निर्वाण प्रकरण - ६५६२ ते ६५७०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
प्रयाणकाळीं तुकारामबावांनीं स्त्रीस सांगातें यावें ह्मणून बोलणें केलें ते समयीं संसार सांडून येत नाहीं असें म्हटल्यावरुन उपदेश केला तो.
॥६५६२॥
होसी पुत्रवंती नारायण सुखें । पहासी पुत्रमुख आशिर्वचन ॥१॥
जातां हा शेवट त्वां गोड केला । कळस झाला येथूनियां ॥२॥
तुका ह्मणे आतां झालें समाधान । समाखिलें मन सेवटीचें ॥३॥
॥६५६३॥
स्त्रियेसी हो तुका जातो सांगोनियां । बैसा ह्मणोनियां जातों आह्मी ॥१॥
सडा संमार्जन तुळसीवृंदावन । देवाचें पूजन करित जावें ॥२॥
तुझिये गर्भी आहे नारायण । तो तुजलागोन उद्धरील ॥३॥
ऐसे बोलोनीयां तुका पुढें आले । सद्गदित झालें हृदय तिचें ॥४॥
====
तुकाराम बावा वैकुंठास चालले असें समजून जिजाबाई त्यास सांगातें प्रवासाची सामोग्री व कांहीं पैसा घेऊन जा असें ह्मणाली तेव्हां बोलले.
॥६५६४॥
आम्हा हेंचि भांडवल । ह्मणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥
सुखें तरों भवनदी । संगें वैष्णवांची मांदी ॥२॥
वाखराचें वाण सांडूं । हें जेऊं जेवण ॥३॥
नलगे वारंवार । तुका ह्मणे येरझार ॥४॥
॥६५६५॥
आतां हेंची जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥
हरिनामाची खिचडी काला । प्रेमसाधनें मोहिला ॥२॥
चवीं चवीं घेऊं ग्रास । ब्रह्मरस आवडी ॥३॥
तुका ह्मणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥४॥
====
तेव्हा तुकाराम बावा ह्मणाले कीं आतां वैकुंठास चलावें मग तुकाराम बावा आपले समागमें संत होते त्यांस व बंधु व स्त्रीपुत्र यांस बोलिले कीं मी वैकुंठास जातों तुह्मी सकळ समागमें चला तुह्मांसही नेतों तेव्हां अभंग बोलिले.
॥६५६६॥
अवधियांच्या आलों मुळें । एक वेळे न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥२॥
जोंवरी ते घटका दुरी । आहे उरी तो काळ ॥३॥
मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥४॥
अवघियाचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥५॥
तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करुनियां ॥६॥
॥६५६७॥
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥
तुह्मी आह्मी खेळों मेळीं । गदारोळी आनंद ॥२॥
ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करुनियां ॥३॥
तुका म्हणे हेंचि निट । जवळी वाट वैकुंठ ॥४॥
====
संगातें कोणी येत नाहीं असें पाहून तुकाराम तेथून निघाले.
॥६५६८॥
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐसा मज धीरें राख आतां ॥१॥
संसाराहातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करी नारायणा ॥२॥
वागवितों तुझ्या नामाचें हत्यार । हाचि बडिवार मिरवितों ॥३॥
तुका ह्मणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणा ॥४॥
॥६५६९॥
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥
होय तैसें होय आतां । देहबळी काय चिंता ॥२॥
पीडिले पालवीं । त्यांचा धाक वाहे जीवीं ॥३॥
तुका ह्मणे जिणें । देवा काय हीनपणें ॥४॥
====
मग अभंग गात गात राउळीं परत आले तो अभंग.
॥६५७०॥
झालें समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥
आतां उठावेसें मना । येत नाहीं नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥३॥
तुका म्हणे भाग । गेला निवारला लाग ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2019
TOP