अध्याय ५० वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीमद्गोविंदात्मने नमः ॥ श्रीमन्महागनपतये नमः ॥ श्रीमन्मुरलीपुरवासिपरमहंसाय नमः ॥ श्रीमद्गोविम्दात्मजाय सोमयाजिने नमः ॥ श्रीमत्सिद्धेश्वरवरदशिवरामात्मने नमः ॥ स्वस्त्सिश्रीमन्मंगलानि भवंतु ॥
गोगणवेत्ता श्रीगोविंद । अखिलाद्यैक आनंदकंद । लीलानुग्रहचरितानुवाद । वदवी विशद स्वसत्ता ॥१॥
हरिहरब्रह्मादि गीर्वाण । जो समष्टीचा गोगण । तद्गत जयाचें संवेदन । वेत्ता संपूर्ण गोविंद ॥२॥
यथोक्त अभिगत करणशोभा । जें उभारी विश्वारंभा । सत्तायोगें ऐश्वर्यप्रभा । विश्ववालभा श्री ज्याची ॥३॥
अखिलसर्गाची विस्तृति । तद्गत सहजानंदावाप्ति । अभेद एकात्मत्वस्थिति । तत्संभूति जेथूनी ॥४॥
तो विंद गोमयवेत्ता । स्वधर्मसेतुसंगोपनार्था । अनेक लीलाविग्रह धरिता । अगाधचरिता विस्तारी ॥५॥
त्यांमाजि मामकीमतिमोदक । कमनीय कृष्णविग्रह एक । तत्कृतचरित्र असंख्याक । वदला श्रीशुक मितवाणी ॥६॥
तयांतील दशम स्कंध । त्यावरी देशभाषाप्रबंध । देशिकादेशें टीका विशद । जें हरिवरदव्याख्यान ॥७॥
आनंदाब्दीं कार्त्तिकमासीं । शुक्लपक्षीं त्रयोदशी । भौमाश्विनीसिद्धियोगेंसीं । पारमहंसीं पुण्योत्सवीं ॥८॥
मुरलीपुरीं सत्समाजीं । अनुचर निरत श्रीपदकंजीं । आज्ञापिला व्याख्यानकार्जी । मौळ कराब्जीं स्पर्शोनी ॥९॥
म्हणती गुरुपदपंकजभ्रमरा । सप्रेमळा आदेशकरा । आरब्ध ग्रंथ कीजे पुरा । संशयवारा न स्पर्शे ॥१०॥
ज्याची सत्ता ब्रह्मांड चाळी । तो वदविता तव हृत्कमळीं । असतां शंकेची काजळी । किमर्थ जवळी वसवावी ॥११॥
स्वसत्ता पूर्ण कर्त्ता हरि । आपण आज्ञानियोगकारी । जे ज्या नियोजिले व्यापारीं । आपण त्यापरी वर्त्तावें ॥१२॥
गोविंदात्मज शिवदीक्षित । वेदार्थवक्ता विपश्चित । चौधरी उपनामें जो ख्यात । मंत्रभागवतव्याख्याता ॥१३॥
दुसरा अपरसिद्धेश्वर । लाहूनि तद्गत साक्षात्कार । करी कारुण्यें जगदुद्धार । भट्ट मुनिवर शिवराम ॥१४॥
एतत्प्रमुख श्रौतस्मार्ती । यतिवर महानुभाव सन्मूर्ति । ब्रह्मसमाजीं हे वरदोक्ति । आज्ञापिली दयार्णव ॥१५॥
आज्ञे सरिसें करूनि नमन । प्रावृटीं कविबुधयोगीं घन । कुरुपे तैसी प्रज्ञागगन । कवळी पूर्ण प्रमेयाचें ॥१६॥
ग्रंथारंभीं मंगळाचरण । हरिगुणगणपति कविजन । त्यांची कृपा शारदा पूर्ण । अभेद नमन गुरुचरणां ॥१७॥
ब्रह्मा नारद व्यास वाल्मिक । महर्षि प्रमुख पराशर शुक । ऊर्ध्वरेते सनकादिक । प्राचीन अशेष कवि नमिले ॥१८॥
मुकुंदराज ज्ञानेश्वर । प्रमुख देशभाषाकार । सिद्धान्तवक्ते ज्ञानभास्कर । स्मरोनि सादर वंदिले ॥१९॥
लिहिजे विस्तृत नामावळी । ग्रंथ जाईल पैं पाल्हाळीं । यालागिं स्मरोनि हृदयकमळीं । धरिलें मौळीं पदकंज ॥२०॥
एवं गुरुभक्तांचा निकर । आब्रह्मादि जो स्थावर । ओतप्रोत जें चिन्मात्र । अभेद अविकार तें नमन ॥२१॥
सूर्य सूर्येंचि प्रकाशे । कीं अमृतीं अमृतचि समरसे । हरिगुणश्रवणीं श्रोते तैसे । साक्षात् हरिरूप हरिवेत्ते ॥२२॥
शौनकप्रमुख जे प्राचीन । लक्ष्मी पार्वती विधि ईशान । इत्यादि श्रोते उद्धवार्जुन । जनमेजय परीक्षिति ॥२३॥
तैशाच भावी भगवन्मूर्ति । ज्यांसि आवडे भगवत्कीर्ति । त्यांच्या चरणां करूनि प्रणति । विनीतविनति हे माझी ॥२४॥
तुमचे कृपेच्या अमृतघनें । पाल्हेजती प्रमेयवनें । अनवधानावर्षणें । स्थिति विरूढली करपती ॥२५॥
यालागिं अवधानाची वृष्टि । मजवरी कीजे कृपादृष्टि । तेणें हरिगुणवरसपुष्टि । विरूढे वाक्पुटीं लसलसित ॥२६॥
हेहि विनति माझी गौण । हा तंव तुमचा सहज गुण । जेंवि अमृतीं अमरपण । विषीं मरण नैसर्ग्य ॥२७॥
तेंवि दुर्जन दूषिती ग्रंथ । जर्ही ते भावें वंदिले माथां । सज्जन घेती न प्रार्थितां । माधवमाधुरी मधुव्रत जे ॥२८॥
सामुद्रिकें पाहूनि चिन्हें । प्रिया परणिजे पाणिग्रहणें । मातेसि पाहतां तीं लक्षणें । होय उपेणें यमसदनीं ॥२९॥
तेंवि साहित्य अळंकार । नवरसनाटकें श्रृंगार । छंदसंगीतपठनें चतुर । होऊनि सुंदर काव्य कीजे ॥३०॥
वाचूनि महाकवींच्या ग्रंथा । हरिकीर्तन श्रवण करितां । चातुर्य शिकोनि दूषण देतां । बैसे माथां यमदंड ॥३१॥
यालागीं नमन सर्वात्मका । कडसणीची सांडूनि शंका । प्राश्निकां श्रोत्यां अनुमोदकां पृथक् विवेका न करीं मी ॥३२॥
दशमस्कंधींचें पूर्वार्ध । महाराष्ट्रभाषावोवीप्रबंध । मूळ व्यासोक्त पाहूनि शुद्ध । विवरिलें विशद यथामति ॥३३॥
तेथ पूर्वार्ध संपते काळीं । धृतराष्ट्राची राहटी सकळीं । अक्रूरें रामकृष्णांजवळी । येऊनि कथिली विषमता ॥३४॥
तें ऐकोनि राममुरारी । उत्साहयुक्त अभ्यंतरीं । भूभारहरणा शस्त्रधारी । झाले समरीं कैं कैसे ॥३५॥
तो हरीचा प्रथम समर । कोण प्रतियोद्धा महावीर । समरकारण सविस्तर । सांगे मुनिवर तें ऐका ॥३६॥
क्रमें अध्याय पन्नासावा । प्रथम उद्दरार्धीं जाणावा । तेथ हा कथासमुद्च्चय आघवा । वाखाणिजेल संक्षेपें ॥३७॥
एकावन्नामाजीं हरि । पलायनमिषें यवना विवरीं । मुचुकुंदाच्या क्षोभें मारी । कृपेनें तारी मुचुकुंदा ॥३८॥
बावन्नाव्यामाजीं कृष्ण । पळोनि पर्वतीं सबंधु लीन । द्वारके वसतां रुक्मिणीलेखन । केलें श्रवण द्विजवदनें ॥३९॥
त्रेपन्नामाजीं कौंडण्यपुरीं । प्रतापें हरूनियां नोवरी । मागधादि दुर्मद वैरी । तत्प्रतिकारीं उठावले ॥४०॥
चौपन्नाव्या अध्यायांत । मागधप्रमुख भंगूनि अहित । विटंबूनि रुक्मि सोडिला जित । इत्थंभूत करग्रहण ॥४१॥
पंचावन्नीं रुक्मिणीजठरीं । स्मर जन्मतां शंबर हरी । कामें त्यातें मारून समरीं । पूर्वनोवरीसह आला ॥४२॥
एवमादि हें अध्यायषट्क । पूर्वार्धान्तींचें पंचक । एकादशिनी हे सम्यक । पंचम निष्टंक जाणावा ॥४३॥
परिसा पूर्वान्वयसंबंधा । प्रथम जरासंध प्रतियोद्धा । लाहूनि दिव्ययानायुधा । करिती युद्धा बलकृष्ण ॥४४॥
मनुष्यवेषाची अवगणी । तदनुसार संपादणी । जरासंधा समरांगणीं । रामकृष्णीं भिडिजेल ॥४५॥
तेथ अष्टादशावे समरीं । बलराम आणि श्रीमुरारी । शत्रुभेणें द्वारकापुरी । सिंधुमाझारीं वसविती ॥४६॥
पूतनेपासूनि कंसवरी । कपटी कपटें मर्दूनि हरि । धार्मिक मागध स्वधर्मसमरीं । जिंकूनि उतरी भूभार ॥४७॥
मागधकलहासि कारण । तें हें मुख्य कंसमरण । शुकसिंहाचें अवलोकन । अनुसंधान कथेचें ॥४८॥
धृतराष्ट्र पांडवेंशीं विषम । ऐकोनि क्षोभले कृष्णराम । पुढें कौरवहननोद्यम । यथानुक्रम वर्णावा ॥४९॥
तंव हें सिंहावलोकनें । कंसकथेच्या उपसंहरणें । संदर्भिलें मुनिसर्वज्ञें । नृपाकारणें तें ऐका ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP