अध्याय ३० वा - श्लोक ४१ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अन्विच्छंत्यो भगवतो मार्गं गोप्यो विदूरतः । ददृशुः प्रियविश्लेषमोहितां दुःखितां सखीम् ॥४१॥
ध्वजांकुशादि चिह्नीं विशद । भूमीं उमटले जे हरिपद । तदनुलक्षें करिती शोध । प्रमदा प्रसिद्ध स्मरतप्ता ॥२८॥
ऐशा हरिमार्गातें अबला । पहात असतां विरहविकळा । तव दुरून देखिली डोळां । सखी व्याकुळा स्मरबाणें ॥२९॥
प्रियतमाचें आलिंगन । लाहोनि विसरली देहभान । करितां मर्यादालंघन । गेला त्यागून वनवासीं ॥३३०॥
कृष्णप्राप्ति हातींची गेली । निजसखियांची विघडणी झाली । जळावेगळी मासोळी । तेंवि तळमळी हरिविरहें ॥३१॥
तिचें ऐकोन आक्रंदन । सवेग आलिया धांवोन । दुःखवरपडी देखोन । प्रश्नसंभाषण आदरिलें ॥३२॥
वनीं अवघ्या सांडूनि वधू । घेऊनि गेला तुज गोविंदु । कोठें हरविला आनंदकंदु । केंवि हा खेदु तुज झाला ॥३३॥
मग ते सखियांप्रति बोले । मज गोविंदें सम्मानिलें । खांदां वाहोनि आणिलें । विविध दाविलें रतिलास्य ॥३४॥
महीं उतरूनि ठायीं ठायीं । विचित्र वनश्री दाविली पाहीं । पुन्हां उचलूनि दोहीं बाहीं । ने लवलाही स्वैरत्वें ॥३३५॥
माझिया मौलग्रथनासाठीं । सुमनें वेंचूनि भरिली वोटीं । अंघ्रीं घेऊनि आपणानिकटीं । ग्रथिली गोमटी वेणिका ॥३६॥
पुन्हां घेवोनि कडिये खांदां । केली कंदर्पकेली विविधा । प्रमदास्वभावें म्यां प्रमादा । करूनि गोविंदा अवगणिलें ॥३७॥
माझिया लावण्या भुलला हरि । म्हणोनि गर्वा चढलें भारीं । वनीं सांडूनि अवघ्या नारी । वाहे कंधरीं मज प्रेमें ॥३८॥
मी एकचि जगीं लावण्यराशि । म्हणूनि आवडे श्रीकृष्णासी । कृष्ण भुलला सौंदर्यासी । म्यां हृषीकेशी वश केला ॥३९॥
कृष्ण जाला मज अधीन । ऐसा धरिला म्यां अभिमान । चालों न शके मी येथून । खांदां वाहून ने म्हणतां ॥३४०॥
खांदां बैसावया मज बाहे । स्कंधारोहणा उचलितां पाहें । तेथचि गुप्त झाला माये । दुःखें लाहेसम मिडकें ॥४१॥
श्रीकृष्णाचें आलिंगन । आठवे कृष्णाचें चुंबन । सप्रेम अपांग मोक्षण । सादर निरीक्षण आठवे ॥४२॥
श्रीकृष्णाच्या गुह्य गोष्टी । स्मरविलासें सस्निग्ध दृष्टि । रसिकलालनें स्मरोनि पोटीं । होतें कष्टी सखिया हो ॥४३॥
तया कथितमाकर्ण्य मानप्राप्तिं च माधवात् । अवमानं च दौरात्म्याद्विस्मयं परमं ययुः ॥४२॥
तिचें ऐकोनि बोलणें । कीं जे सम्मानिली विशेष कृष्णें । म्हणोनि फुगतां मदाभिमानें । पुन्हां अवमानें विघडली ॥४४॥
अगे या श्रीकृष्णचरणासाठीं । विधिहरप्रमुख विरक्त दृष्टि । दुर्घट तपश्चर्येच्या कंष्टीं । शिणतां भेटी दुर्लभ त्यां ॥३४५॥
दैवें त्याची प्राप्ति घडली । दुरादृष्टें गर्वा चढली । पुन्हा अभिमानें विघडली । संकटीं पडली हरिविरहें ॥४६॥
याचें लाघव न कळे कोण्हा । नये विश्वासों याचिया गुणां । चढली मूर्खत्वें अभिमाना । आतां रुदना करीतसे ॥४७॥
निष्काम करिती हरिकीर्तन । जाय तयापें धावोन । सांडूनि लक्ष्मीसह सुखशयन । सनकादिभाषणें सांडूनी ॥४८॥
हरिकीर्तनामाजि नाचे । वंदी अणुरेणु तेथींचे । शेषाप्रति रहस्य याचें । लक्ष्मी वाचे पुसतसे ॥४९॥
सर्वां सांडूनि स्वयें हरि । निष्काम भक्तांचे कीर्तनगजरीं । नाचे उडे नानापरी । कोण्या विचारीं हें नुमजे ॥३५०॥
ऐकोनि म्हणे फणिनायक । रहस्य जननीये आइक । कृष्ण निजजनपरीक्षक । नमनिं जे निष्टंक वशवर्ती ॥५१॥
स्वयें नीचा करी नमन । कीं जो विश्वात्मा आपण । धरितां अंगलगीं अभिमान । मग त्या चरण न दाखवी ॥५२॥
यालागीं ज्यातें तो सम्मानी । त्यांस जायिजे लोटांगणीं । तरीच अधिकार पदसेवनीं । येर्हवीं हानी तत्काळ ॥५३॥
हरिकिंकराचे किंकर । त्याहून आपण नीचतर । होऊनि त्यांचे चरणीं शिर । ठेवितां अधिकार दास्यत्वा ॥५४॥
हें ऐकोनि कमला देवी । हरिजनांचे चरण सेवी । यास्तव त्रिजगाचा गोसांवी । हृदयीं ठेवी सप्रेमें ॥३५५॥
जे कां अर्धांगनिवासिनी । येथवरी नियेची कडसणी । तेथ हे अभिमानें मानिनी । स्कंधारोहिणीं प्रवर्तली ॥५६॥
यास्तव हातींचा हारविला हरि । भोगी विरहें दुःखलहरी । सुरपद दवडूनि भवसागरीं । याज्ञिकांपरी हे जाचे ॥५७॥
दुरात्मत्वें पावली नाड । आणि त्या कृष्णाचें कैवाड । ऐकोनि परमविस्मयारूढ । म्हणती अवघड हरिप्राप्ति ॥५८॥
ऐशा समदुःखें तन्वंगी । तयेसी घेऊनि आपणासंगीं । पुन्हा वनगर्भीं शार्ङ्गी । रिघोनि वेगीं हुडकिती ॥५९॥
ततोऽविशन्वनं चंद्रज्योत्स्ना यावद्विभाव्यते । तमः प्रविष्टमालक्ष्य ततो निववृतुः हरेः ॥४३॥
तये सहित रिघाल्या वनीं । जंववरी शशिभामंडित रजनी । पडतां तमाची गवसणी । हरिहुडकणी सांडिली ॥३६०॥
त्यानंतरें हरिशोधन । सांडूनि पुन्हा सेविलें पुलिन । तेथ विसरोनि देहाभिमान । करिती गायन हरिविरहें ॥६१॥
तन्मनस्कास्तदालापास्तद्विचेष्टास्तदात्मिकाः । तद्गुणानेव गायंत्यो नात्मागारानि सस्मरुः ॥४४॥
श्रीकृष्णाच्या विरहध्यानें । तदाकार झालीं मनें । तेथ नुमटती प्रपंचभानें । तद्गुणगानें तन्मयता ॥६२॥
उन्मत्त जैसे बरळताती । तैशा विवश हरिगुण गाती । अनुभविली जे हरिसंगति । तैशा चेष्टती तन्मय त्या ॥६३॥
कृष्णगानें कृष्णध्यानें । कृष्णसुरतसन्निधानें । कृष्णाकार झाली मनें । प्रपंचभानें सांडवलीं ॥६४॥
कृष्णध्यानाचिया वेधें । भेदा विसरल्या कृष्णावबोधें । कृष्ण होऊनि कृष्णच्छंदें । प्रेम नुसधें वावरे ॥३६५॥
तया प्रेमाची अवस्था । ग्रंथीं नयेचि वाखाणितां विरंचीपर्यंत बुद्धिमंता । नाहीं योग्यता तत्कथनीं ॥६६॥
तैसाचि प्रेमळ कोण्ही एक । हरिपदलालस हरिकामुक । भोगूं शकेल तद्रससुख । कथनीं मूक परि तोही ॥६७॥
श्रीकृष्णाची विरहदशा । अनिर्वाच्य कुरुनरेशा । अनुभवगम्य तन्मानसा । येरा भरवसा न करवे ॥६८॥
असो ऐशा पुलिनीं रामा । पतिसुतसदनासह विरामा । वेधें तन्मय मेघश्यामा । भावूनि आत्मा गुण गाती ॥६९॥
त्यांची सप्रेम तन्मयता । कथिली न वचेचि तत्वता । यालागिं हरिगुणकीर्तनवार्ता । ऐकें गीता गोपींच्या ॥३७०॥
कुरुपुंगवा तुझेनि प्रश्नें । मजही तैसेंच केलें कृष्णें । इतुकें म्हणतां स्मृतींचें ठाणें । उठोनि नयनें जळ लोटे ॥७१॥
हृदयीं प्रेमसुखाची जोडी । फावतां रोमांच उभविती गुढी । कंठ दाटोनि श्वास कोंडी । पडली बोबडी वाचेसी ॥७२॥
जेंवि कां प्रेमामृताची गार । संवादवायु कृष्णाकार । स्पर्शें होऊं पाहे नीर । तेंवि पाझर स्वेदाचे ॥७३॥
परागपरमाणूंची मांदी । मिरवे जैसी फुल्लारविंदी । पुलकउभारा तैसा स्वेदीं । रोमांच संधि टवटविला ॥७४॥
रावणहननीं भूकंपन । होतां सुराद्रि करी धुनन । तेंवि विरतां अहंभान । तनुकंपन सुखलाभें ॥३७५॥
आनंदाब्धीचें हेलावे । तैसे उठती स्फुंदनयावे । एवं सात्त्विक अष्टभावें । श्रीशुकदेवें आथिला ॥७६॥
जेणें वेषें बिंब नटे । प्रतिबिंबही तैसेंचि वेंठे । अष्टभावीं स्वसुखीं पैठें । केलें नेटें तेंवि नृपा ॥७७॥
रासक्रीडेच्या विनोदें । गोपी आथिल्या परमानंदें । स्तिमित झालीं खेचरवृंदें । विधिही न वदे गतसमया ॥७८॥
तैसेचि श्रोते वक्ते दोन्ही । अष्टभावीं सुख भोगूनी । पुन्हा स्मृतीतें आलिंगोनी । श्रवणीं कथनीं प्रवर्तले ॥७९॥
मग बादरायणि म्हणे राया । गोपी हरिविरहें तन्मया । धनसुत सदनें विसरोनियां । गुण गावया प्रवर्तल्या ॥३८०॥
पुनः पुलिनमागत्य कालिंद्याः कृष्णभावनाः । समवेता जगुः कृष्णं तदागमनकाक्षिताः ॥४५॥
पूर्वीं कालिंदीच्या पुलिनीं । अभीष्ट भोगिला चक्रपाणि । पुढती त्याचि स्थळा येऊनी । कृष्णभावनीं तन्मनस्का ॥८१॥
कृष्णाकार कृष्णवेधें । भक्तसुखाच्या अवबोधें । कृष्ण गाती भेदावरोधें । श्रीकृष्णपदें वांछिती ॥८२॥
वांचिती कृष्णाचें आगमन । समस्त मिळोनि गाती कृष्ण । वसवूनि कालिंदीचें पुलिन । भोगिला भगवान जेथ पूर्वीं ॥८३॥
येथूनि पुढें गोपीगीत । एकतिसाव्या अध्यायांत । कथिजेल तेथ देऊनि चित्त । श्रोतीं निवांत परिसावें ॥८४॥
एकोणतिसावा भवविरक्ति । श्रवणवेधें हरिपदप्राप्ति । ईषणात्यागें भगवद्रति । सुखविश्रांति भोगिली ॥३८५॥
पुन्हा उपलब्ध सुखाचा मद । धरितां अंतरला गोविंद । तदन्वेषणप्रकार विशद । तादात्म्यवेध तिसावा ॥८६॥
भूतमात्रीं भगवत्प्रेमा । विपरीतविवर्तबोधोपरमा । लाहतां साफल्य केलिया श्रमा । हे येथ गरिमा जाणावी ॥८७॥
येथवरी अधिकार चढल्या पूर्ण । न लगे अन्यत्र मग साधन । निर्लज्ज करावें हरिकीर्तन । तन्मय होऊन तद्वेधें ॥८८॥
तेचि गोपीगीतमिसें । पुढें कथिजेल राया परिसें । जेथ रमिजे परमहंसें । ऐसें व्यासें निगदिलें ॥८९॥
उत्तरजामाताचे श्रवणीं । इतुकें घालूनि बादरायणि । गोपीगीतनिरूपणीं । सावध येथूनि म्हणतसे ॥३९०॥
प्रतिष्ठानवाळवंट । गौतमीरूपें यमुनातट । अभेद एकात्म वैकुंठ । एकनिष्ठ क्रीडतसे ॥९१॥
तेथ चिदानंद मुरलीगीतें । स्वानंदवेधें गोपीचित्तें । विषयत्यागें गोविंदातें । विरहतप्तें समरसलीं ॥९२॥
तेथ लाहूनि गोविंदरति । शुद्धसत्वें अहंकृति । धरितां अंतरिली अनुभूति । विरहावतीं परिभ्रमण ॥९३॥
भुक्तसुखाचा न पडे विसर । गोड न वटे भवसागर । तेव्हां जालिया कीर्तनपर । कृष्णदयार्णव जाणोनी ॥९४॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र मूळ गणित । परमहंस जेथ निरत । स्कंध त्यांत दशम हा ॥३९५॥
शुकपरीक्षितिसंवाद गहन । गोपिकांहीं हरिशोधन । केलें तें हें निरूपण । अध्याय संपूर्ण तिसावा ॥९६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां भगदन्वेषणं नाम त्रिंशतितमोऽध्यायः ॥३०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ टीका संख्या ॥३९६॥ एवं संख्या ॥४४१॥ ( तिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १५३०९ )
तिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP