युयुधानो विकर्णश्च हार्दिक्यो विदुरादयः । बाल्हीकपुत्रा भूर्याद्या ये च संतर्दनादयः ॥६॥
निरूपिता महायज्ञे नानाकर्मसु ते तदा । प्रवर्तते स्म राजेंद्र राज्ञः प्रियचिकीर्षवः ॥७॥

शिनिवंशींचा प्रतापसिन्धु । सत्यभामेचा पितृव्यबंधु । अर्जुनशिष्यांमाज अगाधु । युयुधाननामा सात्यकि तो ॥६०॥
धृतराष्ट्राचिये पोटीं । दुर्योधनादि कौरव कपटी । त्यांमाजि विकर्ण एक जगजेठी । जो नातळे गोठी कपटाची ॥६१॥
आणि कृतवर्मा महावीर । हार्दिक्य तयाचा नामोच्चार । तैसाचि यमाचा अवतार । सर्वज्ञ विदुर नृपबंधु ॥६२॥
भूरिश्रवा आदिकरून । समस्त बाल्हीकनंदन । आणि कृष्णाचे श्यालक जाण । संतर्दनादिक अवघे ॥६३॥
ऐसिया जिवलगां सुहृदां आप्ता । कृष्णकृपाकटाक्षयुक्तां । श्रीपदभजनानंदतृप्तां । समस्त कृत्यें निरोपिलीं ॥६४॥
राजसूयाख्यमहामखीं । पृथक कार्यें भीष्मादिकीं । ज्यां जीं कथिलीं तीं तीं निकीं । करावया प्रवर्तले ॥६५॥
धर्मराजासि करावें प्रिय । येच इच्छेकरूनि कार्य । ज्यां जें कथिलें तें तद्धुर्य । करिती तात्पर्य जाणोनी ॥६६॥
इत्यादिरचनापूर्वक याग । प्रवर्तलिया साङ्गोपाङ्ग । पूर्वाध्यायीं तो प्रसंग । कथिला अव्यंग तुज राजा ॥६७॥
अजातशत्रुयज्ञें सकळा । उत्साह झाला भूमंडळा । त्यामाजि दुर्योधन वेगळा । तें कारण नृपें पुशिलें ॥६८॥
यालागीं सिंहावलोकनें । कथिलीं पृथक प्रयोजनें । धनाध्यक्षता करितां मनें । दुर्योधनें न साहिजे ॥६९॥
घर्मयज्ञें सर्वांसि सुख । आणि दुर्योधनासि जें कां दुःख । या तव प्रश्नाचा विवेक । आतां सम्यक कळालाकीं ॥७०॥
अंतरसाक्षी जनार्दन । तेणें जाणोनि अंतःकरण । धनाध्यक्ष दुर्योधन । केला संपूर्ण क्षोभार्थ ॥७१॥
तप्ततैलीं शितळ जळ । घालितां गगनीं धांवती ज्वाळ । तेंवि दुर्याधना पोटींचें कुटिळ । क्षोभलें केवळ बहुमानें ॥७२॥
दुर्योधनाचे कुटिळान्तर । प्रकट करावया बाहीर । मानभंगाचा प्रकार । पुढें समग्र कथिजेल तो ॥७३॥
प्रस्तुत राजसूयोपसंहरणीं । सिंहावलोकने बादरायणि । ऋत्विक्पूजावभृथकथनीं । प्रवर्तला तें अवधारा ॥७४॥

ऋत्विक्सदस्यबहुवित्सु सुहृत्तमेषु स्विष्टेषु सूनृतसमर्हणदक्षिणाभिः ।
चैद्ये च सात्वतपतेश्चरणं प्रविष्टे चक्रुस्ततस्त्ववभॄथस्नपनं द्युनद्याम् ॥८॥

ऋत्विज आणि सदस्यगण । बहुवेत्ते जे सर्वज्ञ प्रवीण । सुहृदांमाजि वरिष्ठ मान्य । पूजिले असतां सभास्थानीं ॥७५॥
वसनाभरणीं सर्वोपचारीं । बहुदक्षिणावाद्यगजरीं । तेथ अग्रपूजेच्या अवसरीं । चैद्या मारी हरि चक्रें ॥७६॥
अग्रपूजा चैद्यमरण । ऋत्विक्सदस्यसुहृदर्चन । संपलें असतां अवभृथस्नपन । करविते झाले धर्मातें ॥७७॥
विष्णुपादपंकजभवा । मौळभूषण जे शंभवा । त्रिजगत्पावनी दिव्यार्णवा । मंदाकिनी जे सुरसरिता ॥७८॥
तिये भागीरथीच्या ठायीं । ऋत्विज सदस्य नृप सर्वही । धर्मासहित पुण्योदयीं । अवभृथस्नाना प्रवर्तले ॥७९॥
तिये धर्माचे अवभृथस्थानीं । महोत्साह झाला अवनी । तो ऐकें आपुल्या श्रवणीं । कुरुकुळनलिनीप्रबोधका ॥८०॥

मृदंगशंखपणवधुंधुर्यानकगोमुखाः । वादित्राणि विचित्राणि नेदुरावभृथोत्सवे ॥९॥

यज्ञशाळा सोडूनि सकळीं । अवभृथस्नाना निघते वेळीं । वाद्यप्रवीण वादित्रशाळी । करिती धुमाळी वाद्यांची ॥८१॥
मधुर मृदंग ताल घोळ । शंख स्फुरिती शुभ मंगळ । पणव पटह ढक्के ढोल । दुंदुभि विशाळ दुमदुमिल्या ॥८२॥
धुंधुर्या त्या डफड्या जोडे । वादक वाहूनि नाचती पुढें । भाट बंदिजन पवाडे । गर्जती तोंडें उच्चस्वरें ॥८३॥
आनक गोमुख करणे बांके । शृंगें बुरंगें तुतारें निकें । सूर सनया काहळाप्रमुखें । वाजती अशेषें वाजंत्रें ॥८४॥
ऐसे अवभृथस्नानप्रकरणीं । गमनागमनीं गंगापुलिनीं । वाजंत्रांचें विचित्र ध्वनी । घोष गगनीं न समाये ॥८५॥

नर्तक्यो ननृतुर्हृष्टा गायका यूथशो जगुः । वीणावेणुतलोन्नादस्तेषां स दिवमस्पृशत् ॥१०॥

नर्तकी ज्या नृत्याङ्गना । दिव्याप्सरातुल्य ललना । चंचल चपला चारुवदना । चंपकगौरा चलिताक्षा ॥८६॥
ऐसिया वाराङ्गनांचे यूथ । ठायीं ठायीं करिती नृत्य । परमाल्हादें गायन तेथ । गाती गंधर्वपडिपाडें ॥८७॥
गायकयूथ पृथक पृथक । रागरागिणीमूर्च्छनादिक । आरोह अवरोह गिरड्या गमक । कौतुकें अनेक दाविती ॥८८॥
तेथ वादक पृथक तालें । त्रिवटपडनाचे पडताळें । घेऊनि दाविती करचापलें । अतिकौशल्यें संगीतें ॥८९॥
वीणे वल्लकी विपंची । सारमंडळें कौतुकांची । हस्तीं ताल धरिती त्यांची । ध्वनी नृत्यांची गति प्रकटी ॥९०॥
पूर्वश्लोकींचा वाद्यगजर । ये श्लोकींचा उच्चस्वर । तेणें कोंदलें अंबर । अमरमंदिरपर्यंत ॥९१॥
तया अवभृथस्नानयानीं । निघाले भूभुज विविधा यानीं । तें तूं कुरुवरचूडामणी । सावध श्रवणीं अवधारा ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP