अध्याय २० वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगोविंदसद्गुरवे नमः ।
परमपुरुषा मंगलमूर्ति । अमलैश्वर्य अमलकीर्ति । अखिल अमरां चक्रवर्ती । भवावर्ती तारक तूं ॥१॥
अविद्यापूर्यष्टकनिवासी । पुरुषशब्दें बोलिजे त्यासी । ऐशिया जीवचैतन्यासी । गर्भवासासी घडामोडी ॥२॥
तैसेंचि प्रकृतिपुर्यष्टक । जे कां अविद्या निषेधक । तदभिमानी सर्वात्मक । सर्वज्ञापक सर्वेश ॥३॥
शुद्धसत्त्वात्मकपुरीं । सर्वैश्वर्यता शेजारीं स्वप्नें देखे निद्राभरीं । नानावतारीं अवनार्थ ॥४॥
जीवशिवां समा निद । तरी विद्याअविद्यांमाजीं कें भेद । ऐसें म्हणाल तरी अनुवाद । येथींचा विशद परियेसा ॥५॥
जीव अविद्यानिद्राभरें । दुःस्वप्नींचीं दुःकें घोरें । भोगितां चौर्यांशीं लक्ष फेरे । खातां वोथरे वोसणाय ॥६॥
शुद्धसंकल्पइच्छावशें । ध्यानशेजे शिव प्रवेशे । आवड तया प्रपंचवेशें । सुखें संतोषें सर्वदा ॥७॥
स्वेच्छा कल्पनाध्यानशील । म्हणोनि दुःखाचा नेणे मळ । येर प्रपंच गोंधळ । दोघां केवळ सरिसाची ॥८॥
आपुलें ओझें घेतां शिरीं । अथवा धरिलिया बिगारी । एक सुखी स्वसत्ताभरीं । येरु घोरीं पराधीनु ॥९॥
ऐशिया जीवेश्वराचा ईश । यालागीं तूं परमपुरुष । अमंगळाचा नाहीं स्पर्श । पूर्ण परेश परब्रह्म ॥१०॥
ज्ञानाज्ञान उभय भ्रम । निरसूनि सोलीव परब्रह्म । करिशी जैसें हेमीं हेम । रूप नाम समरसतां ॥११॥
स्वगतभेदाची आइती । तेचि अमंगळाची व्यक्ति । अभेद तो तूं मंगलमूर्ति । द्वैतस्फूर्ति नातळतां ॥१२॥
स्वगतभेदाचा उजळे अंक । तोचि अमंगळ भेद कलंक । अमल ऐश्वर्य निष्कलंक । नित्य निष्टंक गुरुवर्या ॥१३॥
अमल तव कीर्तिमंदाकिनी । उगमा येऊनि प्रवाहे वदनीं । श्रवणें पठनें मनोमज्जनीं । मलक्षालनीं पटुतरा ॥१४॥
तो तूं सद्गुरु अमलकीर्ति । अमरनियंता वेदविहितीं । अमरकरणचक्रवर्ती । आत्मस्थिति स्वसत्ता ॥१५॥
होणें जाणें नवीन कांहीं । भवाप्ययांचे बुडती गेहीं । त्यांसि कवळूनि स्वस्मृतिबाहीं । होसी लवलाहीं तारक तूं ॥१६॥
जीवेश्वरत्वें कलंक । विद्या अविद्या उभयात्मक । तें तूं फेडूनि कंचुक । करिसी आत्म्यैक्य स्वबोधें ॥१७॥
एवं जीवशिवोद्धरणा । गोकुळेश्वरा गोरक्षणा । करिसी म्हणोनि चरणस्मरणा । ओपीं करुणावत्सला ॥१८॥
निखिल चाळितां करणवृंद । चराचरीं अमरवरद । एकचि सद्गुरु गोविंद । तारक स्वपदभजकांसी ॥१९॥
जंव जंव पदपल्लवां न शिवे । तंत्र तंव आवर्ती पडिजे जीवें । तें घडलियां मग आघवें । होय ठावें वावसें ॥२०॥
म्हणोनि तुझिया वरतळीं । शक्र विरिंचि चंद्रमौळी । तो तूं सुलभ सप्रेमळीं । गोगोपाळीं गोविंदा ॥२१॥
परी मी विकळ शरीरधर्मीं । धिंवसा धरूनि श्रीपादपद्मीं । अनुसरलोंसें विगतकामीं । तें तूं स्वामी जाणसी ॥२२॥
बालक कांहींच न करी धंदा । निजाचरणें ओपी खेदा । परस्परें मुखारविंदा । पाहोनि मोदा पावती ॥२३॥
इतुकिया भांडवला ऋणी । वांचूनि दिला दास्याचरणीं । देवें स्वशरणातें चरणीं । अंगीकरणीं नुबगावें ॥२४॥
ऐसें ऐकोनि म्हणती गुरु । न धरीं भेदभावाचा पदरु । अभेदबोधें परमादरु । आरब्धग्रंथीं वाढवीं ॥२५॥
वरदाज्ञेची पूर्णिमा । दयार्णवीं वाढवी प्रेमा । प्रज्ञाकल्लोळ कवळी व्योमा । कथनधर्मा प्रवर्ते ॥२६॥
आतां विसाव्यामाझारीं । रामगोपांसहित हरि । प्रावृट्काळीं क्रीडा करी । कोणें प्रकारीं तें ऐका ॥२७॥
प्रथम चोवीस श्लोकीं जाण । प्रावृट्काळाचें वर्णन । सप्तश्लोकीं हरिक्रीडन । शेष कथन शरच्छ्री ॥२८॥
त्यागा दानगुणीं उपमा । प्रावृट्शरदृतूची परमा । वर्णी अद्भुतऐश्वर्यगरिमा । कृष्णपरमात्मा क्रीडतां ॥२९॥
इतुकी कथा श्रीशुकमुनि । सांगेल परीक्षितीलागूनी । तेंचि श्रोतीं ये व्याख्यानीं । सादर होऊनि परिसिजे ॥३०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP