‘ गंधर्वानीं वधिला, सिंहानीं चपळ नीच कपिसा च;
होता मद्यप, निस्त्रप, परयोषित्व्सक्त, कीचक पिसा च. ॥१॥
तो आपण चि न केवळ, पावे सानुज हि पातकी नाश,
देतो सकुटुंबा ही पापरता नरकपात कीनाश. ’ ॥२॥
ऐसी वार्ता परिसुनि, गेले दुर्योधनाकडे चर ते,
जे पांडवशोधार्थ क्षितिवरि सर्वत्र नित्य संचरते. ॥३॥
ते चर कथिती त्या धृतराष्ट्रसुता पांडवप्रभावार्ता,
हे मात्र कीचकाची तदरिहृदंबुजरविप्रभा वार्ता. ॥४॥
कीचकनिधन परिसतां, तो पांडवशत्रु, ‘ परमकर्कश तें
कोणाचें कृत्य ? ’ असें पाहे शोधुनि मनांत तर्कशतें. ॥५॥
मग बोले, ‘ सर्वत्र भ्रमले निरलस सुदास हे रानीं,
पांडवशोध कराया चित्त न केलें उदास हेरानीं. ॥६॥
कर्णा ! ते मेले, कीं गेले योगें सकाय बाहेर ?
हे शोधितील असतां, नसतां, करितील काय बा ! हेर ? ॥७॥
बोला हो ! सभ्य ! तुम्हीं योग्य वदाया मतिप्रति ज्ञाते.
हरितिल न पद, प्राण हि, नेउनि सिद्धिप्रति प्रतिज्ञा ते. ॥८॥
सुचली युक्ति करावी, मग जरि दैवें न होय शोध, न हो,
अज्ञातवास उरला अत्यल्प चि कीं अहो ! यशोधन हो ! ॥९॥
दूर चढोनि पडावे ते गोमयगोलकार कीटकसे,
अस्खलित उच्चपदवीप्रति लंघूं पाहतात नीट कसे ? ’ ॥१०॥
कर्ण म्हणे, ‘ प्रेषावे ते देवा ! देवपतिसमा ! हेर,
ज्यांच्या वाटे प्रभुचें लघु हि गुरु हि कार्य मतिस माहेर. ॥११॥
न दिसति म्हणवुनि केवळ काय नसति गुर्जरीस कुच ? राज्या !
वेडा चि तो, न दिसले भूमिगत हि पांडुपुत्र कुचरा ज्या. ’ ॥१२॥
तों दुःशासन बोले, ‘ ते भोगुनियां श्रमा न वांचावेम,
कां न मरावे व्यसनीं, ज्यां आधिमहाहि मानवां चावें ? ’ ॥१३॥
श्रीद्रोण म्हणे, ‘ शिव ! शिव ! मरतील महानुभाव कां गा ! ते ?
व्यसनीं जरि गडबडते साधु, तरि तयांसि सुज्ञ कां गातें ? ॥१४॥
रवि न टळे चि; गिळी, परि उगळी खळ मलिन मंद राहु, टळे;
गुर्वापदे हि साधु न भी, न चळे जेंवि अचळ बाहुटळे. ॥१५॥
त्यां आधिस्तव होइल आवडि भलत्या हि काय हो ! मरणीं ?
तैशां धीरां वीरां करणारां स्वपरकायहोम रणीं. ॥१६॥
न पडो दृष्टि पराची म्हणुनि तपःसिद्धिनें स्वपदरानें
तें झांकिले, न दिसती, पांडव गेले मरोनि न दरानें. ’ ॥१७॥
भीष्म म्हणे, “ या कुरुगुरुसम हित मित अन्य बोलका नाहीं,
हितकामें प्राशावे याचे चि, न अन्य बोल कानाहीं. ॥१८॥
जरि विश्वगुरुत्व असे कर्तृत्वास्तव अजा, तरि पुराणा
ज्या पुरुषा ध्यातो, त्या कृष्णास हि मत अजातरिपु राणा. ॥१९॥
जेथें तो तेथें कृतयुगधर्म समस्त, तो चि वर देश,
ऐसा तन्महिमा कीं त्या हरिहर हि प्रसन वरदेश. ॥२०॥
धर्मस्थिति, तेथें कृतयुगगुण हे स्पष्ट दाविली खुण, गा !
उमगा बरें चतुर हो ! तो साधु तपःसमृद्धिचा कुणगा. ॥२१॥
प्रासाद सद्गुणांचे ते पांच, तसी च ती सभा सावी;
त्यांची भेटि, अशुचि जी दृष्टि न जाली च, तीस भासावी. ॥२२॥
उघडा हि निधि अभाग्या न दिसे, मलिना जना हि अत्रिज, गा !
तेजस्वी कां मरतिल ? भीतिल ते कोपल्या हि न त्रिजगा. ॥२३॥
अज्ञातवासपण म्हणउनि सुनिपुण गुणसमुद्र ते, जन हो !
लावाया वेड तुम्हां म्हणतात, ‘ प्रकट आत्मतेज न हो. ” ॥२४॥
कृप हि म्हणे, “ कुरुवर्या ! तन्मार्गण तों अशक्य दक्षमतें,
जें पाठवाल यावरि चतुर चरप्रवरलक्ष अक्षम तें. ॥२५॥
अज्ञातवास दुष्कर, परि तदवधि निपट अल्प उरला, गा !
त्वच्छस्त्रांसि म्हणेल चि भीमाचें वज्रकल्प उर ‘ लागा. ’ ॥२६॥
गांठि तुम्हांसीं त्यांसीं पाडील चि, वाढला विरोध रणीं.
वाटे, म्हणाल चि, ‘ असृक्सिंधूंत विरेल, तरि विरो धरणी. ’ ॥२७॥
शोध कराल तरि करा, सत्वर सिद्धा करा चि परि सेना,
गुरुसुहृदाप्तोक्तातें राया ! हितकाम कोण परिसेना ? ” ॥२८॥
बोले त्रिगर्तराज, “ प्रस्तुत पांडवदशा विराटा हो.
प्राप्ताहि त्यजुनि म्हणे न शिखंडीचा परा ‘ विरा ’ टाहो. ॥२९॥
मेला कीचक घेता, पीडुनि बहुधा, करा त्रिगर्ताचा,
त्याचा आम्हां, तेंवि न पांथा बहु धाक रात्रिं गर्तांचा. ॥३०॥
कीचकरहित विराट स्पष्ट जसा सर्प नीरदन दीन,
अक्ल्प अनल्प बळें तो तूं संप्रति, जेंवि नीरद नदीन. ” ॥३१॥
कर्ण म्हणे, ‘ त्या मत्स्या ग्रासूं आम्हीं तुम्हीं समस्त बक;
बहुसुखशोभाप्रद न स्वस्तरुचा ही यशासम स्तबक. ॥३२॥
पांडव मेले गेल, त्यांची आतां वृथा कथा राहो,
निर्दीप निलय जैसा आंधारा, आधिला न थारा हो. ’ ॥३३॥
राजा म्हणे, ‘ बहु बरें; पात्र तुम्हीं या यशें सुशर्मा व्हा. ’
प्रेषी पुढें कराया गोग्रहण खळा नृपा सुशर्माव्हा. ॥३४॥
आपण सकर्ण सानुज, जींत गुरु, द्रौणि, शांतनव, कृप, ती
सर्वाप्तशूरपर्णा सेना घेवूनियां निघे नृपती. ॥३५॥
संपूर्ण पांडवांचा नुगता अज्ञातवास सरला जों,
लागे विराटनगरा जों प्रविकासोन्मुखाब्जसर लाजों, ॥३६॥
सेनानी कीचकसा जों ये चित्तास कंक राज्याच्या,
श्रीरामाच्या तैशा बहु मान्या रीति शंकरा ज्याच्या, ॥३७॥
इतुक्यांत तो सुशर्मा दंडाहतपन्नगोग्र हानी च
व्हाया स्वकीर्तिची, करि धावोनि विराटगोग्रहा नीच. ॥३८॥
परिसे त्रिगर्तपतिकृतगोग्रहण विराट गोपवदनाहीं,
रदनाहीं अधरातें चावे; रिपुसम असह्य गद नाहीं. ॥३९॥
न रणा भ्याला, ल्याला क्रोधानळतप्तकाय तो कवच,
प्रिय ही जीवित वीरा; धीरा भुलवील काय तोकवच ? ॥४०॥
देवुनि रथादि घेता झाला कंकादिकां हि चवघांस;
वीर स्वशक्ति चतुरा कळविति, गंधें चि जेंवि चव घांस. ॥४१॥
ते गांठिले त्रिगर्त द्युमणिविरामीं च मत्स्यसेनाही,
केले भट सुभटांहीं, प्रबळांहीं अबळ मत्स्यसे, नाहीं. ॥४२॥
उग्र, परि सुखद, शिवसा सुकवींस न वर्ण्य काय संगर तो ?
कीं जो म्हणे, ‘ सकळ जन पावुनि सुरयुवतिकायसंग रतो. ’ ॥४३॥
करिते जाले दारुण रण ते दोघे हि सिंहसम राजे;
पाहति कौतुक, तेथें उरले होते करूनि समरा जे. ॥४४॥
धरिला विराट लाजे, वरि न करी कंधरा त्रिगर्तांत;
नेणे कर्तव्य, जसा पडला अतिअंधरात्रिं गर्तांत. ॥४५॥
धर्मा न सोसवे, जें धरि गोरक्षणपरा सुशर्मा, तें,
कीं सासु हि दुःखातें पावे भंगें, परासु शर्मातें. ॥४६॥
धर्म म्हणे, ‘ भीमा ! हूं, हो व्यसनाब्धींत नाव गा ! त्यातें;
भलत्यातें हि नुपेक्षी बुध, हरिचें जेंवि नाव गात्यातें. ॥४७॥
मां अन्नद आश्रयद व्यसनीं जो केंवि तो न सेव्य जना ?
पाळकतापहरत्वें मान जडा अन्यथा नसे व्यजना. ॥४८॥
त्या भीमें द्विज तो, त्वां रक्षावा हा हि अंतकाऽननग;
चाप चि हो पात्र यशा, दुष्टांच्या मूर्त अंतका ! न नग. ’ ॥४९॥
भीम म्हणे, ‘ हो ! त्याचा लेखा आम्हांचि कायसा ? राया !
सिद्ध समस्त हि आहों युष्मत्कार्यार्थ काय साराय. ’ ॥५०॥
ऐसें वदोनि धांवे, अरिवरि गेले न रामबाण तसे;
साधुमनांत गुरुकथित हरिनाम तसें चि काम बाणतसे. ॥५१॥
क्षुद्र विलंघील कसा त्या पौरवसत्तमा ? कडा हो ! तो
हेमाद्रिचा न हरिस हि लंघ्य, कसा मत्त माकडा होतो ? ॥५२॥
गांठी भीम, जसा अहिपति हरितां सुप्रभा वरमणीला,
टपतो सुकीर्तिला बहुतर, तेंवि न सुप्रभाव रमणीला. ॥५३॥
झाला भग्न सुशर्मा, हरिसीं पडतां चि गांठि सिंधुरसा,
रस मिसळोनि स्वबळें जिंकीसा कवण लवणसिंधुरसा ? ॥५४॥
अरि धरिला, असतां ही असि, शक्ति, धनुष्य, पूर्णशरभातें.
खरतर हि नखर हरिचे, करितिल समरांत काय शरभा ते ? ॥५५॥
उग्रा त्रिगर्तपाळा व्याळा तो वीरवरसुपर्ण कुटी;
दे तापतापसाला करुनि तयाची तनू सुपर्णकुटी. ॥५६॥
भीमें धर्मापासीं ओढित नेला, धरूनि शेंडि, खळ,
झाला सुमृदु विराला; उदकीं केवळ विरे जसें डिखळ. ॥५७॥
सुटला गरुडें धरिल्या श्येनापासूनि काय तो लावा ?
कीं शरभधृतमृगेश्वरमुक्तेभासीं च राय तोलावा. ॥५८॥
भासे तो शंभुपुढें स्मर, यूपाजवळ कांपता पशु कीं,
धर्मीं भूतदयेस्तव उठले जैसे चि कांप, ताप शुकीं. ॥५९॥
भीम म्हणे, ‘ उघड दिसे हें चि खरें काय ? जी ! वदा नातें. ’
धर्म म्हणे, ‘ हा याचक, तूं देता कायजीवदानातें. ॥६०॥
जोंवरि नसे कवळिला, तोंवरि मंडूक दापितो भुजगा,
जो स्पर्शिला रणीं त्वां, न धरी कंडू कदापि तो भुज, गा ! ॥६१॥
हा वीरशीस करस्थित अनुचित, भारतीस वायससा,
सोड, वधावा सिंहें केला अपराध म्हणुनि काय ससा ? ’ ॥६२॥
भीम म्हणे, “ ‘ मीं तुमचा दास, ’ असें स्पष्ट बोल पापा ! हूं. ”
धर्म म्हणे, ‘ जावूं दे, न शकें मीं या धृतत्रपा पाहूं. ’ ॥६३॥
‘ नमन पुरे, रे ! जा, रे ! ध्याव्या, गाव्या, दिसोत गाईशा
शिवमूर्ति, कि रे ! यांचें लंघन सोसेल काय गा ! ईशा ? ’ ॥६४॥
अभय दिलें, तर्हि काढी, नमुनि विराटा, निकाम नीच पळ.
बोधीं बाहेरि निका होय, परि नव्हे निका मनीं, चपळ. ॥६५॥
यश सोडवूनि वसविति, पावुनि विजयोत्सवा, रणाजिर तें;
अभिमान हरिसि ज्याचा, कैसें तद्वस्तु वारणा जिरतें ? ॥६६॥
पांडुसुतांतें पूजुनि, मत्स्यपति म्हणे, ‘ दिली तुम्हां महि म्या
हे काय प्रत्युपकृति ? गाइन तुमच्या चि नित्य या महिम्या. ॥६७॥
कंका ! हो राजा, हे बल्लवमुख सचिवराय होवूत;
तुमचें यश शुचि, याहुनि दुग्धधिचा अधिक काय हो ! वूत ? ॥६८॥
हे क्षिति किति ? योग्य तुम्हीं भोगाया सार्वभौमपदवीतें,
ऐशा सुयशस्तीर्था ज्यां तुमचें सत्वविष्णुपद वीतें. ’ ॥६९॥
कंक म्हणे, ‘ आम्हांला राज्यादिक सर्व पावलें, नृपते !
ज्यां करद स्खलनीं जे, त्यांचीं नमिताति पावलें नृप ते. ॥७०॥
स्वाश्रयभजन स्वभजन, न परार्थ, स्वार्थ यत्न, हा राज्या !
त्या आपुल्या चि, केल्या सत्कृति चिंताख्यरत्नहारा ज्या. ॥७१॥
आधीं निजविजय पुरीं चार प्रेषूनि शीघ्र कळवावा,
नरसिंहा ! क्षिप्र सुहृद्धृदयसरोगाधिनाग पळवागा. ’ ॥७२॥
राय म्हणे, ‘ चर हो ! जा, चिंतातटिनींत तें न पुर वाहो,
सांगोनि विजय निजजनकर्णसुधापानकाम पुरवा, हो ! ॥७३॥
नगर अलंकृत करावा, अमरीकृतपुष्पवृष्टिला ज्यांची
शोभा विपक्ष ऐसी, स्त्रीनिकर करूत वृष्टि लाज्यांची. ’ ॥७४॥
कथिलें पुरासि धांवत जाउनि तें विजयवृत्त हेरजनीं.
पुरजन म्हणती, ‘ चिंता सरली, परि कसि सरेल हे रजनी ? ’ ॥७५॥