श्रीकृष्ण कथामृत - अठरावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( महन्मंगल )

हे गंगाधर देवदेव चरणौ वन्दे त्वदीयौ शुभौ
दीनं ममुररी करोषि भगवन्, प्रायोऽपि हीन गुणैः
संतुष्टोस्मि तथाधुनाऽखिलगुरो शंभो प्रसादात् तव
सर्वे सन्तु निरामयाःक्षितितले भद्राणि पश्यंतु च ॥१॥
जयीं मजवरी कृपा सतत ओतिली आपुली
धरून मजसी करीं सकल संकटें वारिली
मला जवळ घेउनी हरिकथा - दुशा पाजिली
दयाळु गुरु संत हे नमन त्यांचिया पाउलीं ॥२॥
मंगलकर - जल तीर्थपतीचें
तसें घेउनी पुण्य - नद्यांचे
अभिषेकी कीं स्वये रमावर
धर्मासी सम्राट पदावर ॥३॥
उपनिषदांची वि चा र धा रा
ओतुन जेवीं जीव शरीरा
सद्गुरु त्यासी ब्रह्मपदावर
नेत तसा हा प्रसंग सुंदर ॥४॥
ब्राह्मण म्हणती वेद ऋचांसी
तत्पर होते व्यास महर्षी
बंधू ढाळिति छत्रें चामर
मंगल वाद्यें घुमती सुस्वर ॥५॥
सरलें शासन खल नहुषाचें
राज्य पुनः हो पुरंदराचें
हर्षित झाले तदा जसे सुर
तसे आतां लोक मद्दीवर ॥६॥
प्रसन्न चित्तें करी प्रजाजन जयजयकार नृपाचा
द्रौपदीस हरि म्हणे ऋणांतुन मुक्त तुझ्या मी साचा ॥७॥
म्हणे सती ती करुनी वंदन
प्रेमपाश परि करिती बंधन
भक्त जोंवरी असती देवा
तोंवर जाशिल सांग कुठें वा ॥८॥
पावुन निष्कंटक राज्याहीं
युधिष्ठिरा सुख लवही नाही
येत असे वैताग तयातें
सोडित ना खिन्नता मनातें ॥९॥
कुलक्षया मी झालों कारण
पापगिरी हा नच सिंहासन
गुरुजन वधिले वधिले बांधव
वधिले क्षत्रिय कुल मी शिव शिव ॥१०॥
अधमाधम मी दुर्जन पापी
योग्य राजपद मज न कदापि
वनांत जातो त्यजुनी सारी
लोकहिता मी नच अधिकारी ॥११॥
शोक तुला नच शोभत धर्मा वेड शिरे कुठुनी हें
भीष्म पितामह शांतवील तुज चाल तिथें लवलाहें ॥१२॥
परिसुनियां हें हरिचें भाषण
धर्म उत्तरे सद्गद होउन
मुख हें दावूं कसे तयासी
अन्यायें मी छळिले ज्यासी ॥१३॥
कोपा येतिल बघतां मातें
घोर शाप देतील हरी तें
पडले ते पंजरीं शरांच्या
किती वेदना असतिल त्यांच्या ॥१४॥
त्रासिक होतो पीडेनें नर
त्यांतहि पीडा किति ही दुर्धर
लज्जा वाटे वाटे भयही
व्याकुळता बहु येते हृदयीं ” ॥१५॥
“ धर्मा संशय तुझा निकामी
म्हणे हरी त्या ओळखितो मी
थोर हृदय त्या सत्पुरूषांचें
मुनिही गाती पवाड त्यांचें ॥१६॥
क्षमादयेचा सागर रे तो पुतळा सद्धर्माचा
ब्रह्म तया प्रत्यक्ष न लागे श्रुतिसी पार जयाचा ॥१७॥
देइल शांती तुझ्या मना तो
अधोगतीसी संशय नेतो
चुकलों चुकलों वाटत जें तें
चाळविते कीं तव हृदयातें ॥१८॥
सुखें जाय तूं भीष्मापाशी
वंद्य महात्मा तो गुणराशी
उपदेशानें त्य अधीराचे
कृतार्थ होइल जीवन साचें ॥१९॥
पांचालीसह घेउन पांडव
कुरु भूमीवर येत रमाधव
महापुरूष तो जेथ्य निजेला
ज्या भंवती मुनिगण जमलेला ॥२०॥
समाप्तमख पावन वैश्वानर
मावळता वा जणों दिवाकर
अर्घ्य द्यावया त्या प्रेमाचें
जमले जणु समुदाय मुनींचे ॥२१॥
रथांतुनी उतरून अनवाणी पांडव जवळी आले
उच्चारूनि निजनाम आदरें भीष्मा वंदन केलें ॥२२॥
हर्ष जाहला पितामहासी
जवळी यारे म्हणे तयांसी
अंगावरूनी फिरवी हाता
गद्गद अर्जुन ‘ ताता ताता ’ ॥२३॥
वंदन केलें श्रीकृष्णेंही
वदे “ शांत ना तव मन राही ?
तुज सम नाहीं थोर महात्मा
नव्हता होइल पुढें कसा मा ॥२४॥
धर्मराज हा प्रिय तव नातू
दर्शनास ये धरूनी हेतू
पाप लागले ज्ञातिवधाचें
तया सारखें वाटत साचें ॥२५॥
शोक मोह हा हरी तयाचा
अधिकारी तव विमला वाचा
व्यवहाराचें नृपनीतीचे
धर्म कथी या मोक्षपदाचे ॥२६॥
भगवंता पाहून समोरी झालें सुख बहु भीष्मा
धन्य धन्य मज भेटलास तूं हे सच्चित्सुख धामा ॥२७॥
श्रीकृष्णा तव अतुल कृपेनें
स्वस्थ असे मी येथ सुखानें
दृढ आहे मम मन मति वाणी
शक्ति तुझी ही रथांगपाणी ॥२८॥
कारण कार्याहुन तूं परता
अद्वितीय तव अगाध सत्ता
आदि मध्य तुज अंतहि नाहीं
ब्रह्म परात्पर तूं या ठायीं ॥२९॥
अदिती पोटीं द्वादश मूर्तिं
सूर्य तूंच कीं सुवर्ण - कांती
सुधाधवल मृदुशीतल इंदू
तूंच देव - पितरां सुख सिंधू ॥३०॥
बृहदुक्थीं वा अग्निष्टोमीं
स्तविती ब्राह्मण ज्या निष्कामी
वेस्ररूप तो तूं परमेश्वर
योग शयन करिशी शेषावर ॥३१॥
प्राणजयी योगी जी ज्योती दहरीं बघती ती तूं
सहस्रदल जे कलम असें कीं ते तव निवास हेतू ॥३२॥
सकल चिकित्सा आरोग्यासी
अर्थ एकची बहुविध भाषीं
जशा प्रवृत्ती सर्व सुखास्तव
धर्म विविध तूं ध्येय रमाधव ॥३३॥
शिव तूं ब्रह्मा प्रजापती तूं
इंद्रवरूण यम दिक्पालहि तूं
विश्वात्मा तूं सर्वव्यापक
जीवा सद्गुरू तूं उपदेशक ॥३४॥
वंदन तुजसी त्रिगुणातीता
नमन असो तुज कमलाकांता
भवभयखंडन यदुकुलमंडन
वरचेवर तुज सादर वंदन ॥३५॥
धर्माचा तूं सखा दयाळा
आणियलें कां इथें तयाला
तुजपेक्षां का ज्ञान असे मज
वेद तुझे निश्वास अधोक्षज ” ॥३६॥
“ तुझी योग्यता शांतनवा बहु थोर तूंच उपदेशी
वडिल वयानें धर्म कसें मग बोधावें मी त्यासी ॥३७॥
तव वदनी जीं येतिल वचनें
वंद्य जना तीं स्मृतिप्रमाणें
होतिल हा मम वर या बोला ”
विनवी तेंची मुनिजन त्याला ॥३८॥
“ भीष्मा पावन अपुली वाणी
शांतिसुखाची जणु का खाणी
अम्हा ऐकवा हीच विनंती
विफल याचना होत न संतीं ॥३९॥
बरें म्हणोनी पितामहानें
धर्मा दिधली शांतपणानें
योग्य उत्तरें तत्प्रश्नांची
ज्यांत रहस्ये नृपनीतीची ॥४०॥
वदे नीति ही नित पाळावी
चूक अल्पही त्यांत न व्हावी
मनुष्य म्हणुनी चुकावयासी
अवसर नाही लव नेत्यासी ॥४१॥
मनुज करांतुन सहजी चुकतें
सत्य असे तें व्यक्ती पुरतें
झाल्या, लव मर्यादित हानी
परी नृपाचे तसें न जाणी ॥४२॥
प्रजाहिताचा भार जयावर
राजकारणीं तो चुकला जर
भयद संकटें जनतेवरतीं
धर्मा मग अविरत कोसळतीं ॥४३॥
विनाश होतो स्वगुणें कोठें
कुठें दैव पडतें उफराटें
नाश कुठें फल अज्ञानाचें
कुणा बाधती स्वार्थ खलांचे ॥४४॥
विनाशपथ हे यत्नें टाळी सावध नित्य असावें
‘ होणारें चुकते न कधीं हें व्यवहारीं न वदावें ॥४५॥
वीर पुरूष जो उद्योगीं रत
दुर्लभ त्या नच जगतीं किंचित
केवळ दैवावर भरंवसता
उन्मुखही फळ येत न हातां ॥४६॥
अहंकर निज उदात्ततेचा
घातक होतो पहा प्रजेचा
लोकहितास्तव खालीं येउन
करितां कांहीं त्यांत न दूषण ॥४७॥
शिवशीर्षाहुन हिमनग शिखरीं
पुढतीं भूंवर तिथुन सागरीं
खालखालतीं उत्तरे गंगा
करावया नतजनमलभंगा ॥४८॥
अधःपतन हें त्या सरितेचें
अविवेकी जन वदतिल वाचें
उदात्त हेतूस्तव ये खालीं
खरी थोरवी यांत मिळाली ” ॥४९॥
कथिलें वर्णाश्रम धर्मासी
सुख साधन जें ब्रह्मपदासी
ध्येयहि कथिलें कर्तव्यासह
धन्य धन्य तो भीष्म पितामह ॥५०॥
शोक नाशिला पार तयाचा अंती म्हणती त्यासी
युधिष्ठिरा करि अश्वमेध तूं भूषण जो राजासी ॥५१॥
मानुन आज्ञा करूनी वंदन
पांडव आले गेहीं परतुन
म्हणे अर्जुंना श्रीहृषिकेशी
सोड मोकळा अश्व महीसी ॥५२॥
इतर तिघे जा हिमालयासी
अपार आणा सुवर्णराशी
पुण्य तिथें संवर्त मुनीचे
सांचे धरूनी रूप धनाचें ॥५३॥
पांडव तत्पर हरि वचनांते
गेला अर्जुन दिग्विजयातें
इकडे वेळा विचित्र आली
सती उत्तरा प्रसूत झाली ॥५४॥
बाळ जन्मला परि  मेलेला
जळुनी जो कीं पडला काळा
नीच कर्म तें द्रोण सुताचें
अधम किती हे हृदय खलांचे ॥५५॥
हंबरडा फोडीत उत्तरा हाणी हात कपाळीं
सहन न झाले दुःख तिला तें अबला मूर्च्छित झाली ॥५६॥
रडे द्रौपदी रडते कुंती
शोकासी त्या सीमा नव्हती
काय जाहलें हे बघण्यासी
येत हरी सूतिकागृहासीं ॥५७॥
मृत - शिशु ठेवुन हरिचें चरणीं
म्हणते कुंती केविलवाणी
काय जाहलें पहा प्रभो हें
सोसावें रें दुःख किती हें ॥५८॥
बाळें मेलीं पांचालीची
तीच गती प्रिय अभिमन्युची
वंशां न हा एकच उरला
आशेसह तो पार जळाला ॥५९॥
व्हावा का न्रिवंश असा रे
परलोकाची मिटलीं दारें
गोविंदा माधवा दयाळा
तूंच अतां वाचीव अम्हाला ॥६०॥
सती उत्तरा सावध होउन थोर करी आकांता
कुणाकडे पाहुन देवा मी सांग जगावें आतां ॥६१॥
दशा अशी पाहून सुनेची
भरली नयनें श्रीकृष्णाची
दयाघनाचें कळवळलें मन
आसन घालून करी आचमन ॥६२॥
करी प्रतिज्ञा श्रीहृषिकेशी
ऐकवीत जणूं सर्व जगासी
कधि न असत्यें विटाळले मुख
जिवंत ओवो तरि हा बालक ॥६३॥
अधर्म वर्तन केलें नाहीं
अधर्म ना बोधिला कुणाही
स्वार्था झालों कुणा न घातक
जिवंत होवो तरि हा बालक ॥६४॥
दुष्टा वधिलें धर्मासाठी
युद्धांतुन ना फिरलो पाठीं
सत्य जरी गोब्राह्मण पालक
जिवंत होवो तरि हा बालक ॥६५॥   
काया वाचा मने जरी मी पाप न केलें कांहीं
इंद्रियजय जरि सत्य असे तरि बाळा परतुन येईं ॥६६॥
सरस्वती ही परमेशाची
जीवन - मंगलता विश्वाची
सचेत झाले सतेज बालक
निरखुन पाही श्रीहरिचें मुख ॥६७॥
इवले इवले जरि ते डोळे
हर्ष सुखाचें निधान झाले
प्रथम सान तीं फुललीं कमलें
वदनचंद्र तें पाहुन हसले ॥६८॥
बाळ उरासी उचलुन घेई
उत्तरेस ना वदवे कांहीं
आनंदाश्रू हरिचरणासी
निवेदिती जें तिच्या मनासी ॥६९॥
कृतज्ञ करिती सर्वहि वंदन
आले विजयी जइं भीमार्जुन
कळतां सारें वृत्त तयांसी
शक्ति न मज ते वानायासी ॥७०॥
पुढें हरीच्या कृपाप्रसादें हयमख सिद्धी गेला
अपूर्व वैभव पाहुन झाल अविस्मय फार जनांला ॥७१॥
दान जोंजळी भरूनी रत्नें
हेम दक्षिणा नुचले यत्नें
आब्राह्मण चांडाल सर्वही
तृप्त जाहले मिष्टान्नाही ॥७२॥
कोषागारें करी रिकामीं
दान सर्वही दिधली भूमी
श्रीमंतीचें असेंच लक्षण
दान हेंच राजाचें भूषण ॥७३॥
चंचल सर्वहि वैभव सत्ता
कीर्ति एकची कीं स्थिरमत्ता
उदारता ही कारण येथें
धर्माचें यश विश्वहि गातें ॥७४॥
परममहोत्सव तो आनंदें
तडीस गेला हरिप्रसादे
उणें अल्पही पडले नाही
दिग्गज झाले शुभ्र यशेंही ॥७५॥
समाधान वाटलें प्रभूसी आलिंगन धर्मा दे
आज मला कृतकृत्य वाटलें म्हटलें श्री गोविंदे ॥७६॥
युधिष्ठिरानें नाना रीतीं
पूजियलीसे ती श्री मूर्ती
विनवी देवा जवळी राही
तव विरहें भय वाटत पाही ॥७७॥
तारे रविहुन बहु तेजस्वी
परी दूरता त्या लुकलुकवी
म्हणुन न व्हावें दूर दयाघन
नेम न विषया भुलेल कधिं मन ॥७८॥
प्रसन्न हांसुन म्हणे मुरारी
गेले आतां तें भय दूरीं
येतों, मोदें निरोप द्या मज
द्वारकेस मग येत अधोक्षज ॥७९॥
भगवंताच्या छत्रा खालीं
सर्वसुखें यादवां मिळाली
अलोत वैभव अपार सत्ता
भय कसलें ही नव्हतें चित्ता ॥८०॥
रमले सारे सुखांत भौतिक
रजस्तमां बळ हरलें सात्विक
नयनीतीची चाड न उरली
विषय वासना हृदयीं भरली ॥८१॥
ज्ञाते झाले स्वार्थ परायण
सशक्तास मद चढला दारूण
धनलोभानें गिळिलें वणिजा
उद्धट सेवक करिती गमजा ॥८२॥
अनाचार सर्वत्र माजला भय नुरले धर्माचें
स्नेह नम्रता आदर सरले स्वैरपणा बहु नाचे ॥८३॥
मद्यपान कलह व्यभिचारा
लोलुप जन वाव न सुविचारा
स्थल ना कोठें विश्वासासी
शतपळवाटा निर्बंधासी ॥८४॥
नित्य नवे निर्बंध करावे
वासुदेवें ते फोल ठरावे
पातक केवीं लपलें जाइल
हीच वाहती मग चिंता खल ॥८५॥
महत्व येतां कामार्थासी
निर्बंध न ये उपयोगासी
धर्मचि करितो समाज धारण
भ्रांत जनां हें पटे न कारण ॥८६॥
श्रद्धा होती जी वडिलांची
तरुणां वाटे मूर्खपणाची
वागवितां त्या अपमानानें
खंट न वाटे कुणा मनानें ॥८७॥
यथेच्छ निंदा पूज्य जनांची करतां भूषण वाटे
शिकलेल्यांची ऐकुन भाषा उठती देहीं कांटे ॥८८॥
स्त्रीपुरूषीं ना दृष्टी पावन
थट्टा वाटे विवाह बंधन
अशी पाहुनी स्थिति यदूंची
करी विचारा मूर्त हरीची ॥८९॥
भूमीचा मी भार हराया
अवतरलों यदुकुला मधें या
अधर्म परि वाढला इथेची
मी न उपेक्षा करीन यांची ॥९०॥
सडकें फल तें फेंकुन द्यावें
अवयव कुजतां त्या कापावे
हें कर्तव्यहि करणें आतां
अवश्य मातें जातां जातां ॥९१॥
ऐके दिवशी श्रीहरि दर्शन
घेण्या आले थोर ऋषी - जन
देवल नारद मैत्रावरूणी
वामदेव गाधिज बहुमानी ॥९२॥
पाहुन त्यांतें कुमार वदती प्रस्थ माजलें यांचें
गंमत आतां करूं जराशी बळ पाहूं ज्ञानाचें ॥९३॥
सांबा दिधला वेष वधूचा
सुंदर भारी देह जयाचा
घड्या बांधुनी मग वाथ्यावर
भासविलें त्या प्रती गरोदर ॥९४॥
जवळी येई मंद गतीनें
श्रमली जणु कीं गर्भ भराने
मुरकत वंदन करी मुनीसी
सखी विचारी तपोधनासी ॥९५॥
मम मित्राची प्रिय पत्नी ही
गर्भवती ही प्रथमचि राही
पुत्र सुता वा होईल हीतें
कळावया ही उत्सुक चित्तें ॥९६॥
परी लाजते पुसावयासी
कुलजा ही शालीन विशेषीं
तुम्ही ऋषी जाणितां त्रिकाला
सांगा ही प्रसवेल कुणाला ॥९७॥
या कपटानें संतापुन मुनि देई शाप अधोर
मुसळ हिला होईल करी तें तुमचा कुल संहार ॥९८॥
नाश जयाचा जवळी आला
दिसे सर्व विपरीत तयाला
नवल काय मग यदुयुवकासी
तुच्छ वाटले जरी महर्षी ॥९९॥
तपोधनांची अमोघ वाणी
तिला वृथापण येत कुठोनी
सांबा झालें मुसळ खरेंची
अघटित घटना हृदया जाची ॥१००॥
श्रीकृष्ण हें कळवायसी
धीर न झाला परी कुणासी
परभारें खल करूनी केला
मुसळाचा त्या चुरा निराळा ॥१०१॥
उरला तुकडा एक तयासह
चुरा सागरीं त्यजिला दुःसह
गमले झालों निर्भय आतां
पहा किती ही मति विपरीता ॥१०२॥
चुरा लागला तटास झाले बेट तयें वेताचं
लोहकील माश्यांत मिळे शर लुब्धक करी तयाचे ॥१०३॥
कळे सर्व परि रमावरासी
इष्टापत्ती गमत तयासी
म्हणे मनीं हें झालें उत्तम
नको निराळे मज करण्या श्रम ॥१०४॥
हरि वंदाया आले सुरवर
वरुण विधाता सूर्य पुरंदर
संगें भगवान् पिनाकपाणी
करिती विनती नम्र वचांनीं ॥१०५॥
हे परमेशा कमला कांता
निजधामासी यावें आता
होउन गेलीं वीस शतावर
वर्षे तुम्हा येवुन भूवर ॥१०६॥
कार्य संपलें अवताराचें
झालें निर्दालन दुष्टांचें
आतां सुखवा देव गणासी
हे जगदीशा निजसहवासीं ॥१०७॥
विचार माझा तसाच आहे येइन वैकुंठा मी
वदती भगवान् वसुदेवात्मज वेळहि आली नामी ॥१०८॥
यादव झाले सर्व अनावर
मांडितील उच्छाद महीवर
समोर माझ्या नाशुन त्यासीं
मग येतों मम परमपदासी ॥१०९॥
श्रीचरणावर ठेवुन माथा
पुनः पुनः नमुनी यदुनाथा
परते सुरगण निजलोकासी
इकडे उसळे प्रयळ पुरीसी ॥११०॥
निजशक्तीचें सगळें वैभव
हृदयीं रोधुन घेत रमाधव
द्वारवतीसी उत्पातांनीं
सहजीं मग पीडिले भयांनीं ॥१११॥
दिवसां शिरती घरांत घुबडें
भालूंचें जणु फुटलें नरडे
काक गिधाडें झडपा घेती
विझे लावतां दीप ज्योती ॥११२॥
उल्का पडती भूतल कांपे
आटुन गेली नद्यांत आपें
सोसाट्यानें वाहत वारा
रक्तासह वर्षतात गारा ॥११३॥
नग्न नाचता दिसती भूते
मेघांवाचुन नभ गडगडतें
घाण अमंगळ अन्ना येई
प्रजा भयानें विह्वल होई ॥११४॥
धांव घेतली हरिचरणासी म्हणती वांचिव आम्हा
क्षमा कराफ़्वें अमुचें पातक हे कृष्णा सुखधमा ॥११५॥
म्हणे श्रीहरी निघा प्रभासा
ब्रह्मशाप हा टळेल कैसा
मुलें बायका इथेंच ठेवा
शान्ति स्तव जप होम करावा ॥११६॥
त्रिलोक जननी सती रूक्मिणी
वसली नाही परी पट्टणीं
सोडुन तुम्हा मी समयीं या
कधी न राही श्री यदुराया ॥११७॥
बरें म्हणाले श्रीहरि सस्मित
जाणितेस तू माझें हृद्गत
शोभतेस सह - धर्म - चारिणी
तूं मम शक्ति प्रिये रूक्मिणी ॥११८॥
प्रभासासम मग आले यादव
शंकित परि निजहृदयीं उद्धव
म्हणे न लक्षण ठीक दिसे हें
घोर वाटतें भविष्य आहे ॥११९॥
साष्टांगें वंदून हरीसी बोलत सद्गदभावें
“ प्रभो काय तव मनांत आहे कृपया मज सांगावें ॥१२०॥
झाली माझी दशा विलक्षण
उमगेना परी कांहीं कारण
हृदय कसें हें व्याकुळ झालें
उगाच येती भरूनी डोळे ॥१२१॥
दूर दूर तूं त्यजिलें मातें
असें सारखें वाटत चित्तें
घाबरतें हें शोकाकुल मन
धीर मला दे प्रभो दयाघन ” ॥१२२॥
एकांती त्या म्हणे श्रीहरी भक्तवरा परिसावें
विवेक शाली वशी भक्त तूं विह्वल लव ना व्हावें ॥१२३॥
स्वाभाविक ही स्थिति तव सखया
भविष्य कळतें सज्जन हृदया
संहारून यादव वंशा मी
असें निघालो रे निजधामीं ॥१२४॥
वैकुंठासी मी गेल्यावर
द्वारवतीसी बुडवी सागर
घोर कली लागेल पुढारी
तदा बोध तूं जन सुविचारीं ॥१२५॥
श्रीकृष्णाच्या वियोगभेणें
रडे भक्त तो केविलवाणें
क्षणहि न गेला कधीं तुझ्याविण
निष्ठुर होशी आज दयाघन ॥१२६॥
ब्रह्मशाप का बाधक तूंतें
तूंच नियंता या विश्वातें
कांहीं होवो तुजसी सोडुन
मागें नच राहीन दयाघन ॥१२७॥
तूं गेल्यावर मढें असे मी बोधूं काय जनासी
अम्ही वागतों तव शक्तीनें तूं झालास उदासी ॥१२८॥
जवळी घेउन उद्धवजीसी
बोध करी परमेश तयासी
विश्वाचें तुज तत्व न ठावें
शोक होत हा तयें स्वभावें ॥१२९॥
विश्व जयीं हें नव्हतें कांहीं
तदा न ‘ सदसत् ’ दोन्ही राही
प्रकाश नव्हता नव्हता तमही
नाम न रूप न शून्य न पाही ॥१३०॥
उदरीं घेउन महदाकाशा
अवात कांहीं करितें श्वासा
अनंत अव्यय गूढ अनादि
आश्रयवर्जित विभु निरूपाधी ॥१३१॥
त्याचे विषयीं कधीं कुणासी
लवना येई बोलायासी
व्यवहारासी म्हणती आत्मा
ब्रह्म, तोच रे मी परमात्मा ॥१३२॥
मलाच माझी इच्छा झाली वदती कुणि या माया
आया जी ना येत णासी कारण ती विश्वा या ॥१३३॥
त्रिगुणांतुन ही सृष्टी झाली
स्वप्नें पडलीं जागृत कालीं
महदादी हा भूत पसारा
मायेनें मम ये आकारा ॥१३४॥
व्यापुन मी या असंग आहे
मला जाणुनी प्रशांत राहे
निर्गुणांत मी सगुणी येतो
ज्ञानें भजतो निस्पृह जो तो ॥१३५॥
ब्रह्म असें हें विश्व असें हें
हें निर्गुण हें गुणवत् आहे
भक्ति निराळी ज्ञान निराळें
व्यवहारास्तव केवळ बोलें ॥१३६॥
देव भक्त हा गौरव केवळ
भक्ति अभक्ति भाषा निव्वळ
अवघा आहे मीच महेश्वर
या भावी दृढ करणें अंतर ॥१३७॥
देहभाव तो असतो जोंवर लोकीं ज्ञान न होतें
म्हणुनी करिती भक्ति माझी अभेदभावीं ज्ञाते ॥१३८॥
व्यवहारासी आत्मज्ञानें
पावनता ये थोरपणानें
तरी समुच्चय तदीय नाहीं
विरळा जाणे मार्मिकता ही ॥१३९॥
उभारितां घर सपाट भूमी
भाग मानणें गोल निकामी
हिरा कोळसा एक तरी ही
योग्यतेंत भिन्नतात राही ॥१४०॥
व्यष्टि समष्टी धर्माधर्मी
उलटापालट घातक हे मी
कल्याणास्तव कथितों तूतें
हें उपदेशी तूं जगतातें ॥१४१॥
संकट येउन कोसळल्यावर
जगतीं चिडतीं बावरती नर
गमे तयां मी चुकलों नाहीं
आली कां मग आपत्ती ही ॥१४२॥
परी उद्धवा जाण निश्चयें
निज दोषाविण संकट ना ये
कारण न कळे अल्पमतीसी
जरि दडुनी तें असें मुळाशी ॥१४३॥                                                                                                                                                                                                   
व्यर्थ निंदिलें लक्ष्मणास, मोडियली मर्यादा जी
सीतेसमही पतिव्रता मग गंवसे विपदेमाजी ॥१४४॥
निज बुद्धीसी जे कां पटतें
तेंच धजावें करावयातें
सत्य जरी हें परि ती बुद्धि
विमल विपुल असली तर सिद्धी ॥१४५॥
तपःपूत निर्लोभ निरागस
निश्चल सात्विक ज्यांचे मानस
ते सज्जन जो निर्णय घेती
तोच होतसे हितकर अंतीं ॥१४६॥
मंद तामसी राजस पापी
तयीं भरवसूं नये कदापी
निज बुद्धीवर, जी का कामुक
ती नच लाभूं देत खरें सुख ॥१४७॥
म्हणुन उद्धवा सन्मार्गावर
उपदेशुन, तूं वळवावे नर
परी धरावा विवेक तेथें
सर्व सारखें नसती कीं ते ॥१४८॥
सत्य एकची निश्चित जाणें
भेद पडे भूमिकेप्रमाणें
हें जाणून नच वाद करावा
प्रेम - भाव सर्वत्र धरावा ॥१४९॥
वर्णाश्रम - पुरूषार्थ - चौकडीं समाजधारण होतं
न्यून तयासी पडतां कोठें दुःख भाग फल त्यातें ॥१५०॥
इह सुख दे त्या वदे प्रवृत्ती
मोक्षसुखासी हेतु निवृत्ती
दान पंख हे धर्म विहंगा
एक तुटे तरि अघ करि दंगा ॥१५१॥
माजविती खल दंभ रिकामे
हरिहरि जपती सोडुन कामें
तयां कधींहि न जवळिक माझी
स्वकर्म रत त्यावर मी राजी ॥१५२॥
ज्ञान म्हणे जो मजसी झालें
उरलें नाहीं कार्य निराळें
तो न पायरी प्रथमहि चढला
उलट गर्व हा घातक जडला ॥१५३॥
तीन एषणा मनुजाठायीं
लोक - दार - धन - विषयक पाही
कृत्य होतसें जें जें हातुन
तें नच यांची कक्षा सोडुन ॥१५४॥
थोर थोर ज्या म्हणती लोकीं
तेही यांचे दास विलोकी
कुणी प्रगट कुणि झाकुन वागे
सद्भक्तचि या सारित मागें ॥१५५॥
सर्वभूतहितरत तो ज्ञानी
भक्तहि त्याचा मी अभिमानी
मत्पर होती भाव तयाचे
यत्नें करि रक्षण जगताचें ॥१५६॥
असंग व्हावें आंतुन वरि जनरीती अवलंबावी
परी नाशिलें नष्टें जगता तूं ही स्थिति सुधरावी ॥१५७॥
बोध तुला हा केला उद्धव
लोक संग्रहा असंग तूं तंव
शांतमनें जा हिमालयासी
अक्षय राहिन तव हृदयासी ॥१५८॥
हृदयीं धरूनी पद बहुवेळां
वदरीसी हरिभक्त निघाला
वळुन वळुन तो मागें पाहे
भक्ता सुख भक्तींतचि आहे ॥१५९॥
होम दान जप शांति सुखास्तव
निरूपायानें करिती यादव
सरतां तें ये मधुक्रमासी
रंग जाणों पारणा जपासी ॥१६०॥
घड्या मागुनी घडे रिकामे
करिती यादव तइं अविरामें
मद्यप्यास का विवेक राही
बुद्धी पुरती नाशुन जाई ॥१६१॥
निमित्त कांहीं काढुन निंदी सात्यकीस कृतवर्मा
त्यानें ही वाक्प्रहार केले पाहुन त्याच्या मर्मा ॥१६२॥
ज्वालाग्राही कोठारावर
ठिणगे पडली हीच भयंकर
दोन जाहले तट तेठायीं
विकोपास तें भांडण जाई ॥१६३॥
सिंधु तटाचें वेत लव्हाळे
घेउन हातीं प्रहार केले
क्रोधावेशें परस्परांवर
शाप फळा ये असा भयंकर ॥१६४॥
प्रेतांचा खच पडला भूसीं
मदांध लढती तुडवित त्यासी
शिव्या घालिती ओंगळ, ओठीं
कुणि ना उरला जिवंत पाठी ॥१६५॥
अश्वत्थाच्यातळीं शिलेवर
बसुनी सारे बघत रमवार
शेताची जणु काय कापणी
धनी पाहतो शांतपणानीं ॥१६६॥
उत्पत्ति स्थिति या जो कारण तोची करि संहारा
वणिज जसा उठतां हाटांतुन आवरि तोच पसारा ॥१६७॥
बलरामानें जवळी येउन
हरीस दिधलें प्रेमालिंगन
वडिलपणाचें विसरून नातें
मिठी मारिली घट्ट पदातें ॥१६८॥
चुकलों त्याची क्षमा असावी
प्रभो अतां मज आज्ञा व्हावी
स्मितवदनानें वदे दयाघन
सुखें करी अवतार विसर्जन ॥१६९॥
सागरतीरा बसुनी हलधर
योगें पाही हृदीं परात्पर
अदृष्य झाली तदीय मूर्ती
बघे श्रीहरी प्रसन्न चित्तीं ॥१७०॥
भूचा हरला भार सर्वही कार्य न आतां उरलें
असें जाणुनी देव मुरारी ध्यानावस्थित झाले ॥१७१॥
परमेशाची मूर्ती सुंदर
अधिंकचि भासे तदा मनोहर  
शुभ्र पीतांबर वरी मेखळा
तुळशीची रुळते वनमाला ॥१७२॥
स्म्ति वदनावर नत - मंगल जें
शतसूर्यासम तेज विराजे
पायाखालतीं एक महीवर
दुसरा विलसे वामांगावर ॥१७३॥
कमल नयन ते मिटले होते
हृदयीं निरखी निजरूपांतें
तोंच लुब्ध कें माया - मोहित
बाण मारिला मुसलशेषयुत ॥१७४॥
पाय कोंवळा कोमल तांबुस
त्यास वाटलें हें मृग पाडस
रूप चतुर्भुज बघतां जवळी
हृदया त्याचे धडकी भरली ॥१७५॥
येत बापडा तो काकुळती
श्रीहरि त्यातें परि शांतविती
घडले सारें मम इच्छेनें
जरे ! न कर तूं दुःख भयानें ॥१७६॥
दारुकास मग कथी परात्पर जा तूं द्वारवतीसी
यदुकुल - संक्षय गमनहि माझें सांग तिथे सकलांसी ॥१७७॥
द्वारेमाजी कुणि न वसावे
इंद्रप्रस्था सत्वर जावें
अर्जुनास हें कथी सविस्तर
करील मग तो वारासार ॥१७८॥
श्रीकृष्णाचा रथ गरुडांकित
नभीं उडोनी हो अंतर्हित
विस्मित दारुक करूनी वंदन
शोकमग्न करि आज्ञा पालन ॥१७९॥
जवळी आली सती रुक्मिणी
निज मस्तक ठेवी श्रीचरणीं
म्हणे ‘ श्रीहरी ! तुमचे आधीं
त्यजिते मी भूलोक उपाधी ’ ॥१८०॥
प्रदक्षिणा घातली हरीसी
गंहिवर तो दाटला उरासी
प्रेमें वरिवरि नमनें केली
पद्मासन ती देवी घाली ॥१८१॥
जगताची ती वत्सल माता शक्ति परमेशाची
निजधामासी जायासाठीं सज्ज जाहली साची ॥१८२॥
नासाग्रीं स्थिर करूनी दृष्टी
साठवून हरि हत्संपुष्टीं
योगबलानें निर्मी ज्वाला
गेली जननी वैकुंठाला ॥१८३॥
स्वाग करण्या परमेशाचें
तत्पर झाले देव दिवींचे
सुरांगना करितात तनाना
देव वर्षती दिव्य सुमांना ॥१८४॥
बघाव्या निर्याण हरीचें
उत्सुक झाले मन देवांचें
सप्तर्षीसह शंकर आले
इंद्रादिक सुर सिद्ध मिळाले ॥१८५॥
कर जोडुन ते स्तविती सारे
कृष्ण हरे गोंविंद मुरारे
दृष्टी खिळली श्रीमूर्तीवर
आनंदासी पुरे न अंतर ॥१८६॥
वाजतात दुंदुभी जाहला हर्श बहु स्वर्गातें
वर्णूं बुध हो परी कसें मी काय वाटलें भूतें ॥१८७॥
अंतरतें सौभाग्य महीचें
स्पर्श पुनः ना श्रीचरणांचें
मधुर दिसे स्मित हास्य न आतां
दीन जनासी नुरला त्राता ॥१८८॥
हृदयीं आहे हा संतासी
सामान्यांची गत परि कैसी
त्यासी आतां श्रीमूर्तींचें
दर्शन कोठुन घडावयाचें ॥१८९॥
पृथ्वी साई विह्वल झाली
सोडुन तिज जातों वनमाली
नरनारींचे भरती डोळे
हरि दर्शन सुख ज्या अंतरलें ॥१९०॥
प्रसन्नतेनें सर्व दिशांसी
पाहुन झाकी हरि नयनासी
योगेश्वर निजरूपें हृदयीं
संत जनांचें दर्शन घेई ॥१९१॥
ती मूर्ति प्रभुची मनोहर अति ध्यानामधे रंगली
देवांही बघवे न तेज नयनीं जे दीप्त योगानलीं
लीलाविग्रह वासुदेव भगवान् जाती स्वलोकाप्रती
झाले विस्मित वासवादिक मनीं त्यां ती कळेना गती ॥१९२॥
आज जाहले कृतार्थ जीवित
कळसा गेले कृष्णकथामृत
नाम शकाचें असुन विरोधी
तो मम कार्या या ने सिद्धी ॥१९३॥
ठसा यावरीं निज मुद्रेचा
करो वरद कर गुरो तूमचा
तरीच संमत संत - समाजीं
होय अल्प ही सेवा माझी ॥१९४॥
वस्तुगतीनें या कार्याचें
कर्तृत्व न लव मजसी साचे
सद्गुरूराया हे तुमचे बळ
झालोसे मी निमित्त केवळ ॥१९५॥
लेखन करितें टोक बरूचें
परि तें कौशल लिहिणाराचें
दिसते खडकांतुन ये निर्झर
जल वर्षत ते परी पयोधर ॥१९६॥
कुमुदा फुलवी गमे निशाकर
असे मूळचा उजाड तो तर
परावृत्त रविकिरणांनांची
लोक मनिती प्रभा शशीची ॥१९७॥
लहान मुलगा करितो स्वागत अस्फुट निजवाणीनें
शिष्टचारा जाणत ना तो वदे ‘ कथित ’ जननीनें ॥१९८॥
जाणत नामी लेखनरीती
शास्त्र कळेना कशास खाती
अगदी थोडें कळतें संस्कृत
यश ते श्रीपांडुरंग - शिक्षित ॥१९९॥
तशीं दर्शनें मीमासादिक
पाहियलें मीं नच त्यांचें मुख
खोल नसे अभ्यास कशाचा
मधुर आर्जवी ना मम वाचा ॥२००॥
दारुण संकट अनाथतेचें
बालपणीं ये मजवर साचें
रू न ना गुण रोगट काया
तिरस्कारिती जन दीना या ॥२०१॥
मोहक नव्हता स्वरही माझा
स्वभाव हट्टी वज ना काजा
प्रेम कुणा येणार अशाचें
निरपेक्ष न कुणि जगतीं साचें ॥२०२॥
दया प्रेम वात्सल्य जिव्हाळा
खरी गवंसती अगदीं विरळा
त्यांतहि मजसम दुर्गुणयुक्ता
गुरूसेवाविन्मुखा अभक्ता ॥२०३॥
रङ्क दीन आपुला परी हा म्हटला वात्सल्यानें
केलें लालन नानारीतीं हट्ट पुरविले मानें ॥२०४॥
सुयोग्य म्हणुनी वाटत लोका
महदाश्रय दे महत्व रंका
केस जटेंतिल महेश्वराचें
तुललें त्यास न धन धनदाचें ॥२०५॥
तसें हरीनें पान सेविलें
तृप्त करी दुर्वासा लीलें
दाशरथी - धनु - निर्मित रेषा
लंघवली ना निशाचरेशा ॥२०६॥
अज्ञ खेडवळ शूद्रा करवी
श्रीगुरू कीं पंडितास हरवी
महाराज मी साधन तैसें
वापरिलें तें तुम्ही हवेंसें ॥२०७॥
नंदन - यदुवर वसुदेवाचा
भोक्ता भक्तार्पित भावाचा
रुचते मग त्या क्षुद्रहि वस्तु
प्रेमळ आपण सुभक्त - केत ॥२०८॥
तरळें नयनीं आपुलिया नित
हरिप्रेम जें उत्कट हृद्गत
तुम्ही सुगंधित भाव सुमांना
आजवरी रचिले हरिचरणा ॥२०९॥
विनत दास हा आज करावा कृतार्थ या भावानें
तुम्ही वाहिली हरिचरणीं ही मम बोलांची पानें ॥२१०॥
रसविरहित पानें साधारण
नच तुळशीवेलाचीं पावन
स्वीकारी तरि परमात्मा या
प्रेमें आपुलिया गुरूराया ॥२११॥
चिमणें बालक नेणें कांहीं
सकल तयाचें जननी पाही
हितकर तें तें करवी त्यापुन
दूर ठेविते अहिता पासुन ॥२१२॥
तत्व हरीचें मज का कळतें
मुनिजन शोधुन थकले ज्यातें
कृपें आपुल्या श्रीगुरूमूर्ते
सेवा मजही घडली येथें ॥२१३॥
श्रीचरणांची आवड उत्कट
हृदयीं नाहीं, मम मति उद्धट
स्वच्छंदी स्वैरता विलासी
मनांतुनीं मज असे हवीशी ॥२१४॥
हरिणासम परि मम चंचल मन
शिक्षे वांचुन उपदेशाविण
नियमित केलें शांत सदातें
समाधान बहुधा ना ढळतें ॥२१५॥
‘ रिपु ’ म्हणती जन ‘ लाड ’ मुलांचे
बिघडविती ते वर्तन त्यांचें
ताडन हितकर म्हणे सुभाषित
लाडविणें नच शिष्य तसा सुत ॥२१६॥
चमत्कार परि केला पाण
लाडवुनी मज, केलें नियमन
कष्टांवाचुन हांसत खेळत
जसा भक्तिपथ वरफल अर्पित ॥२१७॥
रिक्त सदा जी असते ऐशी तृप्ति तुम्ही श्रीस्वामी
जवळ जवळ भरलीत, पूर्ण ती होइल शंकित ना मी ॥२१८॥
तम रजनीचा नाशायास्तव
उगवे लवकर रवि हा संभव
असतां उजळूं कशास पणती
याचना रूपा हे गुरूमूर्ती ॥२१९॥
युवका हृदयीं औत्सुक्यासम
धीर हि म्हणुनी मला ते श्रम
त्यांतुन मजसी ठावुक आहे
भूक शिशूची मातेला हे ॥२२०॥
तरूवर आपण असा अलौकिक
न मागतां जो पुरवितसे सुख
लोखंडाचें सुवर्ण होतें
स्पर्शहि करणे नलगे येथें ॥२२१॥
मला अपेक्षा कधि ही नव्हती
गाइन कीं मी कृष्णकथा ती
दुधाळ होइल भाकड धेनू
शुष्क रूक्श तरू होय सपर्णू ॥२२२॥
हार गुंफिला जाइल माझा
तर्वड मानी नच गुरूराजा
घडवियलें परि नवल तुम्ही तें
निज प्रभवें करूणामृतें ॥२२३॥
काव्य गंध विरहित शब्दांना
धरीत कंठी श्री यदुराणा
रूक्ष मतीसी आले पल्लव
भाव सुकोमल आरक्तहि नव ॥२२४॥
व्यवहाराची भाकडगाथा आवडते ती वाणी
भवत्कृपेनें मंजुओल गाई हरि लीलामृत गाणीं ॥२२५॥
गुणपालट हा अभिमानास्पद
सादर कौतुक करिताती बुध
प्रसाद गुणयुतकाव्य - महत्ता
स्तविता होते मम मति मत्ता ॥२२६॥
रुसे मदे सुस्वरुप मानुन
जशी आपणा स्त्री साधारण
तिज खुलवी नेपथ्य चतुर नर
निशीं प्रकाशीं रंगभूमिवर ॥२२७॥
कृपण वेत्रधर मानित ‘ मातें ’
वंदन करिती लोक नृपातें
ग्तसेंच मी जनकृतस्तुतीनें
वाहत जों लव गर्व मनानें ॥२२८॥
पाय आपुले तों मलनाशन
भगवन् ! देती स्मरणीं दर्शन
तयें प्रकाशे सत्यस्थिति मम
अहं - कृतीचा मावळतो तम ॥२२९॥
सांगवती ना भाव मनांतिल
करिती स्फुरणें शब्दा चंचल
स्वयंभु भासें रूप तूमचें
अर्थासम कीं क्रियापदाचें ॥२३०॥
गगन सूक्ष परमाणूतिलही
भवत्सूक्षते स्थूलचि पाही
प्रकाशकिरणालाहि न येते
फिरतां अपुल्या व्यापा भंवते ॥२३१॥
जाणिवेत आणिकही कांहीं उद्भवते नव काव्य
परी अनुभवावीण जिभेला एकहि नाहीं सेव्य ॥२३२॥
हतमद केवळ मग चरणीं मी
विनम्र होतो अपुल्या स्वामी
न मागतां नच वदता कांहीं
कांकीं शब्दा बल तें नाहीं ॥२३३॥
लेणे तुमच्या चरण रजांचे
तर्कट थांबविते बुद्धीचे
पदकमलांचा पावन वारा
ताप मनींचा विनयी सारा ॥२३४॥
ते पद वंदन करितो भावें
वदुन असें साष्टांग नमावें
प्रसन्न होई सहजीं मानस
जणों लाभले क्षुधिता पायस ॥२३५॥
परी - उचलूनी श्रीगुरू घेती
कुरवालूनि मुख वत्सल हातीं
म्हणती ठेवुन शिरीं वरदकर
असेंच बाळा ! असो त्वदंतर ॥२३६॥
रचिली जी जी श्रीहरिचरणीं
सद्भावानें अपुली करणी
सहजीं येतें सुंदरता तिज
सौंदर्याचें रूप अधोक्षज ॥२३७॥
मेघा रविपद जेव्हां शिवती
सतेज वासवधनुयुत खुलती
कृतार्थ कमलें होता तेणें
सुंदरतेसी मग का बाणें ॥२३८॥
शब्दांची तव सुंदर रचना
मजलाही हें बघ जमते ना
काव्य बघुन हें मम मन धालें
आज मम श्रम - सार्थक झालें ॥२३९॥
परमेशाची कृपा निरंतर अशीच तुजवर राहो
जें जें वांछित तव मन सात्विक तें तें तुजसी लाहो ॥२४०॥
दीक्षित जे या कृष्णकथेसी
संसृति - भय मग नुरले त्यासी
भावें परिसे कृष्णकथामृत
होतिल सारे पूर्ण मनोरथ ॥२४१॥
सार भारता भागवताचें
हें नाशिल कुटिलत्व मतीचें
तत्पर होउन वाची जो या
प्रिय होइल तो श्रीयदुराया ॥२४२॥
दर्शन होतां सुरधेनूचें
सहवासें वा संतजनांचें
जें फल गंगातीर निवासीं
तेंच असे या कृष्णकथेसी ॥२४३॥
रमारमण गोविंद परात्पर
बाळा दे तव काव्या हा वर
‘ समाधान नांदेल मनासी
शोधुन बघतां या ग्रंथासी ॥२४४॥
होइल जीवन दीर्घ निरोगी
दैन्य लेशहि न येइल भागीं
श्रोता वक्ता या दोघांही
कोणतेंच भय नुरेल पाही ॥२४५॥
इतुके वदुनी श्रीगुरूरायें
उरीं ग्रंथ मम धरिला
वत्सलता ती पाहुन ऐशी
दास मनीं गंहिवरला ॥२४६॥
तिथि शुभ आश्विन वद्य पंचमी
शशिगिरीधृतिमितशक तटि भैमीं
धृतिसर्गीं तइ होत समाप्ता
इषुपुरमुनिदोर्मित ही कविता ॥२४७॥
शंकरा सकल मंगलकारी
माधवा हरि सुदर्शन धारी
शांति शांति जगती सुखशांति
नांदुदे सतत हीच विनंती ॥२४८॥

श्री कृष्णकथामृतं महाकाव्यांतील ‘ महन्मंगल ’ नांवाचा अठरावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
आश्विन वद्य पंचमी शके १८७१

हरिः ॐ तत्सत्

----------------------

ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ।

श्रीकृष्ण - कथामृत

ॐ तत्सत्

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

शुभंभवतु ।

श्रीः श्रीः श्रीः

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP