सर्गस्थित्यन्तकर्तारौ भक्तिगम्यावगोचरौ
उमामहेश्वरौ वन्दे सत्कृपासरिदर्णवौ ॥१॥
विद्यानिधी वरद संकटराशिनाशी
बुद्धि प्रकाशत असे स्मरतां जयासी
ज्याच्या कृपें सकल इच्छित पूर्ण होय
त्या श्रीगणेशचरणीं प्रणती मदीय ॥२॥
विलास तव शारदे म्हणति काव्य ज्यातें जन
महाकविहृदीं तुझें असत सर्वदा आसन ॥
न येत रस वाङ्मयाप्रति तुझ्या प्रसादाविना
सरस्वति तुला असो मम पुनः पुन्हां वंदना ॥३॥
जगदीशा हरि हे सुखकंदा
भीमा - तटवासिया मुकुंदा
जय परमेशा जय अविनाशा
तव चरणांची मजसी आशा ॥४॥
लभ्य न जें पद यतीतपींतें
मन्मन त्याची इच्छा करितें
वेडेपन हें कळतें मजसी
संतवचन परि दे धीरासी ॥५॥
ना योगानें ना तप करितां
भक्ति - बळेंच तुम्ही वश होतां
सत्यवचन तें संशय नाहीं
पंढरिमाजी अनुभव येई ॥६॥
पाय ठेवण्या पुरलें नाहीं
तुला वामना सर्व विश्वही
पुंडलिकाच्या एक विटेवर
तोच विठोबा तूं होशी स्थिर ॥७॥
अनंतरूपा मग हृदयीं मम निवास दुःशक नाहीं
हृदयहि माझें कठिण विटेसम आळ पुरवि इतुकी ही ॥८॥
तव पद देवा नसतां हृदयीं
कृष्णकथेची शुभ गंगा ही
स्रवेल कोठुन सांगा सांगा
मला कोरडा ठेवुं नका गा ॥९॥
वयास ज्याच्या वर्ष पांचवें
शब्द बोबदे जयें वदावे
करितो स्तवनायथार्थ तो ध्रुव
अशी योग्यता शंखांतहि तव ॥१०॥
अशा ऐकिल्या कथा कितीतरि
विश्वासें मी म्हणुन पदा धरि
अतां उपेक्षूं नको विठाई
दीन - वत्सले माझे आई ॥११॥
ज्ञान - भास्करा श्री ज्ञानेश्वर
भवत्पदांवर ठेवितसे शिर
जाणे केवळ ज्या गोविंद
तो गीतार्थहि केला विशद ॥१२॥
अभंगवाणी प्रसिद्ध ज्यांची
भंग करित जी भीति भवाची
तुकाराम, जे वरिष्ठ संतीं,
चरणीं त्यांचे एक विनंती ॥१३॥
महाराज जन अडव्यारानीं भरले होते त्यांसी
योग आजिला उद्धाराला झाडुन संतपथासी ॥१४॥
तितुक्यानें ना परी भागतें
कृपया अमुच्या धरा करांतें
तरिच भक्तिच्या जाऊं गांवा
हरिदर्शन आम्हांसी घडवा ॥१५॥
रामदास गुरूराज दयाघन
किती किती करूं तुम्हांस वंदन
तुमच्या शब्दांच्या सामर्थें
अधःपतितसें राष्ट्र वरी ये ॥१६॥
स्मशानभूचें आनंदभूवन
झालें, प्रसाद तव त्या कारण,
शरण आदरें भवत्पदाला
असो शिरावर हस्त आपुला ॥१७॥
भक्ति - रसाचे पाट जयांनीं
वाहवुनी उद्धरिली अवनी
सांवरिलें पडत्या धर्मातें
नमन तयां सकलहि संतांतें ॥१८॥
शिर घेउन तळहातीं लढले धर्मास्तव जे वीर
देशास्तव तनु झिजली ज्यांची नमन तयां बहुवार ॥१९॥
साई, पंडित गुरो वामना,
शिरसा वंदन तुमचे चरणा
कृपादृष्टिनें अवलोकावें
श्रीमंता मज सहाय्य व्हावें ॥२०॥
दास दीन हा सद्गुरूराया
गणुन आपुला धरिला हृदया
महा-कृपेची पांखर घालुन
राजसुतासम केलें लालन ॥२१॥
अपुल्या महतीचे चांगावे
दुबळ्या वाचें किति मी गावे
नमनस्नानें तव पदगंगा
मतिमल माझा नेवो भंगा ॥२२॥
विनतीचरणी जवळ असावें
कृष्णकथामृत हें वदवावें
नुसतें दावुनि अन्न न भागे
बालकास भरवावें लागे ॥२३॥
कृष्ण चरित हें मुळांत मोठें अधिकचि विचार करितां
क्षितिज जसें कां वाढत जातें उंच चढोनी बघतां ॥२४॥
मत्स्य नरहरी वामन भार्गव
अथवा रावणहंता राघव
अंशभाग असुनी विष्णूचे
अपार आहे चरित्र त्यांचें ॥२५॥
श्रीकृष्णाचें पूर्णांशाचें
चरित कसें मग गावें वाचे
कुणा देखवे प्रखर असा रवि
अंशहि ज्याचा डोळे दिपवी ॥२६॥
कुंठित होती थोर थोर कवि
कृष्णकथा ती मी कां गावी
शेष धरी कष्टें भूगोला
इच्छित त्या उचलण्या विरोळा ॥२७॥
कृष्णचरित्राची महती ती
आणिक माझी कवित्व - शक्ति
परस्परांची करितां तुलना
खंडीलाही पुरी रती ना ॥२८॥
असून याची पुरती जाणिव हाव कथेची धरिली
तें नच अभिमानें हो मजसी भाग गोष्ट ही झाली ॥२९॥
श्री नारायणराव भूपती
पटवर्धन - वंशीय सन्मती
हृदयरत्न जें सती उमेचें
शासन करि जो मिरजपुरीचें ॥३०॥
आग्रह मज तो करी नरपती
चौपाईच्या चालीवरती
कृष्णचरित्रा करणें गायन
श्री तुलसी जेवीं रामायण ॥३१॥
नाहीं म्हणनें शक्य न मजसी
कृतघ्न व्हावें कसें तयासी
या राज्याच्या अन्नावरतीं
पूर्वज माझे जगले असती ॥३२॥
त्यांतुन आणिक पुनः असें ना,
पीतां करि जें तृप्त तत्क्षणा
अमृत प्यावया सुमदुर असलें
पराग्रहाचें कारण कसलें ॥३३॥
“ वत्सा म्हणुनी ” वदती गुरुवर, “ घे मम कार्य शिरीं हें ”
आज्ञा कैसी मोडूं यास्तव धजलों मद हा नोहे ॥३४॥
पावन करि जें नुसतें स्मरतां
यत्स्पर्शे ये मोक्षचि हातां
अशा जाह्नवी - जलीम नाहणें
कुणास असतें नको मनानें ॥३५॥
तसेंच या श्रीकृष्णकथेसी
अवगाहन ये मम भाग्यासी
इच्छित तेंची चालुन आलें
पूर्वपुण्य जणुं मूर्त उदेलें ॥३६॥
कृष्णकथेचे असंख्यात गुण
एकच त्यांतिल करितों वर्णन
दुर्लभ जी शांती इतरांतें
ती या योगें खचित लाभते ॥३७॥
ब्रह्मनिष्ठ बुद्धीचा सागर
ज्ञान - नभींचा जणुं कां दिनकर
व्यास महर्षी रचुनी भारत
धर्मादी - पुरुषार्थ विवेचित ॥३८॥
लिहिलीं नाना - परी पुराणें
नवरसमंडित विस्तारानें
चार भाग केले वेदांचे
सार काढिलें उपनिषदांचे ॥३९॥
तर्क - बुद्धि - निकषावर केली जिज्ञासा ब्रह्माची
सतत चिंतिलें तत्त्व परी ना शान्ती होत मनाची ॥४०॥
अंतीं त्यासी कथिती नारद
शुष्क खलें नास थिर हो पारद
दिव्य औशधी त्या स्थिर करिती
तसेंच चित्ता कृष्णकथा ती ॥४१॥
विदुषी झाली शिकुन बहू जरि
उपवर कन्याकृतार्थ ना तरि
व्यासा तेवीं तुमची वृत्ती
जों न अर्पिता भगवंता - प्रति ॥४२॥
व्यासें रचिलें म्हणुन भागवत
जेथ उसळतें कृष्ण - कथामृत
प्रसन्नता ये मग हृदयातें
शरदानें जणुं जलाशयातें ॥४३॥
याच कथेच्या श्रवणरसाप्रत
लोलुप झाला भूष परीक्षित
मृत्यु उभा असतांही पुढती
कथा परिसतां लव ना खंती ॥४४॥
ती गोडी या कृष्णकथेची
आजवरीही नित्य नवीची
आद्यकवीची जणुं का प्रतिभा
रम्य उषा प्रतिदिनीं वा नभा ॥४५॥
व्यास वर्णिता कथा म्हणुन हे सज्जन गातचि आले
मिरा कवि जयदेव रंगले सुरदासादिक भुलले ॥४६॥
याच कथेच्या रस - लोभानें
प्रवृत्त मीही येथ नयानें
गरुडभरारी ज्या आकाशीं
तेथ जशीका उडते माशीं ॥४७॥
परी तुमचिया आधारावर
महाराज मी होइन पार
तुम्हां विनविलें याच कारणें
मज दीनाचें सहाय्य करणें ॥४८॥
अज्ञ काढितो सुरेख अक्षर
शिक्षक त्याचा हात धरीं जर
उंच फळहि ये बाळा हातीं
वडिल तया जरि उचलुन घेतीं ॥४९॥
शीड सुकाणूं भवत्कृपेंचें
होडीला मम मिळतां साचें
काठिण्याचा तरेन सागर
विघ्न - वीचि उसळती जरी वर ॥५०॥
प्रसाद तुमचा हाच वसंत
मम बुद्धीच्या शून्य वनांत
फुलविल सुमनें पानोंपानीं
सुरभित जीं कां कृष्णकथांनीं ॥५१॥
पुरे कशाला शिणवूं वाचा
जननी जाणे हेत शिशूचा
कुमुदवनासी विकसित करणें
सुधाकरातें नको सांगणें ॥५२॥
अहो संतजन पुनः एकदां
वंदुन तुमच्या पदारविंदा
कृपाजलानें होउन सिंचित
आरंभित मी कृष्ण - कथामृत ॥५३॥
मुनिसह दानव पीडित भूमी गोरूपें विष्णूसी
विनवी माझा भार हरावा जन्मुन मानव - वंशीं ॥५४॥
भूचें करुणा - भाषण परिसुन
तिज आश्चासन दे करुणाघन
घेइन तुजसाठीं अवतार
करीन गे दुर्जन - संहार ॥५५॥
केवळ या आशिर्वचनानें
गमे हायसें मही - कारणें
तीरवायुही नुसता जेवीं
ग्रीष्म - तप्त पथिकास शांतवी ॥५६॥
परतुनि येतां ऋषिवर्यानीं
नारदास कथिलें हर्षानीं
अतां जन्म घेणार रमावर
करण्यासी दुर्जन - संहार ॥५७॥
आनंदित नच नारद झाले शून्यमनें म्हणती ते
यांत काय तरि विशेष ज्याचा हर्ष होत तुम्हांतें ॥५८॥
प्रखर वज्र वेगें कोसळलें
शेणाचे नी गोळे फुटले
गजराजानें पायाखालीं
अहो म्हणे ढेकणें चिरडलीं ॥५९॥
श्रीसूर्यानें प्रखर मयूखीं
काय सुकविणें नुसतीं डवकीं
शंकर उघडी तिसरा डोळा
तयें म्हणे जळला पाचोळा ॥६०॥
तसेंच हास्यास्पद हें तुमचें
आश्वासन मज वाटत साचें
कर्तुमकर्तुं शक्ति तयानें
क्षुद्र दुष्ट वधण्यांत वेचणें ॥६१॥
जन्म सातदां यानें धरिलें
आणिक नुसते दुर्जन वधिले
तेंच जरी करणार पुनः तो
म्हणेन जन्मा उगीच येतो ॥६२॥
कथितों त्यासी जाउन आतां कशास हे श्रम करिसी
शस्त्र - वैद्य कां थोर पाहिजे साधारण काट्यासी ? ॥६३॥
असें ऐकतां नारद - भाषण
बघतचि बसले नुसते मुनिजन
पारख थोरांच्या हेतूची
सामान्यांतें होइल कैची ॥६४॥
यज्ञयाग निर्विघ्नपणानें
पार पडोनी त्याच बळानें
सुख मिळवावें स्वर्लोकींचें
परम साध्य तें हेंच जयांचें ॥६५॥
सकाम - कर्मांमधेंच रमती
सदा वासना वसते चित्तीं
असे लोक कोठून जाणिती
निरिच्छशी निरूपाधिक भक्ती ॥६६॥
वात्सल्याची काम - विहीना
शिशूस यावी कशी कल्पना
आईची कीं गरज भासते
स्तनपानापुरतीच जयातें ॥६७॥
हिमधरसुंदर गौरकलेवर नारद अरुणांबरधारी
छेडित सुस्वर विद्युत्भास्वर वीणा श्रीवर - भजन करी
ज्याचें अंतर करुणानिर्भर उद्धरण्या नर भूवरचे
क्षीर - सागरा जाई सत्वर मंदिर जें श्रीविष्णूचें ॥६८॥
क्षीरार्णव तो अतिशय सुंदर
सुवर्णकणवालुका तटावर
नसे अंत ना पार तदीय
संस्कृत भाषेचें जणुं वाङ्मय ॥६९॥
कुंद मोगरा जुइ वा जाई
शुभ्र वर्ण त्या कमलाचाही
परी क्षीर - सागरीं पसरला
असे धवलिमा कांहिं निराळा ॥७०॥
शील - संपदा पतिव्रतेची
उज्ज्वल कीर्ती आद्यकवीची
आणि शिवाचें हास्य मनोहर
चंद्रकरांनीं वितळविलें जर ॥७१॥
मोत्याच्या पात्रांत घेउनी
मंथन करितां हंसपिसांनीं
येइल जें नवनीत तयावर
क्षीरार्णव हा तसाच सुंदर ॥७२॥
अमृतकौस्तुभादिक जीं रत्नें
याच निर्मिलीं क्षीराब्धीनें
संपत्तीची होय देवता
लक्ष्मीचा त्या हाची जनिता ॥७३॥
हिरे माणकें मोतीं हेची शंख शिंपले येथें
पुरवितात जे सकल मनोरथ वृक्ष असे तीरातें ॥७४॥
अशा मनोहर दुग्धसागरीं
श्रीमंतांची रमली स्वारी
शेषतनूचें मृदुल शुभासन
नीलमण्या जणुं सुवर्ण कोंदण ॥७५॥
नाभी - कमलीं बसुन विधाता
पठण करितसे वेद - संहिता
गरूड उभा कर जोडुन पुढती
ठेउन दृष्टी चरणांवरतीं ॥७६॥
सेवाया हरि - चरण - सरोज
घेत इंदिरा अंकावर निज
परि करवेना तिज संवाहन
पद कोमल ते करकमलाहुन ॥७७॥
स्तवन हरीचें करीत तुंबर
त्या भजनाचे मंजुलसे स्वर
मंदवायुच्यासवें पसरती
तीरवृक्ष जणुं तयेंच डुलती ॥७८॥
भजनाच्या त्या आलापांनीं नारद रंगुन जाती
आगमनाचा हेत विसरले स्वयें साथही देती ॥७९॥
श्रीनारायण जय नारायण
करुणाघन हरि पंकजलोचन
दीनजनोद्धर भक्तप्रियकर
विश्वंभर मां पाहि रमावर ॥८०॥
देहभान हरपलें तयांचें
नाम स्मरतां भगवंताचें
कंथ दाटुनी गहिवरला स्वर
ओघळती अश्रू गालांवर ॥८१॥
उभे सर्व रोमांच तनूवर
भक्तीसी जणुं फुटले अंकुर
एकच घुमतो चहूंकडे स्वन
“ श्रीनारायण जय नारायण ” ॥८२॥
ध्वनिलहरींनीं त्या भजनाचे
डोलविलें हृत्कमल हरीचें
शब्दभृंग उमटले तेथुनी
परिपूरित जे प्रेममधूनीं ॥८३॥
“ सुस्वागत तव असो नारदा अससि कुशल ना सांगे
हृदयवनाचा वसंत मज तूं भेटलास कीं अंगें ” ॥८४॥
स्निग्धवचन तें घनगंभीर
ऐकुन नारद ये भानावर
जवळी येउन नम्रपणानीं
मस्तक ठेवियलें श्रीचरणीं ॥८५॥
चहुहातें त्या दे आलिंगन
प्रेमभरानें श्रीनारायण
पुरुषार्थांनीं जणों चारही
भक्तिभाव हा धरिला हृदयीं ॥८६॥
“ भक्तवरा वद काय कारणें
तुवां मजकडे केलें येणें ”
वदत नारदा पंकजलोचन
“ सहज नसे हें तुझें आगमन ” ॥८७॥
नारद सस्मित मुखें म्हणाले
“ उपकारांचे डोंगर झाले
देवा तव, आमुच्या शिरावर
याच कारणें आलों इथवर ॥८८॥
उपकारांचें झालें तरि ते ओझें हलकें नसतें
पुनः जन्म घेऊन महीवर भर कां घालिशि त्यातें ॥८९॥
नाश व्हावयाचा होणार
उपकारांचा भार पुनः वर
कोण करिल हा बुडाता धंदा
घ्यावा ना अवतार मुकुंदा ” ॥९०॥
विस्मित होउन देव म्हणाले
“ भाषण तव नच मला कळालें
अवतारांचा हेतू तुजसी
विदित असोनी कां हें वदसीं ” ॥९१॥
“ वा वा देवा मलाच म्हणतां
वेड बळानें कां पांघरितां
सोपें निद्रित नर जागविणें
जागृत केवीं जागा करणें ॥९२॥
सूज्ञ तुला सर्वज्ञ मानिती
तरी न कळली काय परिस्थिति
वैकुंठासी टाळें बसले
नगर यमाचें गजबजलेलें ॥९३॥
तुम्ही सात अवतार घेतले किती तारिले सांगा
मत्स्य कूर्म वा वराह तिसरा जन्म फुका श्रीरंगा ॥९४॥
चवथ्या अवताराचे ठायीं
कितीतरी आडंबर होई
थोर गर्जना मही तडाडे
तरलें एकच पोर बापुडें ॥९५॥
पुधें बोलण्या सोयची नाहीं
तुम्हीच केली भिक्षा देही ”
नांव कशाला उद्धाराचें
अधःपतन केलेंत बलीचें ॥९६॥
ज्यानें वधिली अपुली आई
इच्छावें त्याकडुनी कायी
उद्धराच्या कामासी या
रागिट माणुस अगदीं वाया ॥९७॥
पांच सहा पुढच्या अवतारीं
तारियले, नल, अंगद, शबरी,
पवनात्मज, सुग्रीव, बिभीषण,
येथ संपलें तव रामायण ॥९८॥
असा तुझा परिवार चिमुकला काय असावा देवा
आम्रतरूसी शोभतात कां चार आठ पानें वा ॥९९॥
वैकुंठांतिल शून्य - मंदिरें
काय तुला रुचतात मुरारे
लोक न नरकामधें मावती
नित्य नवनव्या पेठा वसती ॥१००॥
प्रथम प्रतिज्ञा तव हृषिकेशी
उद्धरीन मी संतजनांसी
तिचें दिसत झालें विस्मरण
करितांना दुसरीचें पालन ॥१०१॥
अतां आठव्या वेळेसी तरि
महत्त्व दे पहिलीस मुरारी
तुझ्या हातुनीं हें न घडे जर
नको अम्हांसीं तव अवतार ॥१०२॥
तुझें जनन होऊन महीवर
अनुभविती जर नरकासी नर
तरी अधिक ना खचित तयाहुन
दुर्जन अमुचें करिती पीडन ॥१०३॥
इहलोकीं अथवा परलोकीं नरकच भालीं असला
तुमच्यास्तव मी दुर्जन वधिले हा बडिवार कशाला ॥१०४॥
असें ऐकतां नारदभाषण
लक्ष्मी ये पतिसाह्या धावुन
“ संतचि आतां कोठें उरले
थोडे होते ते उद्धरिले ॥१०५॥
यांत नसे अपराध हरीचा
दोष असे हा तुम्हां नरांचा
संत व्हावया सिद्ध न कोणी
लाभतसे फल जशी पेरणी ” ॥१०६॥
नारद यावर म्हणे उसळुनी
“ हाही दोष हरीचा, जननी
हा न कुणासी संत होउं दे
भुलवित त्यासी छंदें ॥१०७॥
आभिष दावि कुणा स्वर्गाचें
कुआण धनाचें, कुणा यशाचें,
कंठीं बांधित कुणा कामिने
क्रोध मत्सरा वाढवी मनीं ॥१०८॥
स्वतःच मोहा कारण होउन मोहितास दंडावें
अनार्यनीती ही त्यापरि कां ईशेंही वागावें ॥१०९॥
त्यांतुन देवी पुनः असें बघ
पाप्यासीची अवश्य तारक
पत्यानें जे नित्य राहती
कशास त्यांनां वैद्य लागती ॥११०॥
अघमलहर पावनी गौतमे
मलिनांच्याची येते कामीं
काय अर्थ जरि करिल पयोधर
शेत सोडुनी वर्ष तळ्यावर ॥१११॥
शुद्ध शांत ज्यांचें आचरण
मुक्तचि ते त्या कशास तार्ण
रत्न न देवी पर-प्रकाशित
चंदन कोणा गंध न मागत ॥११२॥
“ पुरें, नारदा, सांग मला तूं काय मनीं तव आस
पूर्ण करिन, मी वदे रमावर आहे ना विश्वास ॥११३॥
“ पुरा भरंवसा तुझा असे मज
म्हणुन येथवर आलों आज
सर्व लोक, देवा, उद्धरणें
याहुन दुसरें नसे मागणें ॥११४॥
चुगलखोर वा चोर असो तो
परदारेसह अथवा रमतो
शरण पदां तव येतां भावें
मागिल दोष तुम्हीं न बघावे ॥११५॥
अधराशीही असुन तरावा
जो जो तुमचा म्हणविल देवा
गोदेला ये मिळण्या मोरी
घाण म्हणोनी ती न अव्हेरी ॥११६॥
मर्त्य जन्म तो मर्त्य - शिक्षणा
ऐसें कथिलें असे पुराणां
सांग परी मजसी हृषिकेशी
काय तुवां शिकविलें जनांसी ॥११७॥
प्रसंग येती घडोघडीला
गांठ खलाशी प्रतिक्षणाला
धर्मांधर्मीं भ्रमित अंतरें
तदा कुठें शोधणें तुला रे ॥११८॥
उदात्त - चरिताचा आदर्श
व्यवहारीं नित ना कामास
चलन म्हणोनी काय चाललें
मूल्यवान जरि रत्न जाहलें ॥११९॥
उन्नत तव चारित्र्य असावें प्रतिदिन परि संसारीं
बोध तुझा पथदर्शक होवो देवा या अवतारीं ॥१२०॥
सात जन्म तव अपूर्ण देवा
अतां पूर्ण अवतार धरावा
लोकांनीं हा सदा रहावा
आठवीत तव जन्म आठवा ॥१२१॥
प्रत्येकाच्या हृदयामध्यें
तव भक्तीचा उदय होउं दे
श्री नारायण जय नारायण
दुजें न कानीं येवो याविण ॥१२२॥
सर्वांच्या पायांचा भार
घेतों मी माझ्या डोक्यावर
नको मला सुख नको मोक्षही
शतदां भोगिन गर्भवासही ॥१२३॥
पापांचा मज सर्व दंड दे
सुख अर्तांचें परी बघूं दे
अशक्य जरि हें असेल सगळें
मिटवी देवा माझे डोळे ॥१२४॥
पुढें न वदवें नारदास हरिचरण घट्ट मग धरिले
पूर लोटला नयनाश्रूंचा प्रभुहृदयहि गहिंवरलें ॥१२५॥
“ धन्य नारदा ही तव वृत्ती
कोण परासाठीं कळवळती
उगीच तुम्ही नच संतजनांनीं
मला बांधिलें भावबळांनीं ॥१२६॥
घे हें देतो तुज आश्वासन
पतितोद्धारासाठीं येईन
यादववंशीं धरीन जन्म
आदि - पुरुष ज्या वंशा सोम ॥१२७॥
ऐकतां अशा वचास हर्ष फार नारदा
बोलला रमावरास शीर्ष ठेवुनी पदां
माय बाप तूं खरा अमाप ताप वारिले
शांतशा रसें मदीय अंतरंग रंगलें ॥१२८॥
लोकांसी कथितों अतां सकल हें जाऊनियां भूवरीं
आनंदून करा महोत्सव तुम्हां तारावया ये हरी
पापी ही असला कुणी परि जरि सेवील भावें पदां
होवोनी परिहार मागिल पुढें येईल ना आपदा ॥१२९॥
अवतार पीठिका नांवाचा पहिला सर्व समाप्त
लेखनकाल :-
वैशाख, शके १८६७