तं तस्याविनयं दृष्ट्वा देशांश्च तदुपद्रुतान् । क्रुद्धो मुसलमादत्त हलं चारिजिघांसया ॥१६॥

वानर नव्हे हा वनचर । कोणी दैत्यवेषधर । म्हणती भंगिलें जेणें राष्ट्र । तो हा मावकर दुरात्मा ॥६॥
प्रलंब जैसा गोपाळवेषी । अश्वरूप नटला केशी । तैसाचि हाही भगवद्द्वेषी । देशोदेशीं जनहंता ॥७॥
दिसतो सामान्य पारखा मृग । परि हा रणकर्कश अभंग । मुनिआश्रमा केला भंग । त्रासिलें जग उपसर्गें ॥८॥
प्राकृता सामान्य गोळाङ्गुळा । समान पातला रैवताचळा । वानरीचेष्टामिषें बळा । येऊनि अबळा धर्षितसे ॥९॥
आमुची करूनियां अवगणना । ओढी वनितांचिया वसना । दुष्ट चेष्टा करी नाना । मुकेल प्राणा मम हस्तें ॥११०॥
अविनय त्याचा देखूनि ऐसा । क्रोध चढला यादवेशा । नांगर मुसळ त्याचिया नाशा । घेऊनि सहसा उठावला ॥११॥
देखूनि रामाचा उत्कर्ष । वानरें धरिला समरावेश । श्रोतीं होवूनि सावकाश । तो रस अशेष परिसावा ॥१२॥

द्विविदोऽपि महावीर्यः शालमुद्यम्य पाणिना । अभ्येत्य तरसा तेन बलं मूर्द्धन्यताडयत् ॥१७॥

सुनंद मुसळ संवर्त हळ । परजूनि उठिला देखूनि बळ । द्विविदें उपडूनि महाशाळ । उचलूनि तत्काळ लोटला ॥१३॥
बळें उचलोनि दोनी हातें । बलरामाच्या मस्तकावरुतें । हणिता झाला शालघातें । शक्र गिरीतें जेंवि वज्रें ॥१४॥
दांत खाऊनियां करकरां । शाल भवंडूनियां गरगरां । मस्तकीं हाणीं रोहिणीकुमरा । येरु प्रतिकारा काय करी ॥११५॥

तं तु संकर्षणो मूर्ध्नि पतंतमचलो यथा । प्रतिजग्राह भगवान्सुनंदेनाहनच्च तम् ॥१८॥

जैसा प्रचंड पर्वतापरी । शालप्रहार पडतां शिरीं । लाङ्गलें वळूनि वरिच्यावरी । सुनंद प्रहारी द्विविदातें ॥१६॥
मुसळघात बैसतां शिरीं । द्विविद उभाच नाहला रुधिरीं । वज्रप्रहारें जैसा गिरि । भंगोनि भूवरी जळ वाहे ॥१७॥
अक्षय वीजविहिर्‍याचें नीर । तेंवि द्विविदमस्तकींचें रुधिर । धारा लागली निरंतर । तेणें वानर न डंडळी ॥१८॥

मुसलाहतमस्तिष्को विरेजे रक्तधारया । गिर्र्यथा गैरिकया प्रहारं नान्वचिंतयत् ॥१९॥

जैसी सरळ गिरीच्या शिरीं । गैरिका वाहे मेघधारीं । तैसा रामाच्या मुसळप्रहारीं । द्विविद रुधिरीं शोभतसे ॥१९॥
गैरिकेकरूनि शोभे गिरि । तैसाचि वानर रुधिरधारीं । विराजला तैं परंतु समरीं । त्रास न धरी अणुमात्र ॥१२०॥
पक्कोदम्बरफळाच्या घातें । कुञ्जर कुम्भस्थळीं निघातें । ताडिला असतां न मनी व्यथे । निर्भयचित्तें तेंवि कपि ॥२१॥

पुनरन्यं समुत्क्षिप्य कृत्वा निष्पत्रमोजसा । तेनाहनत्सुसंक्रुद्धस्तं बलः शतधाऽच्छिनत् ॥२०॥

ओजसा म्हणिजे प्रचंडबळें । पुढती दुसरा गोळाङ्गुळें । शाळ विशाळ तिये विळे । आवेशबहळें उन्मळिला ॥२२॥
मोडूनि टाकिला अग्रभाग । साळूनि निष्पत्र केला साङ्ग । तेणें रामाचें उत्तमाङ्ग । क्रोधें सवेग ठोकिलें ॥२३॥
रामें शालद्रुमाप्रति । शतधा छेदूनि पाडिला क्षिती । तेणें द्विविद वीरवृत्ति । महानिघातीं प्रवर्तला ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP