य एतस्मिन् महाभागाः प्रीतिं कुर्वंति मानवाः । नारयोऽभिभवंत्येतान्विष्णुपक्षानिवासुराः ॥२१॥

याच्या ठायीं प्रेमभरित । महासभाग्य कृतसुकृत । जे जे मानव प्रीतिवंत । त्यांते अहित न बहिती ॥८३॥
गरुडा सन्निध ज्यांचा वास । काद्रवेय शिवों न शकती त्यांस । कां विष्णुपक्षगां देवांस । असुर निःशेष न नुधवती ॥८४॥
सूर्यलोकीं ज्यांची वसति । ते नेणती सध्वान्त राती । तेंवि कृष्णीं ज्यांची सप्रेम प्रीति । त्यांतें अराति मग कैंचे ॥१८५॥

तस्मान्नंदकुमारोऽयं नारयण्समो गुणैः । श्रिया कीर्त्याऽनुभावेन न तत्कर्मसु विस्मयः ॥२२॥

या कारणें नंदगोपां । अनंतगुणी सत्यसंकल्पां । तुझा कुमार हा त्रैलोक्यभूषा । साम्य सोपाशिशु न म्हण ॥८६॥
नारायणाचे समान कान्ति । नारायणाचे समान कीर्ति । नाआयणाचे समान धृति । तोचि श्रीपति किंबहुना ॥८७॥
नारायणाचि समान तेज । नारायणाची समान पूज्य । किंबहुना हा गरुडध्वज । न मनिजे चोज तत्कर्मीं ॥८८॥
कर्म देखोनि असाधारण । नोहे विस्मयासि कारण । हा प्रत्यक्ष नारायण । गर्गभाषणविश्वासें ॥८९॥

इत्यद्धा मां समादिश्य गर्गे च स्वगृहं गते । मन्ये नारायणस्यांशं कृष्णमक्लिष्टकारिणम् ॥२३॥

ऐसें प्रत्यक्ष गर्गें मज । भविष्य वर्तवूनि कथिलें गुज । ममान्तरीं तो प्रत्यय सहज । होतां बीज पडिपाडें ॥१९०॥
भविष्य कथूनि बरव्यापरी । गर्ग स्वगृहा गेलियावरी । नारायणाम्श माझा हरि । विश्वास अंतरीं धरिला म्यां ॥९१॥
पुढें वाढतां वाढतां सृष्टि । अक्लिष्ट कर्में देखतां दृष्टी । निश्चय मानिला आपुल्या पोटीं । हा जगजेठी वैकुंठ ॥९२॥
अचाट देखूनि कृष्णकरणी । विस्मय न वटे अंतःकरणी । कां जे गर्गें कथिली काहाणी । तुम्हां ये क्षणीं ते वदलों ॥९३॥

इति नंदवच :- श्रुत्वा गर्गगीतं व्रजौकसः । दृष्टश्रुतानुभावास्तेकृष्णस्याभिततेजसः ।
मुदिता नंदमानर्चुः कृष्णं च् गतविस्मयाः ॥२४॥

ऐसें नंदमुखें कथन । गर्गगीतातें परिसून । आनंदले बल्लवगण । म्हणती धन्य नंदातें ॥९४॥
नंदा तुझिया सुकृतासी । समता न करवे कोणासी । धन्य यशोदा सुकृतराशि । जे कृष्णासी प्रसवली ॥१९५॥
जेणें इंद्र अपमानिला । लीलें गोवर्धन उचलिला । जळत दावानळ प्राशिला । तो हा झाला सुत तुमचा ॥९६॥
ब्रह्माण्डभुवनींचा प्रकाशदीप । निश्चळ शिवाचा अजस्र जप । सनकादिकांचा शुद्धसंकल्प । निर्विकल्प जगदात्मा ॥९७॥
कमलामानसकंदर्पजनक । भूतभावनभवबोधक । तो हा कृष्ण तुमचा तोक । भाग्यें वनौक देखतसों ॥९८॥
अचाट देखूनि कृष्णाचरणें । आम्ही विस्मित होतसों मनें । आतां गर्गोक्तीच्या श्रवणें । गतविस्मय जाहलों ॥९९॥
आतां न म्हणों या लेकरूं । पूर्णकाम हा परमेश्वरू । हृदयीं झाला साक्षात्कारू । तुझा उपकार हा नंदा ॥२००॥

देवे वर्षति यज्ञविप्लवरुषा वज्राश्मपर्षानिलैः ।
सीदत्पालपशुस्त्रि आत्मशरणं दृष्ट्वाऽनुकंप्युत्स्मयन् ॥
उत्पाट्यैककरेण शैलमबलो लीलोच्छिलींध्रं यथा ।
बिभ्रद्गोष्ठमपान् महेंद्रमदभित्प्रीयान्न इंद्रो गवाम् ॥२५॥

ऐसें म्हणोनि बल्लवगण । कृष्णचरितवर्तमान । तें साकल्यें सूचवून । करिती स्तवन तें ऐका ॥१॥
श्रीमन्मंगलानि भवंतु । गोवर्धनाख्यानवृत्तान्तु । एक्या श्लोकें नृपाकथित । सावचित्त परिसा तें ॥२॥
महेंद्राचा मदभेदक । जो श्रीकृष्ण नंदतोक । त्यातें गोपवृद्धप्रमुख । म्हणती रक्षक हो आम्हां ॥३॥
जेणें मंजुळ कलभाषणीं । नंदादिकां प्रश्न करूनी । हेतुवाद प्रशंसूनी । इंद्रयज्ञीं पडखळिलें ॥४॥
करूनि सर्वां निरुत्तर । निषेधिला शक्राध्वर । गोद्विजाद्रियज्ञ सार । अत्यादरें करविला ॥२०५॥
विशाळगोवर्धनाची मूर्ति । प्रकट देखोनियां समस्तीं । दृषविश्वास धरिला चित्तीं । इंद्राप्रति न गणूनी ॥६॥
तेणें इंद्र अपमानला । प्रळयरुद्रोपम क्षोभला । व्रजविनाशा उदित झाला । आज्ञापिला मेघगण ॥७॥
प्रळयमेघ संवर्तक । सहित मरुद्गणांचें कटक । माजि दंभोलि भयानक । निर्दयात्मक त्रिवर्ग ॥८॥
प्रळयजळाचे वृष्टिलोट । माजि वर्षाश्म पडती दाट । कल्पान्तविजूंचा कडकडाट । झडझडाट वायूचा ॥९॥
इत्यादिउपद्रवीं पीडित । गोप गोधनें स्त्रियादिसहित । परम दुःखें झालीं व्याप्त । केवळ अनाथसम गमती ॥२१०॥
इंद्र क्षोभला असतां ऐसी । दुःखावाप्ति व्रजौकसांसी । देखोनि सदय निजमानसीं । श्रीहृषीकेशी कळवळिला ॥११॥
आपणचि ज्यांचें कल्याणधाम । मजविण नेणती अभीष्टकाम । ऐसें जाणोनि पुरुषोत्तम । सद्य सप्रेम द्रवला पैं ॥१२॥
मीच व्रजांचे शिरीं नाथ । असतां दिसती हे अनाथ । यांच्या कैपक्षें सुरनाथ । करीन गर्वहत येकाळीं ॥१३॥
ऐसी प्रौधी आविष्करून । गोवर्धनाद्रि उत्पाटून । करीं घेतला लीलेंकरून । पूर्णकारुण्यें व्रजांच्या ॥१४॥
सप्तसंवत्सरांचा हरि । एक्या हातें धरिला गिरि । व्रज रक्षिलें सप्तरात्री । आणिली हारी इंद्रातें ॥२१५॥
लीलेंकरूनि जेंवि बाळक । उपडोनि करीं घे छात्रांक । तेंवि धरिला नगनायक । लज्जित पाकप्रशास्ता ॥१६॥
ऐसें करूनि व्रजरक्षण । केलें महेंद्रमदभंजन । तो गाईंचा इंद्र कृष्ण । पूर्ण शरण्य जो आम्हां ॥१७॥
ऐसा अपार कृष्णमहिमा । देखोनि गोपांच्या हृदयपद्मा । विस्मय गमला तो नृपोत्तमा । निरसी विदितात्मा व्रजपति ॥१८॥  
मग ते सावध होऊनि सर्व । म्हणती श्रीकृष्ण देवाधिदेव । जाणोनि इंद्रें त्यजिला गर्व । हें अपूर्व वर्तलें ॥१९॥
विमानींहूनि पुष्पवृष्टि । इंद्रें करितां देखिली दृष्टी । आतां उतरूनि वसुधापृष्ठीं । कृष्णा वाक्पटीं स्तवील ॥२२०॥
पुढिले अध्यायीं ती कथा । इंद्र येऊनि कृष्णनाथा । व्योमगंगोदकें माथां । अभिषेचिता होईल ॥२१॥
इत्यादिऐश्वर्यें अनंत । असो आम्हांवरी प्रीतिवंत । बल्लव सशुक उत्तरासुत । सूतही म्हणत तत्पंक्ती ॥२२॥
तैसेचि श्रोते वक्ते पुढें । ज्यां हे कृष्णक्था आवडे । त्यांवरी हरीची प्रीति वाडे । वरद रोकडे गोपांचे ॥२३॥
दशमीं सव्विसाव्या माझारीं । दशमधाम जो कां हरि । सव्विसावा तत्त्वनिर्धारीं । जो श्रीशौरि जगादात्मा ॥२४॥
चोव्वीस निरसूनि प्रतापेंशीं । त्या वेगळ्या मज आत्मांशासी । निवडूनि पंचविसाव्यासी । प्रकट प्रेमेंशीं आळिंगो ॥२२५॥
भागवतींचें रहस्य । जोडूनि सप्रेम श्रीहरिदास्य । उभयकामनानैराश्य । उपजे वैरस्य भवभोगीं ॥२६॥
तोंवरी नेहटावी वृत्ति । परतों नेदोनि मागौती । शुद्धसत्त्वात्मक सुकृती । त्यासीच हे स्थिति बाणेल ॥२७॥
येरां ग्रंथोक्त ज्ञान कळे । विषयप्रवाह अनादि न वळे । स्वप्नवैभव देखे दुबळें । तेंवि आंधळे निजस्वरूपीं ॥२८॥
न साधितां मनोजय । कैसेनि होय वासनाक्षय । शब्दज्ञान जें अप्रत्यय । तें न करी विलय भ्रमाचा ॥२९॥
असो तुमचें जें शिकविलें । तुम्हांपाशींच निवेदिलें । न्यूनाधिक गेलें आलें । क्षमा केलें पाहिजे ॥२३०॥
अविद्याध्वान्तविध्वंसक । भानुकुलोद्भव प्रतापार्क । एकनाथात्मा पुण्यश्लोक । स्मरणें विशोक जगत् कर्ता ॥३१॥
तत्पादाब्जसंभवामोद । उपलब्धात्मा चिदानंद । तेणें सर्वत्र स्वानंद । सज्जनषट्पद सेविती ॥३२॥
तेथ गोगोप्ता गोविंद । प्रत्यक्प्रवण करणवृंद । करूनि भोगवी स्वानंद । करी अगाधें दयार्णवीं ॥३३॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्र शुकनिर्मथित । परमहंस रमती जेथ । स्कंध त्यांत दशम हा ॥३४॥
त्यामाजि गोवर्धनाख्यान । शुकपरीक्षितिसंवाद गहन । नंदें गर्गोक्ति केल्या कथन । तो अध्याय पूर्ण सव्विसावा ॥२३५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां षड्विंशतितमोऽध्यायः ॥२६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२५॥ टीका ओव्या ॥२३५॥ एवं संख्या ॥३६०॥ शुभं भवतु ॥ ( सव्विसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १३२५७ )

सव्विसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP