निर्वाण प्रकरण - ६६०१ ते ६६०७
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
तुकारामबावा आपल्या सामर्थ्यानें देहनिरसन करुन तत्वीं लीन झाले असतां देवानें ध्यान करुन हृदयामध्यें चिंतनाचे ठायीं अनुसंधान लावून त्यांस प्रगट केलें.
॥६६०१॥
इच्छेपासी आलों फिरोनी मागुता । स्वामी सेवकता अवडीची ॥१॥
द्यावें लवकरी मागितलें दान । मुळीचें जतन करुनि असें ॥२॥
उपायें हें करीं एकाचि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥३॥
तुका ह्मणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥४॥
॥६६०२॥
जळो माझी तैसी बुद्धि । मज घाली तुजमधीं ॥
आवडी दे विधि । निषेधींच चांगली ॥१॥
तूं स्वामी मी सेवक । उंच नीच पद एक ॥
ऐसें करावें कौतुक । नको धरुं खंडणा ॥२॥
रत्न शोभलें कोंदणें । अलंकारीं मिरवे सोनें ॥
एक असतां तेणें । दुजें केंवीं जाणावें ॥३॥
जळें न खाती जळां । वृक्ष आपुलिया फळां ॥
भोगिता निराळा । त्याने गोडी निवडिली ॥४॥
उष्णें छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा लोटे ॥
एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥५॥
तुका ह्मणे हित । हेंचि मानी माझें चित्त ॥
नव्हे आतां मुक्त । ऐसा झाला भरंवसा ॥६॥
॥६६०३॥
वृत्तीवरी येणें आम्हा कशासाठीं ॥ एवढी आटी सोसावया ॥१॥
जाणतसां परी नेणती जी देवा । भ्रमचि बरवा राखावा तो ॥२॥
मोडुनि भरलो अभेदाची मूस । तुम्हां कां आळस ओढवला ॥३॥
तुका म्हणे होई लवकरी उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥४॥
====
याप्रमाणें तुकारामबावांस प्रगट केल्यावर विष्णु ह्मणाले आता वैकुंठास चलावें तेव्हां समागमें घालवीत आले होते त्यांकडे कृपादृष्टीनें अवलोकन करुन वैकुंठास जावयास निघाले तेव्हां हे अभंग बोलले.
॥६६०४॥
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥
जिंकोनियां अहंकार । पावठणी केलें शीर ॥२॥
काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥३॥
तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥४॥
॥६६०५॥
चालिले न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥२॥
नाहीं भय आड । कांही विषमांचें जड ॥३॥
तुका म्हणे भक्ति । सुखरुप आदी अंतीं ॥४॥
====
मग तुकारामबावा देवांस ह्मणालें कीं आतां सत्वर प्रयाण करावें. हें ऐकून देव व भक्त यांनीं त्यांचें फार स्तवन केलें. त्या समयीं रामेश्वरभटानें म्हटलेला अभंग.
॥६६०६॥
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं ॥१॥
ऐसिया अनंतामाजि तूं अनंत । लिलावेश होत जगत्राता ॥२॥
ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनीं ॥३॥
शास्त्रां शिष्टाचारा अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ॥४॥
देऊनि तिळांजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविणें योगेशीं ब्रह्मार्पण ॥५॥
संत गृहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका ॥६॥
संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आलीं ॥७॥
शांति पतिव्रते झाले परि नयन । काम संतर्पण निष्कामता ॥८॥
क्षमा क्षमापणें प्रसिद्ध वृथा जगीं । तें तो तुझ्या आंगी मूर्तिमंत ॥९॥
दया दिनानाथा तुवां जिवविली । विश्वीं विस्तारली कीर्ति तुझी ॥१०॥
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्व भूतें ॥११॥
अधर्म क्षय व्याधि धर्माशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्य भक्ति ॥१२॥
ब्रह्म ऐक्यभावें भक्ति विस्तारिली । वाक्यें सफल केली वेदविहितें ॥१३॥
देहबुद्धि जात्या अभिमानें वंचिलों । तो मी उपेक्षिलों न पाहिजे ॥१४॥
न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥१५॥
====
ऐसी संतांची स्तुती ऐकुन अहंकृति उत्पन्न होईल व तेणें करुन देवाजीचे पाय अंतरतील असें तुकारामबावा ह्मणाले.
॥६६०७॥
न करावी स्तुति माझी संतजनीं । होईल वचनीं अभिमान ॥१॥
भारें भवनदी न उतरें पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥२॥
तुका ह्मणे गर्वे पुरविली पाठी । होईल माझ्या तुटी विठोबासी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2019
TOP