अध्याय ६९ वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
विभक्तरथ्यापथचत्वरापणैः शालासभाभी रुचिरां सुरालयैः ।
संसिक्तमार्गांगणवीथिदेहलीं पतत्पताकाध्वजवारितातपाम् ॥६॥
विभागें विभक्त पृथक्पृथक । विशाळ विस्तीर्ण राजमार्ग। सूत्रें धरूनि निर्मिले साङ्ग । शोभती अव्यंग चौबारें ॥५९॥
दोहीं भागीं दुकानश्रेणी । निर्मिल्या दिव्यरत्नीं सुवर्णीं । सूर्यप्रभेचे वैदूर्यमणि । दिवसरजनि नुमसविती ॥६०॥
पण्यशाळा विराजित । भरले अनेक पदार्थ । वार्धुष बैसले समर्थ । करिती यथार्थ क्रयविक्रय ॥६१॥
द्वारकारचनावर्णनकारीं । पण्य सभा शाळा सकळी । कथिल्या तिहीं पुरी शोभिली । तैसी पाहिली मुनिवर्यें ॥६२॥
पंचायतनीं देवालयें । रत्नखचितें कनकमयें । शिखरें गोपुरें त्रिदिवप्रायें । देखता होय मुनि नेत्रीं ॥६३॥
केशरकस्तुरीचन्दनसडे । मार्गी घातले चहूंकडे । वीथि अंगणे प्राङ्गणें कोडें । सिंपिलीं निवाडे लखलखिती ॥६४॥
मण्डप गोपुरें देहलिया । भगवच्चरित्रें चित्रिलिया । ध्वजपताका कलशाथिलिया । गगनीं तळपती प्रभंजनें ॥६५॥
प्रचुर पताकांचीं वसनें । गगनीं विस्तीर्ण लंबायमानें । तळपतां वारिती भास्करकिरणें । द्वारका तेणें सुशोभित ॥६६॥
ऐसिये द्वारके माझारी । सशत सोळा सहस्रां घरीं । विराजमान सर्वां परी । अन्तःपुर कृष्णाचें ॥६७॥
तस्यामंतःपुरं श्रीमदर्चितं सर्वधिष्ण्यपैः । हरेः स्वकौशलं यत्र त्वष्ट्रा कार्त्स्न्येन दर्शितम् ॥७॥
नारदें पाहिलें द्वारकापुर । वैकुंठभुवनाहूनि सुन्दर । त्यामाजी हरीचें अंतःपुर । लक्षुनि सत्वर प्रवेशला ॥६८॥
तें अंतःपुर म्हणाल कैसें । सर्व धिष्ण्यषीं अर्चिलें असे । पदार्थरक्षकांचेनि मिषें । वास्तुविशेषें विराजती ॥६९॥
धिष्ण्यप म्हणिजे लोकपाळ । पूर्वभागीं आखण्डळ । हयगजगोधनादिक क्रमेळ । शिक्षी रक्षीं अजस्र ॥७०॥
पाकशाळा आधिष्ठून । सावध सर्वदा कृशान । शयनशाळेचें रक्षण । करी आपण संयमिता ॥७१॥
आयतनमळजळपरित्याग । मळोत्सर्ग शाळामार्ग । तें स्थळ निरृति रक्षी साङ्ग । सावध अव्यंग अहर्निश ॥७२॥
वस्त्राशाळा रक्षी वरुण । शस्त्रशाळा प्रभंजन । द्रविणभाण्डार वैश्रवण । रक्षी आपण अंतद्रित ॥७३॥
देवायतनशाळेप्रति । वर्ते अधिष्ठूनि पशुपति । जो कां लोकपाळांचे पंक्ति । ईशान म्हणती दिग्नाथ ॥७४॥
असो धिष्ण्यप ऐसिये परी । श्रीकृष्णाचे अन्तःपुरीं । सर्वदा स्वर्चित स्वाधिकारीं । सादर वर्तती हरिप्रेमें ॥७५॥
निखिल कुशलत्वाची सीमा । अन्तःपुरीं श्रीहरिधामा । निर्मूनि दावी विश्वकर्मा । पुरुषोत्तमा तोषार्थ ॥७६॥
ऐसीं अन्तःपुरमंदिरें । षोडशसहस्र पृथागाकारें । कृत्स्नकौशल्यें त्वष्टारें । निर्मूनि सुंदरें दाखविलीं ॥७७॥
तत्र षोडशभिः सद्मसहस्रैः समलंकृतम् । विवेशैकतमं शौरेः पत्नीनां भवनं महत् ॥८॥
सोळा सहस्र सदनें करूनि । हरि अन्तःपुरीं विराजमान । त्यामाजी कोणे एके स्त्रीचें भुवन । विधिनंदन प्रवेशला ॥७८॥
मुनि प्रवेशला जे मंदिरीं । ते सदनींची लावण्यकुसरी । सादर पाहता झाला नेत्रीं । शुकवैखरी ते वर्णी ॥७९॥
विष्टब्धं विद्रुमस्तंभैर्वैदूर्यफलकोत्तमैः । इन्द्रनीलमयैः कुड्यैर्जगत्या चाहतत्विषा ॥९॥
चौं श्लोकीं ते भुवरचना । शुकें निवेदिली कुरुभूषणा । श्रवणमात्रें अमरसदना । देखिलें वाटे श्रोतयां ॥८०॥
वास्तुवेदिका पाचुबंदी । वज्रस्तंभनें निरवधि । बिदुमस्तंभ दडपिले बुद्धी । वैदुर्यउथाळीं अष्टदळें ॥८१॥
भित्ती इंद्रनीळमय शोभती । शक्रोपळमय निबद्ध जगती । उभयप्रभाभासुरकान्ति । निरभ्रनभ भासतसे ॥८२॥
पुष्करागाचे तुळवट । पद्मरागाचे किलचा पाट । गोमेदाचे कांसवट । दांडे निघोंट मारकती ॥८३॥
वज्रमनि कोरूनि निगुती । हिंदोळियाची केली आयती । मंचकपालकलंबनाप्रति । शृंखळा युक्ति निर्मिल्या ॥८४॥
रत्नभितीचे कोनाडे । कौशल्याकळितां कंजज नाडे । लक्ष्मीलालस लक्षील कोडें । ऐसिये चाडे करी त्वष्टा ॥८५॥
कर्बुरकर्दमनिर्मितभित्ति । अमररत्नाच्या चित्राकृति । विश्वकर्मा निर्मीं निगुती । त्रैलोक्यपति तोषावया ॥८६॥
हर्म्यभित्ती भर्ममया । शर्मद सर्वांच्या डोळ्या । कर्में सात्त्विकें पहावया । अर्ह होती सुकृति जे ॥८७॥
ऐसिये भुवनीं विलाससदनीं । निःशंक प्रवेशे नारदमुनि । तेथिची शोभा श्रीशुक वर्णी । तेही श्रवणीं अवधारा ॥८८॥
वितानैर्निर्मितैस्त्वष्ट्रा मुक्तादामविलंबिभिः । दांतैरासनपर्यंकैर्मण्युत्तमपरिष्कृतैः ॥१०॥
अमल्यवितानें भुवनगर्भीं । विश्वकर्मा स्वयंभ निर्मी । उपमा द्यावया तिये कर्मीं । निर्जरसद्मीं लक्षेना ॥८९॥
चंद्रपुटाचे चांदवे । मुक्ताफळांचे घोंस बरवे । त्यांमाजी रत्नमणींचे यावे । निजस्वभावें प्रकाशती ॥९०॥
अष्टदिग्भागीं बंधनें । निर्मिलीं जाम्बूनदसुवर्णें । जिया वितानांकारणें । पृथग्विधानें अनेक ॥९१॥
खणोखणीं वितानें भिन्न । तिहींकरूनि शोभाढ्य भुवन । सादर पाहोनि विधिनंदन । कौतुकें आन अवलोकी ॥९२॥
क्षीरोदमथनोद्भव कुंजर । तत्संतति तत्तुल्य अपर । तयांचे दंत विशालतर । आणूनि सादर त्वष्ट्यानें ॥९३॥
पर्यंक निर्मिले कुसरी । उत्तम मणि जडिले वरी । जैसे दिनमणि प्रकटले रात्रीं । हरिमंदिरीं बहुरंगी ॥९४॥
कनककौशेयसंमिश्रवसनें । ज्यांवरी चित्रिलीं निर्जरभुवनें । ऐसीं जवनिकें विधिनंदनें । पाहोनि नयनें स्मय मानी ॥९५॥
हंसपिच्छांच्या तळिका । सुरंगवसनीं छादिल्या देखा । कुंजरदंताच्या पर्यंका । सोपबर्हणा विराजती ॥९६॥
रत्नखचितगण्डूषपात्रें । मंचकातळीं पंकजाकारें । विशेष ताम्बूलष्ठीवनाधारें । कार्तस्वरमय जडितांचीं ॥९७॥
ऐसी उपकरणसामग्री । वदतां मौनावे वैखरी । कुशला पटुतर तत्परिचारीं । किंकर किंकरी तें ऐका ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 11, 2017
TOP