तत्रायुतमदाद्धेनूर्ब्राह्मणेभ्यो हलायुधः । कृतमालां ताम्रपर्णीं मलयं च कुलाचलम् ॥१६॥

बळरामें ते रामेश्वरीं । पुण्यपावन महाक्षेत्रीं । ब्राह्मणांकारणें विधानसूत्रीं । दिधलीं अयुत गोदानें ॥३४॥
वस्त्राभरणें दिव्य अन्नें । याचकस्वेच्छा वांटिलीं धनें । तेथूनि पुढें परिवारगणें । सहित चालिला हलायुध ॥१३५॥
कृतमाळा ताम्रपर्णी । तेथ नाहोनि विधिविधानीं । पुढें मलयाचळा जाउनी । अगस्तिमुनी वंदियला ॥३६॥

तत्रागस्त्यं समासीनं नमस्कृत्याऽभिवाद्य च । योजितस्तेन चाशीभिरनुज्ञातो गतोऽर्णवम् ॥
दक्षिणं तत्र कन्याख्यां दुर्गां देवीं ददर्श सः ॥१७॥

पूर्वीं वाढला विंध्याचळ । कुंठित केलें रविमंडळ । तेणें सचिंत अमरपाळ । राहिल्या सकळ यज्ञक्रिया ॥३७॥
यास्तव काशीप्रती सुरगणीं । जाऊनि प्रार्थिला कुंभजमुनी । विंध्याद्रीचिये उपशमनीं । दक्षिणदिशेप्रती पाठविला ॥३८॥
येतां देखूनि मनुसमर्थ । विंध्याचळ त्या दंडवत । घालितां येरें केला नियत । आज्ञा संकेत सुचवूनी ॥३९॥
दक्षिणसमुद्रीं करूनि स्नान । उत्तरे येईन मी परतून । तेव्हां देईन आशीर्वचन । दंडायमान तंव अशिजे ॥१४०॥
सागर प्राशी जो आचमना । तया मुनीची अलोट आज्ञा । मस्तकीं धरूनि पर्वतराणा । अद्यापि राहिला दंडवत ॥४१॥
मलय पर्वतीं तो अगस्ति । राहिला अधळ करूनि वसती । रामें वंदूनि तयाप्रती । विशुद्धभक्तीं पूजियला ॥४२॥
तेणें अमळ आशीर्वाद । देऊनि गौरविला हळायुध । मुनीची आज्ञा घेऊनि विशद । दक्षिण क्षारोद ठाकियला ॥४३॥
तेथ दुर्गा परमेश्वरी । विख्यात जे कन्याकुमारी । तियेतें नमूनि परमादरीं । पुढें द्विविदारी चालियला ॥४४॥

ततः फाल्गुनमासाद्य पञ्चाप्सरसमुत्तमम् । विष्णुः सन्निहितो यत्र स्नात्वास्पर्शद्गवायुतम् ॥१८॥

तेथूनि पुढें सुचंद्रेश्वर । वटवीरनामक विष्णुक्षेत्र । काळकंठ महारुद्र । आदिकेशव निषेविला ॥१४५॥
कृतमाळा पयस्विनी । स्नानपानीं ताम्रपर्णी । सेवूनियां अवगाहनीं । अनंतशयनीं प्रवेशला ॥४६॥
फाल्गुनक्षेत्र अनंतपुर । पंचाप्सर सरोवर । जेथ सन्निहित श्रीधर । पद्मनाभ परमात्मा ॥४७॥
अमरपुरीतें लाजवी । ऐसी जेथींची ऐश्वर्यपदवी । वनें जीवनें अमृतभावीं । जेथ मानवी अनुभविती ॥४८॥
दहासहस्र धेनु दान । देऊनियां संकर्षण । तिये क्षेत्रींचे ब्राह्मण । पूजिता जाला अमरेंसीं ॥४९॥
तेथूनिं पुढें जनार्दन । संकर्षणें अभिवंदून । केलें केरळदेशा गमन । परिवारगण घेऊनियां ॥१५०॥

ततोऽभिव्रज्य भगवान्केरलांस्तु त्रिगर्त्तकान् । गोकर्णाख्यं शिवक्षेत्रं सान्निध्यं यत्र धूर्जटेः ॥१९॥

लंघूनियां तळ कावेरी । तिये देशींच्या समस्त क्षेत्रीं । सुस्नात होऊनि प्रलंबारी । त्रिगर्तविषयीं उतरला ॥५१॥
क्रमें तेथील तीर्थावळी । अभिवंदूनि चालिला हळी । गोकर्णाख्य चंद्रमौळी । समुद्रपाळीं निषेविला ॥५२॥

आर्यां द्वैतायनीं दृष्ट्वा शूर्पारकमगाद्बलः । तापीं पयोष्णीं निर्विन्ध्यामुपस्पृश्याथ दण्डकम् ॥२०॥

आर्या नामक मूकाम्बिका । द्वीप अयन जियेचें देखा । द्वैपायनी ते सुरनायका । नमितां दुःखा नाशक जे ॥५३॥
पुढें ठाकिलें श्रीगिरिक्षेत्र । शूर्पारक कृष्णातीर । महालक्ष्मीचें करवीरपुर । श्रीकरहाटक निषेविलें ॥५४॥
नृसिंहक्षेत्र कोपारूढ । महाबळेश्वर चंद्रचूड । कृष्णाउगम तो अवघड । सह्याद्रिशिखरीं वंदियला ॥१५५॥
चित्तपावन परशुराम । ज्याचे अंकित काळकाम । त्यांतें वंदूनि यदूत्तम । भीमशंकर वंदियला ॥५६॥
पुढती भीमातटानुक्रमीं । नीराभीमरथीसंगमीं । प्रह्लादवरद नृसिंहनामीं । वंदूनि पंढरी ठाकियली ॥५७॥
पुढें पर्यळी वैजनाथ । ठाकिला अवंढा नागनाथ । लवणासुरा जेथ अंत । तें पावन तीर्थ विष्णुगया ॥५८॥
अनसूया दत्त अत्रिमुनि । रणुका परशुराम जमदग्नि । मेहकरी शार्ङ्गपाणि । ध्रृष्णेश्वर येळूरीं ॥५९॥
त्रिसंध्याक्षेत्र ब्रह्मगिरी । पंचवटी कपालेश्वरी । कुमारक्षेत्र तापीतीरीं । सिन्धुसंगम विलोकिला ॥१६०॥
तापीपयोष्णीसंगम । अभिवंदूनि उत्तमोत्तम । मन्धातृनृपाचा जेथ जन्म । तो ॐकारेश्वर नमियेला ॥६१॥
पुढें ठाकिली अवंती पुरी । महाकाळाची अंतुरी । पुण्यपावन क्षिप्रातीरीं । वंदूनि पुढारीं चालियला ॥६२॥
भृगुक्षेत्र रेवातटीं । पश्चिमसमुद्रीं रेवा पैठी । विन्ध्याद्रीची मर्यादायष्टी । दंडकारण्या लागुनी ॥६३॥
वंदूनिया दंडकातें । रेवा घालूनि दक्षिणहस्तें । पुढें पातला पूर्व पंथें । नगरी जेथ माहिष्मती ॥६४॥
कार्तवीर्यादि आघवे । हैहय वधिले जेथ भार्गवें । तेथिंचें तीर्थविधान बरवें । श्रीबळदेवें सारियलें ॥१६५॥


Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP