अध्याय २३ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तं ब्रह्म परमं साक्षाद्भगवंतमधोक्षजम् । मनुष्यदृष्ट्या दुप्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे ॥११॥
ओं तत्सन्निर्देशवचन । ब्राह्मण देव आणि यज्ञ । त्रिविध ब्रह्म जें अभिन्न । तो श्रीभगवान अधोक्षज ॥३१॥
साक्श्झात्परब्रह्म निर्गुण । प्रणवाकृति तेंचि सगुण । ब्राह्मण वेद आणि यज्ञ । त्रिधा अभिन्न त्रयीचर्या ॥३२॥
जो हा नंतगुणपरिपूर्ण । ज्याहूनि अध अक्षजज्ञान । ब्रह्मादि देवता अक्षगण । नेणती म्हणोन अधोक्षज ॥३३॥
ज्याचिया ऐश्वर्यसत्तायोगें । माया अजडजडात्मक जागे । तेथें त्रैगुण्य यथाविभागें । विविधा रंगें गुजबुजी ॥३४॥
त्या परब्रह्मा भगवंतातें । ब्राह्मण नाहींच झाले मानिते । मनुष्यबुद्धि जाणोनि चित्तें । गोरक्ष म्हणोनि हेळिले ॥१३५॥
जन्मले असती वैश्ययोनी । असंस्कृत गोरक्षपणीं । अन्नें याचिती मध्याह्नीं । क्षुधेची ग्लानि निरसावया ॥३६॥
आम्ही वेदशास्त्रसंपन्न । पात्रनिर्णयविचक्षण । यज्वे त्रैविद्याभिज्ञ । श्रेष्ठ सर्वज्ञ महंत ॥३७॥
श्रेष्ठत्वगर्वें प्रज्ञा दुष्ट । म्हणोनि नेणती ब्रह्म प्रकट । मानूनि सामान्य फलफट । नेदिती स्पष्ट उत्तरही ॥३८॥
न ते यदोमिति प्रोचुर्न नेति च पंरतप । गोपा निराशाः प्रत्येत्य तथोचुः कृष्णरामयोः ॥१२॥
कृष्णसंवगडियां लागुनी । ऐशिया बुद्धी अनादरूनी । आहे नाहीं या प्रतिवचनीं । मौन धरूनि राहिले ॥३९॥
ऐकोनिही कृष्णमहिमान । न अंगीकरिती गोपवचन । नाहीं म्हणोनि प्रतिवचन । ते ब्राह्मण न देती ॥१४०॥
शत्रुतापना परीक्षिति । याज्ञिक सगर्व दुर्मति । गोवळांशीं न बोलती । मग ते जाती निराश ॥४१॥
भणगापरी वाढवेळ । तिष्ठत राहिले पशुपाळ । मग निराश क्षुधाकुळ । गेले बेंबळ हरीपाशीं ॥४२॥
जाऊनि ते रामकृष्णापुढें । वृत्तांत सांगती संवगडे । ते ऐकोनिया निवाडे । हास्य गाढें हरी करी ॥४३॥
तदुपाकर्ण्य भगवान् प्रहस्य जगदीश्वरः । व्याजहार पुनर्गोपान् दर्शयन् लौकिकीं गतिम् ॥१३॥
सकळजगाचा ईश्वर । म्हणोनि जाणे सर्वांतर । भगवान् षड्गुणऐश्वर्य धर । बोले उत्तर गोपेंशीं ॥४४॥
अहो ऐशी लौकिक गति । प्रवर्तलीया याचक वृत्ति । कोणा नव्हे लघुत्वप्राप्ति । महत्त्वोपहती न पवतां ॥१४५॥
श्रीराम समुद्रां याचितां मार्ग । तो उपेक्षी मानोनि उबग । तेणें होऊनी महत्त्व भंग । लघुत्व आंगा शिवतलें ॥४६॥
द्रोणाद्रीतें अंजनीसुता । रामाज्ञेनें औषधी याचितां । महत्त्व जावोनी पावे लघुता । परी न कळे पर्वता कपिमहिमा ॥४७॥
तथापि निजकार्या कारणें । महत्त्वहानीहि न गणूनि मनें । पुन्हा प्रवर्तती शाहाणे । विरक्तपणें नुबगति ॥४८॥
ऐशी बोधूनि लौकिकी गति । संवगडीयांतें कमलापति । कथोनियां रहस्ययुक्ति । पाठवी पुढती याच्ञेतें ॥४९॥
मां ज्ञापयत पत्नीभ्यः ससंकर्षणमागतं । दास्यन्ति काभमन्नं वः स्निग्धा मय्युषिता धिया ॥१४॥
ऐका गडीहो रहस्यखूण । तुम्हीं पत्नीशाळे जाऊन । माझें करावें परिज्ञान । गुणवर्णन करूनी ॥१५०॥
संकर्षणेशीं चक्रपाणी । पातला आहे ये वनीं । ऐसे यज्वपत्न्यांचे कानीं । मंजुळ वचनीं निवेदा ॥५१॥
तुम्हांस पूर्वीं जेविं ब्राह्मणी । उपेक्षिले अवगणूनि । तैशा झणें मानाल पत्नी । त्या मद्भजनीं अनुरक्ता ॥५२॥
धन्य यज्वपत्न्यांचें प्रेम । स्वमुखें वर्णीं पुरुषोत्तम । सनकादि विरक्त जे निष्काम । तेही सकाम ज्या प्रेमा ॥५३॥
संवगडियांतें म्हणे हरी । यज्वपत्न्यांची भजनपरी । त्या देहमात्र वर्तती घरीं । येर मजमाझारीं सर्वस्वें ॥५४॥
अंतःकरणें मजमाजीं लीन । तेणें समाधि सुखसंपन्न । मनें चिंतितां मनमोहन । त्या उन्मन मद्रूपीं ॥१५५॥
बुद्धि करोनि सदाचारीं । वर्ततां दिसती घरोघरीं । परि त्या मजमाजी प्रेमभरीं । साक्षात्कारीं समरसल्य ॥५६॥
मनःकल्पित हा संसार । तन्निश्चयीं बुद्धिचतुर । तिनें केलें मजमाजीं घर । नुसधें शरीर गृहकृत्यीं ॥५७॥
मुख्य मनबुद्धि या दोन्ही । वसिन्नली माझ्या ठाईं । प्राणेंद्रियादि तत्प्रवाहीं । वर्ततां देहीं अनोळख ॥५८॥
मातें लक्षोनि पदार्थमात्रीं । बुद्धि निश्चयातें जैं करीं । चित्त अनुसंधाना धरी । तदनुसारी अहंता ॥५९॥
प्राणप्रवाह मांदूळती । तन्मय इंद्रियाच्याही वृत्ति । प्रतीतिरूढ मदात्मस्थिति । रिती भ्रांति भवभानीं ॥१६०॥
ऐशा मदात्मवेधेंकरूनि । माझ्या ठाईं यज्वपत्नी । राहिल्या होत्सात्या बाह्य सदनीं । प्रपंचभानीं कलिवरें ॥६१॥
यालागिं स्नेहाळा माझ्या ठायीं । त्या मजवेगळें प्रियतम नाहीं । माझें नाम ऐकतां पाही । सर्वस्वही अर्पिती ॥६२॥
यथापेक्षित जें जें अन्न । तुम्हांसी अर्पिती संपूर्ण । ऐसें ऐकतां भगवद्वचन । गडी तोषोन चालिले ॥६३॥
यज्वपत्न्या पाहों नयनीं । ऐशी आवडी अंतःकरणीं । अन्नयाच्ञा भगवद्वचनीं । आनंदोनी चालले ॥६४॥
गत्वाऽथ पत्नीशालायां दृष्ट्वाऽऽसीनाः स्वलंकृताः । नत्वा द्विजसत्तीर्गोपाः प्रश्रिता इदमब्रुवन् ॥१५॥
यज्वयुवती प्रेमकथन । भगवन्मुखें करूनी श्रवण । त्यानंतरें गोपगण । पत्नीभुवन पावला ॥१६५॥
जावोनि पत्नीशाळेप्रति । देखते झाले यज्वयुवति । हरीनें वर्णिल्या जैशा रिती । त्या ते स्थिती पूर्णत्वें ॥६६॥
श्रवण रंगले हरिकीर्तनीं । हरिगुणकथनीं रंगल्या वाणी । नेत्र गुंतले हरिरूपध्यानीं । कृष्णालिंगनीं त्वगिंद्रियें ॥६७॥
कृष्णप्रेमरसाची गोडी । घेऊनि रसना झाली वेडी । मोडली बाह्य विषयांची आवडी । दिधली बुडी हरिनामीं ॥६८॥
कृष्ण नामामृतस्वादें । जीवशिवाशीं निघती दोंदें । नाचो लागलीं परमानंदें । पूर्णत्व स्फुंदे घडमोडी ॥६९॥
कृष्णपादपद्मामोद । तेणें घ्राणासि लागला वेध । कर्मेंद्रियां प्रवृत्तिच्छंद । ज्या गोविंदमय रुचला ॥१७०॥
अलंकरणीं सुमंडिता । करणव्यापारीं पूर्णत्वा । बैसल्या असती स्वानंदभरिता । भगवन्निरता सौभाग्यें ॥७१॥
देखोनि निवाले अंतरीं । नमस्कारोनि विप्रनारी । परम नम्र मधुरोत्तरीं । वृत्तांत कथिते जाहले ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP