अध्याय आठवा - समास पहिला
श्रीसद्गुरुलीलामृत
किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हाया । किती भाविती देहव्याधी हराया ॥
कृपा दृष्टिनें त्यासि आनंद देती । नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमर्ति ॥८॥
श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ ।
जयजया सद्गुरु क्षीरसागरा । अपरंपरा परात्परा । भक्तजन मनोहरा । आनंदरुपा ॥१॥
तुझिये उदरामाजीं अनंत । जलचरें असती राजी । अनंत भक्त झालें गाजी । पय:पान करोनी ॥२॥
कृपामृताचा भरला पूर । नाकीं तोंडीं गेलें नीर । सर्वांगीं भरली सार । गुरुभक्ती ॥३॥
तेणें गेले तळासी । जेथें क्षीरसागर निवासी । लक्ष्मी चरणाची दासी । शेषशय्यें पहुड्लें ॥४॥
दर्शनें आनंदित झाले । पुन्हां संसृती न आले । बुडले आणि तरले । हे नवल गुरुराया ॥५॥
सद्गुरुसागरा तुमचे पोटीं । अनंतरत्नें असतां गोमटी । मोलें वसुंधरातुटी । भाग्यवंता लाभतीं ॥६॥
भक्ती प्रवाल ठाय़ींठायीं । वेल पसर्ले रीघ नाहीं । शांती मौक्तिकें शोभतें पाही । अमोल आणि सतेज ॥७॥
कीर्तीच्या उसळती लाटा । अनुहतध्वनी गर्जे मोठा । माया दरडीसी चपेटा । मारुन झिजविती ॥८॥
साक्षात्कार फेन भरला । तेणीं जीवा चटका लागला । असंख्य समुदाय लोटला । तुमचे चरणीं ॥९॥
भोळे भाविक सज्जन । धरिती देवा तुमचें चरण । भेटविले सीतारमण । क्षीराब्धिवासी ॥१०॥
असो ऐसी गुरुमूर्ति । स्तविता थकली वेद श्रुती । तेथे मानव अल्पमती । वदतां ज्बोल न स्थिरावे ॥११॥
शब्दब्रह्म हें फोल । व्योमी भ्रम भासला चंचल । तेणे नातुडे निश्चल । निश्चयें गुरुपदा ॥१२॥
शब्दलाघव हाव भाव । हीं तों चंचलभाव । अनुभवी घेई अनुभव । तो याहून निराळा ॥१३॥
अज्ञानिया शब्दगहन । तोचि तया अधिष्ठान । तेथेंचि त्याचें समाधान । अकुंचितपणें ॥१४॥
परी तेचि देवे अंगिकारिलें । तया कारणें तैसेचि झालें । पत्रें पुष्पें फलें आणि जलें । तोषले परमात्मा ॥१५॥
तैसी उपमा श्लाध्य नोहे । परी आवडी अंतरी उठताहे । तेणीं बोलणें घडलें हें । मानुनि घ्यावें ॥१६॥
दीनदासाची माउली । अज्ञान अर्भकाची साउली । भक्तकाजार्थ पावली । कलयुगी मर्त्यलोकीं ॥१७॥
तेथें अनंत शरण आलें । कृपाप्रसांदा लाधले । निजहित साधोनी पावले । समाधान ॥१८॥
तीच येईल पुढती कथा । त्याचा तोचि बोलविता । अगाध सिंधू तरोनी जातां । शक्ति कैची आम्हांसी ॥१९॥
देशोदेशीं प्रवास केला । तेथें तेथें समुदाय वाढला । दर्शनें वेध लाविला । परांतरासी ॥२०॥
साधू आले ऐसे वदती । बहूत लोक पाहुं जाती । दर्शनें आनंदित होती । तपतेजें ॥२१॥
नास्तिक ख्ट बाष्फळ । आर्त जिज्ञासू निर्मळ । प्रापंचिक कामानिक विकळ । केले जयासी ॥२२॥
त्रिविध तापें जे पोळले । अथवा ज्ञानाचे भुकेले । परमार्थ हेत धरुनि आले । कित्येक ॥२३॥
कित्येक उगाच पाहु येती । कोणी परोत्कर्षे झोंबती । कर्मठ नामधारका निंदिती । कित्येक ॥२४॥
ऐशा जाती अनेक । कित्येक केवळ भाविक । पाहो येती सहेतुक । गुरुराज योगी ॥२५॥
शुध्दाशुध्द भावना । धरोन येती लोक नाना । नाना जीवांच्या कल्पना । किती म्हणोन सांगाव्या ॥२६॥
दृष्टादृष्ट होतां पाही । उर्मी मावळती सर्व ही । भक्तिपाझर फुटे ह्र्दयी । नम्र होती गुरुचरणीं ॥२७॥
जिवांचा जिवलग शिव । तो निर्विकल्प घेई धांव । निर्विकल्प गुरुराव । स्वतेजें नमवीतसे ॥२८॥
जनी जनार्दन ओळखिला । द्वैता ठाव कोठें उरला । आपआपणा भेटता झाला । सहजी सहज आनंद ॥२९॥
अज्ञानी विकल्पि निवाले । अहंकार राउत आडले । जेणें जग निर्माण केलें । मिथ्या माया जगडंबर ॥३०॥
तेणें घेतली झुंजनी । झुंजता गेला पळोनी । वायू जैसा गगनीं । विरोन जाय ॥३१॥
असो संगती आले ते तरले । दर्शनें आनंदित झाले । ज्ञानशांती साक्षात्कार भले । पाहोनि चकित ॥३२॥
भूतीं दया आणि सत्ता । राजयोग आणि नम्रता । नीति भक्ति विरक्तता । दाक्षिण्यता सर्वत्र ॥३३॥
राम नामाचा गजर । उपासना निरंतर । स्वधर्म कर्मी आदर । लीनता पाहोन लीन होती ॥३४॥
जो साक्षात हनुमंतअंश । तया वर्णिता कोण पुरुष । बाह्य लक्षणें कांही विशेष । अल्पबुध्दीनें कथियेली ॥३५॥
जे जे कोणी शरण आले । तें तें सन्मार्गी लागले । इहपर सौख्य पावले । भावने सारिखे ॥३६॥
चवदासिध्द झाले असती । ऐसे सद्गुरु बोलती । आणीक होतील त्या मिती । कोण करील ॥३७॥
गुरुवचनी विश्वास धरिला । तो तो तरोनिया गेला । विकल्प आळस ज्यानें केला । तो राहिला पलीकडे ॥३८॥
भव्य भरतखंडांत । अनंत झाले पदांकित । त्याचा न लागे अंत । अल्प प्रसिध्द कथन करूं ॥३९॥
सकळा करुं नमस्कार । जे सद्गुरुचे किंकर । तुमच्या कथा वर्णावया थोर । मति द्यावी दासासी ॥४०॥
समर्थ आणि कल्याण । तैसे श्रीगुरु आनंदसागर जाण । यांची कथा विस्तारुन । पुढती निरुपण होईल ॥४१॥
मोंगलाई अंबड तालुका । तेथें पिंपळगांव निका । कुळकर्णी अंताजीपंत देखा । गांवकामगार सुशील ॥४२॥
तयासी झाला एक सुत । गोविंद नामें संबोधित । बुध्दी देखोन चकित होत । लहान थोर ॥४३॥
कांही काळ लोटल्यावरी । अंतोबा गेले इंदुरीं । कांही धरोन चाकरी । प्रपंचा भारा चालविती ॥४४॥
गोविंदा अल्प थोर झाला । म्हणोनि शाळेसी घातला । तेथें भजन करुं लागला । आणि पोरा शिकवीत ॥४५॥
शाळे येवो न देती । इतरां बिघडवील म्हणती । सरासरी लिहिण्यांप्रती येऊं लागले ॥४६॥
शिवालयीं जावोन बैसावें । आदरें रामनाम घ्यावें । दासबोध विवरीत असावें । सर्वकाळ येकांती ॥४७॥
क्रमिता ऐशा समयासी । पंत झाले वैकुंठवासी । दशवर्षे गोविंदासी । माय अत्यंत दुखावली ॥४८॥
कांही येईना शेतसारा । भाउबंदें केला पोबारा । क्षत देखून चोंचमारा । म्हणती काक जैसें ॥४९॥
गृही अत्यंत गरिबी आली । पुंजी सर्व संपोन गेली । गोविंदे लिखाई धरिली । निर्वाही कारणें ॥५०॥
अर्जचिठठी लिहून घ्यावी । कांही मंजूरी मिळवावी । खर्चापुरती गृही द्यावी । उरलीया धर्म करी ॥५१॥
अंध पंगू भिकारी । यांची येत करुणा भारी । तयां लागी मदत करी । द्र्व्यद्वारां ॥५२॥
ऐसा गेला कांहीं काळ । फावल्यावेळीं नाममाळ । जपे दासबोध सर्वकाळ । वाची आणि मनन करी ॥५३॥
अभ्यासे गोडी लागली । अंतरी उदासीनता आली । गुरु भेटीची हांव सुटली । उद्यमी जाहलें दुर्लक्ष्य ॥५४॥
सिध्द साधू बैरागी । आलिया भेटती वेगी । प्रश्न करिती तयालागी । अध्यात्मविषयीं ॥५५॥
जेणें दासबोध विवरिला । तेणे बिकट प्रश्न केला । प्रत्युत्तरें भांबावाला । दिसे साहू ॥५६॥
आणिक लक्षणें पाहती । भक्ति उपासना नीती । कांहींच नसतां उपहासिती । पोटभरू म्हणोनी ॥५७॥
जन भुलवायाकारणीं । देहाची विटंबना करणें । यापेक्षां कांटे भरणें । उदरीं फार बरें ॥५८॥
ऐसे बहुत उपहासिती । अंतरीं गुरुभेटीची आरती । कोणी भेटेल ज्ञानज्योती । जागोजागीं पाहातसे ॥५९॥
गुरुप्राप्ती लागून । नित्य प्रार्थिती हनुमान । सेवा करिती अतिगहन । सद्गुरु भेटावा तुम्हां सरिता ॥६०॥
जैसे दिवस गेले । तैसे अंतर तळमळलें । वैराग्य शरीरी खवळलें । धंदा सर्व सोडिला ॥६१॥
एकदा मायगांवीं जातां । चीजवस्त वाटिली समस्ता । भिक्षाहारे उदरपुर्तता । करुं लागलें ॥६२॥
माय अत्यंत शोक करी । पुत्रा आठवली मधुकरी । प्रारब्धगती विचित्र सारी । देवा कैसी केली तुवां ॥६३॥
गोविंदें लोक लाज सांडिली । एकांतवस्ती आरंभिली । चित्ताची मलीनता गेली । देखतदेखतां ॥६४॥
क्षेत्र नांगरुन तयार केलें । वैराग्यजळें तुडुंब भरलें । कृषिवल ते शोधीत आले । ज्ञानबीज पेराया ॥६५॥
एकदा दासबोध वाचित असतां । महाराज देखिले अवचिता । दृष्टादृष्टी एकतानतां । होवोनि गेली ॥६६॥
देहाची स्मृति उडाली । चिदनंदी वृत्ति रमली । तंव इकडे गुरुमाउली । निघोन गेली ॥६७॥
एक प्रहरें सावध होती । तंव न दिसे गुरुमूर्ती । गल्लोगल्लीं शोधित फिरती । आनंद्कंद गुरुलागी ॥६८॥
कोणी सांगा समाचार । कोठें गेले गुरुवर । नयनीं चालला अश्रुपूर । पुसो लागलें सर्वासी ॥६९॥
भव्य रुप दिव्य कांती । पायी खडावा असती । कफनी फलगुरु घालती । मस्तकीं टोपी शोभतसे ॥७०॥
कंठी वैजयंती माळा । केशर कस्तुरी त्रिपुंड भाळा । भोंवती भक्तांचा मेळा । रामराम गर्जतसे ॥७१॥
कोणी सांगती ते समयीं । दिवाण काटापूर गृहीं । कोणी साधू असती पाही । शीघ्र जावोन भेटावें ॥७२॥
धांवत गेले तेथूनीं । देखिली नयनी गुरुजननी । देह लोटिला चरणीं । कोण वानी तें सुख ॥७३॥
उठोन देती अलिंगन । आनंदसागर ऐसें म्हणोन । पोटी धरितो कुरवाळोन । अनुतापा निवविती ॥७४॥
तै पासोन आनंदसागर । वंदो लागले नारीनर । गोविंदबुवा गुरुवर । ऐसेंही कोणी म्हणती ॥७५॥
प्रश्नोत्तरें दिवसरात । होते तेथें आनंदात । माउली होय चिंताग्रस्त । वेड लाविलें बाळासी ॥७६॥
येवोन निंदो लागली । पुत्रजन्माची माती केली । मर्कटाहातीं कोलती दिली । आजि तुम्हीं ॥७७॥
सद्गुरु म्हणती अहा माय । तुमचें भाग्य पावलें उदय । जन्ममरणादि चुकवीळ घाय । बेचाळिस कुळें ॥७८॥
ऐसा पुत्र लाधला । आणि म्हणतां वेडा झाला । माझे अनुरोधें चाला । तुमचे मनोरथ पुरवील ॥७९॥
रामसेवा करितां सतत । सर्व पुरवील मनोरथ । तुम्ही असावे निश्चिंत । भाग्ये लाधला सुपुत्र ॥८०॥
बोध करितां भ्रम गेला । उभयंतां अनुग्रह दिला । डाव नेम घालोन दिला । भवसिंधू तारक ॥८१॥
आनंद्सागर करिता सेवा । सेविता स्वानंदाचा मेवा । तो प्रकार श्रवण करावा । भावीक जन हो ॥८२॥
गुरुसेवेहून सार । न मानिती दुजें थोर । गुरुआज्ञेवरी विकल्प विचार । अणुभरी धरितीना ॥८३॥
स्नान करितां अर्ध वस्त्र भिजलें । तत्क्षणीं समर्थे बोलाविलें । त्वरित तैसेचि निघाले । ऐसी भक्ती ॥८४॥
भोजनी हाती धरिला घांस । हांक येतां त्या समयास । तैसाचि ठेवोनि तयास । निघोन जाती ॥८५॥
सद्गुरु अंतर पाहती । जपानुष्ठाना बैसविती । एक दोन दिनराती । अन्नोदकावीण ॥८६॥
तरी न मानिती खेद । वाटे तो महदानंद । आज्ञा झाली हाचि प्रसाद । विशेष मानिती ॥८७॥
असो सेवेचा ऐसा प्रकार । नित्य झिजविती शरीर । जाळिले दुरितांचे डोंगर । गुरुकृपा संपादुनी ॥८८॥
उन्मनी अवस्था जई आली । पिशाच्चवत् वृत्ती झाली । श्रीगुरुनी शांतविली । कृपादृष्टी करोनी ॥८९॥
ज्ञानोर्मीसी शमविता । गुरु वांचोन नसे त्राता । पाठी पोटी संरक्षिता । एकलाची गुरुराणा ॥९०॥
तैशाचि अष्टमहासिध्दी । साधकां घालिती उपाधी । शुध्द भावें दया निधी । गुरुनाथ तारितसे ॥९१॥
उभयतां निरोप देती । नर्मदा तिरी बढवाईप्रती । जावोन राहावे शीघ्रगती । जप दासबोध्द चालावा ॥९२॥
दाहा समास दिधलें काढोनी । तैसाचि जप नेमोनी । नित्य असावें उपासनी । ऐंशी हजार दिनं संख्या ॥९४॥
आज्ञा होतां दु:खी झाले । निरुपायें सत्वर निघाले । वडवाईचे रानीं राहिलें । खोपटा करोनी ॥९५॥
ग्रामी भिक्षा मागोनी । निर्वाह करिती आनंदानी । जप दासबोध वाचनी । क्रमिती काळ ॥९६॥
दासबोध विवरीत असतां । पक्षी बैसती सभोंवता । दाणे टाकिल्याही न खातां । श्रवणी होती तल्लीन ॥९७॥
तैसाचि माळी नामें हनुमान । श्रवणा बैसे येवोन । रामनाम अनुदिन । घेतसे भक्तीनें ॥९८॥
तयासी आधी झालें ज्ञान क। रामरुप पाहे भुवन । सर्पासी करी वंदन । रामराम म्हणोनि ॥९९॥
ऐसा चालिला । आनंदीआनंद वाढला । दिवस आला आणि गेला । हें न कळे तिघांसी ॥१००॥
सिध्ददशा पाहतां । माय वंदी आपले सुता । अनुचित गोष्टी हे तत्वतां । वदती आनंदसागर ॥१०१॥
तेही करिती नमस्कार । माय धरी त्यांचा कर । विश्ववंद्य सिध्द साचार । अज्ञानी मी मज न नमावें ॥१०२॥
उभयतां मध्यें वाद पडला । सद्गुरुनी तो मिटविला । उभयतांनी एकमेकाला । नमन कधीं करुं नये ॥१०३॥
उपासना बहू वाढली । सिध्द दशा येवू लागली । तवं इकडे गुरुमाउली । शिष्य्न भेटी चालिली ॥१०४॥
गुरू येती म्हणोन । माळियास झाले ज्ञान । उभयता सामोरे जाऊन । वंदिती गुरुपदा ॥१०५॥
संतुष्ट झाले गुरुवर । ठेविला मस्तकी वरद कर । दवडिले अज्ञान विकार । निजपद तया दधिल ॥१०६॥
तया मुखीं हनुमंतासी । देवविली अनुग्रहासी । हा भक्त योगी ज्ञानरासी । बहुतांशी तारील ॥१०७॥
उभयतांसी अधिकार दिला मंत्रानुग्रह करावयाला । वाढवावें श्रीउपासनेला । रामसेवा करीत जावी ॥१०८॥
रामपुरीं अयोध्येप्रती । हनुमान मठ स्थापिती । उपासना नाम वाढविती । बहुत प्रकारें ॥१०९॥
आनंद सागरा प्रती । मांदारमुळीचा मारुती । देवोनी पारंनरे अंबड प्रांती । तयालागी पाठविलें ॥११०॥
तेरा कोटी जप केला । अंबड जालन्या मठ स्थापिला । वाढविती उपासनेला । राममंदिरें दोहीकडे ॥१११॥
एकदां गोपाळ काल्यासी । श्रीकृष्ण आले गोपवेषी । दर्शन देवोनी भक्तासी पुन्हा अदृश्य जाहले ॥११२॥
श्रीगुरु वदती विवाहसी । करू आतां सत्वरेसी । आनंदसागर वदती आम्हासी । नसतें बंधन कासया ॥११३॥
मायेस पुसती विचार । तीही न दे रुकार । गोसावी केले आमुचे पोर । दुषण दिधले इंदुरीं ॥११४॥
विनोदें मागील स्मरण देता । माय विनवी श्रीगुरुनाथा । अज्ञानें भुरळ होती चित्ता । तवकृपें निवाली ॥११५॥
असो आग्रहें लग्न केलें । सावधासी बंधन कसले । पुत्रकन्यानी शोभविलें । सतशिष्य गृहस्थाश्रमी ॥११६॥
शिष्य शाखा वाढविली । नाम गुडी उभारिली । बहुतांची यातना सोडविली । अनुग्रह प्रसाद देवोनी ॥११७॥
कसा उतरल्यावाचोन । अनुग्रह न देती जाण । नसती विघ्ने येती दारुण । मम अनुग्रह घेतलिया ॥११८॥
आनंदपुरी वसावलें स्थान । नित्य पूजाअर्चा भजन । आल्या अतिथा अन्नदान । शरणांगता रक्षिती ॥११९॥
असो सद्गुरुप्रसाद । सेवितां झाला आनंद । पुढती कथा परिसा बिशद । ब्रह्मानंद सिध्दांची ॥१२०॥
इति श्रीसद गुरुलीलामृते अष्टोध्यायांतर्गत प्रथमसमास: । ओवीसंख्या ॥१२०॥
॥ श्रीगुरूपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 23, 2019
TOP