सूत म्हणाले,
कच्छपरुपी विष्णूचे हे वचन ऐकून ऋषींनी विष्णूला नमस्कार केला आणि प्रश्न केला. ॥१॥
ऋषी म्हणाले,
शिवाची अर्धांगी असलेली ही पूजनीय देवी कोण? मंगलकारक अशी ही आधी सती होती, नंतर पार्वती झाली हे कसे ते आम्हाला सविस्तर सांगा. ॥२॥
ऋषींचे हे बोलणे ऐकूण महायोगी विष्णू आपल्या परमपदाचे ध्यान करुन पुन्हा म्हणाले. ॥३॥
कूर्म म्हणाले,
पूर्वी सुंदर अशा मेरुपृष्ठावर ब्रह्मदेवाने हे गूढ आणि गोपनीय ज्ञान सांगितले. ॥४॥
सांख्यांचे परमतत्व असे हे ब्रह्मज्ञान संसारसागरात बुडालेल्या प्राणिमात्रांना तारणारे (एकमेव) साधन केले. ॥५॥
शिवपत्नी शक्तिज्ञान इच्छारुपिणी, व्योम नावाची, अमर्याद अशी पार्वती होय. ॥६॥
शिवपत्नी ही सर्वव्यापी, अनंत गुणाणीत, अत्यंत शुध्द एक असून अनेक ठिकाणी असणारी, ज्ञानरुप आणि उत्कट इच्छा असणारी आहे. ॥७॥
ही एकमेवाव्दितीय, शुध्दपदी राहणारी असून त्या पदाच्या तेजामुळे तिच्या ठिकाणी सूर्याप्रमाणे निष्कलंक तेज आहे. ॥८॥
शिवपत्नी शक्ती अनेक उपाधींनी श्रेष्ठ अशा रुपांनी त्याच्याजवळ लीला करीत असते. ॥९॥
तीच हे सर्व करीत असते. हे सर्व जग तिचे कार्य आहे. हे ऋषींनो ! शिवाचे ना कोणते कार्य आहे, ना कोणते साधन ! ॥१०॥
हे मुनिवरांनो ऐका ! या देवीच्या चार शक्ति तिच्या स्वरुपात, तिच्या अधिष्ठानामुळे स्थित आहेत. ॥११॥
त्या चार शक्ती म्हणजे शान्ती, विद्या, प्रतिष्ठा आणि निवृत्ती होत. म्हणूनच शिवास चतुर्व्यूह म्हणतात. ॥१२॥
या परेमुळे देव आत्मनंदाचा भोग घेतो. चतुर्व्यूह महेश्वरच चार वेदांचा मूर्तिरुप आहे. ॥१३॥
याचे थोर, अतुलनीय ऐश्वर्य सनातन काळापासून सिध्द आहे. त्या रुद्रपरमात्म्याच्या संदर्भात ही देवी अनंत आहे. ॥१४॥
ती सर्वेश्वरी देवी सर्व प्राणिमात्रांची प्रवर्तक आहे. शिवाला भगवान् , काळ, हरी, प्राण म्हणतात. ॥१५॥
त्याच्या ठिकाणी सर्व जग ओतप्रोत भरले आहे. वेदाभिमानी त्या काळाग्नीरुप शंकराची स्तुती करतात. ॥१६॥
काळा प्राणिमात्रांना निर्मान करतो. काळ लोकांचा संहार करतो. सर्व कालाच्या आधीन आहे. काळ कोणाच्याही आधीन नाही. ॥१७॥
प्रधानपुरुष, अहंकारारादी तत्त्वे, योगी सर्व काळाच्या आधीन आहेत, (त्यांचे ठायी समाविष्ट आहेत.) ॥१८॥
सर्व जगताच्या ठिकाणी असलेल्या त्याच्या शक्तीला माया म्हणतात. तिला ती (हरी) भ्रमण करावयास लावतो. ॥१९॥
ही सर्वधारक, अनादी मायारुप शक्ती महेशाची असून ब्रह्मांडास प्रकाशित करते. ॥२०॥
त्या देवाने निर्माण केलेल्या इतर तीन मुख्य शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती व प्राणशक्ती होत. ॥२१॥
त्या शक्तींना शक्तिमान् ईशाने निर्माण केले ते मायेने. ती मात्र अनादी, अनंत आहे. ॥२२॥
माया दुर्निवार, दुरत्यय आहे; या सर्व शक्तींचा ईश्वर, कालाचा निर्माता प्रभू मायावी आहे. ॥२३॥
काल सर्व निर्माण करतो, काल सर्वांचा नाश करतो. काल सर्वांचे नियमन करतो. हे जग काळाच्या आधीन आहे. ॥२४॥
देवाधिदेव, अनंत, अखिलेश्वर, परमेष्ठी, कालात्मक प्रभु शिवाचे त्याला सान्निध्य प्राप्त आहे. ॥२५॥
प्रधान पुरुष ही मायाच आहे.तीच सर्वत्र आहे. सर्वांच्या ठायी असलेली अनंत निष्कलंक अशी देवी एकमेव आहे. ॥२६॥
शक्ती एकमेव पार्वतीच आहे. शिव एकमेव शक्तिमान् आहे. शक्ती, तसेच इतर शक्तिमंत, हे सर्व या शक्तीपासूनच निर्माण झाले आहेत. ॥२७॥
खरे पाहता शक्ती आणि शक्तिमान् यांत भेद आहे. तत्त्वचिन्तक योगी त्यांचे ठिकाणी अभेद मानतात. ॥२८॥
पार्वती देवीच शक्ती आहे. शिव हा शक्तिमान् आहे. हा विशेष ब्रह्मवाद्यांनी पुराणात सांगितला आहे. ॥२९॥
महेश्वरपत्नी विश्वेश्वरी हिलाच भोग्या म्हणतात. जटाधारी नीललोहित शिवाला भोक्ता म्हणतात. ॥३०॥
विश्वेश्वर मदनविध्वंसक शिवदेवाला मन्ता म्हणतात आणि पार्वती देवीला मन्तंव्या म्हणतात. ॥३१॥
हे ब्राह्मणांनो ! हे सर्व जग शक्ती व शक्तिमान् यांचेपासून झाले आहे असे तत्वचिंतक ऋषींनी वेदात सांगितले आहे. ॥३२॥
सर्व वेन्दात विचारात ब्रह्मवाद्यांनी निश्चित केलेले देवीचे श्रेष्ठ माहात्म्य या प्रकारे सांगितले आहे. ॥३३॥
एकमेव, सर्वव्यापी , सूक्ष्म, कूटस्थ, अचल असे हे महेश्वरीचे श्रेष्ठपद योगीच पाहू शकतात. ॥३४॥
आनंदमय, अविनाशी, ब्रह्मरुप, एकमेव, निष्कलंक असे ते रुप योगीच पाहू शकतात. ॥३५॥
चिरस्थायी, मंगल, भ्रष्ट न होणारे, देवीचे ते परात्परतत्व श्रेष्ठपद अनंत प्रकृतीमध्ये लीन झाले आहे. ॥३७॥
देवीचे ते शुभ्र, निष्कलंक, शुध्द, गुणातीत, अव्दैत परमपद आत्म्याने जाणण्याचा विषय आहे. ॥३८॥
ती माता आहे . परमानंद इच्छिणार्यांना ती देणारी आहे. ती महादेवाच्या सत्तेने सर्व संसारतापांचा नाश करते. म्हणून मोक्षाची इच्छा असणार्याने शिवस्वरुप आणि प्राणिमात्रांचे आत्मस्वरुअप असलेल्या पार्वतीस शरण जावे. ॥३९॥
अत्यंत कठीण तप करुन ज्या कन्येला प्राप्त करुन घेतले आहे त्या पार्वतीस हिमालय सपत्नीक शरण गेला. ॥४०॥
स्वेच्छेनेच जन्मलेल्या आपल्या सुमुखी कन्येस पाहून पतीस मेना म्हणाली ॥४१॥
मेना म्हणाली
हे राजा, आपणा उभयतांच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झालेली आणि सर्व भूतांच्या हितासाठी जन्माला आलेली ही आपली कमलमुखी कन्या पहा. ॥४२॥
नवोदित सूर्याप्रमाणे तेज असलेल्या जटाधारिणी, चतुर्मूखी त्रिनेत्रा, उत्कटलालसा असलेल्या- ॥४३॥
आठहाताच्या, विशालाक्षी चंद्राप्रमाणे मृदू आणि तेजस्वी अवयव असलेल्या निर्गुण-सगुण, सत्-असत् यांच्या पलीकडे असलेल्या - ॥४४॥
त्या देवीस पाहून तिच्या समोर हिमालयाने जमिनीवर डोके ठेवले आणि तिच्या तेजाने व्याकुळ, भयभीत झालेला तो हात जोडून म्हणाला, ॥४५॥
हिमालय म्हणाला,
हे चंद्राप्रमाणे सुंदर अवयव असणार्या विशालाक्षी देवी, मी तुला योग्य प्रकारे जणू शकत नाही; तू कोण आहेस हे मला सांग. ॥४६॥
हिमालयाचे बोलणे ऐकून योग्यांना अभय देणारी देवी त्या महापर्वताला म्हणाली. ॥४७॥
देवी म्हणाली,
महेश्वराच्या आश्रयाने राहणारी मी परशक्ती आहे असे तू जाण. ॥४८॥
मोक्षाची इच्छा असणारे मला, अविनाशी, अनन्य आणि एकमेवाव्दितीय मानतात. सर्व कल्याणरुप अशी मी सर्व भावांचा आत्मा आहे. ॥४९॥
मी शाश्वत अशी ऐश्वर्य आणि विज्ञान यांची मूर्ती आहे. सर्व प्रवर्तक आहे अनंत महिमा असणारी मी संसारसागरातून तारणारी आहे. ॥५०॥
मी तुला दिव्यदृष्टी देते; त्या दिव्यदृष्टीने तू माझे महान् असे रुप पहा. अशा प्रकारे बोलून स्वत: हिमालयाला ज्ञान देऊन- ॥५१॥
व्याकुळ अशा हिमालयाला आपले कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी, दिव्यरुप तिने दाखवले. ॥५२॥
हजारो अग्रिशिखाप्रमाणे असलेले, शेकडो प्रलयाग्नीसमान, भयानक दाढा असलेले, ओढण्यास कठिण, जटामंडलयुक्त (असे ते रुप होते) ॥५३॥
डोक्यावर किरीट, हातात गदा, शंख आणि चक्र असलेले, त्रिशूलधारी, वरहस्त, अत्यंत घोर आणि भयानक (असे ते रुप होते ) ॥५४॥
(आणि तसेच ते ) शान्त, सौम्यमुख असलेले, अनंत आश्चर्यांनी युक्त, चंद्राप्रमाणे मृदू आणि तेजस्वी अवयव असलेले (रुप होते.) ॥५५॥
मुकुट धारण केलेले, हाती गदा, पायीं पैंजण , दिव्य पुष्पहार आणि वस्त्रावृत्त, दिव्यगंध लावलेले (असे ते रुप होते ) ॥५६॥
हाती शंखचक्र असलेले, कमनीय, त्रिनेत्र, अजिनधारी, ब्रह्मांडाच्या आत आणि त्याच्या बाहेर आणि दोहोच्या पलीकडे असलेले (ते रुप होते) ॥५७॥
सर्वशक्ती असलेले, शुभ्र, सनातन, ब्रह्मा-विष्णु -इंद्र आणि श्रेष्ठ योगी यांनी वंदन करण्यायोग्य चरण असलेले (ते रुप होते) ॥५८॥
(त्या रुपाला) सगळीकडे व्यापून स्थित अशा रुपाच्या त्या देवीस हिमालयाने पाहिले . ॥५९॥
त्या देवीचे हे असे शिवरुप पाहून भयाकूळ राजा (हिमालय) मनात प्रसन्न झाला. ॥६०॥
आपल्या आत्म्यामध्ये स्वत:ला ठेवून ऊँकाराचा जप करीत देवीचे सहस्रनाम उच्चारुन त्याने त्या परमेश्वरीस संतुष्ट केले.॥६१॥
हिमालय म्हणाला,
शिवा, उमा, परमा, शक्ती, अनन्ता, निष्कळा, अमला, शान्ता, माहेश्वरी, नित्या, परमाक्षरा, ॥६२॥
अचिन्त्या, केवला, अनन्त्या, शिवात्मा, परमात्मिका, अनादी, अव्यया, शुध्दा, देवात्मा, सर्वगा, अचला, ॥६३॥
एका अनेक विभागस्था, मायागीता, सुनिर्मिळा, महामाहेश्वरी. सत्या. महादेवी, निरंजना, ॥६४॥
काष्टा (मर्यादा) सर्वान्तरस्था, चितशक्ती, अतिलालसा, नन्दा, सर्वात्मिका, विद्या, ज्योतिरुपा, अमृता, अक्षरा, ॥६५॥
शान्ती, प्रतिष्ठा, सर्वांची निवृत्ती, अमृतप्रदा, व्योममूर्ती, व्योमलया, धारा, अच्युता, अभरा, ॥६६॥
अनादिनिधना, अमोघा , कारणात्मा, कुलाकुला, प्रथमजा, अमृताची नाभी, आत्मसंश्रया, ॥६७॥
प्राणेश्वरप्रिया, माता, महामहिषवासिनी, प्राणेश्वरी, प्राणरुपा, प्रधान्पुरुषेश्वरी, ॥६८॥
महामाया, सुदुष्पूरा, मूलप्रकृती, ईश्वरी, सर्वशक्तीकलाकारा, ज्योत्स्ना, द्यौ, महिमास्पदा, ॥६९॥
सर्वकार्यनियंत्री, सर्वभूता, ईश्वरेश्वरी, संसारयोनी, सकला, सर्वशक्तिसमुद्भवा, ॥७०॥
संसारपोता, दुर्वारा, दुर्निरीक्ष्या, दुरासदा, प्राणशक्ती, प्राणविद्या, योगिनी, परमा, कला, ॥७१॥
महाविभूती, दुर्धार्षा, मूलप्रकृतिसंभवा, अनाद्यनन्तविभवा, परमा, आद्या, अपकर्षिणी, ॥७२॥
सर्गस्थित्यन्तकारिणी, सुदुर्वाच्या दुरत्यया, शब्दयोगी, शब्दमयी, नादा, नादाविग्रहा, ॥७३॥
अनादी, अव्यक्तगुणा, महानन्दा, सनातनी, आकाशयोनी, योगस्था, महायोगेश्वरेश्वरी, ॥७४॥
महामाया, सुदुष्पारा, मूलप्रकृती, ईश्वरी, प्रधानपुरुषातीता, प्रधानपुरुषात्मिका, ॥७५॥
पुराणी, चिन्मयी , पुरुषांमध्ये आदिपुरुषस्वरुप ल्यालेली, भूतान्तरस्था, कूटस्था, महापुरुषसंज्ञिता, ॥७६॥
जन्ममृत्युजरातीता, सर्वशक्तिसमन्विता, व्यापिनी, अन्वच्छिन्ना, प्रधानानुप्रवेशिनी, ॥७७॥
क्षेत्रज्ञशक्ती, अव्यक्तलक्षणा, मल वर्जिता, अनादिमाया, असम्भिबा, त्रितत्वा, प्रकृतिग्रहा, ॥७८॥
महामाया, असमुत्पन्ना, तामसी, पौरुषी, ध्रुवा, व्यक्ताव्यक्तात्मिका, कृष्णा, रक्ता, शुक्ला, प्रसूतिका, ॥७९॥
अकार्या, कार्यजननी, सदाप्रसवधर्मिणी, सर्गप्रलयनिर्मुक्त, सृष्टिस्थित्यन्तधर्मिणी, ॥८०॥
ब्रह्मगर्भा, चतुर्विंशा, पद्मनाभा, अच्युतात्मिका, वैद्युती, शाश्वती,योनी, जगन्माता, ईश्वरप्रिया, ॥८१॥
सर्वाधारा, महारुपा, सर्वैश्वर्यसमन्विता विश्वरुपा, महागर्भा, विश्वेशेच्छानुवर्तिनी, ॥८२॥
महीयसी, ब्रह्मयोनी, महालक्ष्मीसमुद्भवा, महाविमानमध्यस्था, महानिद्रात्महेतुका, ॥८३॥
सर्वसाधारणी, सूक्ष्मा, अविद्या, पारमार्थिका अनन्तरुपा, अनन्तस्था, देवी, पुरुषमोहिनी, ॥८४॥
अनेककारसंस्थाना, कालत्रयविवर्जिता, ब्रह्मजन्मा, हरीमूर्ती, ब्रह्माविष्णु-शिवात्मिका, ॥८५॥
ब्रह्मेशविष्णुजननी, ब्रह्माख्या, ब्रह्मसंश्रया, व्यक्ता, प्रथमजा, ब्राह्मी, महती, ब्रह्मरुपिणी, ॥८६॥
वैराग्यैश्वर्य- धर्मात्मा, ब्रह्ममूर्ती, हृदिस्थिता, अपांयोनी, स्वयंभूती, मानसी, तत्त्वसंभवा, ॥८७॥
ईश्वराणी, शर्वाणी, शंकराअर्धशरीरिणी, भवानी, रुद्राणी, महालक्ष्मी, अंबिका, ॥८८॥
महेश्वरसमुत्पन्ना, भुक्तिमुक्तिफलप्रदा, सर्वेश्वरी, सर्ववन्द्या, नित्यमुदितमानसा, ॥८९॥
ब्रह्मेंद्र उपेन्द्रनमिता, शंकरेच्छानुवर्तिनी, ईश्वरार्धासनगता, महेश्वरपतिव्रता, ॥९०॥
सकृतविभाता, सवीर्तसमुद्रपरिशोषिणी, पार्वती, हिमवत्पुत्री, परमानन्ददायिनी, ॥९१॥
गुणाढया योगजा, योग्या, ज्ञानमूर्ती, विकाशिनी, सावित्री, कमला, लक्ष्मी, श्री, अनन्तोरसिस्थिता (विष्णूच्या हृदयात राहणारी ), ॥९२॥
सरोजनिलया, गंगा, यो निद्रा, सुरार्दिनी, सरस्वती, सर्वविद्या, जगज्ज्येष्ठा, सुमंगला, ॥९३॥
वाग्देवी, वरदा, वाच्या, कीर्ती, सर्वार्थसाधिका, योगीश्वरी, ब्रह्मविद्या, महाविद्या, सुशोभना, ॥९४॥
गुह्यविद्या, आत्मविद्या, धर्मविद्या, आत्मभावित, स्वाहा, विश्वभरा, सिध्दी, स्वधा, मेधा, धृती, श्रुती ॥९५॥
नीती, सुनीती, सुकृती, माधवी, नरवाहिनी, पूज्या, विभावती, सौम्या, भोगिनी, भोगशायिनी, ॥९६॥
शोभा, शंकरी, लोला, मालिनी, परमेष्ठिनी, त्रैलोक्यसुंदरी, नम्या, सुन्दरी, कामचारिणी, ॥९७॥
महानुभावा, सत्त्वस्था, महामहिषमर्दिनी, पद्मनाभा, पापहरा, विचित्रमुकुटाड्गदा, ॥९८॥
कान्ता, चित्रांबरधरा, दिव्याभरणभूषिता, हंसाख्या, व्योमनिलया, जगतसृष्टिविवर्धिनी, ॥९९॥
नियंत्री, यंत्रमध्यस्था, नन्दिनी, भद्रकालिका, आदित्यवर्णा, कौबेरी, मयूरवरवाहना, ॥१००॥
वृषासनगता, गौरी, महाकाली, सुरर्चिता, अदिती, नियता, रौद्रा, पद्मगर्भा, विवाहना, ॥१०१॥
विरुपाक्षी, लेलिहानी, महासुरविनाशिनी, महाफला, अनवद्याडी, कामरुपा, विभावरी, ॥१०२॥
विचित्ररत्र्नमुकुटा, प्रणतार्तिप्रभंजनी, कौशिकी, कर्षणी, रात्री, त्रिदशार्तिविनाशिनी, ॥१०३॥
बहुरुपा, स्वरुपा, विरुपा, रुपवर्जिता, भक्तार्तिशमनी, भव्या, भवतापविनाशिनी, ॥१०४॥
निर्गुणा, नित्यविभवा, नि:सारा, निरपत्रपा, तपस्विनी, सामगीती, भवांकनिलयालया, ॥१०५॥
दीक्षा, विद्याधरी, दीप्ता, महेन्द्रविनिपातिनी, सर्वातिशायिनी, विश्वा, सर्वसिध्दिप्रदायिनी, ॥१०६॥
सर्वेश्वरप्रियाभार्या, समुद्रान्तरवासिनी, अकलंका, निराधारा, नित्यसिध्दा, निरामया, ॥१०७॥
कामधेनू, बृहद्गर्भा, धीमती, मोहनाशिनी, नि:संकल्पा, निरातंका, विनया, विनयप्रिया, ॥१०८॥
ज्वालामाला, सहस्राढया, देवदेवी, मनोमय़ी, महाभगवती, भर्गा, वासुदेवसमुद्भवा, ॥१०९॥
महेन्द्रौपेन्द्रभगिनी, भक्तिगम्या, परावरा, ज्ञानज्ञेया, जरातीता, वेदान्तविषया, गती, ॥११०॥
दक्षिणा, दहती, दीर्घा, सर्वभूतनमस्कृता, योगमाया, विभागज्ञा, महामोहा, गरीयसी, ॥१११॥
संध्या, ब्रह्मविद्याश्रया-सर्वसमुद्भूती, बीजांकुरसमुद्भूती, महाशक्ती, महामती, ॥११२॥
क्षान्ती, प्रज्ञा, चिती, सतचित महाभोगीन्द्रशायिनी, विकृती, शांकरी, शास्ती, गणागंधर्वसेविता, ॥११३॥
वैश्वानरी, महाशाला, महासेना, गुहप्रिया, महारात्री, शिवानन्दा, शची, दु:स्वप्नाशिनी, ॥११४॥
ईज्या, पूज्या, जगद्धात्री, दुर्विनेया, सुरुपिणी, तपस्विनी, समाधिस्था, त्रिनेत्रा, दिविसंस्थिता, ॥११५॥
गुहाम्बिका, गुणोत्पत्ती, महापीठा, मरुत्सुता, हव्यवाहा, अन्तरागादी, हव्यवाहसमुद्भवा, ॥११६॥
जगद्योनी, जगन्माता, ज अन्ममृत्युजरातिगा, बुध्दी, महाबुध्दिमती, पुरुषान्तरवासिनी, ॥११७॥
तपस्विनी, समाधिस्था, त्रिनेत्रा, दिविसंस्थिता, सर्वेद्रियमनोमाता, सर्वभूतहृदिस्थिता, ॥११८॥
संसारतारिणी, विद्या, ब्रह्मवादिमनोलया, ब्रह्माणी, बृहती, प्राज्ञी, ब्रह्मभूता, भवारणी, ॥११९॥
हिरण्मयी, महारात्री, संसारपरिवर्त्तिका, सुमालिनी, सुरुपा, भाविनी, हारिणी, प्रभा, ॥१२०॥
उन्मीलनी, सर्वसहा, सर्वप्रत्ययसाक्षिणी, सुसौम्या, चन्द्रवदना, ताण्डवासक्तमानसा, ॥१२१॥
सत्त्वशुध्दिकरी, शुध्दी, मलत्रयविनाशिनी, जगत् प्रिया,जगन्मूर्ती, त्रिमूर्ती, अमृताश्रया, ॥१२२॥
निराश्रया, निराहारा, निरंकुशपदोद्भवा, चंद्र्हस्ता, विचित्रांगी, स्रग्विणी, पद्मधारिणी, ॥१२३॥
परवरविधानज्ञा, महापुरुषपूर्वजा, विश्वेश्वरप्रिया, विद्युत्, विद्युत् जिव्हाअ, जितश्रमा, ॥१२४॥
विद्यामयी, सहस्राक्षी, सहस्रवदनात्मजा, सहस्ररश्मी, सत्त्वस्था, महेश्वरपदाश्रया, ॥१२५॥
क्षालिनी, मृण्मयी, व्याप्ता, तैजसी पद्मबोधिका, महामाया, आश्रया, मान्या, महादेवमनोरमा, ॥१२६॥
व्योमलक्ष्मी, सिंहस्था, चेकिताना, अमितप्रभा, वीरेश्वरी, विमानस्थाक, विशोका, शोकनाशिनी, ॥१२७॥
अनाहता, कुंडलिनी, नलिनी, पद्मभासिनी, सदानन्दा, सदाकीर्ती, सर्वभूताश्रयस्थिता. ॥१२८॥
वाग्देवता, ब्रह्मकला, कलातीता, कलारणी, ब्रह्मश्री, ब्रह्महॄदया, ब्रह्मविष्णुशिवप्रिया. ॥१२९॥
व्योमशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, परागती, क्षोभिका, बन्धिका, भेद्या, भेदाभेदविवर्जिता, ॥१३०॥
अभिन्ना, भिन्नसंस्थाना, वशिनी, वंशहारिणी, गुह्यशक्ती, गुणातीता, सर्वदा, सर्वतोमुखी, ॥१३१॥
भगिनी, भगवत्पत्नी, सकला, कालहारिणी, सर्वविद्, सर्वतोभद्रा, गुह्यातीता, गुहावली, ॥१३२॥
प्रक्रिया, योगमाता, गंगा, विश्वेश्वरा, ईश्वरी, कलिला, कपिला, कान्ता, कमलाभा, कलान्तरा, ॥१३३॥
पुण्या, पुष्करिणी, भोक्ती, पुरन्दरपुरस्सरा, पोषिणी, परमा, ऐश्वर्यभूतिदा, भूतिभूषणा, ॥१३४॥
पंचब्रह्मसमुत्पत्ती, परमार्था, अर्थविग्रहा, धर्मोदया, भानुमती, योगिज्ञेया, मनोजवा, ॥१३५॥
मनोरमा, मनोरस्का, तापसी, वेदरुपिणी, वेदशक्ती, वेदमाता, वेदविद्याप्रकाशिनी, ॥१३६॥
योगेश्वरेश्वरी, माता, महाशक्ती, मनोमयी, विश्वावस्था, वियतमूर्ती, विद्युन्माला, विहायसी, ॥१३७॥
किन्नरी, सुरभी, विद्या, नन्दिनी, नन्दिवल्लभा, भारती, परमानन्दा, परापरविभेदिका, ॥१३८॥
सर्वप्रहरणोपेता, काम्या, कामेश्वरेश्वरी, अचिन्त्या, अनन्तविभवा, भूलेखा, कनकप्रभा , ॥१३९॥
कूष्माण्डी, धनरत्नाढया, सुगंधा, गंधदायिनी, त्रिविक्रमपदोद्भूता, धनुष्पाणी,शिवोदया, ॥१४०॥
सुदुर्लभा, धनाध्यक्षा, धन्या, पिंगललोचना, शान्ती, प्रभावती, दीप्ती, पंकजायतलोचना, ॥१४१॥
आद्या, भू, कमलोद्भूता, गाईंची माता, रणप्रिया, सत्क्रिया, गिरिशा, शुध्दी, नित्यपुष्टी, निरंतरा, ॥१४२॥
दुर्गा, कात्यायनी, चण्डी, चर्चिताड्गा, सुविग्रहा, हिरण्यवर्णा, जगती, जगद्यन्त्रप्रवर्तिका, ॥१४३॥
मन्दराद्रिनिवासा, गरहा, स्वर्णमालिनी, रत्नमाला, रत्नगर्भा, पुष्टी, विश्वप्रमाथिनी, ॥१४४॥
पद्मनाभा, पद्मनिभा, नित्यरुष्टा, अमृतोद्भवा, धुन्वती, दुष्प्रकम्पा, सूर्यमाता, दृषव्दती, ॥१४५॥
महेन्द्रभगिनी, सौम्या, वरेण्या, वरदायिका, कल्यणी, कमलावासा, पञ्चचूडा, वरप्रदा, ॥१४६॥
वाच्या, अमरेश्वरी, विद्या, दुर्जया, दुरतिक्रमा, कालरात्री, महावेगा, वीरभद्रप्रिया, हिता, ॥१४७॥
भद्राकाली, जगन्माता, भक्त-भद्रदायिनी, कराला, पिडलाकारा, कामभेदा, महास्वना, ॥१४८॥
यशस्विनी, यशोदा, षडध्वप्रवर्तिका, शडिनी, पद्मिनी, सांख्या, सांख्यायोगप्रवर्तिका, ॥१४९॥
चैत्रा, संव्त्स्दरारुढा, जगत्संपूरणी, ध्वजा, शुम्भारी, खेचरी, कम्बुग्रीवा, कलिप्रिया, ॥१५०॥
खगध्वजाज, खगारुढा, वाराही, पूगमालिनी, ऐश्वर्यपद्मनिलया, विरक्ता, गरुडासना, ॥१५१॥
जयन्ती, हृद्गुहागम्या, गह्वरेष्ठा, गणाग्रणी, संकल्पसिध्दा, सामस्था, सर्वविज्ञानदायिनी, ॥१५२॥
कली, कल्कविहन्त्री, गुह्या, उपनिषदुत्तमा, निष्ठा दृष्टी, स्मृती, व्याप्ती, पुष्टी, तुष्टी, क्रियावती, ॥१५३॥
विश्वा, अमरेश्वरा, ईशाना, भुक्ती, मुक्ती, शिवामृता, लोहिता, सर्पमाला, भीषणी, वनमालिनीइ, ॥१५४॥
अनन्तशयना, अनन्ता, नरनारायणोद्भवा, नृसिंही, दैत्यमथनी, शखचक्रगदाधरा, ॥१५५॥
सकर्षणी, समुत्पत्ती, अंबिका, पादसंश्रया, महाज्वाला, महाभूती, सुमूर्ती, सर्वकामधुक्, ॥१५६॥
शुभ्रा, सुस्तना, सौरी, धर्मकामार्थमोक्षदा, भ्रूमध्यनिलया, पूर्वा, पुराणपुरुषारणी, ॥१५७॥
महाविभूतिदा, मध्या, सरोजनयना, समा, अष्टादशभुजा, अनाद्या, नीलोत्पलदलप्रभा, ॥१५८॥
सर्वशक्त्यासनारुढा, धर्माधर्मविवर्जिता, वैराग्यज्ञाननिरता, निरालोका, निरिन्द्रिया, ॥१५९॥
विचित्रगहनाधारा, शाश्वतस्थानवासिनी, स्थानेश्वरी, निरानन्दा, त्रिशूलवरधारिणी, ॥१६०॥
अशेषदेवता, मूर्तिदेवता, वरदेवता, गणाम्बिका, गिरिपुत्री, निशुम्भविनिपातिनी, ॥१६१॥
अवर्णा, वर्णरहिता, त्रिवर्णा, जीवसम्भवा, अनन्तवर्णा, अनन्यस्था, शंकरी, शान्तमानसा, ॥१६२॥
अगोत्रा, गोमती, गोप्त्री, गुह्यरुपा, गुणोत्तरा, गौ-गी-गव्यप्रिया, गौणी, गणेश्वरनमस्कृता, ॥१६३॥
सत्यभामा, सत्यसन्धा, त्रिसन्ध्या, सन्धिवर्जिता, सर्ववादाश्रया, संख्या, सांख्ययोगसमुद्भवा, ॥१६४॥
असंख्येया, अप्रमेयाख्या, शून्या, शुध्दकुलोद्भवा, बिन्दुनादसमुत्पत्ती, शंभुवामा, शशिप्रभा, ॥१६५॥
पिशडा०, भेदरहिता, मनोज्ञा, मधुसूदनी, महाश्री, श्रीसमुत्पत्ती, तमपारप्रतिष्ठिता, ॥१६६॥
त्रितत्त्वमाता, त्रिविधा, सुसूक्ष्मपदसंश्रया, शान्ता, भीता, मलातीता, निर्विकारा, शिवाश्रया, ॥१६७॥
शिवाख्या, चित्तनिलया, शिवज्ञानस्वरुपिणी, दैत्यदानवनिर्माथी, काश्यपी, कालकर्णिका, ॥१६८॥
शास्त्रयोनी, क्रियामूर्ती, चतुर्वर्गप्रदर्शिका, नारायणी, नरोत्पत्ती, कौमुदी, लिडधारिणी, ॥१६९॥
कामुकी, कलिताभावा, परावरविभूतिदा, पराडजातमहिमा, वडवा, वामलोचना, ॥१७०॥
सुभद्रा, देवकी, सीता, वेदवेदाडपारगा, मनस्विनी, मन्युमाता, महामन्युसमुद्भवा, ॥१७१॥
अमन्यु, अमृतास्वादा, पुरुहूता, पुरुष्टुता, अशोच्या, भिन्नविषया, हिरण्यरजतप्रिया, ॥१७२॥
हिरण्यरजनी, हैमा, हेमाभरणभूषिता, विभ्राजमाना, दुर्ज्ञेया, ज्योतिष्टोमफलप्रदा, ॥१७३॥
महानिद्रासमुद्भुती, अनिद्रा सत्यदेवता, दीर्घा, ककुद्मिनी, हृद्या, शान्तिदा, शान्तिवर्धिनी, ॥१७४॥
लक्ष्म्यादिशक्तिजननी, शक्तिचक्रप्रवर्तिका, त्रिशक्तिजननी, जन्या, षडूर्मिपरिवर्जिता, ॥१७५॥
सुधौता, कर्मकरणी, युगान्तदहनात्मिका, संकर्षणी, जगध्दात्री, कामयोनी, किरीटिनी, ॥१७६॥
ऐन्द्री, त्रैलोक्यनमिता, वैष्णवी, परमेश्वरी, प्रद्युम्नदयिता, दात्री, युग्मदृष्टी, त्रिलोचना, ॥१७७॥
मदोत्कटा, हंसगती, प्रचण्डा, चण्डविक्रमा, वृषावेशा, वियन्माता, विन्ध्यपर्वतवासिनी, ॥१७८॥
हिमवन्मेरुनिलया, कैलासगिरिवासिनी, चाणूरहन्तृतनया, (कृष्ण) नीतिज्ञा, कामरुपिणी, ॥१७९॥
वेदविद्याव्रतस्नाता, ब्रह्मशैलनिवासिनी, वीरभद्रप्रजा, वीरा, महाकामसमुद्भवा, ॥१८०॥
विद्याधरप्रिया, सिध्दा, विद्याधरनिराकृती, आप्यायनी, हरन्ती, पावनी, पोषणी, कला, ॥१८१॥
मातृका, मन्मथोद्भूता, वारिजा, वाहनप्रिया, करीषिणी, सुधावाणी, वीणावादनतत्परा, ॥१८२॥
सेविता, सेविका, सेव्या, सिनीवाली, गरुत्मती, अरुंधती, हिरण्याक्षी, मृगांका, मानदायिनी, ॥१८३॥
वसुप्रदा, वसुमती, वसोर्धारा, वसुंधरा, धाराधारा, वरारोहा, परावाससहस्रदा, ॥१८४॥
श्रीफला, श्रीमती, श्रीशा, श्रीनिवासा, शिवप्रिया, श्रीधरा, श्रीकरी, कल्पा, श्रीधरार्धशरीरिणी, ॥१८५॥
अनन्तदृष्टी, अक्षुद्रा, धात्रीशा, धनदप्रिया, दैत्यसंघानां निहन्त्री, (देत्यगणांना ठार करणारी ) सिंहिका, सिंहवाहना, ॥१८६॥
सुवर्चला , सुश्रोणी, सुकीर्ती, छिन्नसंशया, रसज्ञा, रसदा, रसदा, रामा, लेलिहाना, अमृतस्रवा, ॥१८७॥
नित्योदिता, स्वयंज्योती, उत्सुका, मृतजीवना, वज्रदंडा, वज्रजिहवा,वैदेही, वज्रविग्रहा, ॥१८८॥
मांगल्या, मंगला, माला, निर्मला, मलहारिणी, गांधर्वी, करुका, चांद्री, कंबला, अश्वतरप्रिया, ॥१८९॥
सौदामिनी, जनानन्दाअ, भ्रुकुटिकुटिलालना, कर्णिकारकरा, कक्षा, कंसप्राणापहारिणी, ॥१९०॥
युगंधरा, युगावर्ता, त्रिसंध्या, हर्षवर्धनी, प्रत्यक्षदेवता, दिव्या, दिव्यगंधा, दिव:परा, ॥१९१॥
शक्रासनगता, शाक्री, साध्या, चारुशरासना, इष्टा, विशिष्टा, शिष्टेष्टा, शिष्टाशिष्टप्रपूजिता, ॥१९२॥
शतरुपा, शतावर्ता, विनता, सुरभी, सुरा, सुरेन्द्रमाता, सुद्युम्ना, सुषुम्ना, सूर्यसंस्थिता, ॥१९३॥
समीक्षा, सत्प्रतिष्ठा, निवृत्ती, ज्ञानपारगा, धर्मशास्त्रार्थकुशला, धर्मज्ञा, धर्मवाहना, ॥१९४॥
धर्माधर्मविनिर्मात्री, धार्मिकाणांशिवप्रदा, धर्मशक्ती, धर्ममयी, विधर्मा, विश्वधर्मिणी, ॥१९५॥
धर्मांतरा, धर्ममयी, धर्मपूर्वा, धनावहा, धर्मोपदेष्ट्री, धर्मात्मा, धर्मगम्या, धराधरा, ॥१९६॥
कापाली, शकला, अमूर्ती, कलाकलितविग्रहा, सर्वशक्तिविनिर्मुक्ता, सर्वशक्त्याश्रया आश्रया, ॥१९७॥
सर्वा, सर्वेश्वरी, सूक्ष्मा, सूक्ष्मज्ञानस्वरुपिणी, प्रधानपुरुषा, ईशेषा, महादेवैकसाक्षिणी, ॥१९८॥
सदाशिवा, वियन्मूर्ती, वेदमूर्ती, अमूर्तिका अशा सहस्रनावांनी हिमालयाने तिची प्रशंसा (स्तुती) केली. ॥१९९॥
(तिच्या या रुपाने ) भ्यालेला हिमालय हात जोडून म्हणाला, ‘देवी तुझे हे रुप फार भयानक आहे,’ ॥२००॥
(या रुपाने ) मी फार भ्यालो आहे तरी तुझे दुसरे (सौम्य) रुप दाखव. त्याने असे म्हटल्यावर देवी पार्वतीने ॥२०१॥
आपले (घोर रुप) लुप्त करुन दुसरे रुप दाखविले. (ते रुप ) नीलकमलाच्या पानाप्रमाणे (मृदु ) आणि तसेच सुगंधित ॥२०२॥
दोन डोळे , दोन हात, सौम्य, काळे केस असलेले, लाल कमळाप्रमाणे हात व पाय असलेले, ॥२०३॥
सुंदर, खेळकर, कपाळावरील तिलकाने सुशोभित, अलंकारयुक्त, सर्व अवयव सुंदर, अत्यन्त मृदू, ॥२०४॥
वक्षावर सुवर्णाचा मोठा हार धारण केला आहे, किंचित् स्मितयुक्त, सुंदर ओठ असलेले, नूपुरांचा ध्वनी करणारे, ॥२०५॥
प्रसन्नमुख, दिव्य, अनन्तमहिमा असलेले ते रुप हिमालयाने पाहिले, ॥२०६॥
हिमवान् भीती दूर करुन हर्षितमनाने तो परमेश्वरीस म्हणाला, ‘आज माझा जन्म सफल झाला, माझे तप सफल झाले.’ ॥२०७॥
कारण तू अव्यक्त असूनही मला दृष्टिगोचर झालीस, तू सर्व जग निर्मिलेस, प्रधान इ. तुझ्यात स्थित आहेत. ॥२०८॥
तुझ्यातच हे लीन होतात, तूच परम गती आहेस, तुला कोणी प्रकृतीपलीकडची प्रकृती मानतात, ॥२०९॥
दुसरे सत्यार्थ जाणणारे तुला शिवाच्या आश्रयाने राहणारी शिवा म्हणतात. तुझ्यातच प्रधान, पुरुष, महान् ब्रह्मा आणि ईश्वर... ॥२१०॥
अविद्या, नियती, माया, शतश: कला तुझ्यात आहेस, हे योगिनी महादेव तुझ्या आहेत. तूच परमशक्ती, अनन्त परमेष्ठिनी आहेस. ॥२११॥
सर्वभेदांपासून मुक्त, सर्वभेदांच्या आश्रयांचा आश्रय आहेस, हे योगिनी महादेव तुझ्या अधिष्ठानाने ॥२१२॥
प्रधानादी सर्व जगत् निर्माण करतो आणि नष्ट करतो. तुझ्या सहवासांत तो देव आत्मानंदाचा भोग घेतो. ॥२१३॥
तू परमानंद आहेस, परमानंद देणारी आहेस, तू अक्षर, पराकाश, महान् ज्योती आणि निरंजन आहेस. ॥२१४॥
शिव, सर्वांच्याठायी असलेले सूक्ष्म असे तुझे रुप असून तू सनातन परब्रह्म आहेस, सर्व देवांमध्ये इंद्र आहेस, ब्रह्म जाणणार्यांत तू ब्रह्म आहेस. ॥२१५॥
हे देवी, बलवानात तू वायू, तर योग्यांमध्ये कुमार (स्कंद) आहेस, ऋषींमध्ये वसिष्ठ, तर वेदज्ञांमध्ये व्यास आहेस. ॥२१६॥
सांख्यांत कपिल, रुद्रांमध्ये शंकर, आदित्यांमध्ये उपेन्द्र, वसूंमध्ये पावक आहेस. ॥२१७॥
वेदांत तू सामवेद आणि छंदात गायत्री आहेस, विद्यांमध्ये अध्यात्मविद्या, गतींमध्ये श्रेष्ठ गती आहेस. ॥२१८॥
सर्वशक्तींमध्ये माया, मोजणार्यामध्ये काल, सर्व रहस्यांमध्ये ओंकार आणि सर्व वर्णांत उत्तम ब्राह्मण आहेस. ॥२१९॥
आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम, ईश्वरांमध्ये महेश्वर, पुरुषांत तू एकमात्र पुरुष असून सर्व प्राण्यांच्या हृदयात आहेस. ॥२२०॥
सर्व उपनिषदांमध्ये तू गुह्योपनिषद् म्हटली जातेस, कल्पांमध्ये ईशान आणि युगांमध्ये कृत-युग म्हटली जातेस. ॥२२१॥
(तू) सर्व मार्गांमध्ये आदित्य, वाणींमध्ये सरस्वती, सुंदरुपांमध्ये लक्ष्मी, मायावींच्यामध्ये विष्णू आहेस, ॥२२२॥
सतींमध्ये अरुन्धती, पक्ष्यांमध्ये गरुड, सूक्तामध्ये पुरुषसूक्त, सामांमध्ये ज्येष्ठ साम आहेस. ॥२२३॥
जप करण्यायोग्य अशांत तू सावित्री, यजुंमध्ये शतरुद्रीय, परवतांत महामेरु, नागांमध्ये अनन्त आहेस ॥२२४॥
सर्वांमध्ये तू परमब्रह्म आहेस, सर्व त्वन्मय आहे. ॥२२५॥
तुझे रुप सर्व विकारापासून मुक्त, अगोचर, निर्मल आणि एक आहे. आदि, मध्य अन्त नसलेले, सत्य, अंधकाराच्या पलीकडचे असे आहे. त्याला मी नमस्कार करतो. ॥२२६॥
वेदान्ताचा अर्थ ज्यांनी निश्चित केला आहे,जाणला आहे, ते जिला ब्रह्मांडाचे उत्पत्तिस्थान मानतात, जी आनंदमात्र, ओंकार संज्ञा असलेली आहे, तिला मी शरण जातो. ॥२२७॥
सर्वभूतमात्रांत समाविष्ट असलेल्या, प्रधान पुरुषाच्या संयोग वियोगाचे कारण अशा, तेजोमय, जन्म आणि नाश नसलेल्या, प्राण हे नाव असलेल्या या रुपाला मी नमितो. ॥२२८॥
आदी आणि अन्त नसलेल्या, जगताचे आत्मरुप अशा, अनेक ठिकाणी वास करणार्या प्रकृतीच्या पलीकडील, कूटस्थ आणि अव्यक्त शरीराच्या, पुरुष संज्ञा असलेल्या रुपास मी नमस्कार करतो. ॥२२९॥
सर्वाना आश्रय असलेले जगत् निर्माण करणारे, सर्वगामी जन्मनाशहीन, सूक्ष्म, विचित्र त्रिगुणात्मक, प्रधान, भेद आणि रुप नसलेले असे जे तुझे रुप , त्याला मी नमितो. ॥२३०॥
आद्य, महान् पुरुष नाम असलेले, प्रकृतिस्वरुप, त्रिगुणांचे बीज, ऐश्वर्य, विज्ञान आणि विरोधी धर्मांनी युक्त तुझे रुप असून त्याला माझा नमस्कार आहे. ॥२३१॥
चौदा भुवने असलेल्या, पाण्यात स्थित, अनेक भेद असलेल्या, पुरुषाला एक मात्र नाथ मानणार्या ,ब्रह्मांड संज्ञा असलेल्या तुझ्या रुपाला मी वंदन करतो. ॥२३२॥
संपूर्ण वेदात्मक, एकमेव, आद्य, तेजाने भेद नष्ट करणारे, भूतवर्तमानभविष्याचा हेतु असणारे, सूर्यमंडलात असलेले परमेष्ठी नाम असलेले तुझे रुप मी वन्दितो. ॥२३३॥
सहस्रशीर्ष, अनन्तशक्ती, सहस्रबाहू, पुराणपुरुष, जलाशयात पहुडलेले असे तुझे जे नारायण रुप त्याला मी नमस्कार करतो. ॥२३४॥
भयानक दाढा असलेले, देवांना वंद्य, आहे. ॥२३५॥
सहस्रफणा असलेले, नागश्रेष्ठांनी पूजिले जाणारे, विष्णूला वेढणारे असे जे तुझे शेष स्वरुप आहे त्याला मी वंदन करतो. ॥२३६॥
अखंड ऐश्वर्ययुक्त, दोन डोळ्यांचे, ब्रह्मामृतानंदाच्या रसाला जाणणारे, युगान्तानंतरही शेष, स्वर्गात नर्तन करणारे तुझे रुद्र नामक जे रुप आहे त्याला मी नमस्कार करतो. ॥२३७॥
शोकरहित, रुपहीन, देवासुर ज्या चरणकमलाचे वंदन करतात, ते तुझे अत्यंत विमल स्वच्छ भासणारे रुप, हे भवानी मला वंद्य आहे. ॥२३८॥
महादेवी तुला नमन असो, परमेश्वरी तुला नमस्कार असो, हे भगवती, ईशानी, शिवा, तुला पुन: पुन्हा नमन असो. ॥२३९॥
तू मला व्यापले आहेस, तूच माझा आधार, माझी गती आहेस, मी तुलाच शरण आहे, परमेश्वरी, मजवर कृपा कर. ॥२४०॥
जगन्माता अशी तू माझ्या तपाने माझी कन्या झालीस म्हणून देव वा दानव लोकांतही माझ्यासारखा कोण आहे ? ॥२४१॥
तू जगन्माता असून मला व मेनेला पिता माता कल्पून तू कन्यारुपाने आलीस हे माझे श्रेष्ठ पुण्यच आहे. ॥२४२॥
मेनेसह माझे रक्षण कर. मी तुझ्या चरणांना वंदन करतो, शिवाला शरण जातो. ॥२४३॥
महादेवीची प्राप्ती हे माझे अहोभाग्य. हे महादेवी, मी काय करावे ते सांग. ॥२४४॥
असे बोलून, हात जोडून, गिरिजेकडे पाहात, हिमालय बाजूला उभा राहिला. ॥२४५॥
हिमालयाचेव वचन ऐकून जगतनिर्माण करणारी पार्वती शिवाचे स्मरण करुन स्मितपूर्वक म्हणाली, ॥२४६॥
हा गुहय, ईश्वरालाच गोचर, मूळ उपदेश ऐक, हे गिरिश्रेष्ठ, त्याची ब्रह्मवादी लोक देखील सेवा करतात. ॥२४७॥
माझे परमऐश्वर्ययुक्त अद्भुत रुप तू प्रत्यक्ष पाहिले आहेस, हे रुप सर्व शक्तीयुक्त, अनंत आणि प्रेरक आहे. ॥२४८॥
शान्त आणि स्थिरमनाने, मान अहंकार सोडून, तत्परायण होऊन, त्यावर निष्ठा ठेवून, त्या रुपालाच शरण जा. ॥२४९॥
माझ्या ठिकाणी भाव ठेऊन, भक्तिपूर्वक, यज्ञा तपश्चर्या दान आद्सिह त्या रुपाची पूजा कर. ॥२५०॥
त्यालाच मनाने पहा, त्याचे ध्यान कर, त्याचे पूजन कर; माझ्या उपदेशाने मी तुझे संसारचक्र नष्ट करीन. ॥२५१॥
अत्यंत भक्तीने ईश्वराच्या ठायी मन जडलेल्या तुला त्वरित भवसागराच्या पार नेईन. ॥२५२॥
ज्ञान, कर्मयोग, भक्ती आणि ज्ञान या योगे मी तुला प्राप्त होईन, अन्य कुठच्याही अगणित कर्मांनी नाही. ॥२५३॥
श्रुतिस्मृति यात कथिलेले वर्णाश्रमयुक्त योग्य कर्म, अध्यात्मज्ञानसहित सतत कर म्हणजे मुक्त होशील. ॥२५४॥
धर्मापासून भक्ती, भक्तीमुळे परमतत्त्व मिळते. हा यज्ञादी धर्म श्रुतीस्मृतीमुळे उत्पन्न होतो असे मानतात. ॥२५५॥
वेदांपासून धर्म झाला आहे, अन्य कुठूनही नाही म्हणून धर्माची इच्छा करणारे आणि मुमुक्षू यांनी माझे रुप असलेल्या वेदांचा आश्रय घ्यावा. ॥२५६॥
वेदसंज्ञक, सनातन अशी ही माझीच श्रेष्ठ शक्ती सृष्टीच्या आरभी ऋक् , साम, यजुस् या वेदरुपाने प्रवर्तित झाले. ॥२५७॥
त्याच वेदांच्या रक्षणासाठी ब्रह्मदेवाने ब्राह्मणादींना निर्माण केले आणि आपापल्या कर्मांमध्ये नेमले. ॥२५८
धर्म करावा म्हणून ब्रह्मदेवाने माझ्यासह ऊर्ध्वलोक निर्मान केले आणि त्याच्या खाली तमिस्रादि नरक निर्माण केले. ॥२५९॥
धर्म सांगणारे, वेदाशिवाय दुसरे कुठलेही शास्त्र नाही. जो अन्यत्र धर्म पाहतो त्याशी ब्राह्मणांनी बोलू नये. ॥२६०॥
श्रुतिस्मृतीविरुध्द अशा शास्त्रांमध्ये ज्यांना रुची असते त्यांची निष्ठा तामसी समजावी, ॥२६१॥
ती भुरळ पाडणारी शास्त्रे म्हणजे कापाल, भैरव, यामल, वाम आणि जैन ही होत. ॥२६२॥
जे कुशास्त्रांनी लोकांना चकवितात, त्यांना पुढच्या जन्मी मी सृष्ट केलेली शास्त्रे वश करतात. ॥२६३॥
वेदज्ज्ञांनी जे वैदिक कर्म सांगितले आहे ते प्रयत्नपूर्वक करणारे लोक मला आवडतात. ॥२६४॥
माझ्या आज्ञेने स्वयंभू विराट मनूने हा धर्म पूर्वी ऋषींना सांगितला, कारण सर्व वर्णाबद्दल त्याला अनुकंपा होती. ॥२६५॥
मनूव्दारा उत्तम धर्म ऐकून अन्य ऋषींनी आपापली धर्मशास्त्रे निर्माण केली. ॥२६६॥
युगान्त होतांना ते महर्षी लोप पावतील तेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने इतर ऋषी प्रत्येक युगामध्ये स्मृती करतील. ॥२६७॥
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने व्यासादींनी जी अठरा पुराणे सांगितली त्यात धर्म प्रतिष्ठित आहे. ॥२६८॥
त्यांच्या शिष्यांनी अनेक उपपुराणे कथिली आणि धर्मशास्त्र जाणणारा प्रत्येक युगात या सर्वांची पुन: सृष्टी करतो. ॥२६९॥
शिक्षा, कला, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, न्याय या विद्यांचे लेखन या ऋषींनी केले. ॥२७०॥
चार वेदासहित या चौदा विद्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितल्या, त्याशिवाय वेगळा असा धर्म नाही. ॥२७१॥
ब्रह्मदेवापासून प्राप्त या धर्माची स्थापना मनू, व्यास आदि माझ्या आज्ञेने युगान्तापर्यन्त करतात. ॥२७२॥
प्रतिसंचर प्राप्त झाला असता ब्रह्मदेवांसह सर्व कृतकृत्य होऊन परमपदाला प्राप्त होतात. ॥२७३॥
या साठी सर्वप्रकारे प्रयत्न करुन धर्मार्थाच्या प्राप्तीसाठी वेदांचा आश्रय करावा, धर्मासहित ज्ञान आणि परब्रह्म यांना प्रकाशित करावे. ॥२७४॥
जे सर्वसंग त्यागून मला शरण येतात, भक्तिपूर्वक योगाची उपासना करतात. ॥२७५॥
प्राणिमात्रावर दया करतात, शांत, संयमी, मत्सरहीत असतात, अमानी बुध्दिमान, तापसी, व्रताचरणी असतात. ॥२७६॥
जे मन माझ्यात ठेवतात, प्राण मला समर्पित करतात, मी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यात मग्र असतात असे गृहस्थ , संन्यासी, वानप्रस्थ, ब्रह्मचारी ॥२७७॥
असे जे निरंतर माझ्यात स्थित असतात त्यांचे मायातत्व (मायाशरीर), तो अंधकार ज्ञानदीपाने मी त्वरित नष्ट करते. ॥२७८॥
अज्ञानांधकाराचा नाश झालेले ते एकनिष्ठ ज्ञानाने माझ्यात लीन झालेले, अत्यंत आनंद प्राप्त करतात आणि संसाराच्या चक्रातून सुटतात. ॥२७९॥
म्हणून सर्व प्रकारे माझा भक्त हो, माझीच पूजा कर, मनाने मलाच शरण जा (ये) ॥२८०॥
माझ्या या अव्यरुपाचे ध्यान करण्यास जर तू समर्थ नसशील तर माझ्या कालाद्य रुपाला शरण जा. ॥२८१॥
माझे जे रुप तुला मनोगम्य वाटेल त्यावर निष्ठा ठेव आणि त्याचीच पूजा कर. ॥२८२॥
माझे हे रुप निष्कलंक, चिन्मात्र आणि शिवरुप सर्व उपाधीरहित, अनन्त, अमृत आणि श्रेष्ठ आहे. ॥२८३॥
अत्यंत कष्टपूर्वक प्राप्त ज्ञानानेच ते प्राप्त होऊ शकते. ते ज्ञानच मला पाहू शकते आणि असे लोक माझ्यात प्रविष्ट होतात. ॥२८४॥
ज्ञानाने ज्यांचे पाप धुतले गेले आहे असे, आपली बुध्दी, आत्मा, निष्ठा त्या परमपदाचे ठिकाणी ठेवतात आणि पुनर्जन्माच्या फेर्यातून वाचतात. ॥२८५॥
मला शरण आल्याशिवाय हे शुध्द निर्वाणपद प्राप्त होत नाही म्हणून हे राजा मलाच शरण ये. ॥२८६॥
एकरुपाने किंवा अनेकरुपाने किंवा दोन्ही प्रकारे माझी उपासना कर म्हणजे परमपदाला जाशील. ॥२८७॥
स्वभावशुध्द असे ते शिवपद माझा आश्रय घेतल्याविना प्राप्त होत नाही म्हणून तू मला शरण ये. ॥२८८॥
म्हणून अविनाशी, सनातन असे जे रुपऐश्वर्य त्याचीच प्रयत्नपूर्वक आराधना कर म्हणजे तुझे अज्ञानान्धत्व नष्ट होईल. तू मला शरण ये. ॥२८९॥
मनसा, वाचा, कर्मणा सदा शिवाची मनापासून आराधना कर म्हणजे ते पद प्राप्त करशील. ॥२९०॥
माझ्या मायेने मोह पावलेले, त्या अनाद्यनन्त, अजन्मा अशा महेश्वर शिवाला प्राप्त करु शकत नाहीत. ॥२९१॥
सर्व प्राणिमात्राच्या आत्म्याच्या ठिकाणी असलेले, (तत्त्व) सर्वांचा आधार, निष्कलंक, सदान्दरुप, आभासरहित, गुणातीत, अंधकाराच्या पलीकडचे आहे. ॥२९२॥
अव्दैत, स्थिर, कलाहीन, विस्तार नसलेले, आत्म्यास कळणारे, (बाह्य साधनांनी ) मुळीच न कळणारे, त्याच्या पलीकडचे ते तत्त्व आहे. ॥२९३॥
माझ्या सूक्ष्म अशा मायारुपी अंधकाराने वेष्टित जीव भयानक संसारसागरात पुन: पुन्हा जन्म घेतात. ॥२९४॥
हे पर्वतश्रेष्ठा, अनन्य भक्तीने, सम्यगज्ञानाने, जन्मबंधननाशासाठी त्या ब्रह्माचा शोध घ्यावा. ॥२९५॥
गर्व, मत्सर, काम, क्रोध, परिग्रह, अधर्माची ओढ यांचा त्याग करुन आसक्ती सोडून वैराग्य धारण करुन ॥२९६॥
सर्व प्राणिमात्रांत स्वत:ला आणि स्वत:मध्ये सर्व भूतांना पाहून आणि आपणाला आत्म्याने पाहून जो वागतो तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. ॥२९७॥
ब्रह्मांत लीन होऊन, संतुष्ट मनाचा, प्राणिमात्रांना अभय देणारा अनन्य भक्ती प्राप्त करतो. ॥२९८॥
त्या नंतर निष्कल असे ईश्वराचे ब्रह्मतत्व त्याला दिसते. सर्व संसारातून मुक्त होत्साता तो ब्रह्मामध्ये राहातो. ॥२९९॥
शिवच ब्रह्माची प्रतिष्ठा आहे; त्याचा एकमात्र स्थिर आधार महेश्वरच आहे. ते अनन्य, अव्यय, एकच आत्म्याचा आधार आहे. ॥३००॥
ज्ञानयोगाने, कर्मयोगाने किंवा भक्तियोगाने त्या शिवाला शरण जा; ज्यामुळे संसारातून मुक्त होशील (संसारातून मुक्तीसाठी त्याला शरण जा ) ॥३०१॥
हे पर्वतश्रेष्ठा, हा रहस्यमय उपदेश मी तुला दिला आहे, यावर नीट विचार करुन तुला जसे वाटेल तसे कर. ॥३०२॥
शिवाचा निन्दक जो दक्षप्रजापती, त्याची निंदा करुन देवांनी प्रार्थना केली तेव्हां मी परमेश्वरापासून उत्पन्न झाले. ॥३०३॥
तुझ्या उपासनेमुळे, धर्मसंस्थापनेसाठी , मेनेच्या पोटी जन्म घेऊन पिता म्हणून तुझा आधार घेतला. ॥३०४॥
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने आता तू स्वयंवर प्रसंगी मला रुद्राला अर्पण कर. ॥३०५॥
त्याच्याशी (विवाह) संबंध आल्यावर इंद्रादि देव तुला नमस्कार करतील आणि शिवही संतुष्ट होईल.॥३०६॥
म्हणून प्रयत्नपूर्वक पहा की मी शिवाला प्राप्त होईन.पूजनीय, आश्रयदाता असा जो शिव, त्याला शरण जा. ॥३०७॥
पार्वतीने असे म्हटल्यावर हिमालय हात जोडून आणि मस्तक विनम्र करुन तिला म्हणाला, ॥३०८॥
हे देवी, शैवयोग, आत्मयोग यांचे ज्ञान व त्याची साधने मला सांग. ॥३०९॥
तेव्हा देवीने हे परमज्ञान, आत्मयोग आणि त्याची साधने व्यवस्थितपणे त्याला सांगितली. ॥३१०॥
लोकमाता पार्वतीच्या मुखकमलातून निघालेले परमज्ञान ऐकून लोकपूजित पर्वतराज पुन: योगसक्त झाला. ॥३११॥
देवांच्या साक्षीने, ब्रह्मदेवाच्या आज्ञेने, श्रेष्ठ भाग्याने त्याने पार्वतीस शंकराला अर्पण केले. ॥३१२॥
देवीमहात्म्याचे वर्णन करणारा हा अध्याय जो पठण करील तो भक्तीने पवित्र होऊन शिवाच्या जवळ जाईल. ॥३१३॥
सर्वपापापासून मुक्त होऊन,क दिव्ययोगयुक्त, ब्रह्मलोक पार करुन देवीच्या स्थानास जाईल. ॥३१४॥
ब्राह्मणाच्या निकट जो या स्तोत्राचे पठण करील तो ही संतुष्ट होऊन सर्व पापांपासून मुक्त होईल. ॥३१५॥
देवीची जी हजार नावे सांगितली ती देवी सूर्यमंडळाचे ठायी आहे असे जाणून तिचे आवाहन करावे. ॥३१६॥
गंध (चंदन), फुलांनी पूजा करुन, देवीचे जे शैवपद, त्याचे भक्तियोगपूर्वक स्मरण करावे. ॥३१७॥
ब्राह्मणाने मृत्युपर्यंत तिच्या नावाचा जप करावा म्हणजे अन्तकाळी नामस्मरण होऊन तो ब्रह्मपद पावतो. ॥३१८॥
किंवा ब्राह्मणाच्या पवित्र कुळात त्याचा जन्म होईल. पूर्वसंस्काराच्या माहात्म्यामुळे तो ब्रह्मविद्या प्राप्त करील. ॥३१९॥
परमदिव्य अशा त्या शैवयोगास प्राप्त व्हावे, शांत संयमी होऊन त्याशी एक व्हावे (असे वाटत असल्यास ) ॥३२०॥
प्रत्येक नामाचे वेळी तीन आहुती द्याव्या म्हणजे महामारी, वाईटग्रह यांच्या दोषापासून तो मुक्त होईल. ॥३२१॥
किंवा वर्षभर रात्रंदिवस याचा जप करावा. वैभवाची इच्छा असणार्याने अशा प्रकारे पार्वतीची विधानोक्त पूजा करावी. ॥३२२॥
(पार्वतीसह) त्रिनेत्र शिवाची भक्तियुक्त पूजा केल्यास त्याच्या प्रसादाने लक्ष्मी प्राप्त होते. ॥३२३॥
सर्व पातके दूर करण्यासाठी त्रैवर्णिकांनी प्रयत्नपूर्वक देवीच्या सहस्रनामाचा जप करावा. ॥३२४॥
सूत म्हणाले,
हे विप्रांनो ! कथेच्या ओघात देवीचे हे माहात्म्य मी सांगितले. आता भृगु आदि लोकसृष्टीचे बाबत सांगतो ॥३२५॥
आदिमायागीतेचा दुसरा अध्याय समाप्त.
॥आदिमायागीतेचा समाप्त ॥