दत्त म्हणाले, आवाहन किंवा विसर्जन जेथे नाही तेथे पत्रे पुष्पे इत्यादि पूजासाहित्य तरी कोठून असणार ? तसेच ध्यान व मंत्र तेथे कोठचे ? तेथे शिवाचे पूजन करणे किंवा न करणे दोन्ही सारखेच. ॥१॥
मी केवळ बंध व मोक्ष, मी केवल शुद्धि किंवा विशुद्धि योग किंवा वियोग यांनीच केवळ मी रहित आहे असे नव्हे तर अत्यंत मुक्त व गगनासारखा (परमात्मा तोच) मी आहे. ॥२॥
निरनिराळ्या दृष्टीने पाहिले हे सर्व उत्पन्न होते हे म्हणणे खरे आहे व खोटेही आहे. तथापि हे विकल्प माझे ठिकाणी कधीच नसतात. मी निर्वाण स्वरूपाचा व व्याधिरहित आहे. ॥३॥
हे सर्व मलिन किंवा निर्मल, सच्छिद्र किंवा भरलेले नाही आतून थोडे तरी भेद युक्त आहे ! असेही माझे प्रत्ययाला येत नाही. तर मी निर्वाण स्वरूप व व्याधिरहित आहे. ॥४॥
अज्ञान किंवा ज्ञान तसे ज्ञानरूप हे कधी उत्पन्न झाले नाही तेव्हा ज्ञान किंवा अज्ञान हे मी कसे सांगावे कारण मी मोक्षस्वरूप व आनंदपूर्ण आहे. ॥५॥
मी धर्मवान, बंधमुक्त किंवा मोक्षयुक्तही नाही. युक्तत्व किंवा अयुक्तत्व यापैकी कशाचाही मला प्रत्यय येत नाही. मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥६॥
परत्व किंवा अपरत्व (म्ह. श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व) हे माझे धर्म माझे नाहीत. उदासीनपणा किंवा मित्रत्व वा शत्रुत्व हे ही माझे भाव नाहीत. हे हितकर किंवा अहितकर हे मी कसे सांगावे. कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥७॥
मी कोणाचा उपासक नाही की उपास्य दैवत नाही मला कोणाचा उपदेश व कोणतीच क्रियाही नाही. असे असताना ज्ञानस्वरूपाविषयी कार सांगावे ? कारण
मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥८॥
यात व्याप्य किंवा व्यापक, साधार व निराधार असेही काही नाही. तर मी ते शून्य किंवा अशून्य आहे हे कसे सांगावे ? कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥९॥
मी ग्राहक नाही की ग्राह्यही नाही, मी कारण नाही किंवा कार्यही नाही असे असताना त्या अचिन्त्याचे वर्णन कसे करु ? कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१०॥
जे तत्व कशाचाल भेद करीत नाही किंवा ते स्वत: भेद पावत नाहे ते कसाचे वेदक किंवा जाणण्यास योग्य नाही. ते गत किंवा अगत आहे हे मी कसे सांगू ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥११॥
मला देह नाही मी विदेहीही नाही. बुद्धि, मन, इंद्रिये ही माझी नव्हेत. ते तत्व सकाम की निरोगी हे मी कसे सांगावे ? कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१२॥
त्या तत्वाचा उल्लेख मात्र करता येतो. पण ते आकृतीने पृथक झालेले नाही. उल्लेख करता येतो पण ते अत्यंत गूढ आहे असेही नाही. ते सम आहे किंवा विषम आहे हे कसे सांगू. मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१३॥
मी जितेंद्रिय किंवा अजितेंद्रिय आहे ? कारण इंद्रिय संयम किंवा नियम माझ्या ठिकाणी मुळीच नाहीत. हे मित्रा, जय किंवा अजय हे मी कसे सांगावे. मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१४॥
मी वस्तुत: मूर्त किंवा अमूर्त नाही. मला जन्म, स्थिती व लय नाही. यास्तव हे मित्रा, त्यांच्या बलाबलाविषयी काय बोलू ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१५॥
बाबारे मजपासून मृतत्व किंवा अमृतत्व, विष किंवा अविष यापैकी काहीच उत्पन्न होत नाही. त्याअर्थी शुद्ध किंवा अशुद्ध ते मी कसे सांगू ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१६॥
स्वप्न, जागृति, योगांतील आसनानिमुद्रा दिवस व रात्र याचे मी मला कधीच काही नाही तर मग तुरीय किंवा अतुरीय हे मी कसे सांगावे ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१७॥
सर्व व प्रत्येक समष्टि व व्यष्टी यानी रहित, कौटिल्य किंवा अकौटिल्य यापैकी मला काही नाही तर मग संध्यादि कर्मे तरी माझी आहेत हे कसे सांगू ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१८॥
मी सर्व अंगे व उपांगे यासहित संप्रज्ञान व असंप्रज्ञात समाधियुक्त आहे असे जाण. लक्ष्य अलक्ष्य यांनी रह्ति मी आहे, असेही जाण. योग व योगरहित यापैकी कोणत्या धर्माने ते तत्व युक्त ते कसे सांगू मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥१९॥
मी मूर्ख किंवा पंडितही नाही. मौन किंवा बोलकेपणा हे माझे धर्म कधीही नव्हते. तर्क करण्यासारखे किंवा न करण्यासारखे हे मी काय सांगू ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥२०॥
पिता, माता, कुल जाति, जन्म मृत्यु इत्यादि माझे कधीही नव्हेत प्रीति व तिचे कारण मोह यापैकी कांहीतरी एक आहे हे तरी मी कसे म्हणावे ? कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥२१॥
कधीही माझा अस्त नाही, सदोदित उदय पावलेलाच असतो. तेज व निस्तेज माझे धर्म नव्हेत तर संध्यादिक कर्मा विषयी मी काय सांगावे ? मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥२२॥
नि:संशय मी व्याकुळ नाही. मी सर्वव्यापी आहे. असे तू नि:संशय समज. मी निर्मल आहे हे नि:संशय जाण. कारण मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥२३॥
साधक सर्वही ध्याने, शुभाशुभ कर्मे टाकतात. बाबारे, ते धीर पुरुष संन्यासापासून प्राप्त झालेले अमृत यथेच्छ पितात. सारांश मी मोक्षरुप व आनंदमय आहे. ॥२४॥
जेथे ज्ञान व अज्ञान हे शब्द नाहीत. छंदोलपणाचा जेथे गंधही नाही. पण समरसामध्ये मग्न झाल्यामुळे जो अंतर्बाह्य पवित्र झाला आहे तोच परम सिद्ध पुरुष या तत्वाविषयी बोलतो. ॥२५॥
याप्रमाणे परम सिद्ध स्वरूप नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला.