अध्याय ५१ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भूमेर्भारायमाणानामसुराणां क्षयाय च । अवतीर्णो यदुकुले गृह आनकदुंदुभेः ।
वदंति वासुदेवेति वसुदेवसुतं हि माम् ॥४१॥

भूमीकारणें भाररूप । केवळ दैत्य असुर भूप । त्यांच्या क्षयाचा साक्षेप । कृतसंकल्प मम जन्म ॥३३॥
अधर्मकरांचें संहरण । तेणेंचि धर्मसंरक्षण । असाधूम्चें निर्दळण । साधुपाळण तैं तेंची ॥३४॥
महाविष्णु जो परात्मा । तो मी त्रिदशकल्याणकामा । भूभारहरणा प्रार्थितां ब्रह्मा । धरूनि जन्मा अवतरलों ॥२३५॥
कोण म्हणोनि पुसिलें याचें । परिज्ञान करूनि साचें । कोणे गोत्रीं जन्म त्याचें । विवरण वाचे निरूपितों ॥३६॥
सोमवंशीं यदुअन्वयीं । वृष्णिप्रवर वसुदेवगेहीं । म्यां हा अवतार धरिला पाहीं । ऐक नामेंही सांगतसें ॥३७॥
आनकदुंदुभि जो वसुदेव । तेथें माझा प्रादुर्भाव । वसुदेवतनय वासुदेव । म्हणती मानव भूलोकीं ॥३८॥
अवतारकार्य कांहीं कांहीं । यावत्काळ केलें तेंही । अल्प स्वल्प कथितों पाहीं । ऐकोनि हृदयीं समजावें ॥३९॥

कालनेमिर्हतः कंसः प्रलंबाद्याश्च सद्द्विषः ।
अयं च यवनो दग्धो राजंस्ते तिग्मचक्षुषा ॥४२॥

कालनेमीचा अवतार । तो म्यां वधिला कंसासुर । सज्जनद्वेष्टे दैत्य क्रूर । प्रलंबप्रमुख निर्दळिले ॥२४०॥
तुझिया तीक्ष्णदृगग्निपातें । राया यवन म्यां वधिला येथें । तुजवरी सुप्रसन्नचित्तें । अनुग्रहार्थ प्रकटलो ॥४१॥
 
सोऽहं तवानुग्रहार्त गुहामेतामुपागतः । प्रार्थितः प्रचुरं पूर्व त्वयाहं भक्तवत्सलः ॥४३॥

कंटकाविळ घोरारण्य । किमर्थ प्रवेशलासि म्हणोन । राया तां जो केला प्रश्न । तत्प्रतिवचन हें ऐक ॥४२॥
तवानुग्रहार्थचि जाणें । माझें येथ जालें येणें । तुज उमजावया कारणें । खुणा लक्षणें अवधारीं ॥४३॥
कैवल्यदाता पैं श्रीहरि । जो एक तुजला कथिला सुरीं । तो प्रकटलों ये अवसरीं । प्रतीत तवान्तरीं बाणावया ॥४४॥
चतुर्बाहु पीतवसन । मेघश्याम पंकजनयन । वैजयंती श्रीवत्सचिह्न । अभीष्टध्यान अवगमिजे ॥२४५॥

भक्तवत्सल मी जो पूर्वीं । तुवां प्रार्थिलों सर्वभावीं । ते हे अभीष्टसिद्धि आघवी । फळली अटवी सुरतरूंची ॥४६॥

वरान्वृणीष्व राजर्षे सर्वान्कामान्ददामि ते ।
मां प्रपन्नो जनः कश्चिन्न भूयोऽर्हति शोचितुम् ॥४४॥

हे जाणोनि राजेश्वरा । मनोवांछिता मागें वरा । त्या देऊनि तव अंतरा । पूर्ण सत्वरा करीन ॥४७॥
अनन्यभावें मातें शरण । कोण्ही एक होईल जन । पुढती त्यातें शोकदर्शन । नोहे जाण कल्पान्तीं ॥४८॥
अनन्यभावें शरण मातें । होऊनियांही अपूर्णचित्तें । राहोनि शोक करावयातें । समर्थ नोहे कोण्हीही ॥४९॥
अथवा अन्यत्र देवता भजती । जेंवि ते प्राणी शोकार्ह होती । तैसी मदेकशरणांप्रति । न शिवे कल्पान्तीं शोकोर्मि ॥२५०॥
हें वाटेल तुज कानडें । तरी हें व्याख्यान ऐकें उघडें । दृष्टांतद्वारा अर्थ निवडे । तैम श्रोता न पडे संदेहीं ॥५१॥
उखता बैसविला बिढारीं । तो तें इतरां दान न करी । गृहस्थ दात्यातेंचि दवडी दुरी । तैं कोण उजरी दानपात्रा ॥५२॥
तेंवि सामान्यें दैवतें । पदेंण सहित नाशिवंतें । त्यांच्या वरें शोकाभिभूतें । भजकें होती सर्वत्र ॥५३॥
तैसे न होती मदेकशरण । लाहोनि अक्षय मम वरदान । होती निष्कामनापूर्ण । शोक कोठून त्या स्पर्शें ॥५४॥
ऐशी भगवन्मुखींची वाणी । ऐकोनि मुचुकुंद अंतःकरणीं । प्रत्यय बाणोनि वोळखी जुनी । स्मरोनि नमनीं प्रवर्तला ॥२५५॥

श्रीशुक उवाच - इत्युक्तस्तं प्रणम्याऽऽह मुचुकुंदो मुदान्वितः ।
ज्ञात्वा नारायणं देवं गर्गवाक्यमनुस्मरन् ॥४५॥

शुक म्हणे गा कुरुनरशक्रा । इत्यादि कृष्णोक्ति अवक्रा । ऐकोनि मुचुकुंद पाहे वक्त्रा । शशांकचक्रा चकोरवत् ॥५६॥
इत्यादि बोलिला होत्साता । कृष्णचरणीं ठेवूनि माथा । परमानंदें निर्भरचित्ता । माजि तत्वता विवरीतसे ॥५७॥
राज्य करितां मज अयोध्यापुरीं । वृद्धगर्गोक्ति तैं ऐकिली श्रोत्रीं । द्वितीयपरार्धामाझारी । कीं अवतरेल हरि यदुवंशीं ॥५८॥
अठ्ठाविसाव्या युगाच्या ठायीं । द्वापारान्तीं कलीच्या उदयीं । देवकीजठरीं वसुदेवनिलयीं । शेषशायी जन्मेल ॥५९॥
ऐसी गर्गोक्ति स्मरोनि मनीं । तो हा नारायण जाणोनी । परम विनीत नम्र मूर्ध्नि । मुचुकुंद स्तवनीं प्रवर्तला ॥२६०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP