अध्याय ५५ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - कामस्त वासुदेवांशो दग्धः प्राग्रुद्रमन्युना ।
देहोपपत्तये भूयस्तमेव प्रत्यपद्यत ॥१॥
शुक म्हणे गा श्रवणसुभगा । परीक्षिति धनुर्वेदपारगा । कुरुकरवकाननैमृगा । हरियशोगंगापय प्राशीं ॥११॥
राया पूर्वीं सृष्टिक्रमीं । कामोत्पत्ति कथिली आम्हीं । तेचि येथ इतिहासक्रमीं । सूचितां नियमीं अवधारीं ॥१२॥
सर्वान्तरीं ज्याचा वास । जो परमात्मा आदिपुरुष । काम चित्तोद्भव तदंश । सृष्टिहेतुत्वें जो सृजिला ॥१३॥
तोचि मन्मथ सुरवरकार्या । छळूं गेला कैलासराया । तेथ रुद्रक्षोभदृगग्नीं काया । कर्पूरन्यायें जळाली ॥१४॥
तैं रतीच्या आर्तविलापीं । द्रवोनि कारुण्यें विश्वव्यापी । रति प्रबोधिली संक्षेपीं । गगनवाग्जल्पीं भविष्यार्थें ॥१५॥
तदनुसार शंबरालयीं । रति राहिली दृढनिर्वाहीं । पुढती मन्मथावाप्ति हृदयीं । धरूनि निश्चयीं दिन कंठीं ॥१६॥
म्हणसी राया कवणे रीती । शंबरसदनीं राहिली रति । विष्णुपुराणीं वाशिष्ठोक्ति । ते तुजप्रति निरूपितों ॥१७॥
मृगयाव्यसनें शंबर वनीं । फिरतां देखिली मन्मथपत्नी । तिचें लावन्य रुचतां नयनीं । निजगेहिनी करूं इच्छी ॥१८॥
तिनें पुसतां नामाभिधाना । शंबरें कथितां विवरी मना । म्हणे वसवूनि याचिया सदना । स्मरदर्शना लाहीन ॥१९॥
ऐसें विवरूनि अंतःकरणीं । मायावती या अभिधानीं । शंबरा मोहूनि सौंदर्यगुणीं । मायिक पत्नी होऊनि असे ॥२०॥
आत्मस्वरूपें अपौली छाया । कृत्रिम नाट्यें निर्मूनि माया । शंबरा मोहूनि म्हणवी जाया । रक्षी स्वदेहा व्रतदार्ढ्यें ॥२१॥
वैष्णवोक्त हा रतिवृत्तान्त । असो यावरी जें मन्मथ । विवरी आपुल्या हृदयाआंत । स्वदेह प्रपत होआवया ॥२२॥
पूर्वीं आपण वासुदेवांश । तोचि वसुदेवजठरीं ईश । जन्मला दैत्यसंहारणास । कारण देहास तें लक्षी ॥२३॥
त्यातें प्रतिपादूनि स्वहेतु । कृष्णस्वरूपीं लीन होतु । आविर्भविला जो वॄत्तान्तु । ऐकें श्लोकोक्त कुरुवर्या ॥२४॥
स एव जातो वैदर्भ्यां कृष्णवीर्यसमुद्भवः ।
प्रद्युम्न इति विख्यातः सर्वतोऽनवमः पितुः ॥२॥
ऐसा वासुदेवांश विख्यात । तोचि कृष्णवीर्यसमुद्भूत । रुक्मिणीजठरीं लावण्यभरित । मनसिज मूर्त जन्मला पैं ॥२५॥
परब्रह्माची जे गवसणी । चिच्छक्ति वैदर्भी लावण्यखाणी । चित्प्रकाश वीर्यस्थानीं । मुसावोनि आविर्भवला ॥२६॥
नवमासपर्यंत गुरोदर । दोहदसंस्कर सविस्तर । कथितां ग्रंथ वाढेल थोर । यास्तव मुकुरवत्कथिला ॥२७॥
नाम रूप गुण लावण्य । कमनीय ठकार ठाणमाण । इत्यादि वैदर्भीचे गुण । त्रिजगन्मोहन स्मर मिरवी ॥२८॥
उज्वल यशस्वी औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य धैर्य । इत्यादि भगवद्गुणांचा निचय । अनंग लाहे साङ्गाङ्गी ॥२९॥
प्रद्युम्न या नामें विख्यात । कुरुनरपाळा तुजही श्रुत । कृष्णसमान अवयव वृत्त । चिह्नें समस्त अन्यून ॥३०॥
नवमास रुक्मिणी गर्भवती । पूर्ण दिवसीं लब्धप्रसूति । त्रैलोक्यमोहन मन्मथमूर्ति । पुत्रोत्पत्ति लाधली ॥३१॥
कृष्णें करूनि सचैल स्नान । जातकर्मादि विधिविधान । यथासाङ्ग संपादून । सर्व ब्राह्मण गौरविले ॥३२॥
सूत मागध विद्योपजीवी । यथाधिकारें त्यां गौरवी । द्वारकानगरीं सर्वत्र सर्वीं । पुत्रोत्साह घरोघरीं ॥३३॥
आसो ऐसें प्रद्युम्नजनन । पुढें शंबरें केलें विघ्न । तेंचि आतां निरूपण । सावधान अवधारा ॥३४॥
तं शंबरः कामरूपी हृत्वा तोकमनिर्दशम् ।
स विदित्वात्मनः शत्रुं प्रास्योदन्वत्यगाद्गृहम् ॥३॥
तमांशरूपी रुद्रावतार । महामायावी शंबरासुर । जन्म पावला दैत्य घोर । मन्मथवैर स्मरोनी ॥३५॥
रुद्रें मन्मथ निरपराध । भस्म केला होऊनि क्रुद्ध । रुद्रक्रोधचि तो प्रसिद्ध । शंबररूपें अवतरला ॥३६॥
महाकपटी खटाटोपी । अभिचारकर्माचा साक्षेपी । जारणमारणप्रमुखकल्पीं । चित्रसंकल्पीं मति ज्याची ॥३७॥
प्रतापें वसतां शंबरपुरीं । त्यातें प्रबोधी नभोवैखरी । श्रीकृष्णवीर्यें रुक्मिणीजठरीं । स्मर तव वैरी संभवला ॥३८॥
त्यानें ऐकोनि ते नभोक्ति । इच्छारूपी धरूनि व्यक्ति । रिघूनि प्रसूतिसदनाप्रति । मन्मथमूर्ति विलोकिली ॥३९॥
सर्वलक्षणोक्त संपूर्ण । अपर अवतरला श्रीकृष्ण । सादर शंबरें अवलोकून । केलें विंदान तें ऐका ॥४०॥
जातमात्र मन्मथ सगुण । त्यातें शंबरें करीं धरून । दशाह न भरतांचि पूर्ण । केलें हरण षष्ठाहीं ॥४१॥
गगनवाणीच्या विश्वासें । आत्मशत्रु जाणोनि द्वेषें । नेऊनि वधूं पाहे रोषें । लावण्यविशेषें मन द्रवलें ॥४२॥
मग तो समुद्रामाझारी । वैर स्मरोनि त्या झुगारी । परतोनि प्रवेशे शंबरपुरीं । निःशल्य मंदिरीं सुख मानी ॥४३॥
सुदर्शनाची द्वारके घरटी । असतां प्रवेशला केंवि कपटी । म्हणाल तरी ते ऐका गोठी । सर्वज्ञ जगजेठी हरि जाणे ॥४४॥
शंबर हरूनि नेईल बाळ । तो स्मर होईल त्याच्याचि काळ । जाणोनि भविष्यार्थ गोपाळ । रक्षकमेळ निरोधी ॥४५॥
बाळक झुगारिलें सागरीं । पुढें वर्तली कैसी परी । ते तूं कुरुवर्या अवधारीं । विचित्र थोरी दैवाची ॥४६॥
तं निर्जगार बलवान्मीनः सोऽप्यपरैः सह ।
वृतो जालेन महता गृहीतो मत्स्यजीविभिः ॥४॥
बाळक पडतां समुद्रजळीं । बलिष्ठ मत्स्य त्या तत्काळ गिळी । तोही सामान्यमत्स्यमेळीं । पडला जाळीं प्रारब्धें ॥४७॥
मत्स्यविक्रयें जेविकावृत्ति । मत्स्यजीवी ते धीवरजाति । तिहीं तेजाळ कर्षूनि हातीं । मत्स्याप्रति संग्रहिलें ॥४८॥
तं शंबराय कैवर्ता उपाजह्रुरुपायनम् ।
सूदा महानसं नीत्वाऽवद्यन्स्वधितिनाद्भुतम् ।
दृष्ट्वा तदुदरे बालं मायावत्यै न्यवेदयन् ॥५॥
धीवर मिळोनियां समस्त । शंबरा मत्स्य अर्पूनि उजित । गौरवग्रहणें उत्साहभरित । गेले निवान्त निजसदना ॥४९॥
पाककर्तया म्हणिजे सूद । त्यातें बोलावूनि सन्निध । शंबर जाला मत्स्यप्रद । बोधूनि विशद पचनक्रिया ॥५०॥
सूदें नेऊनि पाकशाळे । शस्त्रविशेषें करितां शकलें । अद्भुत बाळ देखोनि डोळे । झांकोळले सूदावे ॥५१॥
मत्स्योदरीं मन्मथतनु । देखोनि सूद विस्मयपन्न । मायावतीप्रति जाऊन । करी अर्पण तें बाळ ॥५२॥
मन्मथयुवति जे कां रति । शंबरालयीं ते मायावेती । कमनीय बाळक देखोनि चित्तीं । परम विश्रान्ति पावली ॥५३॥
पुढती शंका मानी मनीं । नरवैडूर्य मत्स्ययोनीं । हे दैत्याची कापट्यकरणी । किंवा मोहिनी देवमाया ॥५४॥
ऐसी साशंक हृदयकमळीं । कमनेय बाळक जंव निहाळी । सांगो इच्छी शंबराजवळी । तंव आला जवळी देवर्षि ॥५५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP