शाहीर हैबती - घरच्या आयाविषयीं
शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.
( लावणी )
आये घराचे अष्ट कोण तो आया कुठें द्यावा ।
शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥ध्रु०॥
घर बांधितां अष्ट आथांचें साधन आहे त्यासी ।
कोण जागीचा कोण आया ऐका वचनासी ॥
मध्यभागीं ध्वज आया मोजणी आणा नेमासी ।
धूम्र आया देईजे ठिकाणा तो स्वयंपाकासीं ॥
सिंह आया नेमकाचि मोजुनि दरवाज्याप्रत यावा ।
शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥१॥
पिछाडीचे दरवाजाप्रति देइजे श्वान आया ।
चोराचें भय नाहीं योजून घालावा पाया ।
वृषभ आया तो उत्तम योजून देणें ज्या ठाया ।
म्हैस गाई अश्वादि ठिकाण तथें बांधाया ।
मुळींच ऐसा पाया चतुरें योजून घालावा ।
शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥२॥
स्मर आया देईजे ठिकाणा तोच निजावयासी ।
गज आया देईजे देवघर करणें देवासी ।
ऐसे आये सात आतां ऐकावें आठव्यासी ।
शेवटचा आठवा चतुरें आणावा ध्यानासी ॥
ढंक आया बालती शेतखान्यासी परिसावा ।
शिल्पशास्त्र बोलिलें दाखला तो ऐकून घ्यावा ॥३॥
अष्ट आये याप्रमाणें एका घरामध्यें यावे ।
महिना पाहुन उत्तम घर बांधून नांदावे ॥
कवि हैबती म्हणे शिल्पशास्त्रामध्यें हें पाहावें ।
हेच आठाघरीं आठ आये सांगतों चित्त द्यावें ॥
ग्रंथ पाहिण्याविण शब्द कविवर न ठेवावा ।
शिल्पशास्त्र बोलिलें दाखला ऐकून घ्यावा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2017
TOP