अध्याय ५२ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - इत्थं सोऽनुगृहीतोंऽग कृष्णेनेक्ष्वाकुनंदनः ।
तं परिक्रम्य सनम्य निश्चक्राम गुहामुखात् ॥१॥
ये अध्यायीं निरूपण । मुचुकुंदकथीं उपसंहरण । म्लेच्छसैन्य संहारून । नेतां तें धन द्वारकेसी ॥११॥
तये संधि जरासंधु । आला जाणोनि उभय बंदु । पळतां पर्वतीं पावले वधु । ऐसा शब्द रूढविला ॥१२॥
मग रुक्मिणीस्वयंवरीं । भीमकीपत्रें तोषोनि हरि । प्रकट जाले कोण्डिन्यपुरीं । तें अवधारीं कुरुनाथा ॥१३॥
कोमळ आमंत्रणीं म्हणे अंग । ऐसा मुचुकुंद अनुग्रहूनि सांग । इक्ष्वाकु अन्वयापत्य जो चांग । कृष्णें अव्यंग बोलिला ॥१४॥
मग त्या कृष्णाचीं चरणकमळें । सम्यक् नमूनि स्नेहबळें । सप्रेमभावें स्रवती डोळे । जेंवि शरदब्जमुकुळें विकाशतां ॥१५॥
वारंवार प्रदक्षिणा । करूनि लागे पुढती चरणां । अलोट जाणोनि श्रीकृष्णाज्ञा । सोडिलें वदना गुहेचिया ॥१६॥
जैसा प्राग्गुहाउदयाद्रिवदना । पुर्सूनि सूर्य संचरे गगना । तैसा मुचुकुंद बदरीकानना । करी कां गमना तें ऐका ॥१७॥
स वीक्ष्य क्षुल्लकान्मर्त्यान्पशून्वीरुद्वनस्पतीन् ।
मत्वा कलियुगं प्राप्तं जगाम दिशमुत्तराम् ॥२॥
परम क्षुल्लक मर्त्यजाति । तैशाच क्षुल्लका वनस्पति । जाळी गुल्मादिकांच्या पंक्ति । भूतळीं भासती अत्यल्पा ॥१८॥
कुल्यातुल्य महासरिता । प्रजा वर्णादिस्वधर्मरहिता । दिव्यद्रुमीं निष्फलता । ऋद्धिवर्जिता महाकृषि ॥१९॥
अल्पसा अल्पबळें । अल्पवृष्टि अल्पजळें । प्राणिमात्र क्षुत्क्शामविकळें । अल्पधैर्यें अल्पकें ॥२०॥
ऐसें जाणोनि वर्तमान । भाविलें कळिकाळाचें चिह्न । मग मानसीं होऊनि उद्विग्न । केलें स्मरण कृष्णाचें झणें ॥२१॥
कळिकाखाचा लागतां वारा । विकल्प झळंबेल अंतरा । म्हणोनि उत्तरेचिया मोहरा । त्वरें घाबिरा निघाला ॥२२॥
परम पावन बदरीस्थान । नारायणाचें संनिधान । जेथीं लागतां सहज पवन । कलिमलदहन क्षणमात्रें ॥२३॥
हृदयीं चिंतूनि तया ठाया । कोण्या प्रकारें नेमूनि काया । जातां जाला तें कुरुराया । परिसावया शुक बोधी ॥२४॥
तपः श्रद्धायुतो धीरो निःस्म्गो मुक्तसंशयः ।
समाधाय मनः कृष्णे प्राविशद्गंधमादनम् ॥३॥
कृष्णें उपदेशिलीं जीं वचनें । श्रद्धापूर्वक विवरूनि मनें । म्हणे मज पूर्वीं मृगयाचरणें । जंतुहनन अघ घडलें ॥२५॥
क्षात्रधम नृपराहटी । माजि घडल्या पातककोटि । तत्क्षाळणीं कृपाळु पोटीं । मज हे गोठी हरि वदला ॥२६॥
एकाग्रचित्तें इंद्रियदमनें । मन्निष्ठ निष्काम तपाचरणें । उरल्या आयुष्यें अघसंहरणें । हें श्रीकृष्णें मज कथिलें ॥२७॥
या वाक्याच्या अनुस्मरणें । श्रद्धापूर्वक अंतःकरणें । धैर्य धरूनि निःसंगपणें । संशयहननें दृढ जाला ॥२८॥
निःस्पृह एकाकी वनवासी । कृच्छ्रादि नियम कायसे त्यासी । तपश्चर्या केली कैसी । ते अल्पसी अवधारा ॥२९॥
काया वाचा आणि मन । त्रिविधतपश्चर्यासाधन । साधिता जाला इंद्रियगण । कृष्णार्पण करूनियां ॥३०॥
सर्वभूतीं भगवद्भाव । यास्तव भूतीं सुहृत्स्नेह । जातिवैरें शरीरमोह । न करी रोह प्रज्ञेतें ॥३१॥
नेदी भूतमात्रासि दुःख । तत्सुखीं शरीर अवंचक । देवब्रहमणप्राज्ञप्रमुख । सद्विवेकें उपासी ॥३२॥
स्थावराहूनि सचेतनीं । मूर्खाहूनि वरिष्ठ ज्ञानी । जाणोनि तारतम्यकडसणी । समवर्तनीं सोत्साह ॥३३॥
नमन मनाची अवक्रता । ब्रह्मचर्य ब्रह्मनिष्ठता । पूजन सर्वत्र अवंचकता । देहात्मता हारपली ॥३४॥
ऐसें कायिक तप बाणलें । वाङ्मय कैसेम ठसावलें । तेंही जाईल निरूपिलें । अवधारिलें पाहिजे ॥३५॥
भीकर न करी वर्णोचार । नामस्मरणीं प्रेमादर । नित्य नियम सदाचार । यथाधिकार श्रुतिपठन ॥३६॥
स्तोत्रमंत्रसूक्तें स्मृति । निष्काम कृष्णस्तवनीं रती । वांचूनि सकाम न धरी हातीं । निगमपद्धति भवजल्प ॥३७॥
सत्य सन्मात्र समदर्शन । प्रिय चिन्मात्र अभेद पूर्ण । हित मित आनंदाभिवर्धन । वाड्मय सगुनब्रह्मगिरा ॥३८॥
कृष्णावेगळा नाहीं गुरु । कृष्णें अनुग्रह केला सधरु । कृष्न परब्रह्म निर्विकार । हा निर्धार चमत्कृत ॥३९॥
देखिलें सगुण श्रीकृष्णध्यान । ध्यानयोगें वेधलें मन । अध्यस्त मोडलें भवभान । जालें उन्मन ध्यानसुखें ॥४०॥
बाह्येंद्रियांची कुसमुस । उपरम पावली निःशेष । सच्चिदानंदप्रकाशक । भवभमलेशवर्जित जो ॥४१॥
श्रद्धायुक्त हे तपोनिष्ठा । साधितां बाणोनि ठेली काष्ठा । भजन शिक्षिता शरीरचेष्टा । प्रारब्धच्छंदें चेष्टतीं ॥४२॥
धीर धृतिमंत शीतोष्णसहनीं । धिषणा प्रगल्भ आत्मचिंतनीं । अभेदबोधें निरभिमानी । निःसंग मौनी निर्मम पैं ॥४३॥
आत्मप्रत्यय दृढ बाणला । निर्मुक्त निःसंशय दादुला । दैवसंस्कारें भ्रमत गेला । गंधमादनगिरीप्रति ॥४४॥
गंधमादन म्हणसी कोण । जो हिमाद्रीचा दक्षिणचरण । सेतुबंधनीं स्थापिला सानु । प्रथमांभी हेथील ॥४५॥
यालागिं अद्यापि रामेश्वरीं । गंधमादनपर्वतोच्चारीं । सर्वकर्मीं द्विजवैखरी । प्रयोगपठनीं प्रशस्ता ॥४६॥
असो ऐसिये गंधमादनीं । नरनारायणनिवासस्थानीं । पावोनियां मुचुकुंदमुनि । बदरीकाननीं स्थिरावला ॥४७॥
बदर्याश्रममासाद्य नरनारायणालयम् । सर्वद्वंद्वसहस्तत्र तपसाराधयद्धरिम् ॥४॥
तया बदरिकाश्रमाच्या ठायीं । द्वंद्वसहिष्णु धैर्य देहीं । तनुवाड्मानसतपः प्रवाहीं । श्रीकृष्ण हृदयीं आराधी ॥४८॥
ऐसा मुचुकुंद तपोनिष्ठ । ध्यानाभ्यासें चित्सुखाविष्ट । जंववरी होय तनुशेवट । तंववरी द्रढिष्ठ राहिला ॥४९॥
इतकें मुचुकुंदाख्यान । जे नर भावें करिती श्रवण । त्यांचीं पातकें होती दहन । विघ्नें भंगून हरि रक्षी ॥५०॥
यावरी कृष्णाकडील कथा । कालयवनाच्या करूनि घाता । अनुग्रहूनि मान्धातृसुता । निघाला त्वरिता तें ऐका ॥५१॥
भगवान्पुनराव्रज्य पुरीं यवनवेष्टिताम् ।
हत्वा म्लेच्छबलं निन्ये तदीयं द्वारकां धनम् ॥५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान । मुचुकुंदातें अनुग्रहून । आला परतोन मथुरेसी ॥५२॥
तंव म्लेच्छसेना मथुरापुरी । दुर्ग रोधूनि राहिली फेरीं । य़ंत्रगोळाच्या महामारीं । भिडती निकरीं दुर्गेंसी ॥५३॥
दुर्गामाजि सहस्रफणी । तो बलराम मुसलपाणि । मारी म्लेच्छाचिया श्रेणि । शतायुतघ्नीमहायंत्रीं ॥५४॥
तंव झळकला पीतांबर । आला जाणोनि कमलावर । केला दुर्गस्थीं जयगजर । राम बाहीर निघाला ॥५५॥
रामकृष्ण प्रतापतरणि । मिनले प्रळयभंजनाग्नि । तृणनिचयासम म्लेच्छसैन्यीं । भस्म करीत चालिले ॥५६॥
स्मरतां स्मरतां तें स्वायुधें । प्राप्त जाळीं स्मरणसिद्धें । निशितें तेजस्वी स्वतःसिद्धें । सन्नद्ध बद्धें समर्म्गीं ॥५७॥
मुसळघातें लोळवी वीरां । रणीं पाडिल्या सैन्यधुरा । शार्ङ्गजाकृष्ट सुटतां शरा । शिरें अंबरां उसळती ॥५८॥
दीन दीन शब्दें एक । दीनवदनें दीनात्मक । दैन्य भाकिती पैं तुरुष्क । अद्यापि देख ते स्मरति ॥५९॥
बलराम मारीत आला आला । प्राणधाकें जो कोल्हाळ केला । अद्यापि त्यां तो संस्कार उरला । अल्ला अल्ला स्मरताती ॥६०॥
रामकृष्णांचा वीरश्रीमद । देखोनि म्हणती महामद । ऐसे तत्समयींचे जे शब्द । ते मंत्र विशद यवनांचे ॥६१॥
र्हस्वदीर्घ जडता वर्णा । ते प्राणभयाची बोबडी वदना । ज्या उच्चारें रक्षिलें प्राणा । तो मंत्र जाणा तद्वंशीं ॥६२॥
चक्र प्रेरितां चक्रपाणि । रणीं पडिल्या म्लेच्छश्रेणि । कित्तेकीं देखोनि प्राणहानि । शस्त्र सांडूनि पळालीं ॥६३॥
एक विलपती क्षतीं रणीं । एक अक्षतचि प्रेतावगणी । घेनि लोळतां रणमेदिनी । नेत्र झांकोनि जीवभयें ॥६४॥
एक पडिले प्रेतभार । त्यांचे होऊनि मक्षिकावार । दीन दीन कृतोच्चार । टुकडा वस्त्र याचिती ॥६५॥
घायाळ जळार्थ आक्रंदून । पिपासाभूत त्यजिती प्राण । पी र पी र म्हणतां जाण । पीर करून बैसले ॥६६॥
ताक पी र पेंड पी र । ताडी माडि सिंदी पी र । ऐसे अनेक नामोच्चार । केले पीर स्थळोस्थळीं ॥६७॥
ऐसें मारूनि यवनसैन्य । विजयी प्रतापी रामकृष्ण । म्लेच्छकटकींचें नग्नीकरण । द्वारके तें धन चालविलें ॥६८॥
म्लेच्छलुंठन नेतां ऐसें । अकस्मात मगधाधीशें । मध्यें विघ्न केलें कैसें । तेंही परिसें कुरुवर्या ॥६९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP