अध्याय ७ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तृणावर्तः शांतरयो वात्यारूपधरो हरन् । कृष्णं नभोगतो गंतुं नाशक्नोद्भूरिभारभृत् ॥२६॥
वायुस्वरूपें तृणावर्त । होऊनि आपुलें साधूनि कृत्य । वेग सांडूनि झाला शांत । गगनाआंत प्रवेशला ॥२९॥
वायुस्वरूपें हरिला बाळ । बळें क्रमिला अंतराळ । बाळें कर्षिलें कंठनाळ । झाला विकळ नभोगर्भीं ॥३३०॥
कित्येक क्रमिलें आकाश । तंव कंठीं पडिला कालपाश । प्राण झाले कासावीस । श्वासोच्छ्वास कोंडले ॥३१॥
न सहावे भूरिभार । खुंटला उत्प्लवनविचार । उडोनि गेला कपटाचार । जाहला असुर घाबरा ॥३२॥
तमश्मानं मन्यमान आत्मनो गुरुमत्तया । गले गृहीत उत्स्रष्टुं नाशक्रोदद्भुतार्भकम् ॥२७॥
बीजामाजीं तरु सर्व । तैसें मेरूचें गौरव । घेऊनि बाळाचे अवयव । महागुरुत्व पावले ॥३३॥
जैसा पाषाणांचा निचय । तैसा गुरुतर पर्वतप्राय । गलग्रहण करूनि राहे । जो नच जाय उचलिला ॥३४॥
बाळक नव्हे हा केवळ । गुरुत्वें मानी मंदरशैल । एवढ्या जाड्यें कंठनाळ । अतिप्रबळ आकळिलें ॥३३५॥
झाडूनि टाकूं न शके दैत्य । खुंटलें प्राणेंद्रियांचें कृत्य । म्हणे मांडला प्राणांत । अत्यद्भुत अर्भक हें ॥३६॥
गलग्रहणनिश्चेष्टो दैत्यो निर्गतलोचनः । अव्यक्तरावो न्यपतत्सहबालो व्यसुर्व्रजे ॥२८॥
बालकाची वज्रमिठी । कालपाशातुल्य कंठीं । पडली न सुटे प्राणसंकटीं । महाकष्टीं उखळितां ॥३७॥
कंठ आवळितां बळें । बाहेर पडलीं नेत्रबुबुळें । शब्द न फुटतां कोसळे । प्रचंडशिळेवरौता ॥३८॥
प्राण गेले अंतराळीं । बाळ तैसेंचि वक्षःस्थळीं । दैत्य रिचवला व्रजमंडळीं । गात्रें मोकळीं विखुरलीं ॥३९॥
भर्गमार्गणें भंगे त्रिपुर । कीं वज्रप्रहारें विंध्याद्रिशिखर । कां श्रीरामबाणें वालिवानर । तेंवि असुर कोसळला ॥३४०॥
तमंतरिक्षात्पतितं शिलायां विशार्णसर्वावयवं करालम् ।
पुरं यथा रुद्रशरेण विद्धं स्त्रियो रुदत्यो ददृशुः समेताः ॥२९॥
जें नभींहूनि शिळेवरी पडे । त्या मृभ्दांडाचे होती तुकडे । तेंवि गात्रें चहूंकडे । खंडें विखंडें विखुरलीं ॥४१॥
महाकराळ भयंकर । दिसे कर्कश घोर शरीर । तिखट दंष्ट्रा वदन उग्र । प्रेत दुर्धर पसरलें ॥४२॥
तया प्रेताचा पतनध्वनि । निधा दाटला गिरिकाननीं । यशोदे भोंवल्या व्रजकामिनी । पाहती दचकोनि चहूंकडे ॥४३॥
सर्वही करीत होत्या रुदन । तंव देखिलें प्रेतपतन । सवेग आल्या धांवोन । तेथ नंदनंदन देखिला ॥४४॥
प्रादाय मात्रे प्रतिहृत्य विस्मिताः कृष्णं च तस्योरसि लंबभानम् ।
तं स्वस्तिमंतं पुरुषादिनीतं विहायसा मृत्युमुखात्प्रमुक्तम् ॥३०॥
तया प्रेताचे वक्षस्थळीं । लोंबे धरूनि कंठनाळीं । तो बाळ घेऊनि गोपिका सकळी । यशोदे जवळी दीधला ॥३४५॥
परमविस्मयें दाटल्या सकळी । परमानंदें पिटिली टाळी । म्हणती यशोदा दैवागळी । सुकृत बळी नंदाचें ॥४६॥
केवढें वर्तलें अत्यद्भुत । बाळक नेतां गगनाआंत । तेथूनि पडला अकस्मात । बाळकासहित भूतळीं ॥४७॥
राक्षस पडला शिळेवरी । झाली गात्रांचीं कांडोरीं । बाळक वाचलें कोणे परीं । सर्व शरीरीं अक्षत ॥४८॥
निर्भय निःशंक स्वस्तिमंत । यसोदे वांचला तुझा सुत । तुझें दैव कल्याणवंत । ऐसें समस्त बोलती ॥४९॥
बाळक गळ्याचें सुटोनि पडतें । शिळापृष्ठीं चूर्ण होतें । तेथ रक्षिलें तव सुकृतें । स्वस्तिसूक्तें द्विजांच्या ॥३५०॥
\न होतां कोणासही ठावें । राक्षसें बालक गगना न्यावें । राक्षस पडोनि हें वांचावें । अघटित दैवें घडले हें ॥५१॥
मृत्युमुखीं प्रविष्ट झालें । तें त्या मृत्यूनें वमन केलें । तैसें मृत्युमुखींहूनि सुटलें । पुन्हा भेटलें आम्हांसी ॥५२॥
ऐशा आनंदें निर्भर । अवघीं करिती जयजयकार । म्हणती तुष्टला जगदीश्वर । अक्षत कुमार वांचला ॥५३॥
हर्षनिर्भर अवघ्यां पोटीं । विस्मयें गांठोनि करितां गोठी । अपार मिळाली लोकदाटी । पाहोनि दृष्टीं वर्तलें ॥५४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP