अध्याय ३७ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
चाणूरं मुष्टिकं चैव मल्लानन्यांश्च हस्तिनम् । कंसं च निहतं द्रक्ष्ये परश्वोऽहनि तो विभो ॥१६॥
परश्वोऽहनि म्हणिजे परवां । मथुरा प्रवेशसी माधवा । चाणूरादि मल्लां सर्वां । मुष्टिकप्रमुखां मारिसी ॥५७॥
अतींद्रियद्र्ष्टा नारदमुनि । तयाची प्रसिद्ध सिद्धवाणी । ज्ञानप्रकाशें अवलोकुनी । कृष्णालागूनि विज्ञापी ॥५८॥
माझें संपतां वृत्तांतकथन । सद्यचि होईल अक्रूरागमन । त्याचें ऐकोनि विज्ञापन । मथुरानिवेशन प्रभाते ॥५९॥
उद्यां अपराह्णीं मथुरानगर । सहित अग्रज वयस्यनिकर । प्रवेशोनि पाहसी समग्र । लक्ष्मी विचित्र यदुपुरीची ॥१६०॥
रजक वधूनियां प्रारंभीं । धनुष्य भंगूनि समारंभीं । कंसबळेंसीं काळक्षोभी । धनुष्यरक्षक वधसील ॥६१॥
ऐसी संपल्या उद्यांची रात्री । परवा पाहीन आपुले नेत्रीं । तुवां मारिला जाईल स्वकरीं । कुवलयापीड महागज ॥६२॥
पुढें रिघोनि रंगागार । समल्लमुष्टिकादि चाणूर । तुवां मर्दिला कंसासुर । हें तव चरित्र पाहीन ॥६३॥
इतुकें पाहीन रोकडें । यावरी मारिसी जे जे पुढें । ते ते वीर प्रतापी गाढे । ऐकें निवाडें जाणवितों ॥६४॥
तस्यानु शंखयवनमुराणां नरकस्य च । पारिजातस्य हरणमिंद्रस्य च पराभवम् ॥१७॥
कंसमर्दनापासून । अनुक्रमेंचि चरित्र जाण । भद्रासनीं उग्रसेन । पितृसांत्वन व्रतदीक्षा ॥१६५॥
पुढें सांदीपनीपासीं । गुरूपसादन विद्याभ्यासीं । गुरुपत्नीनें दक्षणेसी । मृतपुत्रासि याचितां ॥६६॥
तदर्थ प्रवेशे सिंधूदरीं पांचजन्य जो सागरवैरि । मर्दूनि वागविसी वामकरीं । मत्स्यावतारीं जेंवि दुजा ॥६७॥
त्यानंतरें कंसदारा । दुःखें जाऊन कंसघरा । पिता मागध स्मरवूनि वैरा । बळात्कारें क्षोभवितां ॥६८॥
कंससूड मागतां रणीं । मागधपक्षीय दैत्यश्रेणी । मर्दितां अनुक्रमें करूनी । कालयवन मारिसी ॥६९॥
त्यानंतरें रुक्मिणीहरणीं । संहरिसी वीरश्रेणी । हें व्याख्यान वक्ष्यमाणीं । व्यत्यास कोण्ही न मनावा ॥१७०॥
सत्यभामारुक्मिणी कलह । सत्यभामासांत्वनस्नेह । दावितां अमरांचा समूह । कथील विग्रह भौमाचा ॥७१॥
तत्प्रसंगें मुरमर्दन । आणि नरकासुराचें हनन । पारिजातद्रुमापहरण । गर्व भंगून शक्राचा ॥७२॥
उद्वाहं वीरकन्यानां वीर्यशुल्कादिलक्षणम् । नृगस्य मोक्षणं पापाद्वारकायां जगत्पते ॥१८॥
स्वप्रतापमात्र मोल । करूनि ललनारत्नें अमोल । जिंकिसी तत्प्रसंगें खळ । प्रबळदळेंसी निर्दळिसी ॥७३॥
रुक्मिणीप्रमुख नायिका अष्ट । कृतनियमेंसी जिंकिसी स्पष्ट । सोळा सहस्र येकवाट । येके घटिकेंत वरिसील ॥७४॥
स्यमंतकमणिगवेषण । जांबवंताचें संतोषण । करिसी गर्व परिहरून । देशी दर्शन रामरूपें ॥१७५॥
नृगासि द्विजशापें करून । अंधकूपीं चिरकाळ पतन । त्याचें करितील उद्धरण । द्वारकाभुवन वसवूनी ॥७६॥
स्यमंतकस्य च मणेरादानं सह भार्यया । मृतपुत्रप्रदानं च ब्राह्मणस्य स्वधामतः ॥१९॥
सत्यभामेची ऐकोनि ग्लानि । सुधन्व्याची प्रानहानि । करूनि घेसी स्यमंतकमणी । हेंही नयनीं देखेन ॥७७॥
पुढें ब्राह्मणाचे मृतपुत्र । प्रतिज्ञापूर्वक पंडुपुत्र । आनितां भंगेल प्रतिज्ञासूत्र । तैं तूं चरित्र करसील ॥७८॥
सवें घेऊनियां अर्जुन । महाकाळपुरा जाऊन । ब्राह्मणाचे मृतनंदन । देसी आणून कौतुकें ॥७९॥
पौंड्रकस्य वधं पश्चात्काशिपुर्याश्च दीपनम् । दंतवक्त्रस्य निधनं चैद्यस्य च महाक्रतौ ॥२०॥
पौंड्रकनामें कारुषराव । कृष्णायुधें कृत्रिम सर्व । धरूनि म्हणवी वासुदेव । द्वेषें दानव समसाम्य ॥१८०॥
दूत धाडूनि तो दुर्मति । पाचारील युद्धाप्रति । काशीमाजी त्या स्वरूपमुक्ति । देसी स्वहस्तीं निवटूनी ॥८१॥
काशीपति पौंड्रकमित्र चक्रें छेदिसी तयाचें वक्त्र । सूडाकारणें तत्पुत्र । यजील अभिचारविधि रुद्रा ॥८२॥
रुद्र दत्त कृत्या क्रूर । यज्ञीं प्रकटेल महाघोर । तीतें प्रेरूनि द्वारकापुर । जाळितां प्रतिकार तूं करिसी ॥८३॥
धगधगीत सुदर्शन देखोनि कृत्या पलायमान । प्रेरकेंसी ऋत्विग्गण । भस्म जाळून करील ॥८४॥
तत्प्रसंगें काशीपुरी । अवदान होईल वैश्वानरी । राजसूयमहाध्वरीं । प्रार्थील तूंतें युधिष्ठिर ॥१८५॥
तत्प्रसंगें मागधहनन । भीमहस्तें करविसी जाण । अग्रपूजेचें प्रकरण । चैद्यहनन ते ठायीं ॥८६॥
अनुक्रमेंचि दंतवक्त्र । मनुष्यरूपी केवळ असुर । तुजसी करूनि क्रूर समर । समरसेल तुजमाजी ॥८७॥
या वेगळे अनेक वीर । पृथ्वी ज्यांचा मानी भार । त्यांचा करिसील संहार पांडुकुमर क्षोभवूनी ॥८८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 05, 2017
TOP