भीष्म म्हणाले, त्या सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ असलेला ॠषभ नावाचा विप्रश्रेष्ठ हसल्यासारखे करुन म्हणाला, ॥१॥
नृपश्रेष्ठा, पूर्वी एकदा मी तीर्थाटन करीत असताना नर- नारायणांच्या दिव्य आश्रमात गेलो. ॥२॥
त्या ठिकाणी ते बदरी नावाचे तीर्थ तसेच वैहायस डोह आहे. आणि राजा, जिथे हयग्रीव अविनाशी अशा वेदांचे पठन करतो. ॥३॥
आधी त्या डोहात पितरांचे व देवांचे यथाविधी तर्पण केले व नंतर आश्रमात गेलो. ॥४॥
या आश्रमात नर व नारायण हे दोन ऋषी नित्य वास्तव्य करतात. जवळच असलेल्या आश्रमात मी काही काळ वास्तव्य करण्यासाठी गेलो. ॥५॥
तेथे वल्कल व अजिन परिधान केलेला, खूप उंच व कृश असा तनु नावाचा तपोधन ऋषी येत असलेला मला दिसला. ॥६॥
महाबाहो, हा ऋषी सामान्य पुरुषांच्या आठ पट उंच होता. इतका विलक्षण कृश पुरुष कधीही पाहिलेला नाही. ॥७॥
राजर्षि, त्याचा देह करंगळीप्रमाणे कृश होता. त्याची मान, हात, पाय तसेच केसही अद्भुत होते. ॥८॥
त्याचे मस्तक, नेत्र आणि कानही त्याच्या शरीराला अनुकूल होते. हे राजा, त्याची वाणी तसेच वागणे सामान्य होते. ॥९॥
त्या कृश विप्राला पाहून मी घाबरतो व अतिशय अस्वस्थ झालो. त्याच्या चरणांना वंदन करुन, हात जोडून मी समोर उभा राहिलो. ॥१०॥
हे राजा, माझे नाव, गोत्र, पित्याचे नाव मी त्याला सांगितले. आणि त्याने दाखविलेल्या आसनावर मी हळूच बसलो. ॥११॥
नंतर धर्मवेत्त्या पुरुषांमधे श्रेष्ठ असलेल्या त्या तनुऋषीने ऋषींच्या सभेत धर्म व अर्थाने युक्त अशा विषयाचे विवेचन केले. ॥१२॥
तनु हे विवेचन करीत असतानाच भूरिद्युम्नाचा पिता, कीर्तिमान, ऐश्वर्यसंपन्न राजा वीरद्युम्न आपल्या सैन्यासह अश्वारुढ होऊन तेथे आला. अतिशय खिन्न असलेल्या त्या राजाला अरण्यात बेपत्ता झालेल्या आपल्या पुत्राचे सतत स्मरण होत होते. ॥१३-१४॥
‘इथे माझा पुत्र दिसेल’ , ‘इथे माझा पुत्र दिसेल ’ , अशी उत्कट आशा धरुन तो राजा वनात संचार करीत होता. ॥१५॥
‘माझा धर्मनिष्ठ पुत्र अरण्यात नाहीसा झाला. तो मला भेटणे अशक्य आहे. पण माझ्या अमर्याद आशेने मला घेरुन टाकले आहे. माझे मरण खरोखरच जवळ आले आहे.’ असे तो स्वत:शीच पुटपुटत होता. ॥१६-१७॥
त्याचे हे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठ भगवान् तनूने मान खाली घातली. आणि थोडावेळ ध्यानमग्न झाला. ॥१८॥
तनु ध्यानमग्न आहे असे पाहून अस्वस्थ झालेला वीरद्युम्न राजा अतिशय दीनवाणेपणाने हलक्या आवाजात मुनीला उद्देशून पुन्हा पुन्हा म्हणाला, ॥१९॥
देवर्ष, आशेपेक्षाही दुर्लभ व सर्वव्यापक असे काय आहे ? हे माझ्यासाठी रहस्य ठेवायचे नसेल तर कृपा करुन आपण हे मला सांगा. ॥२०॥
तुझ्या पुत्राचे नशीब खडतर असल्यामुळे बालिश बुध्दीने त्याने पूर्वी एका श्रेष्ठ महर्षीचा अपमान केला होता. ॥२१॥
राजा, तुझ्या पुत्राकडे सुवर्णकलश व वल्कलांची मागणी केली असता ती पूर्ण न करता त्याने त्याचा अपमान केला. ॥२२॥
हे ऐकून, त्या सर्व जगाला आदरणीय असलेल्या मुनीला अभिवान करुन हे राजा, तुझ्याप्रमाणेच श्रान्त व क्षीण झालेला तो बसला. ॥२३॥
नंतर त्या महर्षीने अर्घ्य व पाद्योदक आणले आणि वनात उचित असलेल्या विधीने त्याने ते सर्व राजाला अर्पण केले. ॥२४॥
हे पुरुषश्रेष्ठा, नंतर सप्तर्षी ध्रुवाच्या भोवाती असतात त्याप्रमाणे ते सारे विरद्युम्न राजाच्या भोवती बसले. ॥२५॥
तिथे त्यांनी त्या पराक्रमी राजाला आश्रमात येण्याचे प्रयोजन विचारले. ॥२६॥
राजा म्हणाला, मी वीरद्युम्न राजा म्हणून सर्व जगात विख्यात आहे. भूरिद्युम्न नावाच्या माझ्या बेपत्ता झालेल्या पुत्राच्या शोधासाठी मी वनात आलो आहे. ॥२७॥
कुठेही दिसत नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी मी हिंडतो आहे. ॥२८॥
ऋषभ म्हणाला, राजा असे बोलल्यावर तो मुनी मान खाली घालून शांत बसला. त्याने राजाला काही अंतर दिले नाही. ॥२९॥
मागे दीर्घकाल तपश्चर्या करणारा एक विप्र मनात आशा बाळगून त्या राजाकडे गेला असताना त्याने त्या ब्राह्माणाला विशेष मानाने वागविले नाही. ॥३०॥
तेव्हापासून ‘काही झाले तरी राजांकडून कशाचाही स्वीकार, करणार नाही. आणि अन्य वर्णीयांकडूनही काही घेणार नाही,’ असा निर्धार त्याने केला.॥३१॥
‘मनात ठाण मांडून राहिलेला आशा लहान-थोर प्रत्येकाला धडपडायला भाग पाडते. म्हणून मी तिलाच संपवतो ! असा त्याने निश्चय केला. ॥३२॥
राजा म्हणाला, भगवान्, आपण धर्म व अर्थ जाणता. अमर्याद आशा करणार्या आणि तिच्या पूर्ण तावडीत सापडलेल्या माणसाप्रमाणे दुर्लभ या जगात काय आहे ? ते सांगा. ॥३३॥
ऋषभ म्हणाला, तेव्हा त्या कृश शरीराच्या तनुची जागृत होऊन राजाला सर्व स्मरण देण्याच्या इच्छॆने तो विप्र म्हणाला, ॥३४॥
राजा, आशा बाळगणार्या माणसाप्रमाणे जगात अन्य काहीही नाही. आशेच्या दुर्लभतेमुळे मला राजांची याचना करणे भाग पडले. ॥३५॥
राजा म्हणाला, विप्रश्रेष्ठ, कृश व अकृश कोणाला म्हणावे ते आपल्या बोलण्याने मला समजते. आशेने ध्यास घेतलेल्या गोष्टी दुर्लभ असतात. हे मी वेदवाक्यांप्रमाणे मानले आहे. ॥३६॥
हे प्रज्ञावंत व्दिजश्रेष्ठ , माझ्या मनातील शंका मी विचारतो. आपण तिचे यथायोग्य निराकरण करावे. ॥३७॥
भगवन्, आपल्यापेक्षाही कृश काय आहे ? जर हे रहस्य नसेल तर मला स्पष्ट करुन सांगा. ॥३८॥
कृशतनु म्हणाला, जो याचक धैर्याने संपन्न असेल तो दुर्लभ असेल वा नसेल, पण जो याचकाची अवहेलना करीत नाही असा पुरुष मात्र अतिशय दुर्लभ आहे. ॥३९॥
याचकाचा प्रथम सत्कार करुन नंतर आपल्या सामर्थ्याप्रमाणे त्याला दान न देणार्या पुरुषावर तसेच सर्वच माणसांवर वर्चस्व गाजविणारी आशा माझ्यापेक्षाही कृश आहे. ॥४०॥
एकुलता एक पुत्र नष्ट झाल्यावर वा देशांतरी गेल्यावर त्याची कुशलवार्ता न जाणणार्या पित्याची आशा माझ्यापेक्षा अधिक कृश आहे. ॥४१॥
राजा, संततीसाठी तळमळणार्या स्त्रियांची, पुत्रासाठी असलेली वृध्दांची तसेच धनिकांची आशा माझ्यापेक्षाही कृश आहे. ॥४२॥
ऋषभ म्हणाला, राजा, तेव्हा हे ऐकून त्या राजाने आपल्या स्त्रियांसमवेत त्या व्दिजश्रेष्ठाला साष्टांग प्रणिपात केला. ॥४३॥
राजा म्हणाला, भगवन्, मी विनंती करतो मला पुत्राचा सहवास हवा आहे. हे विप्रा, ज्याची इच्छा असेल ती गोष्टा यथाविधी मागा. ॥४४॥
ऋषभ म्हणाला, तो कमळाप्रमाणे डोळे असलेला राजा त्याला म्हणाला की ‘ आपण जे सांगितले ते अगदी सत्य आहे. त्यात काही खोटे नाही.’ ॥४५॥
तेव्हा धर्मनिष्ठ तापसांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भगवान तनुने हसून आपल्या तप व ज्ञानाच्या सामर्थ्याने तत्क्षणी त्याच्या पुत्राला तिथे आणले. ॥४६॥
राजाच्या पुत्राला तिथे आणून, राजाची निर्भत्सना करुन, धर्मनिष्ठांमध्ये श्रेष्ठ असलेल्या तनुने त्याला आपल्या धर्माचे ज्ञान करुन दिले.॥४७॥
आपल्या दिव्य व अद्भुत स्वरुपाचे दर्शन दिल्यावर, पापरहित व क्रोधरहित असा तो मुनी वनाच्या जवळ संचार करु लागला. ॥४८॥
राजा, हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिजे व ऐकले आहे. तेव्हा या कमालीच्या कृश आशेचा तू लवकरात लवकर त्याग कर. ॥४९॥
भीष्म म्हणाले, महात्मा ऋषभाने असा उपदेश केल्यावर सुमित्राने अत्यंत कृश अशा आशेचा तत्क्षणी त्याग केला. ॥५०॥
युधिष्ठिरा, माझे हे विवेचन ऐकल्यावर तू सुध्दा हिमालय पर्वताप्रमाणे स्थिर राहा. ॥५१॥
संकटकाळी विचारणारा, पाहणारा तूच आहेस. माझे हे बोलणे ऐकल्यावर आता तू मनस्ताप करुन घेऊ नकोस. ॥५२॥
दुसरा अध्याय समाप्त.
॥ ऋषभगीता समाप्त ॥