मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|
ऐलगीता

ऐलगीता

ऐलगीता


श्रीभगवान्‍ (उध्दवास) म्हणाले, माझे स्वरुप ज्यायोगे लक्षिता येते असा हा मानवदेह प्राप्त करुन घेऊन माझ्या भक्तीमध्ये जो एकनिष्ठ असतो त्याला जीवाच्या अंतर्यामी असणार्‍या परमानंदस्वरुप अशा परमात्म्याची म्हणजेच माझी प्राप्ती होते. ॥१॥
ज्ञानाच्या एकनिष्ठ अभ्यासाने त्रिगुणात्मक जीवावस्थेतून मुक्त झालेला तो दृश्यमात्र म्हणून मिथ्या असणार्‍या त्रिगुणात्मक विश्वात वागतानाही तो मिथ्या गुणांवर लुब्ध होत नाही. तो नि: संग राहातो. ॥२॥
शिश्रोदरपरायण अशा नास्तिकाशी केव्हाही  समागम करु नये . अन्यथा त्याची गत आंधळ्याचा हात धरुन चालणार्‍या आंधळ्याप्रमाणे होऊन तो नास्तिकाचा मार्ग अवलंबणारा जीव अंधतम अशा लोकाप्रत जातो. ॥३॥
सुप्रसिध्द असा ऐल नावाचा चक्रवर्ती राजा उर्वशीच्या विरहाने मूढ झाला. पण पुढे शुध्दीवर येताच विषयविरक्त होऊन त्याने पुढील काव्य गायले. ॥४॥
उन्मत्ताप्रमाणे दिगंबर झालेला तो ऐल राजा आपल्याला सोडून जाणार्‍या उर्वशीला उद्देशून, हे निष्ठुर प्रिये ! थांब थांब ! असा विलाप करीत व्याकुलतेने तिच्या मागे जाऊ लागला. ॥५॥
क्षुल्लक (मोक्षाला निरुपयोगी) अशा वासनांचा उपभोग घेऊनही अतृप्तच राहिलेल्या , उर्वशीचे वेड लागलेल्या त्या राजाला विषयसेवनात कालाचेही भान राहिले नाही. ॥६॥
ऐल म्हणाला, (शुध्दीवर येऊन) उर्वशीने माझ्या गळ्यात हात टाकताक्षणीच काममदाने मी इतका उन्मत्त झालो आणि माझा मोह इतका वाढला की, माझ्या आयुष्याचा केवढा थोरला भाग नष्ट झाला याचे मला भानसुध्दा राहिले नाही. ॥७॥
त्या सुंदरीच्या मोहात मग्न झालेल्या मला, रात्र केव्हा आली व दिवस केव्हा उजाडला याचे भानच राहिले नव्हते. अरेरे ! अशा या बेभान स्थितीत माझी किती तरी वर्षे व्यर्थ गेली. ॥८॥
अनेक मांडलिक राजांचाअ चूडामणी, चक्रवर्ती असा सार्वभौम राजा मी बायकांचा क्रीडामृग (खेळणे) झालो होतो. काय हा आत्म्याचा संमोह ! हा या मोहाचाच परिणाम होय. ॥९॥
ऐश्वर्यसंपन्न सर्व प्रभू मी, परंतु मला कस्पटाप्रमाणे मानणार्‍या त्या उर्वशीच्या मागे वेडा होऊन मी रडत रडत गेलो. मला वस्त्राचीही शुध्द राहिली नव्हती. लाथाडल्या जाणार्‍या गाढवाप्रमाणेच स्त्रीच्या मागे धावणार्‍या मला प्रभुत्व, तेज, ऐश्वर्य कोठून असणार ? माझे प्रभुत्वादी सर्व मातीमोल झाले. ॥१०-११॥
ज्याचे मन स्त्रियांनी चोरुन नेले त्याची विद्या, त्याचे तप, त्याचे ज्ञान, त्याचे एकांतवास्तव्य किंवा मूकव्रत ही सर्व व्यर्थच होत. ॥१२॥
ऐश्वर्यसंपन्न असूनही जो मी स्त्रियांकडून बैल व गर्दभ यांसारख्या ग्राम्यपशूप्रमाणे वश केला गेलो, त्या स्वत: चा उत्तम पुरुषार्थ न जाणणार्‍या मूर्ख, तसेच पंडितमन्य माझा धिक्कार असो. ॥१३॥
अग्नीला कितीही आहुती दिल्या तरी त्याचे समाधान होत नाही. (तो उफाळूनच येतो.) त्याचप्रमाणे अनेक वर्षे उर्वशीचे अधरामृत मी प्यालो तरीही माझ्या मनातील विषयवासनेची तृप्ती झालीच नाही. ॥१४॥
त्या उर्वशी वारांगनेने पिंजर्‍यात कोंडलेले माझे मन बंधमुक्त करण्याला आता एका आत्मारामाशिवाय दुसरा कोण समर्थ आहे ?तोच अधोक्षज भगवान्‍  माझ्या मनाला विषयदास्यातून सोडवेल. ॥१५॥
देवी उर्वशीने सदुपदेश करुन मला बोधिले तरी व्यर्थ ! इंद्रियवश अशा मनातील माझा मोह नष्ट झाला नाही. ॥१६॥
त्या उर्वशीने माझा काय बरे अपराध केला ? जसे दोरीलाच साप मानून व्याकूळ झालेल्या अज्ञानी पुरुषाबाबत दोरीचा काय दोष ? मीच स्वत: इंद्रियांचा दास झालो म्हणून मीच खरा अपराधी आहे. ॥१७॥
कोठे हा अतिमलीन दुर्गंधाने युक्त असा अशुध्द देह आणि कोठे निर्मळ, सुगंधी , नाजूक पुष्पाप्रमाणे सात्त्विक गुण ! मलीनत्वादी दुर्गुण असणार्‍या देहाच्या ठिकाणी निर्मलताप्रभृती चांगल्या गुणांचा आरोप जीव करतो ते अविद्येचेच फल होय. ॥१८॥
हा जो देह आहे तो खरा आपला, का आईवडिलांचा, का पत्नीचा, का अग्नीचा, का पशुपक्ष्यादिकांचा, का आपल्या आपल्या आप्तेष्टांचा हे काहीच निश्चयाने सांगता येत नाही. ॥१९॥
असल्या या अपवित्र व शेवटी अत्यंत तुच्छ स्वरुप घेणार्‍या जड देहावरच या स्त्रीचे मुख उत्तम, नाक सरळ व मनोहर हास्य यामुळे कितीतरी सुंदर आहे असा आरोप करुन वेडया आकर्षकपणे लुब्ध होतो. ॥२०॥
त्वचा , मांस, रक्त, स्नायू, मेद , मज्जा, हाडे या सात अमंगला पदार्थांच्या मिश्रणाने सिध्द झालेल्या या देहसंघाताच्या ठिकाणी रममाण होणार्‍या माझ्यासारख्यात आणि विष्ठा , मूत्रादिकांच्या चिखलात लोळण्यात आनंद मानणार्‍या किडयात काय फरक आहे ? ॥२१॥
म्हणूनच स्त्रियांची आणि स्त्रीलोलुपांची संगती पुरुषार्थ जाणणार्‍या विव्दानांनी करुच नये. कारण विषयांचा इंद्रियांशी संयोग आला की मन भोगासाठी क्षुब्ध होतेच. दुसर्‍या कशानेही नाही. ॥२२॥
विषय पाहिला नाही अथवा ऐकला नाही म्हणजे मनात विकार उत्पन्न होणेच अशक्य असते. यासाठी इंद्रिये विवेकाने घटट बांधावी म्हणजे मन शांत राहाते. ॥२३॥
म्हणून स्त्रिया व स्त्रीसंगी पुरुष यांच्याशी पुरुष यांच्याशी इंद्रियांचा संयोग केव्हाही करु नये. कारण मोठे ज्ञानी पुरुष कामक्रोधादि सहा विकारांच्या जाळ्यात अडकतात मग माझ्यासारख्या अज्ञान्याची काय कथा ? ॥२४॥
श्रीभगवान म्हणाले, याप्रमाणे सुंदर गीत गाऊन त्या चक्रवर्ती ऐल राजाने उर्वशीलोक टाकून दिला. आपला जो आत्मा तोच परमात्मा (म्हणजे मी आहे) हे त्याने जाणले. त्याचा अज्ञानजन्य शोक, मोह नष्ट होऊन तो नि:संग झाला आणि मुक्त झाला. ॥२५॥
म्हणून बुध्दिमानाने नेहमी सत्संगती धरावी. मनाला स्वभावत: प्राप्त होणारी विषयासक्ती असते तिचा आपल्या सदुपदेशाने नाश करण्याला संतच काय ते समर्थ असतात. ॥२६॥
ते संत निस्पृह, भगवत्पर, विनम्र, समदृष्टी, ममता व अहंकार नसलेले, सुख -दु:खांविषयी उदासीन आणि पूर्ण विरक्त असतात. ॥२७॥
हे भाग्यशाली (उध्दवा) त्या पुण्यशील संतांमध्ये माझ्याच कथांच अवतीर्ण होतात आणि त्या कथा मानवांचे सर्व पातक नष्ट करतात. ॥२८॥
त्या आदरणीय कथांचे जे आदरपूर्वक श्रवण गायन व अनुमोदन करतात. ते श्रध्दालू व मत्परायण भक्तांना माझी भक्ती प्राप्त होते. ॥२९॥
अनंत गुण असणार्‍या आणि आनंदस्वरुप अशा ब्रह्मरुप माझ्या ठायी भक्ती दृढ झालेल्या  साधूला आणखी काय मिळवायचे शिल्लक राहाते ? तात्पर्य, तो कृतकृत्यच होतो. ॥३०॥
ज्याप्रमाणे अग्नीच्या आश्रयाला असलेल्या थंडी, भीती , अंधार यांची बाधा संभवत नाही. त्याप्रमाणे साधुंची सेवा करणार्‍याला कसलेही भय उतर नाही. ॥३१॥
जसे पाण्यात बुडणार्‍यास बळकट नावच तारते तसे घोर भवसागरात्‍ बुडून गटांगळ्या खाणार्‍यास शांत व ब्रह्मज्ञ संतच तारक ठरतो. ॥३२॥
जसे अन्न हे प्राण्यांचे जीवन आहे, दु:खित दीनांचा आधार मी आहे. मृत्यूनंतर प्राण्याचे धर्माचरण हीच त्याची दौलत तसे जन्ममरणाला घाबरणार्‍या जीवास साधूच निर्भय करतात. ॥३३॥
उगवलेला सूर्य बाहेरचे  ज्ञान देण्याला उपकारक होतो. पण संत अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनांनी (शिष्याला) ज्ञासंपन्न करतात. संतच सर्व देवता, आप्तेष्ट , आत्मा होत. परमात्मा - मी सुध्दा संतच होत. (संत सर्व श्रेष्ठ आहेत. ) ॥३४॥
याप्रमाणे उर्वशी लोकाचा त्याग केलेला तो राजा मुक्तसंग म्हणजे नि:संग बनून आत्मस्वरुपात रममाण होऊन या भूलोकावर यथेष्ट संचार करीत राहिला. ॥३५॥
॥इति ऐलगीता समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP