रोहिणी च महाभागा नन्दगोपाभिनन्दिता । व्यचरद्दिव्यवासःस्रक्कण्ठाभरनभूषिता ॥१७॥

नंदें गौरविली रोहिणी । अमूल्य रत्नें कनकाभरणीं । विद्युत्प्रभाहेमवसनीं । दिव्यसुमनीं पूजिली ॥६५॥
मंगलोत्सवीं उल्हासभरें । रोहिणी विचरे प्रेमादरें । जैशी जगदंबा अमरवरें । दिव्योपचारे पूजिली ॥६६॥
गोपी गौळ्यां गौरविलें । गोकुळवासी तोषविले । नंदें विश्व सुखी केलें । जातमांगल्यें कृष्णाच्या ॥६७॥
ऐसा सोहळा आनंदकर । पुष्पवृष्टि करिती अमर । दुंदुभिघोषें वाद्यगजर । नादाकार नभ झालें ॥६८॥
अष्ट दिशांचे दिक्पाळ । सावध रक्षिती गोकुळ । जेथ अवतरला गोपाळ । त्रैलोक्यपाळ जगदात्मा ॥६९॥

तत आरभ्य नन्दस्य व्रजः सर्वसमृद्धिमान् । हरेर्निवासात्मगुणै रमाक्रीडमभून्नृप ॥१८॥

जैं पासूनि हरीचें जन्म । तैंहूनि समृद्धि उत्कृष्ट परम । स्वेच्छाकरूनि पद्मा सद्म । क्रीडे सप्रेम स्वानंदें ॥१७०॥
वृक्ष झाले कल्पद्रुम । सर्वदा फळतां अभीष्टकाम । अमृत उदकेंशीं असाम्य । मेघश्यामसंस्पर्शें ॥७१॥
यवसें पीयूषा लजविती । असाम्य व्रजासि सुरसंपत्ति । इंद्र सांडूनि अमरावती । अर्जुनाकृति अवगला ॥७२॥
वाळले वठले कोमाइले । तुटले मोडले खांकर झाले । टवटवीत कोंब आले । पाल्हेजले लसलसित ॥७३॥
वांझा वृद्धा बोंचरिया । धेनु कामदुधा झालिया । संख्या न करवे दुभतिया । कृष्ण आलिया गोकुळा ॥७४॥
वृद्धा नारी झाल्या तरुण । रमा रेणुका गिरा गौण । अनुसूयादिसर्वगुण । साध्वी संपूर्ण लेइल्या ॥१७५॥
लेंकुरां स्फुरती विचारयुक्ति । ते शिकावया बृहस्पति । भविष्य जाणोनि यादवपंक्ति । उद्धवाकृति लेइली ॥७६॥
अप्सरा झाल्या गोपकुमारी । वेदश्रुति देहधारी । चिदैक्यबोधें निर्विकारी । आत्मा श्रीहरि तोषविती ॥७७॥
सिद्धि होऊनि परिचारिका । वोळगे राबती श्रीनायका । मेधा धृति इत्यादिकां । व्रजींच्या लोकां सेविती ॥७८॥
लाभ व्यवसायांच्या रूपें । गोकुळीं प्रवेशे साक्षेपें । निधि धनधान्यनिक्षेपें । होती सांटपे वस्तूंचे ॥७९॥
स्वधर्म सर्वांचे शरीरीं । प्रकट क्रीडे सदाचारीं । प्रवृत्ति सर्वेंद्रियव्यापारीं । नीति नटोनि अवतरली ॥१८०॥
भाषणामाजील गौल्यता । सारी परौतें अमृता । ऋतसत्यत्वें विधाता । गिरागौणता लाजवी ॥८१॥
परमहंस जे परिव्राज । गोकुळीं हंस ते झाले द्विज । गंधर्व भृंग होऊनि ओज । सप्तस्वरांची दाविती ॥८२॥
स्वर्गभ्जोग स्रक्चंदन । तेथ दुर्लभ हरिकीर्त्तन । म्हणोनि गोकुळीं गंधर्वगण । भृंग होऊनि अवतरले ॥८३॥
दुःख दोष आणि दरिद्र । चिंता व्यथा दुराचार । क्रोध द्वेष भय अघोर । रिघती घर कंसाचें ॥८४॥
ब्रह्मांडींच्या विभवराशि । रमा आणी गोकुळासी । जाणोनि हरीच्या निवासासी । आत्मगुणेंशीं क्रीडत ॥१८५॥
तेणें सर्व समृद्धिमंत । झालें व्रजपुर विख्यात । रमा क्रीडे स्वानंदभरित । सालंकृत आत्मगुणीं ॥८६॥
रमा गुणमयी हरिरमणी । सत्त्वरजतमादि गुणीं । प्रकट कैशी गोकुलभुवनीं । तेंचि श्रवणीं परिसावें ॥८७॥
तमोगुणातें प्रकटून । दुष्टदैत्यांचें संहरण । करी आणि घाली मौन । दृढ अज्ञान त्यां ओपी ॥८८॥
रजोगुणें सर्व समृद्धि । कलाचातुर्य अभिवृद्धि मंगलकार्यें यथाविधि । कर्म त्रिशुद्धी रोचक ॥८९॥
तैसा सत्त्वें श्रीकृष्णगुणीं । प्रेमा उपजे अंतःकरणीं । देहगेहांतें विसरोनि । व्रजकामिनी लोधती ॥१९०॥
बाळकें विसरती निजमाता । लुब्ध होती यशोदासुता । ही प्रसंगें येईल पुढें कथा । एथें श्लोकार्था सुचविलें ॥९१॥
सर्व प्राणी निर्वैर झाले । जातिवैरस्वभाव त्यजिले । द्वेष निःशेष हरपले । आनंदले हरिप्रेमें ॥९२॥
हरिप्रेमाचिये भुली । जाति स्वभावक्रिया पहिली । नाठवे हे सत्त्वीं चाली । प्रकट केली शुद्धसत्त्वें ॥९३॥
ऐशी संभ्रमें आत्मगुणीं । रमा क्रीडे व्रजभुवनीं । दानदाक्षिन्यअलंकरणीं । जगज्जननी जगदंबा ॥९४॥
अभ्यागतांचे सन्मान । सर्व करिती बल्लवजन । यथाविधि दानपूजन । पादार्चन परिचर्या ॥१९५॥
सत्पुरुषांचा प्रेमादर । भावें यजिती देवपितर । धेनुपालनीं अतिसादर । करुणापर भूतमात्रीं ॥९६॥
असत्यदोषा विमुखा वाणी । रंगल्या श्रीरंगगुणकीर्त्तनीं । निंदाद्वेषांची कहाणी । गोकुळीं कोणी नेणती ॥९७॥
परस्परें सर्वां मैत्री । पित्राज्ञा पाळिजे पुत्रीं । जैसें जीवन प्राणिमात्रीं । कलह श्रोत्री दुर्लभ ॥९८॥
भर्त्तरप्रेमें आथिलिया । भावानुकूल व्रजस्त्रिया । पुण्यपुरुषार्थ पायवणीया । ओढविती मस्तकें ॥९९॥
जीर्णवस्तु संग्रही पाहीं । बल्लव रक्षिती सर्वदाही । विदुषवृंद गुणग्राही । ईर्ष्या देहीं न धरूनि ॥२००॥
इत्यादिगुणें तेजःपुंज । रमाक्रीड झाला व्रज । जैंहूनि जन्मला अधोक्षज । विश्वबीजे जगदात्मा ॥१॥
परीक्षितीसी शुकाचार्य । इतुका सांगोनि कथान्वय । सावध करूनि श्रवण सुहृदय । पुढें काय निरूपी ॥२॥

गोपान् गोकुलाक्षायां निरूप्य मथुरां गतः । नन्दः कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरूद्वह ॥१९॥

ऐकें राया कौवरपति । गोप गोकुलरक्षणाप्रति । निरोपूनि यथानिगुती । गेला व्रजपति मथुरेसी ॥३॥
व्रजींचें वार्षिकद्रव्यदान । कंसासि करावया अर्पण । गोप गोकुळीं रक्षण । नंद ठेवूनि स्वयें गेला ॥४॥
मधुगोरसें भरूनि कलश । कंद मूल फलविशेष । गाडे भरूनि सावकाश । नंद मथुरे पावला ॥५॥
विष्णुपुराणींची व्युत्पत्ति । कृष्ण नेतां व्रजाप्रति । यमुनातीरीं वृष्णिपति । पाहे पंथीं नंदातें ॥६॥
गाडे भरूनिया गोरसीं । घेऊनि वार्षिकद्रव्यासी । जातां आढळला वसुदेवासी । तेचि निशीं अवचित ॥७॥
वसुदेवें देखिलें त्यासी । तो न देखत वसुदेवासी । योगमायेची करणी ऐशी । पाराशरऋषि बोलिला ॥८॥
असो हें नंद मथुरापुरीं । शकट लवूनि बिढारीं । कंसा भेटॊनि अर्पण करी । जे सामग्री आणिली ते ॥९॥
वार्षिक कर समर्पिला । कंसें सन्मानें बोळविला । आज्ञा घेऊनि नंद आला । शकटस्थाना आपुल्या ॥२१०॥

वसुदेव उपश्रुत्य भ्रातरं नन्दमागतम् । ज्ञात्वा दत्तकरं राज्ञे ययौ तदवमोचनम् ॥२०॥

कर अर्पूनि कंसाप्रति । नंद चालिला व्रजाप्रति । हें ऐकोनि वृष्णिपति । भेटी त्वरितीं पातला ॥११॥
प्राणापढियें मित्र बंधु । केवळ स्नेहसुखाचा सिंधु । शकटस्थाना वृष्णिकंदु । जाऊनि नंद आलिंगी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP