अध्याय पहिला - समास पहिला
श्रीसद्गुरुलीलामृत
महारुद्र जे मारुती रामदास । कलीमाजिं ते जाहले रामदास ॥
पुन्हां उद्धाराया जगा प्राप्त होती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति ॥१॥
श्री गणेशाय नम: । श्रीसीतारामचंद्राय नम: श्रीमहारुद्रानुमत नम: श्रीसद् गुरुनाथाय नम: श्रीरामसमर्थ ॥
जयजयाजी एकदंता । विन्घांतका सिध्दिदाता । नमन करूं तुज आतां । ग्रंथ सिध्दीते पाववी ॥१॥
सकल गणांचा अधिपती । म्हणूनि नामें गणपती । तव प्रसादें मंदमती । वाचस्पती होय ॥२॥
सकल मंगलामजिं एक । प्रथम पूजावा विनायक । श्रुतिस्मृति बोलती कौतुक । निर्विघ्न करी कार्यसिध्दी ॥३॥
पाशांकुश वरदहस्त । एके करीं मोदक शोभत । मूषकावरी अतिप्रीत । सर्वांगी सिंदूर चर्चिला ॥४॥
तुझिये कृपा कटाक्षें । अलक्ष्यवस्तु तेंही लक्षे । अज्ञानी पाविजे कक्षे । सिध्दांचिया ॥५॥
आसतां सुवर्ण हातीं । कांहीं कार्ये साध्य होतीं । तुझी कृपा जे संपादिती । तयांसि सकल सिध्दी ॥६॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ह्यां तंव तुझिया सहज लीला । पदी नमची शिरकामला । तया प्राप्ती सहजची ॥७॥
आदिमाया आणि ईश्वर । तयांचा अंकूर सुंदर । रुप तरी लंबोदर । अनंत ब्रह्मांडें साठवी ॥८॥
सिंदुरासुर मातला । त्रैलोक्य अजिंक्य जाहला । ब्रह्मादिकीं तुज स्तविला । नानास्तोत्रें ॥९॥
मर्दोनिया तो असुर । भक्तचिंता केली दूर । शिवलिंग रावणवीर । नेऊं पाहे स्वस्थानीं ॥१०॥
तै बालरुप घेऊन । घेतलें त्वां हिराऊन । मृत्युलोकीं स्थापून । गोकर्ण क्षेत्र निर्मिलें ॥११॥
आतां हीच विनंती । दिनासि धरूनि हातीं । ग्रंथासिध्दीची आयती । पुरवावी तुवां ॥१२॥
जयजय श्रीशारदा माय । सप्रेम वंदोनि तंव पाय । तुज तुझें शब्द प्रमेय । समर्पू आतां ॥१३॥
ॐकाराची जननी । ब्रह्मांडाची मुळापासोनी । घडामोडी स्वेच्छे करोनी । क्षणामाजीं करितसे ॥१४॥
परेहूनि जी पर । तुर्या स्वरुप निरंतर । नकळे जियेचा पार । अगाध लीला । ॥१५॥
जिचे गायनाचा विलास । मधुरध्वनी नवरस । भुलवी नादें जनास । जगद्वंध ॥१६॥
काश्मीर देशी अधिष्ठान । सुंदर मयूर वाहन । परेसि जिचेनी स्फुरण । विद्यादेवी ॥१७॥
सुंदरामाजीं सुंदर । चतुरामाजीं चतुर । भक्तालागीं अभयकर । ज्ञानज्योती ॥१८॥
शुध्द द्वितियेचा चंद्रमा । पहावया पल्लवसीमा । करोनी दाविती व्योमा । जन जैसें ॥१९॥
तैसे पहावया निजस्थान । शब्द ब्रह्मसीमा जाण । ज्ञानें करोनी विज्ञान । दाविती सिध्द ॥२०॥
धनावरी असे बैसला । परी नेणिवेनें वाया गेला । तैसें तव स्वरूपाला न । जानता व्यर्थ ॥२१॥
जाणीव नेणीव क्रिया दोनी । चितशक्ती चहूंवाणी दशेंद्रिया चाळवणी । तुझेनि योगें ॥२२॥
मीपणाची जी स्फूर्ती । ती ही तुझीच शक्ती । स्तुती करितां मती । कुंठित होय ॥२३॥
परी आम्हां भाविकासी । सगुणोपासना निश्चयेसी । म्हणूनि तंव चरणांसी । वंदूं आतां ॥२४॥
ग्रंथलेखनाची स्फूर्ती । उपजविली जैषी चित्ती । सांग करी समाप्ती । चिंता मजसी कासया ॥२५॥
आतां वंदूं सद्गुरुमाय । जें देवांचेही आधि ध्येय । सद्भावें वंदितां पाय । द्वैतभाव मावळे ॥२६॥
जयाचें करितां स्तवन । ज्ञानिया पडे मौन । मी अज्ञानी मति हीन । विनवावें कवणे परी ॥२७॥
जयाचें जाणतां स्वरुप । जाणता होय तद्रुप । ध्येय ध्याता ध्यान अल्प । वेगळें उरेना ॥२८॥
तुमची करूं जातां स्तुती । नपुरे शब्द व्युत्पत्ती । परि आवडी उठली चित्तीं । मानुनी घ्यावी ॥२९॥
जैसी लेकुरें मातेप्रती । लटकेची जेवूं घालितीं । उदर न भरे परी तृप्ती । माय दावी ॥३०॥
तैसा निर्विकल्प अरुप । भक्ताकारणें धरिलें रुप । म्हणूनि स्तवनाचा संकल्प । कौतुक पुरवी ॥३१॥
वत्स देखोनी पान्हा घाली । तैसी सद्गुरु माउली । सच्छिष्याते पावली । ज्ञान बोधें ॥३२॥
यास्तव श्रीगुरु आधार । साधक पावे पैलपार । दुजें तारूं नसे थोर । भवसिंधू तरावया ॥३३॥
गुरूवांचोनि तर्ला । ऐसा देखिला न ऐकिला । महिमा न ववे वर्णिला । निरुपमेय ॥३४॥
गुरु तोचि सदाशिव । गुरू तोचि ब्रह्मदेव । गुरू नारायण स्वयमेव । चिद्वस्तू ॥३५॥
गुरूचें घरीं पाणी भरी । अथवा सडासंमार्जन करि । ऋध्दिसिध्द तयाचें द्वारीं । सदां तिष्ठती ॥३६॥
गुरुकृपेचा महिमा । बोलावया नाही सीमा । अनुभवी अनुभवें आरामा । धन्य साधू ॥३७॥
परात्यक्त दुरितें मळतीं । तीर्थे पुनित व्हाया येतीं । गुरुसेवा पारायण असती । तया पाशीं ॥३८॥
न करितां वेदाध्ययन । षट्शास्त्रादि पठण । सद्भावें सद्गुरुचरण । सेविता ज्ञान होय ॥३९॥
गुरुक्षेत्र काशीपुरी । अथवा जाणावी पंढरी । देवांचा देव वास करी । काय वानूं ॥४०॥
सद्गुरुचे चरणतीर्थ । सकल तीर्थावूनि पुनित । स्नानपान घडतां नित्य । अनंत पातकी उध्दरती ॥४१॥
सद्गुरुचे संनिध वास । तोचि केवळ ब्रह्मरस । आर्त पीडित जनांस । धन्य तारूं ॥४२॥
सच्छिष्य उत्तम क्षेत्र । अनुतापें खणिलें पवित्र । भक्तिरस भरोनि पात्र । सिंचिलें तयावरी ॥४३॥
गुरु वाक्य निर्मळ बीज । पेरिते झाले सहज । अंकुरावें पाहती चोज । कूर्म दृष्टीं ॥४४॥
ऐसा तूं सद्गुरूराणा । वर्णू न शकेचि निर्गुणा । गुरु भक्तीच्या खुणा । गुरुभक्त जाणती ॥४५॥
कल्परतू म्हणोअ जातां । न पाही तो अहिताहिता । इच्छिलें पुरवी तत्वतां । आन नेणें ॥४६॥
तैशी नव्हे गुरु मूर्ती । हित अनहित:पाहती । हितकर वस्तूच हाती । देती साधकांच्या ॥४७॥
जरी म्हणावें परीस । देई केवळ सुवर्णास । सदगुरु स्वस्वरूपास । देत असे ॥४८॥
सुवर्ण तें नाशवंत । स्वरुप जाणावें शाश्वत । अशाश्वत शाश्वतासी एकमत । होईल कैसें ॥४९॥
परीस न देई आपुलेपण । लोहासि करी सुवर्ण । सुवर्णा अंगी परिसपण । येत नसें ॥५०॥
तैसा नव्हे कीं गुरुवर । शिष्या दे स्वाधिकार । तया करवीं असंख्य नर । तारितसे ॥५१॥
कामधेनू म्हणो जातां । काम मूळ जी अहंता । खणोनि काढी तत्वतां । काय मागावें ॥५२॥
गुरुसि म्हणावें मातापिता । तरी न होय साम्यता । मातापित्यांची ममता । एकदेशी ॥५३॥
बालक सुखी असावें ऐसे इच्छित मनोभावें । केवळ इहलोक साधावें । म्हणोनी एकदेशी ॥५४॥
परत्र सुखातें नेणती । जाणतां द्यावया नसे शक्ती । मायामोहें गुंते वृत्ती । बहुतेकांची ॥५५॥
तैशी नव्हे तुमची लीला । इहपर स्वानंद सोहळा । भोगविता शिष्यबाळा । जीवन्मुक्ती ॥५६॥
मुक्या मुखे बोलविसी । लुल्या करवीं काम घेसी । पांगुळ्यासही चालविसी । सहजची ॥५७॥
अंधासि देसी लोचन । भवरोगासी भेषज जाण । मुमुक्ष चातका जीवन । मुक्तीरस वर्षतसे ॥५८॥
तूं वैराग्याचें मंदिर । शांति सुखाचें माहेर । शमदमादि वळण सुंदर । तुझिये ठायीं ॥५९॥
साधन चतुष्याची वाट । भक्तिज्ञानाची पेठ । मोल शुध्दभाव श्रेष्ठ । असे येथिचा ॥६०॥
ऐसा तूं सदगुरूराव । चरणी राहो शुध्द भाव ॥ ह्रदयस्थ स्वयमेव । बोलवी बोल ॥६१॥
तुझें कृपाप्रसादें चित्ती । चरित्र वदविण्याची स्फुर्ती । कृपा कटाक्षें करी तृप्ती । बाळलीला ॥६२॥
सद्गुरुची शोर करणी । न वचे वदली वाणी । मी तंव असे अज्ञानी । केवी बोलूं ॥६३॥
माउली संनिध असतां । तीस बालकाची चिंता । क्रीडे माजीं पडतां । वेळोवेळां सांवरी ॥६४॥
गुरुमाउलीचेनि बळें । बोलूं बोल हे आगळे । भक्तिरसाचे सोहळें । पुरवूं आजीं ॥६५॥
चंरित्रामाजी चरित्र । संत चरित्र परम पवित्र । श्रवणें पाविजें परत्र । सार्थकता ॥६६॥
संत चरित्राचा कित्ता । सतत पुढें ठेवितां । मोक्ष येईल हातां । साधकांच्या ॥६७॥
ऐसे हे संतजन । वर्षती स्वानंद जीवन । तयांसि करुं नमन । साष्टांग भावें ॥६८॥
तयांचा वाग्विलास । नवविधा भक्तिरस । सेवूनि पावती तृप्तीस । भाविकजन ॥६९॥
साधकासी आदर्शभूत । न्यून पूर्ण प्रत्ययें दावित । आपणामाजीं मेळवित । परोपकारी ॥७०॥
जयांचे घडतां दर्शन । चित्त होय उदासीन । उत्तम नरदेह पावून । व्यर्थ आयुष्य दवडिलें ॥७१॥
यांचे चालीनें चालावें । यांचे बोलीनें बोलावें । यांच्या संनिध असावें । सर्वकाळ ॥७२॥
यांची स्थिती अनुभवाची । तरीच देहसार्थकता बरवी । आतां हानी न करावी । आयुष्याची ॥७३॥
ऐशी उपरती होय मना । क्षणएक घडतां दर्शना । विषयांपासोन वासना । फिरे मागें ॥७४॥
मग होय समाधान । आनंदाश्रुनें लोचन । भरती रोमांच परिपूर्ण । सर्वांगी थरारिती ॥७५॥
कंठ होय सद्गदीत । भक्ति प्रेमें उचंबळत । मुखीं हरिनाम रसभरित । नाचतसें आनंदें ॥७६॥
कन्येस माहेर मूळ । येतां आनंद कल्लोळ । तैसा संत भेटीचा काळ । आनंदा आनंदवी ॥७७॥
कीं ह्या परमार्थ मार्गीच्या ज्योती । लखलखीत तेजोमय दीप्ती । वळसे खळगे दाविती । ज्ञानोदया पर्यंत ॥७८॥
ऐसी संतकृपा राणीव । भूतीं भगवंत ही जाणीव । सुष्ट दुष्टा एकभाव । प्रेम पान्हा पाजविती ॥७९॥
संतामाजीं वरिष्ठ । अध्यात्म ग्रंथ केले स्पष्ट । भवसिंधूवरुनि वाट । करणी जयांची ॥८०॥
प्राचीन अर्वाचीन दोन्ही । भूतभविष्यवर्तमानीं । उपयुक्त ज्यांची करणी । वंदूं तया ॥८१॥
आतां नमूं कुलदैवता । विष्णुपंचायतना स्मरतां । हरिहर गणेश सविता । जगन्माता जगदंबा ॥८२॥
वेळोवेळी रक्षिलें । हातीं धरोनि सांभाळलें । नित्य पाहिजे स्मरण केलें उपकार ज्यांचे ॥८३॥
गोत्रदेवत अत्रिऋषी । भार्या पतिव्रता जयासी । लाधली दत्तरुपें कुशीं । ब्रह्मा हरिहर अवतरले ॥८४॥
जें सकळिकांचें गुरुवर । केला बहुत जगदुध्दार । करिती पुढें करणार । नमन असो तयांसी ॥८५॥
तया कृपेचेनि योगें । सद्गुरु भेटी होय वेगें । नाही तरी फिरता मागे । न मिळे मोक्षदाता ॥८६॥
वंदूं माता आणि पिता । जयांची देहावरी सत्ता । देहयोगे कर्तव्यता । घडे सर्व ॥८७॥
माउलीचा उपकार भला । नवमास भार वाहिला । सेवेचा योग नाहीं घडला । बाळपणीं निवर्तला ॥८८॥
दिधली असें कामधेनू । मिळवावया नारायणू तया उपकारांतें वानूं । कोण्या मुखें ॥८९॥
परदेशी पाळिला पोर नि:स्वार्थे केला थोर । तिये वंदिता नीर । नयनीं लोटे ॥९०॥
कुलदैवत गोत्र दैवत | जननी जनक पाळितें दैवत । इतुक्यांचा ऋणाइत । देह थोर वाढविला ॥९१॥
याचें सार्थक करितां कांही । ऋण फिटेल लवलाही । नाहीं तरी भवडोहीं । बुडावें लागे ॥९२॥
असो आतां श्रोतेजन । श्रवणीं बैसले सज्जन । तयांचे वंदोनि चरण । ग्रंथारंभ करितसे ॥९३॥
श्रवणीं बैसले सादर । न्यूनाधिकीं ना अनादर । जाणोनि अजाणत्याचें कीर । पुरविती जे ॥९४॥
जैसा नाटयलेखक । नटबोल ऐके सकौतुक । तैसे लिहविले लेख । श्रवण कीजे ॥९५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2023
TOP