीवत आभासू ॥७४॥
घडतां गुरुची अनन्य सेवा । शिष्यास देती अमृतठेवा । मग द्वैत अद्वैताचा केवा । रहावा मनीं विकल्प ॥७५॥
येणे चंद्र आणि चांदणे । एकाच चंद्रमी सामावणें । शिष्यगुरु ये प्रमाणें । अविभक्त शेवटीं ॥७६॥
याच अनुभूतिच्या आधारें । तरलो उध्दरलो म्हणाले । स्वयंप्रकाशें सुखावले । निवृत्ती कृपे ज्ञानदेव ॥७७॥
सद्गुरु संतकुळीचे । राणे चिरंतन ऐश्चर्याचे । प्राण विसावे जगताचे । ज्ञानदेव सांगती आपणासी ॥७८॥
गुरु वैराग्याचे मूळ । गुरु परब्रह्म केवळ । गुरु शांती-सुखाचे अढळ । कैवल्यधाम मुमुक्षांसी ॥७९॥
महाराज गुरुगोविंद । आणि प्रिय श्रोतवृंद । गुरुमहिमा प्रबंध । कथिला मी तुम्हां अल्पमती ॥८०॥
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु । गुरुसर्वेश्वर शिवशंभु । होऊं तया विनम्रु । कर जोडोनी आदरें ॥८१॥
ऐकोनी केशवांची वाणी । सकल श्रोतृजनांनी । जोडोनी कर अंत:करणीं । नामिले सद्गुरुसी अत्यादरे ॥८२॥
प्रभु केशवांचे प्रवचन । ऐकोनी झाले उन्मन । गोविंद गुरुंचे लोचन । पाणावले सुखानें ॥८३॥
वाजवा टाळी एक छंद । म्हणा राधे गोविंद गोविंद । अंतरंगी नाचु द्या स्वानंद । तरंग परम मंगल ॥८४॥
म्हणा नम: परम कल्याण । नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: ॥८५॥
पुनरोच्चारूनी ही प्रार्थना । केली सकलें आराधना । मग रामकृष्ण हरि गर्जना । दुमदुमली एकमुखीं ॥८६॥
अध्याय म्हणती पुरुषोत्तम । गीतेचा पंधरावा मनोरम । संक्षेपे तयाचे विवेचन । करीन आतां श्रोते मी ॥८७॥
हा मायावी संसार । आहे कैसा असार । सांगती धनंजया यदुवर । प्रसन्न होऊनी सौरसे ॥८८॥
संसाररूपी हा वृक्ष । म्हणती तया अश्वत्थ । खाली शाखा मूळें उर्ध्व । विशाल आणि अनादि ॥८९॥
हा संसाररूपी महावृक्ष । अर्जुना असे विचित्र । यास नसे आदि अंत । बुडखा न शेंडा दृगोचर ॥९०॥
अन्यथा झाडें वा वनस्पती । जीवनाविणें शुष्क होती । खंडिता तया नष्ट पावती । परी हा निश्चळ सदाचा ॥९१॥
विस्तार याचा अफाट । परार्धावरी शाखा ब्रह्मलोकांत । मूळ निराकार ब्रह्मांत । स्थिरावले अभेद्य ॥९२॥
मानवा पासोनी स्थावर । पशुपक्षादि अवघे चराचर । चंद्र, तारे, सुरवर । शास्त्राच या वृक्षाच्या ॥९३॥
जगङव्याळ हा संसार । अशाश्वत आणि असार । वृक्षाची देऊनी उपमा सुंदर । वर्णन केला प्रभुंनी ॥९४॥
इंद्रधनुचे सप्तरंग । की दिसावे जळीं वायुतरंग । नानारुपे नानारंग । परम मायावी वृक्ष हा ॥९५॥
या द्रुमाच्या पर्णात । सामावले आहेत वेद । जे जाणती तया छंदोबध्द । ते सर्वज्ञ जाणावे ॥९६॥
सत्व रम तम वाढलेल्या । असती याच्या डहाळ्या । आकाशीं पाताळीं पसरल्या । विषय पालवी फुटोनी ॥९७॥
या वृक्षाचे सत्यरूप । येते न सहज अनुभवास । हा कर्मबंधने आभास । केवळ अज्ञानां कारणें ॥९८॥
यासी छेदावया निर्मूळ । पाणी शस्त्र एकच प्रबळ । अंगी वैराग्य सबळ । अर्जुना जाण निश्चये ॥९९॥
किंबहुना याचे मूळ अनन्य । आहे केवळ अज्ञान । होईल तयाचे निरसन । ज्ञानोदय होतां अंतरी ॥१००॥
वार स्वप्नीं असिलतेचा । उपाव त्यास जागृतीचा । छेद कराया संसाराचा । ज्ञान-रूप खडग तैसाची ॥१॥
हा महाकाय अश्वत्थ । उर्ध्वजल मूळासकट । खाडावा कडाकूट । आत्मज्ञान परशुने ॥२॥
उदयाचळीं येता आदित्य । रजनीचे न राहे अस्तित्व । तेवीच देहाचे अज्ञानत्व । आत्मज्ञान शोषितसे ॥३॥
आत्मसुखाचे होता ज्ञान । सुख दु:ख मोह अज्ञान । दाही दिशां जाते विरोन । द्वंद्वमुक्त करी मानवास ॥४॥
माया मोह संगदोष । विलया जाती नि:शेष । ज्ञानमार्गाची धरितां कांस । सांगती प्रभू अर्जुनासी ॥५॥
शुध्दज्ञान मिळेल जयासी । तो एकात्म होईल मजसी । पुनर्जन्म न घडे तयासी । मुक्ती पावेल शाश्वत ॥६॥
कीं देहाचे सस्वरूप । मूढासी राहाते अज्ञात । परि जे ज्ञानचक्षु परिलुप्त । ते सहज पाहती तयास ॥७॥
जाणती स्जे सस्वरूप । तेज मजसी मद्रुप । प्राणीमात्रासी मीच एक । व्यापूनी राहिलो जगयत्रीं ॥८॥
मीच करितो पृथ्वी प्रवेश । भूतमात्रासी धारक । मीच चंद्रमा रसात्मक । औषधीचे करी पोषण ॥९॥
सूर्य चंद्राचे मीच तेज । मीच अग्नीचें प्रकाशरूप । मीच उजेड मीच अंधार । सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी ॥१०॥
समृध्दि अन्नधान्याची । करोनी मीच नित्याची । रक्षा प्राणिमात्रांची । मीच करीतो जाण पा ॥११॥
देहाच्या अंतरी शिरोन । होतो मीच प्राण अपान । चतुर्विथ अन्नाचे पोषण । मीच करितसे धनंजया ॥१२॥
सकल भूतीं प्रवेशून । देतो तयांना स्मृति ज्ञान । आभावहि तयांचा निर्माण । मत्कारणें होत असे ॥१३॥
या लोकीं क्षर आणि अक्षर । पदार्थ दोन परस्पर । मायोपाधि जीव ते अक्षर । क्षर म्हणती भूतासी ॥१४॥
जें मायेच्या उपाधिने । जीवात्म्याचे चैतन्यानें । धारण करते रूप साने । अक्षर पुरुष तो जाणावा ॥१५॥
या दोहों पासोनी निराळा । उत्तम पुरुष आगळा । परमात्मा म्हणती तयाला । तोच मी विश्वेश्वर ॥१६॥
कीं निंदा आणि स्वप्न । अलग असती जागृतीहून । मृगजळ आणि सूर्यकिरण । सूर्य मंडळा वेगळे ॥१७॥
काष्ट वा काष्टातील अग्नी । एक न म्हणू तया दोन्ही । तैसाच क्षर अक्षराहूनी । उत्तम पुरुष वेगळा ॥१८॥
मी क्षरासी पूर्णगामी । उत्तम बहु अक्षराहूनी । वेद आणि सकल जनीं । ख्यातनाम पुरुषोत्तम ॥१९॥
साधुसंतांचा समागम । योग भक्ति वैराग्य ज्ञान । मज जाणावया मार्ग उत्तम । सुखद आणि नेटका ॥१२०॥
श्रोते ऐसी ही गीताई । ज्ञानवल्ली अमृतदायी । जाणेल जो आत्महृदयीं । मोह मुक्त होईल निर्धारे ॥२१॥
हा सकल संसार । मिथ्या आणि असार । तैं “मीपणाचा” अंतर्भाव । आत्मस्वरूपीं राहावा ॥२२॥
अध्याय पंधराव्याचे वर्म । शारङगधरे कथिले सुवर्म । चिंतन करा तयाचे मनोमन । गुरुकेशव म्हणाले ॥२३॥
गजर पुन्हां हरिनामाचा । एकमुखीं झाला हर्षाचा । रसाळ मग प्रवचनाचा । कार्यक्रम संपला अपूर्व ॥२४॥
इति श्री यशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्त भाविका होवो सुखद । नववा अध्याय संपूर्ण ॥२५॥
॥ इति नवमोऽध्याय: समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2016
TOP