श्री भगवान्‍ म्हणाले, शास्त्रे अनेक आहेत. जाणून घ्यावयाच्या विषयांचा व्याप फार मोठा आहे. उपलब्ध काळ कमी आहे. त्यात पुन्हा नाना प्रकारची विघ्ने आहेत. (हे सर्व लक्षात घेता ) दूधपाण्याचे मिश्रणातून हंस ज्याप्रमाणे फक्त दूध घेतो त्याप्रमाणे जे सारभूत आहे तेवढेच अभ्यासावे. ॥१॥
पुराणे, महाभारत, वेद आणि नानाविध शास्त्रे अभ्यासासाठी आहेत. स्त्रीपुत्रादिस्वरुप संसार हा योगाभ्यासात अडचण निर्माण करणारा आहे. ॥२॥
हे ज्ञान, हे ज्ञेय ते सर्व जाणून  घेण्याची इच्छा असता अभ्यासांत हजारो वर्षे लोटली तरी शास्त्रांचा अन्त लागत नाही. ॥३॥
अक्षरविज्ञान जाणावयाचे म्हटले तरी स्वर, व्यंजने, व्याकरणादी सर्व शास्त्रे यांचा अभ्यास करावा लागेल. परंतु जीवित अस्थिर आहे. म्हणून शास्त्रजंजाळ सोडून जे सार तेच घ्यावे. ॥४॥
जीभ आणि जननेंद्रिय याव्दारा मिळणारे विषयोपभोग हेच, पृथ्वीवर जेवढे म्हणून जिवाणू आहेत त्यांचे पृथ्वीवरील वास्तव्याचे निमित्त आहे. जीभ आणि जननेंद्रिय (यांच्या विषयांचा) परित्याग केला असता पृथ्वीवर राहण्याचे काही प्रयोजनच नाही. ॥५॥
आत्मज्ञानसंपन्न योगी तीर्थे व देव यांचा स्वीकार करीत नाहीत. कारण त्यांचेदृष्टीने तीर्थे म्हणजे पाण्याचे साठे आणि देव ते माती दगडाचे. ॥६॥
ब्राह्मणांची अग्नी ही देवता, योग्यांची हृन्निवासी ईश्वर ही देवता, स्वल्पबुध्दिंची प्रतिभा ही देवता आहे. आत्मज्ञान झालेल्या भक्ताचा भगवंत सर्वत्र आहे. ॥७॥
उगवलेल्या सूर्याला आंधळा पाहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानचक्षू नसलेला मनुष्य, सर्वत्र भरुन असलेल्या शांत स्थितीत असलेल्या जनार्दनाला पाहत नाही. ॥८॥
निरभ्र आकाशाप्रमाणे निर्मळ असलेल्या ईश्वराला ज्ञानी आपल्या देहातच पाहतो. त्यानंतर योग्याचे जेथे जेथे मन जाते तेथे तेथे त्याला परमपदाचेच दर्शन होते. ॥९॥
दृश्य स्वरुपात रुपाकारमय जे जे काही दिसते आहे तेथे तेथे ब्रह्म भरलेले आहे . तथापि हे ब्रह्म आकाशापेक्षा निर्लेप आहे.॥१०॥
‘मी ब्रह्मस्वरुप आहे’ हे जो मनुष्य नित्य जाणतो त्याने सर्व लोकांचा घात केला तरी तो सर्वथा कृतकृत्य राहतो. (त्याला हत्येचे पातक लागत नाही.) ॥११॥
एकाक्षर श्रेष्ठ, अविनाशी, विष्णुपदस्वरुप असलेले ब्रह्म ते मीच आहे. (घटाकाशाप्रमाणे) ज्या व्यक्ताकारात ते दिसेल तदाकार त्याचा विचार करावा. ॥१२॥
आत्म्यामध्ये डोळ्याचे आकाराचे तर डोळयामध्ये आत्माकाराचे आकाशात आकाशाकृतीचे (ते ब्रह्म) दिसते. ते जसे दिसते तदाकार त्याचा विचार करावा. ॥१३॥
ब्रह्म विभागसंपन्न असूनही अखंड आहे. ते सूक्ष्म आहे. मोक्षमार्गानेच त्याची जणू निर्मिती झाली आहे. स्वर्गस्वरुप, निर्वाणस्वरुप परम , व्यापक आणि अविनाशी असे ब्रह्म आहे. ॥१४॥
प्रकाशाची गती सर्वत्र आहे. त्याप्रमाणे सर्वभूतांत आत्मस्वरुप माझी गती अप्रतिहत असून (हारांतील सर्व फुलांशी जसा दोर्‍याचा तसा ) आत्मरुप माझा सर्वभूतांशी संबंध आहे. मी सर्वत्र परमाअत्मस्वरुप, ब्रह्मस्वरुप, परमाक्षरस्वरुप आहे. ॥१५॥
योगी लोक जेथे पळभर किंवा अर्धा पळ थांबतात ते स्थान कुरुक्षेत्र, प्रयाग, नैमिष , व्रज याप्रमाणे पवित्र तीर्थक्षेत्र बनते. ॥१६॥
पळभर किंवा अर्धपळही जो अध्यात्मविषयाचे चिंतन करतो त्या योग्याने सर्व प्रकारची निषिध्द कर्मे केली तरी तो त्या निषिध्द कर्मांनी बध्द होत नाही. ॥१७॥
सहस्रकोटी यागापेक्षाही एकटे ध्यान भारी आहे. ब्रह्मज्ञानरुप अग्रीने नेहमी पापपुण्यांचे दहन होत असते. ॥१८॥
मित्रामित्रता, सुखदु:ख, इष्टानिष्टत्व, शुभाशुभत्व, मानापमान,  निंदास्तुती हे सर्वही वरीलप्रमाणे ज्ञानाग्नीने जळून जातात. ॥१९॥
देहरक्षण एवढाच भिक्षान्नाचा उद्देश. लज्जानिवारणापुरताच वस्त्राचा विनियोग. सोने व दगड दोन्ही समान. रानटी पालेभाजी व साळी़चा सुग्रास भात दोन्ही ठिकाणी रसवृत्ती सारखीच. ॥२०॥
याप्रमाणे योग्याने सर्वत्र सम विचार ठेवावा. अशी विचारक्षमता साधली असता त्या योग्याच्या हातातच कैवल्य नांदते. त्याला पुन्हा जन्म असत नाही. ॥२१॥
(देहरक्षणार्थ) भिक्षान्नाचे सेवन करणारा वास्तविक निराहारीच असतो; कारण भिक्षा हा स्वीकृतिप्रकार नव्हेच. (भोजनासाठी) काही असले वा नसले तरीही त्या योग्याला दररोज अमृतपानाचा आनंद मिळत असतो. ॥२२॥
शीतोष्णापासून संरक्षण करण्यासाठी शेकडो ठिकाणी भोके पडलेल्या वस्त्रांची गोधडीही पुरेशी होते. भगवान्‍ केशवाचे ठिकाणी दृढ भक्ती असता इतर ऐश्वर्याची गरजच काय ? ॥२३॥
ज्या गृहस्थांकडील अन्न योग्याचे पोटात जाऊन योगाभ्यासाने तेथे त्याचे पचन होते त्या गृहस्थाच्या आधीच्या दहा व नंतरच्या दहा अशा वीस कुळांचा उध्दार होतो. ॥२४॥
यतीच्या हातावर प्रथम पाणी घालावे. मग भिक्षापदार्थ द्यावेत आणि पुन्हा पाणी घालावे. ते अन्न मेरुतुल्य आणि ते पाणी श्रेष्ठ सागरासारखे होत असते. ॥२५॥
ज्याच्या घरी जेवतो त्याच्या घरी त्रैलोक्य जेवत असते. ॥२६॥
जो सापाप्रमाणे जनसंपर्क सर्वदा टाळतो, वीतराग होऊन प्रेताप्रमाणे स्त्रियांचा त्याग करतो. जिला अंतच नाही अशी विषयभोगासक्ति विषाप्रमाणे मानतो असा परमहंस योगी मोक्षपद जिंकतो. ॥२७॥
सूर्य ज्याप्रमाणे सर्व रस शोषून घेतो किंवा अग्रि सर्व काही भक्षण करतो त्याप्रमाणे योगी प्राप्त विषयांचा उपभोग घेतो तथापि त्या कर्माची शुभाशुभ फले त्याला बंधनकारक होत नाहीत. ॥२८॥
योग हीच आणि म्हणजे अग्रि उत्पादक यंत्र. आणि ध्यान हीच त्या अग्रियंत्राची घर्षणक्रिया होय. ती केली असता ज्ञानरुप अग्रि तयार होतो. पंचमहाभूतांची गुणकर्मे हेच इंधन ते त्या ज्ञानाग्रीला पुरविले, त्याला वायूची साथ मिळाली तर तो ज्ञानाग्रि चांगलाच प्रज्वलित होऊन , त्यात कर्मबंधासह सर्वाचा जळून नाश होतो. ॥२९॥
ब्रह्मतत्त्व स्पष्टपणे जो जाणत नाही त्याला मुक्ति मिळत नाही. सर्व प्राण्यांच्या अंतरी एकच ब्रह्मसूत्र (ओवल्याप्रमणे) आहे असे सांगतात. ॥३०॥
कोळी आपला पोटातून  धागा काढतो व त्याचे जाळे बनवितो. ब्रह्मतत्त्व त्याप्रमाणेच सूक्ष्म शुध्द शांत आहे. तेथे विचार अविचार हा विभाग नाही. ॥३१॥
सर्व चिंतापासून मुक्त झालेला निश्चितरीतीने शुध्द होईलच त्या योग्याला ब्रह्मनिर्वाण पदाचा लाभ होतो. याविषयी शंका नाही. ॥३२॥
॥ उत्तरगीतेचा तृतीयाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP