अध्याय १५ वा - श्लोक १ ते ३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - ततश्च पौगंडवयः श्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपालसंमतौ ।
गाश्चारयंतौ सखिभिः समं पद्वैर्वृदावनं पुण्यमतीव चक्रतुः ॥१॥

अघासुराचिये वदनीं । वृथा श्रमले प्रवेशूनी । तैं कृष्णप्रवेश तालनीं । सुपक्व देखोनि संवगडे ॥३८॥
कथिले कौमारविहार । त्यानंतरें यदुकुमार । झाले पौगंडवयसापर । तो प्रकार अवधारा ॥३९॥
अविद्यादामनिबंधनें । संचितप्रारब्धक्रियमाणें । तेथूनि अज्ञानपशुमोक्षणें । सद्गुरुअरुणें उजळितां ॥४०॥
खंडज्ञानाच्या सैराटीं । भरतां गोरुवांचिया थाटी । हाणोनि विवेकविरागकाठीं । निष्कामवाटीं चालविणें ॥४१॥
नवविध नवरस रसाळ रानें । तेथें स्वस्थ चरों देणें । मननप्रवाहींच्या निजजीवनें । अवघीं करणें वितृष्ण ॥४२॥
निदिध्यासें रोमंथिती । साक्षात्कारें विश्रामती । दृश्यविसरें नेत्रपातीं । लावूनि बैसति निजच्छाये ॥४३॥
लय विक्षेप विराम । रसास्वाद कषाय काम । विघ्नरूप हे दंशश्रम । खंडणविश्राम भोगविणें ॥४४॥
संकल्पाचे सायंकाळीं । पुढती नेणें मुळींचें स्थळीं । ऐसें पशुपालनशाळी । बळवनमाळी जाहले ॥४५॥
जे कां गोप निज संवगडे । यांसि क्रीडा जे आवडे । ते ते करिती वाडेंकोडें । प्रेमचाडें तयांचे ॥४६॥
ऐसे पशुपाळसंमत । दोघे झाले वसुदेवसुत । उगलांगबळ बुद्धियुक्त । जैसे प्राकृत गुराखे ॥४७॥
संवगडियांच्या समागमें । धेनु चारितां यथोक्तक्रमें । पवित्र पदांच्या विक्रमें । फिरती रम्यें काननें ॥४८॥
पुण्यपाउलीं अटवीअटणें । परमपुण्याचें जन्मस्थान । पुण्यपावन वृंदावन । करिती नंदन नंदाचे ॥४९॥

तन्माधवो वेणुमुदीरयन्वृतो गोपैर्गृणएद्भिः स्वयशो बलान्वितः ।
पशून्पुरस्कृत्य पशव्यमाविशद्विहर्तुकामः कुसुमाकरं वनम् ॥२॥

राया कैसें वृंदावन । म्हणसी तरी तें करी श्रवण । जेथ क्रीडे मधुसूदन । अगाध महिमान तेथींचें ॥५०॥
वसंत आपुली उत्कृष्ट शोभा । घेऊनि वनीं ठाकला उभा । गोपक्रीडेच्या वालभा । पद्मनाभा सुसेव्य ॥५१॥
निखिल कुसुमांचा आकर । म्हणोनि म्हणिजे कुसुमाकर । तेथ प्रवेशे मुरलीधर । गोपसहचरसमवेत ॥५२॥
बलभद्रेंशीं समागम । विनोदवचनीं विहारकाम । रसाळ वेणु पुरुषोत्तम । वाजवीत होत्साता ॥५३॥
स्वयश वर्णिती संवगडे । चालती कृष्णा मागें पुढें । भंवतें वेष्टून चहूंकडे । गाती पवाडे कृष्णाचे ॥५४॥
कृष्ण आमुचा प्राणसखा । कृष्ण दुर्लभ सनकादिकां । कृष्णचरणींच्या पीयूखा । मनःशशांका सुखलाभ ॥५५॥
कृष्ण असतां आम्हांपाशीं । कोण गणी कळिकाळासी । कृष्णें भंगिलें व्याळासी । महाबकासि चिरियेलें ॥५६॥
पाहतां कृष्णमुखाकडे । ब्रह्मानंदही नावडे । तो हा आम्हां मागें पुढें । वागे घोंगडें पांघरूनी ॥५७॥
कृष्ण गोड गुळाहून । एक म्हणती पितरांसमान । एक म्हणती क्षुधेसि अन्न । तैसा श्रीकृष्ण आवडे ॥५८॥
तृषार्तासि आवडे जळ । बुडतया प्रिय वाटे उथळ । उष्णें तापल्या शीतळ । तैसा गोपाळ प्रिय म्हणती ॥५९॥
ऐसें गोपाळ परोपरी । कृष्णा गाती आनंदगजरीं । वेणुवादनें तल्लालोरी । शृंग मोहरी चंगाढ्य ॥६०॥
पशूंसि सुसेव्य जें कानन । त्यासि पशव्य हें अभिधान । त्यामाजीं पशु पुरस्करून । मधुसूदन प्रवेशला ॥६१॥

तन्मंजुघोषालिमृगद्विजाकुलं महन्मनःप्रख्यपयःसरस्वता ।
वातेन जुष्टं शतपत्रगंधिना निरीक्ष्य रंतुं भगवान्मनो दधे ॥३॥

देखोनि रमणीय कानन । क्रीडासक्त श्रीकृष्णमन । तया वनाचें लावण्य । वासन्म्दन अनुवादे ॥६२॥
पुष्पित द्रुमांचिया हारी । भ्रमर रुंजती झुंकारीं । मयूर नाचती कोकारीं । पंचमस्वरीं कोकिला ॥६३॥
चातक चकोर चक्रवाक । शुक सारिका कपोतक । भारद्वाजादि अनेक । पक्षिविशेष रुंजती ॥६४॥
वनबिडालक शकली वोतु । जवादिमार्जारें मिथुनीभूत । कस्तूरीमृग स्वस्त्रीयुक्त । शब्द करिती सक्रीड ॥६५॥
मधुमक्षिका विविध मधु । संचिती त्यांचा चित्रविचित्र । मृगालिपक्ष्यांचा अगाधु । मधुर नाद काननीं ॥६६॥
महापुरुषांचीं विशुद्ध मनें । तैशीं कासारीं स्वच्छ जीवनें । माजीं विकसित पंकजवनें । मंद पवनें डोलती ॥६७॥
बगळे बलाका हंसमिथुनें । जलकुक्कुटें शब्दायमानें । सारसांचीं संभाषणें । भ्रमरगायनें सारसीं ॥६८॥
टिटिव्या कौड्याळ कारंडव । जलाश्रया प्राणी सर्व । स्वभाषणें करिती रव । तेणें गौरव वनशोभे ॥६९॥
ऐसें मंजुघोषें मृगाळिपक्षी । रुंजती जळीं स्थळीं आणि वृक्षीं । यास्तव वनक्रीडा सापेक्षी । जो निरपेक्षी श्रीकृष्ण ॥७०॥
अमलकमलोद्भव अनिळ । मंद सुगंध सुशीतळ । मधुकर मकरंद आणि मवाळ । प्रेमें गोपाळ वेधक ॥७१॥
चतुरस्रें कां षडष्टदळें । दश द्वादश कां षोडश दळें द्विदळें शतारें सहस्र दळें । तदुत्थ अनिळें वन जुष्ट ॥७२॥
वसंत स्वगुणीं वनवरिष्ठ । जेणें भुलवूनि वैकुंठ । अपणामाजीं क्रीडानिष्ठ । केला यथेष्ट लावण्यें ॥७३॥
सती सच्छिष्य कां सत्येवक स्वगुणीं गोंवूनि स्वनायक । सप्रेम सेविती होऊनि रंक । तैं फावे स्वसुख परस्परें ॥७४॥
ऐसें गुणाढ्य देखूनि वन । आदिपुरुष जो भगवान । अग्रजासि बोले वचन । सावधान तें ऐका ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP