अध्याय ६ वा - श्लोक ४१ ते ४४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कटधूमस्य सौरभ्यमवघ्राय व्रजौकसः । किमिदं कुत एवेति वदन्तो व्रजमाययुः ॥४१॥
पूतनादेह जाळिला रानीं । तो सुगंध भरिला गौळियां घ्राणीं । काय आश्चर्य हें म्हणोनि । विस्मय मनीं मानिती ॥२५॥
सुगंध एवढा सुंदर । कोठूनि येतो मनोहर । ऐसा परस्परें विचार । करीत व्रजपुरा प्रवेशले ॥२६॥
ते तत्र वर्णितं गोपैः पूतनागमनादिकम् । श्रुत्वा तन्निधनं स्वस्तिः शिशोश्चासन्सुविस्मिताः ॥४२॥
तेथ मिळोनि गोपाळक । वर्णिती पूतनागमनादिक । तें ऐकावया नंदप्रमुख । झाले सकौतुक सादर ॥२७॥
प्रत्यगात्मया नंदाप्रति । गो गोपाळ निवेदिती । पूतना देहबुद्धि हे अवचितीं । गोकुळाप्रति पातली ॥२८॥
इंद्रियग्राम गोकुळनगरी । देहबुद्धि पूतना खेचरी । घेऊनि संपदा आसुरी । हृदयमंदिरीं संचरली ॥२९॥
आत्माश्रीकृष्ण कवळून । नास्तिक्यभावें करावया हनन । विषयविषाचा मुखीं स्तन । घालूनि प्राशन करवी ते ॥३३०॥
शुद्ध शबळ दोघी माया । देहबुद्धीची पडतां छाया । चाकटल्या जी बल्लवराया । करणकार्या विसरल्या ॥३१॥
इहामुत्रार्थ दोन्ही स्तन । विषयविषाचा पान्हा पूर्ण । कपटें करितां कृष्णार्पण । शोखी सप्राण परमात्मा ॥३२॥
विचार विश्वास दोन्ही करीं । उभय स्तनांचें पीडन करी । स्वबोधावेशें श्रीमुरारि । प्राशन करी सप्राण ॥३३॥
उभयभोगात्मक स्तन । स्वप्रतीति मिथ्या करून । सर्वगतत्वें करी प्राशन । विषय अभिन्न आत्मत्वें ॥३४॥
विषासहित पूतना प्याला । कीं आपणचि अवघें होऊनि ठेला । मग तयेच्या जीवनकळा । झाल्या व्याकुळा ममतेसी ॥३३५॥
षड्विकार अष्टही मद । जिचीं अष्टांगेंही विशद । असंभावना विपरीत बोध । झाडी करपद प्रलोभें ॥३६॥
फळाशेच्या अर्थवादें । दीर्घस्वरें ते आक्रंदे । राग द्वेष मीतूंभेदें । सर्वांग खेदें उडविलें ॥३७॥
स्वात्मप्रत्ययें सोडिले प्राण । झाली दृश्यबोधविहीन । ब्रह्माहमस्मि सायुज्यसदन । ब्रह्मनिर्वाण पावली ॥३८॥
ब्रह्मान्वयें निरभिमान । आत्मावबोधें विश्वदर्शन । पूतनादेहबुद्धीचें दहन । ऐसें करून परतलों ॥३९॥
आत्मा सर्वत्र अबाधित । विषय व्यापूनि विषयातीत । ऐसा बालक अक्षत । ऐकोनि विस्मित व्रजपति ॥३४०॥
ऐसें गोपाळीं पूतनाचरित । सर्व कथिलें यथावृत्त । ऐकोनि नंदादि विस्मित । म्हणती उत्पात चुकला ॥४१॥
कथिलें मथुरेसी वसुदेवें । तयासी ज्ञानेंच झालें ठावें । विघ्न निरसिलें थोर दैवें । श्रीवासुदेवें तारिलें ॥४२॥
नंदः स्वपुत्रमादाय प्रेत्यागतमुदारधीः । मूर्ध्न्युपाघ्राय परमां मुदं लेभे कुरूद्वह ॥४३॥
ऐकें कुरुवंशधुरंधरा । परीक्षिते सप्रेम चतुरा । नंद प्रवासाहूनि आला घरा । घेऊनि कुमारा निज अंकीं ॥४३॥
केलें मूर्ध्नि अवघ्राण । परमानंदें भरला पूर्ण । श्रीकृष्णाचें पाहोनि वदन । सुप्रसन्न मन बुद्धि ॥४४॥
कृष्णवियोगें न साहे क्षण । परंतु कंसाचें वार्षिक धन । द्यावया केलें मथुरागमन । आला परतोन सत्वर ॥३४५॥
देखोनि विघ्नांचा निरास । पुत्रदर्शनें पावला तोष । तो तुज कथिला हा इतिहास । जो करी निर्दोष श्रोतया ॥४६॥
ग्र एतत्पूतनामोक्षं कृष्णस्याऽऽर्भकमद्भुतम् । श्रुणुयाच्छ्रद्धयाऽमर्त्यो गोविंदे लभते रतिम् ॥४४॥
ऐसें कथूनि पूतनाख्यान । करी इतिहास उपसंहरण । हें जे करिती भावें श्रवण । त्यांचें पुण्य शुक वर्णी ॥४७॥
श्रीकृष्णावतारचरितगुण । त्यांत प्रथम हें पूतनामोक्षण । ज्याचें करितां श्रवण पठण । जोडे पुण्य अद्भुत ॥४८॥
इये नाशवंत मृत्युभुवनीं । जन्मले अविद्यत्मक जे प्राणी । त्यांमाजीं भाग्याथिला कोणी । त्याचे श्रवणीं हें पडे ॥४९॥
पडतां सप्रेम अंतरीं । श्रद्धायुक्त श्रवण करी । आवडी पढे निजवैखरी । आनंदगजरीं सद्भावें ॥३५०॥
तेणें सहस्रोंसहस्र जन्मांतरें । ध्यान समाधि तप अध्वरें । शुद्ध सुकृत जोडिलें खरें । म्हणूनि भरे हरिप्रेमें ॥५१॥
ब्रह्मादिकां दुर्लभ प्राप्ति । ते गोविंदचरणकमळीं रति । सुगमोपायें सप्रेम भक्ति । ते लाहती त्या पुण्यें ॥५२॥
आणि संतानवती ज्या नारी । श्रवण करिती अत्यादरीं । त्यांचे बालग्रह निवारी । अभीष्टकारी सर्वदा ॥५३॥
त्यावरी सप्तमाध्यायीं कथा । शकटा आणि तृणावर्ता । भंगूनि कृष्ण जांभई देतां । पाहील माता विश्वरूप ॥५४॥
हें ऐकावयाकारणें । पुण्यश्लोकीं सादर होणें । माझें सलगीचें हें विनवणें । अंगीकारणें सज्जनीं ॥३५५॥
भानुदासकुलभूषणमणि । श्रीएकनाथ चिन्मात्रतरणि । तेणें चिदानंदज्ञानकिरणीं । सर्वाभरणीं प्रकाशिला ॥५६॥
तेथ स्वानंदसुखाचिये लाभा । कोंदाटली सज्जनसभा । त्यांचिया पादार्चनवालभा । गोविंदप्रभा फांकली ॥५७॥
त्यांच्या पादोदकाचा निक्षेपठाव । म्हणोनि म्हणती दयार्णव । संतपादोदकवैभव । सर्व गौरव शोभवी ॥५८॥
इति श्रीमद्भागवत । महापुराण विख्यात । अठरा सहस्र विस्तृत । संहिता निश्चित पारमहंसी ॥५९॥
त्यामाजीं हा दशम स्कंध । श्रीशुकपरीक्षित्संवाद । दयार्णवानुचर कथी विशद । भाषाभेद महाराष्ट्र ॥३६०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमह्म्स्या संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां पूतनामारणं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४४॥ टीका ओव्या ॥३६०॥ एवं ॥४०४॥ ( सहा अध्याय मिळून ओवीसंख्या ३८९३)
सहावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP