अध्याय ७२ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
जीवताब्राह्मणार्थाय कोऽन्वर्थः क्षत्त्रबंधुना । देहेन पतमानेन नेहता विपुलं यशः ॥२६॥
क्षत्रुकुळीं जो जन्मला होय । पडणार जाणोनि नश्वर देह । विप्रकामनासाधनीं राहे । तो नर लाहे विपुल यश ॥१८५॥
ब्राह्मणकारणीं जीवित ज्याचें । यावज्जन्म सर्वस्व वेंचे । याहूनि विशेष कोण अर्थाचें । जोदल्या यशाचें विपुलत्व ॥८६॥
इत्युदारमतिः प्राह कृष्णार्जुनवृकोदरान् । हे विप्रा व्रियतां कामो ददाम्यात्मशिरोऽपि वः ॥२७॥
इतुकें विवरूनि उदारमति । भीमार्जुनकृष्णांप्रति । म्हणे विप्र हो कामना चित्तीं । असेल मजप्रति ते मागा ॥८७॥
तुह्मी दिसतां वेषधारी । छळनही करूं आलेंति जरी । तर्ही ब्राह्मणां न अव्हेरीं । विभवीं नश्वरीं भुलोनियां ॥८८॥
छलनीं सत्व रक्षितां मरण । लाहतां पाविजे कैवल्यसदन । नश्वरलोभें विमुख ब्राह्मण । दवडितां पतन अंधतमीं ॥८९॥
यालागिं अभीष्ट काम जो तुमचा । तुम्ही मागा तो प्रसन्नवाचा । मस्तकें सहित म्यां विभवाचा । सोडिला साचा संकल्प ॥१९०॥
मस्तक मागाल ये अवसरीं । तोही देईन तुमच्या करीं । कार्यसिद्धीतें जाणोनि हरी । बोले वैखरी ते ऐका ॥९१॥
श्रीभगवानुवाच - युद्धं नो देहि राजेंद्र द्वंद्वशोयदि मन्यसे । युद्धार्थिनो वयं प्राप्ता राजन्या नान्नकांक्षिणः ॥२८॥
हरि म्हणे गा भो राजेन्द्रा । आम्हीं युद्धार्थ तुझिया भद्रा । पातलों जाणोनि द्वंद्वसंगरा । देईं उदारा मगधेशा ॥९२॥
आम्ही अन्नार्थी न हों ब्राह्मण । द्वंद्व युद्धार्थी क्षत्रिय जाण । आम्हांसि द्वंद्वयुद्ध देऊन । म्हणवीं धन्य तिहीं लोकीं ॥९३॥
जरी हें मानेल तुझिया मना । तरी पुरवावी युद्धकामना । इतुकें बोलूनि परिज्ञाना । करी अभिधाना प्रकटूनी ॥९४॥
असौ वृकोदरः पार्थस्तस्य भ्रातार्जुनो ह्ययम् । अनयोर्मातुलेयं मां कृष्णं जानीहि ते रिपुम् ॥२९॥
म्हणसी क्षत्रिय तुम्ही कोण । तरी हा भीम पृथात्मज जाण । त्याचा अनुज भ्राता अर्जुन । मातुळनंदन मी त्यांचा ॥१९५॥
सतरा वेळा समराङ्गणीं । जिंकूनि सोडिलें तुजलागूनी । तो मी तव रिपु कृष्ण जाणोनी । युद्धदानीं दृढ होईं ॥९६॥
कृष्णवचन ऐकोनि ऐसें । हास्य केलें मगधाधीशें । हांसोनि बोलिला जें संतोषें । तें तूं परिसें परीक्षिती ॥९७॥
एवमावेदितो राजा जहासोच्चैः स्म मागधः । माह चामर्षितो मंदा युद्धं तर्हि ददामि वः ॥३०॥
स्वनामें ऐसिये प्रकारीं । मागधा जाणवितां श्रीहरी । मग तो हांसोनि उच्चस्वरीं । सक्रोध उत्तरीं बोलतसे ॥९८॥
अरे मंदहो द्वंद्वयुद्ध । तुम्हीं याचिलें मजविरुद्ध । तुम्हांसि दिधलें तें पसिद्ध । परि ऐका सावध ये अर्थीं ॥९९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP