अध्याय ६८ वा - श्लोक ४६ ते ५४
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
त्वमेवमूर्ध्नीदमनंत लीलया भूमंडलं बिभर्षि सहस्रमूर्धन् ।
अते च यः स्वात्मनि रुद्धविश्वः शेषे द्वितीयः परिशिष्यमाणः ॥४६॥
भो भो अनंता सहस्रशिरि । तूंचि हें भूमंडळ धरिसी शिरीं । अनंत लीलेच्या प्रकारीं । विश्वाकारीं अभिरमसी ॥२६॥
आधारभूत अनंतमूर्ध्नी । तेथ आधेय अवघी धरणी । धराधर तूं पूर्णपणीं । लीलेकरूनि भू धरिसी ॥२७॥
यथानुक्रमें प्रकृतिमान । पुरतां होसी संकल्पशून्य । निर्विकल्प करूनि मन । विश्व संपूर्ण सांठविसी ॥२८॥
तैं अद्वितीय उरे जो शेष । शेषशायी म्हणणें त्यास । नित्य निर्गुण निर्गुण निर्विशेष । तो तूं परेश सन्मात्र ॥२९॥
गुणमय समष्टि ब्रह्माण्ड । अविद्यागुणात्मक व्यष्टि पिण्ड । तेणें आवृत होतां मूढ । झालों सदृढ भ्रमग्रस्त ॥३३०॥
अविद्याभ्रमाची भुली पडली । एकीं अनेकता विरूढली । करणज्ञानें निष्ठा घडली । प्रतीति बिघडली वास्तव जे ॥३१॥
यालागीं सगुण मर्त्यलिंग । प्रकाशे जैसा करणवर्ग । तोचि प्रत्यय बाणें चांग । नुमजे अव्यंग आत्मत्व ॥३२॥
यालागीं अद्वया अखिलानंता । देऊं प्रत्यक्ष हे सगुणता । मानूं मानवासम प्राकृता । हा आमुचे माथां दोष नसे ॥३३॥
दृश्य साच मानिती करणें । यास्तव तूंतें वृष्णिपणें । जाणोनि केलीं जीं हेळणें । क्षमा करणें तीं अवघीं ॥३४॥
तुझा कोप हा आमुच्या ठायीं । सहसा उचिता नोहे पाहीं । म्हणसी यदर्थीं कारण कायी । तें सर्वही अवधारीं ॥३३५॥
अनादिसिद्ध ब्रह्माण्डवर्ती । निगमप्रतिपाद्य जे कां स्थिति । तत्पथ दैत्य जे भंगिती । ते प्रतिपंथी धर्माचे ॥३६॥
कोपस्तेऽखिलशिक्षार्थं न द्वेषान्न च मत्सरात् । बिभ्रतो भगवन्सत्त्वं स्थितिपालनतत्परः ॥४७॥
ते धर्माची संस्थापना । करावया अवतार नाना । घेऊनि करणें स्थितिपालना । दुष्टां दुर्जनां दंडूनि ॥३७॥
मुंगीपासूनि विरंचीवरी । धर्मोच्छेदनीं शिक्षा करी । अखिलशिक्षार्थ दंडधारी । तूं अवधारी जगदीशा ॥३८॥
जितुका अपराध तितुका दंड । करूनि पाळिसी ब्रह्माण्ड । तात्पर्यार्थ कोप उदंड । दुष्ट प्रचंड निर्दळना ॥३९॥
द्वेषा अथवा मत्सरास्तव । तुझ्याठायीं क्रोधोद्भव । न घडे निश्चय हा वास्तव । तव कृपेस्तव जाणतसों ॥३४०॥
यादव मनुष्य तुज मानूनी । वास्तव तव ऐश्वर्य नेणोनी । हेलना केली मूर्खपणीं । ते तूं मनीं न धरिसी ॥४१॥
तुवां मनुष्यमात्र व्हावें । तें हेलनोक्तीनें विषादा यावें । वास्तव स्वरूप झालें ठावें । कृपावैभवें स्वामीच्या ॥४२॥
आतां स्वपादशरणां रक्ष । आमुचे अपराध लक्षेलक्ष । विसरूनि शरणागताचा पक्ष । कृपाकटाक्षें अवलोकें ॥४३॥
नमस्ते सर्वभूतात्मन्सर्वशक्तिधराव्यय । विश्वकर्मन्नमस्तेऽस्तु त्वां वयं शरणं गताः ॥४८॥
सर्व भूतांचा अंतरात्मा । सर्वसाक्षी सर्वोत्तमा । सवशक्तिधर तव गरिमा । अव्यय अनामा अक्षरा ॥४४॥
ब्रह्माण्डसमुच्चय होय जाय । त्यामाजी तूं अज अव्यय । मायानियंता मायाश्रय । मायातीता अमायिका ॥३४५॥
विश्वकर्मन्संबोधनें । याचिलागीं तूंतें म्हणणें । अखिल विश्वाचें होणें जाणें । स्थितिलयगोपनें तव सत्ता ॥४६॥
कालकलनाप्रवर्तक । माया स्वसत्ता नियामक । नाहीं तुजपरता आणिक । जाणोनि पदाङ्क दृढ धरिलें ॥४७॥
तूंतें आम्ही शरणागत । आलों कृतागस दुष्कृत । करीं अभयदानें सनाथ । आमुचें औद्धत्य विसरूनी ॥४८॥
बाळकाचे अन्याय कोटी । कृपेनें माऊली घाली पोटीं । तेंवि आमुचें कृपादृष्टी । रक्षीं संकटीं दयाळुवा ॥४९॥
भीष्मप्रमुखीं केला स्तव । रामें साद्यंत ऐकूनि सर्व । जाणोनि तयाचा अंतर्भाव । आला द्रव कारुण्यें ॥३५०॥
श्रीशुक उवाच - एवं प्रपन्नैः संविग्नैर्वेपमानायनैर्बलः । प्रसादितः सुप्रसन्नो मा भैष्टेत्यभयं ददौ ॥४९॥
नगर घालितां पालथें । थोर आकान्त नगरस्थांतें । भयें व्यापिलें कौरवांतें । उद्विग्नचित्तें यास्तव ते ॥५१॥
एवं कौरव संविग्नचित्त । पूर्वोक्तप्रकारें शरणागत । स्तवनें नमनें रेवतीकान्त । प्रसन्न त्वरित तिहीं केला ॥५२॥
प्रसन्न होत्साता बळराम । अभयहस्तें पूर्णकाम । सस्मितवदनें बोले क्षेम । येथूनि तुम्हां मम वरें ॥५३॥
म्यां ओपिलें अभयदान । येथूनि सर्वांचें कल्याण । तुमचें दौर्जन्य तुम्हांसि विग्न । होतां शरण तें क्षमिलें ॥५४॥
इत्यादि स्तवनीं वृष्णिपाळा । स्तवितां अपराध क्षमा केला । नांगर काढूनि पुरवप्राला । दडपिता झाला पूर्ववत ॥३५५॥
अभय ओपितांचि बळभद्र । कौरवीं केला जयजयकार । मंगळतुरांचा वाद्यगजर । नेला हलधर नृपसदना ॥५६॥
यथाविधि पाणिग्रहण । चारी दिवस संपादून । साडे ऐरणी वंशविधान । लक्ष्मीपूजन जानवसा ॥५७॥
दुर्योधन जो कौवरराव । सांडूनि ऐश्वर्यमदाचा गर्व । देता झाला पारिबर्ह । संतोशार्ह जामात्या ॥५८॥
दुर्योधनः पारिबर्हं कुंजरान्षष्टिहायनान् । ददौ च द्वादश शतान्ययुतानि तुरंगमान् ॥५०॥
षष्टायन जे भद्रजाति । बारा शतें मत्त हस्ती । देता झाला सप्रेमभक्ति । जामात्या दुहितृवात्सल्यें ॥५९॥
एक लक्ष वीस सहस्र । पर्वतसंभव तुरंगसार । जवें जिंकिती जे समीर । ते साळंकार समर्पिले ॥३६०॥
रथानां षट्सहस्राणि रौक्माणां सूर्यवर्चसाम् । दासीनां निष्ककंठीनां सहस्रं दुहितृवत्सलः ॥५१॥
सहा सहस्र सुवर्णरर्थ । रविभाभासुर रत्नखचित । आसनें वितानें शिबिकान्वित । तुरंगमंडित सूतेंसीं ॥६१॥
एक सहस्र तरुणा दासी । सालंकृता लावण्यराशि । अमौल्य पदकें कंठदेशीं । उपचारेंसी समर्पिल्या ॥६२॥
वस्त्रें पात्रें दिव्याभरणें । महिषी अजा अविक गोधनें । कन्यावत्सलें दुर्योधनें । नृपोपकरणें निवेदिलीं ॥६३॥
आंदण अर्पूनि दुर्योधन । म्हणे लक्ष्मणा नेणती सगुण । प्रतिपाळावी कृपेंकरून । वदतां नयनीं जळ आलें ॥६४॥
सहित धृतराष्ट्र गांधारी । भानुमतीप्रमुख नारी । लक्ष्मणा निरवूनि रामाकरीं । देतां नेत्रीं जळ लोटे ॥३६५॥
भीष्मप्रमुखां कौरवां सकळां । मोह जाकळी तये वेळां । म्हणती रामा वृष्णिपाळा । स्नेहें सांभाळा कुमरीतें ॥६६॥
इत्यादि वचनीं लक्ष्मणा । निरोविली संकर्षणा । सवें देऊनि दुःशासना । द्वारकाभुवना बोळविती ॥६७॥
प्रतिगृह्य तु तत्सर्व भगवान्सात्वतर्षभः । ससुतः सस्तुषः प्रायात्सुहृद्भिरभिनंदितः ॥५२॥
रामें पारिबर्ह समस्त । सवें घेऊनि स्नुषा सुत । द्वारकापुरा आनंदभरित । सात्वतनाथ निघाला ॥६८॥
इष्ट मित्र सुहृद आप्त । कौरवपाण्डवादि समस्त । गव्यूतिमात्र बोळवित । कलत्रेंसहित निघाले ॥६९॥
स्तुतिस्तवनें रामाप्रति । स्नेहवादें तोषविती । सुप्रसन्न रेवतीपति । सुहृदप्रेमोक्ति परिसोनी ॥३७०॥
गव्यूतिमात्र क्रमिल्या पंथ । रामें स्थिर करूनि रथ । सर्व कौरव कलत्रेंसहित । प्रार्थूनि तेथ राहविले ॥७१॥
कुरुवृद्धाची घेऊनि आज्ञा । राम आरूढला स्यंदना । मंगळतुरांची गर्जना । द्वारकाभुवना चालियले ॥७२॥
उद्धव केला पुरःसर । दुःशासन पार्ष्णिधर । मध्यें बळराम ओहर । सेनापरिवारवेष्टित ॥७३॥
स्थिर स्थिर चाले सेना । मथुराप्रान्तीं लंघिली यमुना । चर्मण्वतीचिया जीवना । त्रितीय दिवशीं ठाकिलें ॥७४॥
अर्बुदाचळेश्वर वंदून । साब्रमती उल्लंघून । आनर्तदेश अतिक्रमून । द्वारकाभुवन पावले ॥३७५॥
बळराम येतां द्वारकेनिकटीं । कृष्ण सम्मुख पातला भेटी । सवें यदुचक्राची दाटी । पुजनदाटी बहुसाल ॥७६॥
उद्धव आणि संकर्षण । नमिले ब्राह्मण अभिवंदून । वोहरें नमिती श्रीकृष्णचरण । मौळावघ्राण येरू करी ॥७७॥
दुःशासनें नमिला हरि । येरू कवळूनि हृदयीं धरी । आलिंङ्गूनि स्नेहभरीं । तोष अंतरीं वोसंडे ॥७८॥
त्यानंतरें यदुपुङ्गवां । अनुक्रमेंचि नमिलें सर्वां । कृष्णतनुजां अनुजां खेवा । देऊनि गौरवा मानविलें ॥७९॥
मंगळतुरांचिया गजरीं । प्रवेशले द्वारकापुरीं । तें कुरुवर्या अवधारीं । शुकवैखरी वर्णीतसे ॥३८०॥
ततः प्रविष्टः स्वपुरीं हलायुधः ममेत्य बंधूननुरक्तचेतसः ।
शशंस सर्वं यदुपुंगवांनां मध्ये सभायां कुरुषु स्वचेष्टितम् ॥५३॥
त्यानंतर हलायुध । द्वारका प्रवेशला सुस्निग्ध । त्या समयींचा परमानंद । कोण विशद कवि वर्णी ॥८१॥
महाद्वारीं सांडिल्या बळि । भूरि वांटिली कनकाञ्जळी । जयजयकार करिती सकळी । वैष्णव धुमाळी नाचती ॥८२॥
नृत्य करिती नृत्यांगना । सप्तस्वरीं तानमाना । गंधर्व गाती सामगायना । वेदाध्ययना द्विज करिती ॥८३॥
ठायीं ठायीं ठाकती उभे । पुरजनदाटणी पाहती शोभे । वोहरें मिरवितां पंकजनाभें । समारंभ पुरगर्भीं ॥८४॥
पुढें वाजती गजदुंदुभी । दीर्घपताका फडकती नभीं । तुङ्गातपत्रें छत्रें उभीं । भंवरी देती गरगरां ॥३८५॥
रत्नदंडी चामरजोडें । वोहरा वीजिती चहूंकडे । वेत्रपाणि खोलती पुढे । मांदी निवाडें सारावया ॥८६॥
अस्ममाना गेला तरणि । पुरप्रवेशीं झाली रजनी । अग्निद्रव्याची विचित्र करणी । कौतुक नयनीं जन पाहती ॥८७॥
पुष्पवृष्टि वोहरांवरी । परिमळद्रव्यें उधळिती भारीं । ऐसे अनेक उत्साहगजरीं । आले झडकरी भद्रपीठा ॥८८॥
पुढें सुधर्मासभास्थानीं । राजा उग्रसेन सिंहासनीं । भोंवत्या यादवांचिया श्रेणी । जेंवि सुरगणीं अमरेन्द्र ॥८९॥
देवकआनकदुंदुभिप्रमुख । विकट कृतवर्मा सात्यक । भानुदेवभागादिश्वफल्क । वृद्ध अनेक यदुवर्य ॥३९०॥
ऐसिये नृपसभेमाझारी । संकर्षण ते अवसरीं । वधूवर दोहीं कडियेवरी । घेऊनि झडकरी प्रवेशला ॥९१॥
रायें कवळूनियां वोहर । मुखावरून उतरिला कर । उभयतांची प्रीति स्थिर । उमामहेश्वरसम राहो ॥९२॥
आज्ञा करूनि सेवकाला । उघडूनि नेपथ्यवसनशाळा । दिव्याभरणां दिव्य दुकूळां । वधूवरांला लेवविलीं ॥९३॥
दुःशासन भेटला राया । समग्र वृष्णींच्या समुदाया । सभास्थानीं बैसोनियां । कथिती झालिया वृत्तान्ता ॥९४॥
हस्तिनापुरींई समग्र कथा । उद्धवें निवेदिली नृपनाथा । दुर्योधनें चरणीं माथा । ठेवूनि दुहिता निवेदिली ॥९५॥
कौरवीं सन्मान केला पूर्वीं । तुमची आज्ञा ऐकतां गुर्वी । क्षोभा चढले महागर्वी । जैसा पर्वीं जळराशि ॥९६॥
हेलनोक्ति नानापरी । बोलोनि प्रवेशले नगरी । तेव्हां प्रळयरुद्रापरी । रामशरीरीं क्रोधोर्मी ॥९७॥
पालथें घाला हस्तिनापुर । तुमचे आज्ञेचें उत्तर । स्मरोनि म्हणे नृपकिङ्कर । करीन साचार नृपाज्ञा ॥९८॥
नांगर घालूनि वप्रातळीं । उचटूनि नगराची ढेंपुळी । पालथें घालितां गंगाजळीं । कौरवमंडळी गजबजली ॥९९॥
भीष्मादिक आले शरण । मुकुटें वंदूनि संकर्षण । स्वतनें करूनि सुप्रसन्न । स्नुषा नंदन समर्पिली ॥४००॥
विवाहसंभ्रम केला थोर । पारिबर्ह दिधलें फार । राया अर्पिलें तें समग्र । हयरथकुंजरदासीसीं ॥१॥
उग्रसेनें तें आंदळ पुढती । वोहरां अर्पिलें परमप्रीती । ऐकोनि बळरामाची कीर्ति । यादव हांसती करधरणी ॥२॥
ताम्बूल अर्पिले सर्वांप्रति । दुःशासनें पूजिला नृपति । अहेर वसनाभरण निगुतीं । पात्राप्रमाणें निवेदिलीं ॥३॥
घेऊनि उग्रसेनाची आज्ञा । रामप्रमुख गेले सदना । करिते झाले श्रीपूजना । जाम्बवतीचे मंदिरीं ॥४॥
गृहप्रवेश संपादिला । द्वारकेमाजी उत्साह झाला । सुहृदां स्वजनां सह द्विजाला । दिव्य भोजनें समर्पिलीं ॥४०५॥
रेवती रुक्मिणी जाम्बवती । इत्यादि वरिष्ठा कृष्णयुवती । वरमातरा गौरविती । यादवपंक्ति सुहृदत्वें ॥६॥
श्रेष्ठ यादव निजमंदिरीं । वोहरें वरमाय वाद्यगजरीं । अभ्यंगादि सर्वोपचारीं । पृथगाकारीं गौरविती ॥७॥
ऐसा आनंद झाला थोर । वर्णिती सुर नर मुनि किन्नर । द्वारकेपुढें अमरपुर । भासे लघुतर पल्लिवत ॥८॥
दुःशासन मास दोनी । राहिला स्नेहें द्वारकाभुवनीं । पुढती हस्तिनापुरीहूनी । विकर्ण शकुनि मूळ आले ॥९॥
शकुनिप्रमुखां सर्वोपरी । यादवीं आपुलालिये मंदिरीं । पूजूनियां पृथगाकारीं । श्रेष्ठ अहेरीं गौरविलें ॥४१०॥
उत्तम मुहूर्तीं माहेरा । बोळविली ते साम्बदारा । लक्ष्मणा घेऊनि हस्तिनापुरा । शकुनिप्रमुख पावले ॥११॥
ये अध्यायीं इतुकी कथा । शुक सांगोनि कौरवनाथा । म्हणे रामाचें यश तत्त्वता । कोण वक्ता वदों शके ॥१२॥
अद्यापि च पुरं ह्येतत्सूचयद्रामविक्रमम् । समुन्नतं दक्षिणतो गंगायामनुदृश्यते ॥५४॥
अद्यापि राया हस्तिनापुर । कुरुवंशाचें राज्य भद्र । उत्तमभागीं निम्नतर । जाह्नवीतीरपर्यंत ॥१३॥
वप्र भेदिले लाङ्गलघातें । यास्तव उच्छ्रित दक्षिणप्रान्तें । यश रामाचें जाणविते । उत्तरोत्तर युगानुयुगीं ॥१४॥
अद्यापिही गंगातीरीं । दक्षिणोच्छ्रित हस्तिनापुरीं । देखिजे ते अमरीं नरीं । प्रतापथोरी रामाची ॥४१५॥
इतिश्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं परीक्षिति । अद्भुत बळरामाची शक्ति । ऐकूनि चित्तीं स्मय मानी ॥१६॥
श्रीशुक म्हणे राया चतुरा । संकर्षणा धरणीधरा । इत्यादि कर्में चमत्कारा । कारणरूप न भासती ॥१७॥
एक ईश्वरद्विधा रूपें । भूभार उतरावयाच्या पडपें । नटला बळकृष्णस्वरूपें । पूर्वसंकल्पें सुरावना ॥१८॥
त्यांचीं ऐसीं अगाध कर्में । येरां मानवां ज्यांचेनि नामें । सांडिजेतसे भवसंभ्रमें । जपतां प्रेमें अहर्निशी ॥१९॥
ऐसें बळरामाचें यश । जे ऐकती नित्य निर्दोष । ते नर वरिती कैवल्यास । इतुका विशेष ये श्रवणीं ॥४२०॥
पुढिले अध्यायीं कुरुवर्या । श्रीकृष्णाची अद्भुत चर्या । आला नारद पहावया । स्वर्गींहूनियां तें ऐका ॥२१॥
प्रतिष्ठानकैवल्यनिलयीं । श्रीएकनाथशेषशायी । चिदानंदें लक्ष्मी पाहीं । स्वानंददायी पद सेवी ॥२२॥
गोविंदपादपंकजरज । वाहिनी गंगा तेजःपुंज । दयार्णवीं ते भरतां सहज । त्रिजगाभोज निमज्जनीं ॥२३॥
श्रवणमात्रें कीजे पान । अर्थानुप्रभवें अवगाहन । मननें निर्दोषसुखसंपन्न । तीर्थवीधान हें येथ ॥२४॥
विधानवक्ता आचार्यमूर्ति । करूनि भवभयाघनिवृत्ति । शुद्ध प्रकटी आत्मप्रतीति । चिन्मात्र स्थिति वास्तव जे ॥४२५॥
यालागीं हे त्रिजगत्पावनी । दयार्णवसंगमीं मंदाकिनी । सेवूनि वसिजे कैवल्यसदनीं । हे जाणवणी मुमुक्षूतें ॥३२६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां बलभद्रविजयसाम्बलक्ष्मणाविवाहोनामाष्टषष्टितमोऽध्यायः ॥६८॥
पिंगलाब्दे परे शुक्ले द्वादश्यां भौमवासरे । पिपीलिकापुरे पूर्णं लक्ष्मणाहरणं शुभम् ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५४॥ टीका ओव्या ॥४२६॥ एवं संख्या ॥४८०॥ ( अड्डसष्ठावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३१७१६ )
अडसष्टावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 11, 2017
TOP