N/Aश्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसद्‍गुरुचरणारविंदात्यैनम: । श्रीरामसमर्थ । ॐनमोजी गुरुराया । अर्पितों तुझे
चरणी काया । निरसावें या भवभया । ठाव देई चरणाचा ॥१॥    
ह्रदयस्थां आत्मयारामा । वर्णावयाची झाली सीमा । शेष थकला गातां महिमा । एक मुखें काय वर्णू ॥२॥
असो कृष्णा वारणा संगमासी । हरिपूर क्षेत्र परियेसी । राधाबाई नाम जिसी । भोळी भाविक सत्वस्थ ॥३॥
अन्नपुर्तीचा सुकाळ । भजन जियेचे प्रेम । भक्ति भाव तो निर्मळ । संत सेवनी सादर ॥४॥
मिरजग्रामी आण्णाबुवा । लोकी वेडा म्हणावा । अंतर्निष्ठांनीं ओळखावा । सिध्द पुरुष ॥५॥
अनेक चमत्कारांसी दाखवी । लोक कार्ये करावीं । पिशाच्य वृत्ती धरावी । वरिवरी ॥६॥
नाशीक प्रांती सटाणागांग । तेथे मामलेदार देव । गृहस्थाश्रमीं शुध्दभाव । ज्ञानी असोनि विरक्त ॥७॥
भार्या जयाची सती । पतिवृता गुणवती । उभयता बहु प्रेम करिती । गणपती वरी ॥८॥
जातां येतां काशीहोनीं । सद्‍गुरू जाती नेमे करोनि । थोडे दिवस राहोनि । पुढें होती मार्गस्थ ॥९॥
जाणोनि हनुमदंश । मानिती भजनी विशेष । प्रश्नोत्तरें दिवस दिवस । संवाद होत स्वानंदे ॥१०॥
जातीसी मिळता जात । प्रेमें प्रेम दुणावत । सहज समाधी येत । अनुभवासी ॥११॥
माणिकप्रभू हुमणाबादकर । ज्ञानी विरक्त योगेश्वर । शिष्य समुदाय थोर । असे जयांचा ॥१२॥
कांही दिवस केली वस्ती । प्रेम संवाद चालती । रामभक्त जाणोनि चित्ती । वंदन करिती समसाम्यें ॥१३॥
सद्‍गुरू अक्कलकोटकर निवासी । दत्तमहाराज म्हणती जयासी । तेथें जाती दर्शनासी । दत्त अवतार मुर्तीमंत ॥१४॥
कथिती ते रामोपासना । सद्‍गुरू भेटतील जाणा । अंतर्भाव जाणोनी खुणा । येरयेरा भेटले ॥१५॥
आणिक बहू असती । जे गिरी गुहें माजीं वसती । मनुष्य वाराही न घेती । ऐसे राहती अलिप्त ॥१६॥
प्रसंगे श्रीगुरूनीं कथिले । तें येथें विशद केले । मार्गी बहुत भेटले । सिध्द आणि साधक ॥१७॥
बहुत केल्या येरझारा । काशीहुनि रामेश्वर । भरतखंड शोधिला सारा । सद्‍गुरु कारणें ॥१८॥
कोणा म्हणती आम्हांसी । अधिकार नसे निश्चयेसी । तुम्ही ज्ञानी गुणराशी । आम्हां गुरुसारिखे ॥१९॥
कोणी ज्ञानी तपोबल । भूत भविष्य जाणोनि सकळ । आवतारिक पुरुष हा केवळ । गुरू व्हावा कासया ॥२०॥
कोठें कांही कोठें कांही । मिळोनि समाधान नाहीं । तळमळ वाटे अंतर बाह्य । विवरती भूमंडळी ॥२१॥
सद्‍गुरूपद तें दुर्लभ । सहसा नव्हे अलभ्य लाभ । सुटता संस्कृतीचा लोभ ठाई पडे ॥२२॥
रुका अडका खर्चिला । सद्‍गुरू खरेदी घेतला । तरी बोध तैसाचि झाला । इह मा परत्र ॥२३॥
धूर्त तार्किक विचक्षण । युक्ति प्रयुक्ती वेधिती मन । भोळे भाविक सज्जन । भुलाविती अनेक ॥२४॥
कामक्रोधा बळी पडले । अहंकारी वैभवी गुंतले । सिध्दि साह्ये सुख मानिलें । तेंही सद्‍गुरू म्हणविती ॥२५॥
शाक्तमार्गे भरी भरती । भूरदयेतें नेणती । भूतपिशाच्य कोणी भजती । भुलविती शब्द ज्ञानें ॥२६॥
वैभव पाहोनि भुलले । शध्द ज्ञानें चकित झाले । आड्मार्गी  जावोनि पडले । असंख्य नर ॥२७॥
देवाहोनि आम्ही श्रेष्ठ । सेवा करा एकनिष्ठ । व्यसनी विषयीं झाले भ्रष्ट । भोदिती जग ॥२८॥
नाही भक्ती नाही ज्ञान । नाही उपासना अनुसंधान । वैराग्य क्षमा समाधान । नाही भूतदया ॥२९॥
समबुध्दी ना स्थीरत्व । नैष्कर्म्य ना जनप्रियत्व । निरहंकृती ना निस्पूहत्व । वंचक वृत्ती ॥३०॥
नहीं संदेह गेला । मूर्ती भगवंत न देखिला । आशा तंतू नसे तुटला । महंती प्रिय ॥३१॥
अंगी भरला ज्ञानताठा । यमनियमा दिधला फाटा । स्तुति प्रिय झाला मोठा । अनुभव हीन ॥३२॥
ऐसे गुरु बहुत असती । बिकट प्रश्ने चडफडती । महंती जाईल म्हणोनि भिती । शिष्य गुंती काढितीना ॥३३॥
ऐशियाचेनि सार्थक । होणार नाहीं नि:शक । स्वयें बुडोनि लोक । बुडविती निश्चयेसी ॥३४॥
ऐसे बहुत शोधिले । फिरत वाराणसी आले । देखोनी तेथें शास्त्री भले । प्रश्न करिती नेमस्त ॥३५॥
शास्त्री वदती बाळा । गुरुविणें ज्ञान जिव्हाळा । नये विद्या आणि कळा । यथा सांग ॥३६॥
दक्षिणे मोंगलाई । तेथें सदगुरु तुकाईए । शरण जाई लवलाही । अनन्य भावें ॥३७॥
परिसोनि वचनासी । संतुष्ट झाले मानसी । फिरले त्वरित दक्षिणेसी । विचार मानसी दृष्ट केला ॥३८॥
तुकाराम साधू भले । येळेगांवी ऐसे कथिलें । परिसताचे समाधान झालें गणपतीचें ॥३९॥
बहुत पुरुष आजवरी । पाहतां फिरले पादचारी । परि समाधान आजवरी । कधीं न झालें ॥४०॥
आत्माआत्मपणें एक । उपाधीन दिसे अनेक । परी अनेक नव्हें एक । सर्वाभूतीं ॥४१॥
तोची देतसे साक्ष । सुक्ष्मपणें देता लक्ष्य । सत्यासत्य दावी पक्ष । विवेकी जना ॥४२॥
या अनुभवाच्या गोष्टि । विवेकी पाहती दृष्टीं । इतर करतील चावटी । वितंडा वादें ॥४३॥
असो झालें समाधान । चित्तासी बाणली खूण । त्वरीत निघाले तेथोन । गुरुपदीं लीन व्हाया ॥४४॥
उतावेळ झालें चित्त । सदगुरू भेटीची आरत । वाटे वाटे दुणावत क। सत्वरी ओसरेना ॥४५॥
धेनू आली वनातोनी । धारेसी निघाला घरधनी । वत्सें धांव धरिली मनीं । परी बिरडें सुटेना ॥४६॥
ग्रामाहुन आला पती । सासुर्वासी भार्यासती । भेटी उतावेळ चित्ती । वाटे गभस्ति मंद चाले ॥४७॥
तैसें श्रीसद‍गुरुदर्शन । घ्यावया उतावीळ मन । जान्हवीचे स्नान करुन । विश्वेश्वर दर्शन घेतलें ॥४८॥
तेथूनि निघे गुरुमाउली । सद्‍गुरुभेटिसी चालिली । वय लहान असोन केली । करणी हे अघटित ॥४९॥
सद्‍गुरू भेटीची आयती । केली कैसी पाहावी ती । चित्तशुध्दि अनुतापस्थिती । वैराग्य युक्त ॥५०॥
माय मोह पितृ मोह । खेळगडी यांचा मोह । आप्तइष्ट गृह मोह । शरीर मोह सांडिला ॥५१॥
आयाचित उदर भरण । फलहार उपोषण । रसनेद्रिय जिंकिले गहन । अजिंक्य जें ॥५२॥
कोठेंही करावी वस्ती । ग्रामी अथवा वनाप्रती । प्रावर्णाविण वागविती । देह आपुला ॥५३॥
शोतोष्ण वारा पाऊस । सोसतां न मानी वास । वेराग्यस्थिती जयास । पूर्णत्वे बाणली ॥५४॥
आशा ममता देह वेडी । लोभ मोह वासना कुडी । भय अहंकार वर्‍हाडी । घालविलें सकळ ॥५५॥
अखंड मुखी रामनाम । तेणे चित्तशुध्दि होय परम । एक ध्यानी श्रीराम । भोग्य वस्तू टाकिल्या ॥५६॥
माझे घर माझा संसार । माझी मायबापे चतुर । माझी जन्मभूमि थोर । शहाणा एक मीच मी ॥५७॥
माझें धन माझे शेत । माझें खेळगडी बहुत । आप्तइष्ट गणगोत । सर्वही माझें ॥५८॥
माझें हें ओझें समस्त । विवेकें विवरी सतत । असत्य मानोनि शोधी सत्य । सद्‍गुरुपाशीं ॥५९॥
न इच्छी विषय भोगांसी । विषसम जाणोनि त्यांसी । अलिप्त राहे उदासी । आवडी एक नामाची ॥६०॥
परी रामदर्शन करवी । ऐसा न मिळे गोसावी । अखंड तळमळ लागली जीवी । वैराग्ययुक्त ॥६१॥
अनुतापें होवोनि विरक्त । विवेक जागविला सतत । नाम स्मरणानें होत । चित्तशुध्दी ॥६२॥
मुमुक्ष स्थिती अनुभविली । साधक वृत्ती अंगिकारिली । सदगुरु भेटीसी चालली । माय माझी ॥६३॥
जे उपजत ज्ञानधन । आदिमध्यांत अविच्छिन्न । जनांसी लावावया वळण । जनरुढी चालती ॥६४॥
असो गणपती बाळ । ओलांडोनि रानोमाळ । पाहावया सद्‍गुरू दयाळ । सत्वर चालिले ॥६५॥
पावले मोंगलाईत । एळेगांग कोठें पुसत । संकेतें पावले जेथ । तुकाराम नांदतसे ॥६६॥
बाळ चातक ज्ञानाधिकारी । स्वानंद मेघ वरुवेल वरी । सदगुरू कृपेचिया सरी । तन्निमित्ते सेवन करुं ॥६७॥
  इति श्रीसद‍ गुरुलीलामृते चतुर्थो्ध्यायांतर्गत द्वितीयसमास: । ओंवीसंख्या ॥६७॥
॥ श्रीसद‍गुरूचरणारविदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP