तपें तोषला सद्‍गुरु ज्ञानियांचा । वदे वाढवी पंथ या राघवाचा ॥
कलींमाजिं मंदावली धर्मभक्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति ॥५॥

श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । जयजय सद्‍गुरुपरंपरा ।

वंदन करुं जोडोनि करा । मुमुक्षुजना असरा । उपकार किती वानावे ॥१॥
भूमिस्थित गुप्त ठेवा । वरी बैसोन नसे ठावा । आयतां काढोनि हातीं द्यावा । ऐसें केलें ॥२॥
अज्ञान भरलें शीत । अंग थरथरा कांपत । कटकटा वाजती दंत । माया मोहें ॥३॥
ज्ञानाग्नि स्फुलिंग चेतविलें । प्रगट करोनि दाविलें । शीत वारोनी सुखी केलें । बहुतांसी ॥४॥
पूर्वप्राप्त निधान । जवळी असोनि चुकलें जाण । आड पडिलें झांकण । सगुणत्वाचें ॥५॥
सगुणीच दाविलें निर्गुण । भ्रमाचें फेकोनि झांकण । साक्षात्कारें समाधान दिधलें तुम्हीं ॥६॥
ईश्वर मानव हितासाठी । दया उपजोनि पोटीं । दिधली जी निधान पेटी । तुमचे हातीं ॥७॥
जतन करोनि ठेविली । प्राणापरिस सांभाळिली । बहुतांचे उपयोगा आली । भवदरिद्र हरावया ॥८॥
जें शिवें आदरलें । जहर विष शमविलें । नित्य समाधान पावलें । चिंतनें जयाच्या ॥९॥
कितीएक जीवन्मुक्त झाले । देहीं असोनि विदेही बनले । कोणी राम होवोनि गेले । सायुज्यासी ॥१०॥
भक्तपणें विभक्त कोणी । राहिले सुखे सुखावोनी । कोणी नामरुप विसरोनी । चैतन्यची जाहले ॥११॥
कित्येक ते विरक्त । जगीं वर्तती पिशाच्चवत । कोणासही अंत । न देती कदापी ॥१२॥
कोणी झाले ब्रह्मवेत्ते । देव वंदिती जयातें । अभिमानरहित क्रोधापरते । दया शांतिचे पुतळे ॥१३॥
कोणी झाले सत्ताधारी । दुर्जन पळविले दुरी । सज्जनांचे सहकारी । होवोनि गेले ॥१४॥
कोणी रामभक्तीची गुडी । उभारिली दोहींथडी । इहपर स्वानंद गोडी । चाखली सहज ॥१५॥
कोणी लिहिलें अध्यात्म । गुह्यातीत गुह्य परम । तरोनि गेले बहू दुर्गम । श्रवण मननें भवसिंधू ॥१६॥
कोणी ब्रह्मानंदें निमग्न झाले । ब्रह्मचर्य आदरें पाळिलें । षडमीचे हवन केलें । शांतिकुंडीं ॥१७॥
ऐसे तरले किती एक । तरती तरतील अनेक । जें चिंतनींय वासना छेदक । परमसार ॥१८॥
तेंचि दिधलें दोनी हातीं । जेणे घडे अनन्य भक्ती । तन्मयता चितशांती । प्राप्त होय ॥१९॥
कैसें करणीचें लाघव । मावळविती समूळ भाव । मीपणासी नुरे ठाव । द्वैतभाव हरोनी ॥२०॥
जेथे वेद मंदावले । शास्त्रांचे विचार थकले । उपनिषदें घुसळोनि पाहिलें । तरी वेगळें दिसेना ॥२१॥
ऐसा तो सावनंदघन । सत्‍ शिष्या दिधला जाण । पतीत केले पावन । दयादृष्टी ॥२२॥
तयासी करोनि वंदन । पंचमाध्यांचें विवरण । जें असें अत्यंत गहन । तै बोलू गुरू कृपें ॥२३॥
चतुर्थाध्यायाचें अंती । गुरुसेवा केली जी ती । परिसता वाढे गुरु भक्ती । भाविकांची ॥२४॥
पंचमी सहजानंद । गुरुशिष्या ऐक्य पद । जगजोध्दाराचा अनुवाद । पडेल श्रवणीं ॥२५॥
असो चालली अखंड सेवा । सत्‍-संगतीचा मेवा । विषयोमींचा सुटला गोवा । सहजसमाधी बाणली ॥२६॥
पाहुनियां साधन स्थिती । सद्‍गुरु संतुष्ट होती । मग जिविचें गुह्य कथिती । ज्ञानदृष्टी देवोनि ॥२७॥
मस्तकिची ऊ काढोनी । हातीं दिधली तयांनीं । श्रीरामा वसिष्ठांनीं । दिधले तोचि तुज देतों ॥२८॥
पुनरपी आणीक एक । काढोनी हातीं देती देख । सांदीपनें यदुनायक । बोधिले तोचि घेई बा ॥२९॥
विकल्प विचार न करितां । गुरुप्रसाद वंदिला माथां । संतुष्ट झाला गुरु दाता । अनन्य भाव पाहोनी ॥३०॥
विवेक युक्त वैराग्य । साधन साधी अव्यंग । ऐसा सच्छिष्य सभाग्य । मिळतां गुरु संतोषे ॥३१॥
जो आळसा न देई अंग । गुरुवचनी श्रध्दा चांग । गुरुकृपा व्हावया मग । उशीर नाहीं ॥३२॥
गुरुवचनी विकल्प धरी । तो शिष्य नव्हे आपुला वैरी । क्षीर टाकूनि वार करी । पान जैसा ॥३३॥
गुरुची जाणें कदर । ऐसा दुर्लभ नर । जो पावे पैलपार । ऐसा विरळा ॥३४॥
बहुतका गुरु केले । म्हणती गुरुमुख पाहिजे झालें । ऐसें वेदशास्त्र बालिले । ठाई ठाई ॥३५॥
जन्मा आलियाचें साथक । एकदा करावें गुरुमुख । लौकिक व्यवहार मानिती देख । तेंही गुरुभक्त म्हणविती ॥३६॥
कोणी म्हणती गुरु करावा । म्हणजे प्रपंच चाले बरवा । संकट कालीं आठवावा । म्हणजे बरें ॥३७॥
कित्येकीं गुरु केला । अनन्य शरण नाहीं गेला । सेवा करितां लाजला । तोही शिष्य म्हणवीतसे ॥३८॥
कित्येक गुरुसी वंचति । प्रसंगे सेवा न करिती । प्राणासवें रक्षिती । आपुलें धन ॥३९॥
कोणी म्हणती हा गोसावी । कारणीक संगती करावी । नाहीं तरी कुळाची थोरवी । जाईल आमुची ॥४०॥
कोणी म्हणती हा भाग्यवंत । याचे संगे राहतां नित्य । मिष्टान्नें सेवितां तृप्त । होवूं आम्हीं ॥४१॥
कित्येक म्हणवाया संत । गुरु करिती त्वरित । झालों आतां पुनित । पूर्ण ज्ञानी ॥४२॥
गुरुभक्ताचे नांवाखालीं । कित्येक दुष्कर्मे झांकिलीं । अद्वैताची बोलती बोलीं । म्हणती आम्हां परमहंस ॥४३॥
स्वानुमतें मुक्त झाले । आणि संदेहचक्रीं भ्रमलें । भ्रष्टाकारें कुडे झाले । किती एक ॥४४॥
निहेतुक गुरुभक्ती । निर्विकल्प ज्यांची वृत्ती । आवडी सतीशीपती । जैसी तैसी ॥४५॥
सर्वस्व अर्पिलें गुरुसी । तोचि अधिकारी मोक्षासी । लाजवी महासिध्दीसी । सिध्दपुरुष ॥४६॥
गुरुचें करितां गुणश्रवण । सर्वद्रियांचे करी कान । जैसा चातक घे झेलोन । मेघोदक ॥४७॥
काळवेळा कळेना । श्रवणीं आवडी लागली मना । अखंडा चालवी भजना । गुरुगुणासी ॥४८॥
तैसे गुणवर्णितां । न पुरे शब्द व्युत्पन्नता । वाकइंद्रिय श्रमतां । नेत्रेंद्रिय पाझरें ॥४९॥
गुरुचे घेतां नाम । अंतरीं पावें विश्राम । म्हणे धन्य कूळ धन्य जन्म । ऐसें पद पावलों ॥५०॥
देहाचे करोनि पोतेरें । सारवी स्वामीचीं मंदिरें । इंद्रियें उपकरणीं सुंदरे । पीक धरीं हस्तकीं ॥५१॥
गुरु सेवेवांचुनि काज । नसे न धरी लोक लाज । अधिक सेवा मागे व्याज । सद्‍गुरुपासी ॥५२॥
गुरु जेथोनि चालिले । तया धुळीसही वंदिले । धन्य इचें भाग्य उदेलें । चरण वाहिले मस्तकीं ॥५३॥
सकलां गुरुरुप पाहे । आणि नम्र होत आहे । जैसा धनलोभी चिंतित राहे । धनागार ॥५४॥
गुरुसेवेसी तत्पर । आळस ओळखी सांडिली दूर । क्षुतूपिपासेचा विसर । चरणीं देह अर्पिला ॥५५॥
जैसा रवी अहोरात्र । निरालस्य चालवी सूत्र । न मागे अन्नवस्त्र । अथवा स्तुती ही वांछीना ॥५६॥
तैसा सतत सेवा करी । न म्हणे उणीपुरी । तनू झिजवी चंदनापरी । शेखी नसे अंतरीं ॥५७॥
सेवेची तन्मयता ऐसी । जे जे लागेल गुरुसी । अधीच समजे सत् शिष्यासी । तैसी सामुग्री करिगसे ॥५८॥
गुरुसी तृषा लागेल पुढें । पूर्वीच जाणे शिष्य रोकडे । पात्र भरोनी करी पुढें । ऐसी एकाग्र लक्षणें ॥५९॥
गुरुहूनि निजसखा । दुजा न देखे जो कां । गुरुभक्त एकमेकां । भेटतां द्वैत न वाटे ॥६०॥
मायपर गुरुमाय । पिता गुरुचि होय । गण गोत गुरुराय । सोय जाणते हिताची ॥६१॥
चित्त चिंतनी झिजे । देहास्वक्ती । सेवें बुझे । वंदनें अहंकार लाजे । गुरुपुत्रा संन्निध जावया ॥६२॥
अर्चनें घडे विषयत्याग । अज्ञा प्रमाण लय अभंग । ऐसीया भक्तीनें आत्मयोग । सहजासहजी घडतसे ॥६३॥
करितां सप्रेम गुरुभक्ती । सहजी प्रकाशे ज्योती । गुरुभक्त ते जाणती । इतर करिती कुतर्क ॥६४॥
मातीचा केला द्रोण । निर्विकल्प सेविला गहन । न दावितां झालें ज्ञान । भिल्लासी पहा प्रत्यक्ष ॥६५॥
सेवा चालिली अढळ । संतोषले दीनदयाळ । कृपामृताचा खळाळ । लोटला पूर ॥६६॥
शिष्यवैराग्यें उदास । आणि गुरुवचनीं विश्वास । अनन्य शरण अलियास । सदगुरुकृपा ओळतसे ॥६७॥
गणपती कृपा पात्र जाहला । परी पाहिजे परिक्षीला । कसवटी कसा उतरला । तरीच श्लाध्य ॥६८॥
म्हणोनि एकेदिनीं । बैसले सहज सिद्वासनीं । बोलती शिष्या लागोनी । पानें तोडी वडाचीं ॥६९॥
गुरु आज्ञा मानोनि शिरीं । शिष्य चढे वृक्षावरी । पर्णे तोडोनिया करी । भूमीवरी टाकितसे ॥७०॥
ऐसा चालिला क्रम । चीक वाहे तळीं परम । तंव बोलती तुकाराम । वृक्षा दु:ख देऊं नको ॥७१॥
अरे हे रुधिर स्रवतें । तरी पर्णे लावी जेथेची तेथें । ऐकोनियां वचनातें । पर्णे सर्व जमविलीं ॥७२॥
जेथून तोडिलें पान । तेथे लावी नेवेन । तात्काळ जाय मिळोन । पूर्वी होतें तैसेची ॥७३॥
न धरी मनी विकल्प । हो ना करि जल्प । वचन प्रमाण हा संकल्प । बाणोनि गेला ॥७४॥
वृक्ष पूर्ववत झाला । सद्‍गुरु मनीं संतोषला । म्हणे शिष्य भला भला । चैतन्याचा अधिकारी ॥७५॥
ऐसी कठीण आज्ञा करिती । कैं दुरुत्तरेंही बोलती । कैं धन्यधन्य म्हणोनि गाती । विषादअहंकार उठेना ॥७६॥
एकदां मोळी उसाची । दोघां चौघां न हालेची । मस्तकीं देवोनि त्वरेची । चालविती निजपंथें ॥७७॥
योजन योजनपर्यंत । धांवती शिष्य मागुती जात । मग ऊस समस्त । फेकून देती चहू दिशे ॥७८॥
परी निष्कारण देती त्रास । नये किंतू जयास । सेवा घेती हे विशेष । म्हणोनि हर्ष मानी ॥७९॥
गुरुसेवा सतत घडो । चित्त सेवेमाजी जडो । आळस गिरीकंदरी द्डो । ऐसें भावी ॥८०॥
कैं अंधारीं फिरविती । सर्पविंचूसी धरविती । अंतरस्थिती पाहती । नाना प्रकारें ॥८१॥
ऐसाचि एक प्रसंग । पुढें वर्णू यथासांग । श्रवण करिता अव्यंग । गुरुसेवा कळों ये ॥८२॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते पंचमाध्यायांतर्गत प्रथम समास: । ओंवीसंख्या ॥८२॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP