विदेहापरीं चालवोनी प्रपंचा । मुमुक्षू जनांलागिं अध्यात्मचर्चा ॥
करोनि बहू लोक जे मेळविती । नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ति ॥६॥

श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ । श्रीमहारुद्रहनुमतेनम: । जयजयसद्‍गुस्वानंदा ।
भक्तीकमलींमकरंदा । मुमुक्षूभृंग घेती स्वादा । नाठवें देहभाव ॥१॥
तुझीये आनंदाची गोडी । चाखिती जे जे व्हराडी । तितुके गेले देशोधडी । अहंता नि:शेष सोडोनी ॥२॥
कोणा न देती ओळख । वरी दिसती स्वाभाविक । परी चोरिलें निजसुख । स्वानंदरस सेवूनी ॥३॥
अकंठ अमर्याद भरले । तेणे ते उन्मत्त झाले । घरच्या घरी बावरले । नवल वाटे ॥४॥
मायेची ममता सांडिली । पितयाची आज्ञा मोडिली । आशा मावशी ती बधिली । देखदेखतां ॥५॥
कामक्रोध बंधूवएरी । जो कां सदा गुरगुरी । कल्पना ईषणा भगिनी सुंदरी । समोर येऊं देईना ॥६॥
प्रारब्ध ठेवा लुटविला । घराचा देव्हारा केला । मरणा मारोन उरला । आनंदरस चाखित ॥७॥
शब्दस्पर्शरुपस । गंधभूषणें वेशीस । बांधोनी राही उदास । सर्वकाळ आनंदी ॥८॥
जगा वेगळा बडबडे । जगीं असोनियां दडे । प्रपंच व्यवसाय नावडे । परी करणे सोडीना ॥९॥
दया क्षमा शांती दासी । तेथें रमे अहर्निशीं । सांडोनि लोकलज्जेसी । आनंदमदें धुंद झाला ॥१०॥
न जाणें आपपर । विधीनिषेधादी आचार । बुडविलें सकळ घरदार । आनंदोमीं माझारी ॥११॥
आनंदे उन्मत्त झाला । न मानी कळिकाळाला । पुण्यपाप तुडवूं लागला । संकट उपाधी ॥१२॥
ऐसा तूं आनंदघन । सेवितां ते सेवकपण । समूळ जाय विरोन । सेव्यसेवा आनंद ॥१३॥
जया घडेल हा योग । तेणेचि साधिला लाग । इतरें राखिली तगमग । नरदेहा येवोनि ॥१४॥
सबल सुकृतांच्या राशी । सत्संग नम्रता जयासी । तोचि जाणे स्वानंदासी । ज्ञानाऽज्ञान गिळोनी ॥१५॥
अथवा श्रध्देचा ओलावा । धरोनि करिता गुरुसेवा । स्वानंदसोहळा भोगावा । नित्य सत्य निर्विकार ॥१६॥
ऐसी सेवा साधोनि । सद्‍गुरु गेले नैमिष वनीं । एकांतवास साधोनि । पुनरपि गृहीं निघाले ॥१७॥
मार्गी बहुतां बोदिलें । अनुगृहें सुखीं केलें । रामभक्तीसी लाविलें । अज्ञ विकल्पी भाविक ॥१८॥
अनेक कामना पुरवोनी । जन लाविती रामभजनीं । जेवी कषाय न सेवी म्हणोनी । साखरखडा दाखवती ॥१९॥
ऐसा करित जगदोध्दार । पावले गोंदावले नगर । गृहीं जावोनि रघुवीर । पुकारितसे गोसावी ॥२०॥
माय येवोनि जंव पाहे । तंव गोसावी उभा आहे । अंगी तेज न समाये । प्रेमजिव्हाळा उफाळे ॥२१॥
मागें गणू येवोनि गेला । तोही गोसावीच झाला । वर्तमान ठाउके असेल याला । म्हणोनि करी प्रश्नांते ॥२२॥
अहो साधू महाज्ञानी । तुम्ही फिरतां रानीवनीं । कोठे दिसला की नयनीं । पुत्र आमुचा सांगावा ॥२३॥
सदा रामनाम घेत । तुम्हा सारिखा वेष धरित । सद्‍गुरुकारणें फिरत । देशीविदेशीं ॥२४॥
सद्‍गुणी चातुर्याची खाण । वय सान वैराग्य पूर्ण । मध्यमसा गौरवर्ण । अंगठेव सुदृढ ॥२५॥
आम्हां दु:खीं टाकोनी । गेला गृह सोडोनी । कोठे देखिला की नयनीं । कृपा करुनी सांगावें ॥२६॥
सद्‍गुरु बोलती मातेप्रती । माउली चिंता नसावी चित्ती । उदयीक भेटेल निश्चिती । तुमचा सुत तुम्हांसी ॥२७॥
ऐसें वदोन सत्वर । पावले हनुमंत मंदिर । दुरोनि पाहती चमत्कार । बाळपणाचा ॥२८॥
नानापरी क्रीडा केली । सोबत्यांची मांदी मिळविली । आजीं सर्व पारखी झाली । जवळी असोनी ॥२९॥
एकरात्र केली वस्ती । ओळखी कोणा न देती । दुजेदिनीं पाचारिती । चिंतू बुवासी ॥३०॥
उपाध्याय चिंतूबुवा । संबोधिती घेऊन नांवा । बालपणच्या गोष्टी तेव्हां । खुणेलागी सांगितल्या ॥३१॥
खूण पटत्तां हर्ष झाला । धांवला रावजी गृहाला । गीताई तुमचा सुत आला । मंदिरामाजीं ॥३२॥
शब्द पडतांचि श्रवणीं । गीता निघे झडकरोनि । चरण धरी धांवोनी । गणपती तै जननीचे ॥३३॥
उभयतां संतोष झाला । गणपती सर्वा भेटला । हरपला ठेवा गवसला । गोंदावलीसी ॥३४॥
बालपणचे मित्र सारे । करिती नाना प्रश्नोत्तरें । निवविती सकलांची अंतरें । प्रवास कथा सांगोनी ॥३५॥
कथिती अध्यात्मज्ञान । रामभक्ती सगुण भजन । सर्वांचे बोधिती मन । आपणाकडे ॥३६॥
शरण येती तयांसी । निववूनी रामभक्तीसी । लाविती तत्क्षणेसी । युक्ति प्रयुक्ति ॥३७॥
प्रापंचिक युक्तिवाद मुमुक्षूसी भक्तिबोध । नास्तिकासी प्रेमसंवाद । करोनि भजनी लाविती ॥३८॥
मुखोमुखा पसरली मात । गोंदावलीसी आले संत । साक्षात्कारें समाधान देत । प्राणिमात्रांसी ॥३९॥
शर्करा पाहूनि मुंग्या धांवती । तैसें झालें गोंदावल्याप्रती । बहुत ग्रामीचे जन येती । साधुदर्शनाकारणें ॥४०॥
बध्दमुमुक्षूसाधकसिध्द । करिती प्रेमसंवाद । समाधान पावोन धरिती पद । सद्‍गुरुचे ते काळीं ॥४१॥
कोणी म्हणती सिध्द पुरुष । कोणी मानिती देवांश । पावले देव प्रत्यक्ष । गोंदावले ग्रामासी ॥४२॥
सकलां दर्शनें आनंदवी । ऐसा पावला गोसावी । सर्वांगीं विभुति लावी । कौपीन परिधान करितसे ॥४३॥
जटा दाढी शोभा देती । पायीं खडावा गर्जती । गणेश टोपी कफनी घालिती । हातीं स्मरणी शोभतसे ॥४४॥
मुद्रा रामनामांकित । कुबडी करीं वागवित । सदा आनंदे भजन करित । भक्तजन घेवोनी ॥४५॥
गृही वास न करिती । विठठलमंदीरा समीपवस्ती । कटटा करोनि बैसती । समुदायासमवेत ॥४६॥
कीर्ति पसरली चहूदेशीं । मत्सर वाटे स्वकीयासी । न साहवें परोत्कर्षासी । स्वभाव धर्म ॥४७॥
स्तोम माजविलें फार । यासी पुसती विचार । आमचा अपमान होतो फार । अधिकारी यांसी वंदिती ॥४८॥
तरी आतां ऐसें करावें । यासी मुंडण करावें । गृहस्थाश्रमीं लावावें । म्हणजे महती जाईल ॥४९॥
करोनि ऐसा विचार । म्हणती हा उतरावा भार । सद्‍गुरु वदती अनिवार । खर्च असे तयास्सी ॥५०॥
होम हवन ब्राह्मण भोजन । सांगता असे गहन । येरू वदती तया लागुन । सर्व करु यथा सांग ॥५१॥
मनींचा भाव जाणती । परी गुरुआज्ञा झाली होती । प्रपंच करोनि रामभक्ती । वाढवावी सतत ॥५२॥
स्वार्थ तीर्थ साध्य होतें । म्हणोनि करविलें मुंडणातें । अन्नदान हवनांतें । यथा सांग करविलें ॥५३॥
रावजी गीता आनंदले । म्हणती बाळ शुध्दीस आलें । आतां प्रपंच करील वहिलें । चिंता सर्व उडाली ॥५४॥
सरस्वती कांता खातवळीं । चिंता वाहोन कृश झाली । तिजला सत्वर आणिली । कृपासागर गुरुरायें ॥५५॥
प्रपंच चालिला अव्यंग । सदा भजती श्रीरंग । सदा भजती श्रीरंग । दर्शना येतसे जग । पूर्वीहुनि अधिकची ॥५६॥
प्रपंच करोनि प्ररमार्थ । कैसा साधावा स्वार्थ । दाविती राहोनि विरक्त । समस्तांसि ॥५७॥
प्रांत:कालीं देवतार्चन । अखंडा करती नामस्माण । अध्यात्म चर्चा विवरण । श्रोतसमुदाय विनविती ॥५८॥
नाना शंका उपशंका । प्रत्ययें फेडिती देखा । ग्रंथार्थ बोधिती लोकां । विशद करोनि ॥५९॥
दासबोध नाथभागवत । भगवद्‍गीता अध्यात्म ग्रंथ । अभंगदि गाथा समस्त । तुळशीकृत रामायण ॥६०॥
ग्रंथाग्रंथांची एकवाक्यता । विवरोनि दाविती समस्तां । श्रोता वक्ता श्रवणकरितां । तादात्म्यतां पावती ॥६१॥
चालतां अध्यात्म निरुपण । उपासना बोधिती सगुण । भक्ति प्रेम उचंबळोन । येतसे श्रोतयासी ॥६२॥
ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगती । आणि सगुणातें न भजती । तेणें इहपर नाडती । ऐसे वक्ते बहुतेक ॥६३॥
शब्दज्ञानें भरी भरिती । आणि उपासना सोडिती । तैसी नव्हे गुरुमूर्ती । बोधिती सगुण भजन ॥६४॥
स्वयें आचरोनि दाविलें । आणि जना शिकविलें । तेणे समाधान पावलें । कितीयेक ॥६५॥
सायंकाळी प्रेमळभजन । करुणारल रुपध्यान । नानापरीनें स्तवन । रामरायाचें होतसे ॥६६॥
बहूत संतांची वचनें । अभंगपदादीं कवनें । जेणे साधका उपदेश बाणें । साधें आणि रसाळ ॥६७॥
ऐसे भजन नित्य करिती । अष्टकें श्लोक आरती । स्वयें करोनि करविती । जना करवी ॥६८॥
चालविती ऐसी उपासना प्रपंचकार्ये करिती नाना । गोसावी झाला शहाणा । म्हणती सर्व ॥६९॥
माय बोले सद्‍गुरुप्रत्ती । एक इच्छा असे निगुती । वडिलोर्जित वतन वृत्ती । अंगीकारावी तुवां ॥७०॥
पाळी असे आमुची आली । ती पाहिजे तुवां केली । मान्य करी आमुची बोली । पुत्रधर्म जाणोनि ॥७१॥
श्रीगुरु वदती माय । रामसेवे अर्पिला देह गरज नसे नोकरी गेह । आम्हा गोसावियासी ॥७२॥
परी मातृआज्ञा म्हणोनि । होइन मी कुलकर्णी । कांही काल क्रमोनी । पुनरपी जाईन वनातें ॥७३॥
पुरविण्या वडिलांची हौस । हाती घेतलें वतनास । नीति न्यायमर्यादेस । सीमा नाही ॥७४॥
भूतीं भावना भगवंत । न करिती अन्याय घात । पंचतत्व विवरण जेथ । हिशेबावी काय कथा ॥७५॥
कळिकाळां ज्याची सत्ता । तया गांवची काय वार्ता । आश्चर्य वाटा समस्तां । कोठें शिकला ज्ञान हें ॥७६॥
रयत म्हणती भले झालें । सूज्ञ कुलकर्णी लाभलें । अधिकारी संतोषलें । कामकाज देखुनी ॥७७॥
मायबाप संतोष झाला । तीन मास काळ गेला । सद्‍गुरूनी बदली दिला । पुरे म्हणती व्याप हा ॥७८॥
रामसेवा करावी । व्यक्ती भक्तीसी लावावी । याहोन अन्य पदवी । नको आह्मां ॥७९॥
जाणें असे नैमिषारण्य़ीं सद्‍गुरु भेटीलागोनि । तुम्ही रामनाम वदनीं । घेत असावें सर्वकाळ ॥८०॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते षष्ठोध्यायांतर्गत प्रथमसमास: । ओंवीसंख्या ॥८०॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP