श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्राय नम: ।  श्रीरामसमर्थ ।
ब्रह्मचैतन्य सद्‍गुरुराणा । सकला सांगे उपासना । मुख्य स्मरणभक्ती जाणा । दुजी आत्मनिवेदन ॥१॥
आणिक ज्या राहिल्या भक्ती । त्यांकारणें मंदिरांप्रती । पाहिजे जाणोन चित्ती । करविती अनेक ॥२॥
भक्तीचे नवविध प्रकार । श्रवण कीर्तन नामगजर । सेवा अर्चन नमस्कार । दास्य सख्य निवेदन ॥३॥
घडतां नवविधा भक्ती । सहज मिळे जीवा शांती । नवविध भक्ती सहज घडती । मंदिरांमाजी ॥४॥
मंदिरीं पुराणश्रवण घडे । मंदिरीं कीर्ती डोळ्यापुढें । स्मरण तें मागें पुढें सहजचि राही ॥५॥
मंदिर बांधाया काज । सद्‍बोध हेंचि एक बीज । बोधकर्ता गुरुराज । दृष्टी समोर उभा ठाके ॥६॥
मंदिर असावें मलरहित । मंदिर असावे शोभिवंत । येणें न्यायें सेवा घडत । वंदन पहा प्रत्यक्ष ॥७॥
कोणी जातां मंदिरांत । तूं देव मी भक्त । दास्य भाव उमटत । आपोआप ॥८॥
आमुचा देव आमुचा धर्म । आमुची याती आमुचा नेम । आमुचे म्हणतांच सख्य परम । अंतरी वसे ॥९॥
मंदिरीं वसे देवमूर्ति । कैसें स्वरुप कैसी व्याप्ति । कैसेनि घडे भगवद्भक्ति । अनन्य जिज्ञासा होतसे ॥१०॥
जिज्ञासू करी श्रवण मनन । तेणे निजध्यास चाले गहन । निजध्यासे आत्मनिवेदन । नववी भक्ती घडतसे ॥११॥
असो ऐशा नऊ भक्ती । मंदिरीं साधका सहज घडती । याकारणें गुरुमूर्ती । मंदिरें स्थापिती अनेक ॥१२॥
मंदिर खरी धर्मशाळा । मंदिर उपासका जिव्हाळा । मंदिर आनंदाचा मळा । शिणल्या भागल्या जीवासी ॥१३॥
मंदिरी अन्नदान घडतें । मंदिरी मैत्री दुणावते । संत महंत भेट होते । सहज श्रीमंदिरी ॥१४॥
देशज्ञान कालज्ञान । नाना तीर्थक्षेत्रांचे ज्ञान । येणेचि रीती समाधान । बहुप्रकारें ॥१५॥
मंदिर बांधिता ससाहित्य । उभय कुळें उध्दरित । स्व्यें करुन करवित । उपासना बहुतांकरवी ॥१६॥
असो ऐसी मंदिरे किती । सद‍गुरु स्वहस्तें बांधिती । उपदेशें किती बांधविती । रावसाहेब यांचे करवीं ॥१८॥
महादेवभटट इंदुरवासी । पूजा करिती अहर्निशी । शेती पूजासाहित्यासी । दिधली असे ॥१९॥
बेलधडीस ब्रह्मानंद । स्थापिती रामप्रसाद । विदरहळ्ळी व्यंकटापुरीं प्रसिध्द मंदिरें बांधिलीं तयांनी ॥२०॥
आनंद सागरे जालनामठीं । स्थापिले श्रीराम जगजेठी । यात्रा महोत्साव दाटी । श्रीरामनवमीशी ॥२१॥
अंबड येथें दुसरें मंदिर । स्थापन करिती आनंदसागर । महोत्सव यात्रा गजर । रामसांप्रदाय वाढविला ॥२२॥
प्रसिध्द मंदिर पंढरपुरीं । जी श्रीविठठलाची नगरी । तेथें स्थापिलें कोंदंडधारी । पाहतां हारपे तहानभूक ॥२३॥
आप्पासाहेब भडगांवकर । मालक धनिक द्विजवर । मंदिर लहान सुंदर । निळकंठबुवा पुजारी ॥२४॥
महाभागवतांचे येथें । शिवालय पूर्वीचें होतें । मागें स्थापिलें रामातें । हरिहरसंगम शोभतसे ॥२५॥
सिध्दक्षेत्र कुरवली स्थान । तेथें मंदिर बांधिलें विस्तीर्ण । दामोदरबुवा शिष्य जाण । सुप्रसिध्द तयांनी ॥२६॥
भाऊ साहेब जवळगीकर । यांजकरवीं श्रीमंदिर । बांधविलें शहरी सोलापूर । उपासना करावया ॥२७॥
तैसेंच मंदिर गिरवीसी । येसूकाकांचे हस्तेशीं । पूजा करिती पिलंभटट जोशी । श्रीगुरुआज्ञेनें ॥२८॥
नानासाहेब धनिक वदत । विष्णुकाका साधकसंत । यांजकरवीं मांडवें येथें । राममंदिर करविलें ॥२९॥
सांवळाराम देशपांडे । दंडधारी नोकर गाढे । श्रीमान्‍ भरले द्रव्यघडे । बोधें अनुताप पावले ॥३०॥
तयांकरवीं श्रीराममंदिर । गोमेवाडी येथें सुंदरी । बांधवोनि केला परिहार । सत्कर्मे दुष्कृतांचा ॥३१॥
विष्णुअण्णा कात्रे पंत । नोकरी सोडून झाले विरक्त । मधुकरी निर्वाह करुनि सतत । भजन करुं लागले ॥३२॥
दत्तउपासना तयांनीं । घेतली सद्‍गुरुपासोनी । दत्तमंदिर आटपाडीं बांधोनी । सेवा करिती गुरुआज्ञें ॥३३॥
तेथेंचि राममंदिर । स्थापिती बुवा यज्ञेश्वर । जे गुरुचे भक्त थोर । सिध्दपुरुष ॥३४॥
धनिक साधक साधक गुणराशी । विष्णुपंत ह्मासुर्ण्यासी । स्थापिती सीता वल्लभासी । गुरुआज्ञा घेउनी ॥३५॥
विद्वान शंकरशास्त्री यांसी । श्रींनीं नेमिलें पूजेसी । सेवा करिती अहर्निशी । भक्त साधक प्रसिध्द ॥३६॥
वामनबुवा पेंढारकर । नामें श्रीगुरुकिंकर । मोरगिरी येथें मंदिर । रघुनाथाचें बांधिती ॥३७॥
करावया पूजोपचार । जगन्नाथ इंदुरकर । मदतीस देती गुरुवर । रामसंस्था चालावया ॥३८॥
भक्त वासुनाना देव । कृष्णातटीं कर्‍हाड गांव । तेथें पूजिती रामराव । गुरुबोध सेवोनियां ॥३९॥
मंदिरीं महंत बापु चिवटे । सेवा करिती एकनिष्ठें । अतिथीच्या ठाईए ममत्व मोठें । आदरें करिती अन्नदान ॥४०॥
गणुबुवा रामदासे । कागवाडीं करिती मंदिरासी । तेथें मारुती स्थापनेसी । महाराज करिती आनंदें ॥४१॥
गोविंदशास्त्री पुराणिक । दत्तोपासक भाविक । सातारीं दत्तमंदिर देख । बांधिती गुरुआज्ञेनें ॥४२॥
राममंदिर हुबळी शहरीं । चिदंबर नाइक करी । बांधोन करिती चाकरी । सद्‍गतीकारणें ॥४३॥
पुणें प्रांती उक्साण । तेथें विठठल मंदिर गहन । नरगुंदीं जीर्णोध्दार जाण । विठठलमंदिराचा करविला ॥४४॥
खातबळीं श्रीविठठलमंदिर । तैसेचि विखळे येथें सुंदर । मांजरडयास रघुवीर । स्थापिती गुरुआज्ञे ॥४५॥
संत दप्तरदार विठठलपंत । रसाळ कवित्व जगविख्यात । रामोपासक कर्‍हाडाक्षेत्रस्थ । होउनियां गेले ॥४६॥
त्यांच्या मूर्ती होत्या जरी । पाटन ग्रामीं स्थापविती घरीं । बाळकृष्ण महाजन सेवाधिकारी । उपासक श्रीगुरुंचे ॥४७॥
तैसेच कोंकणप्रांतांत । विप्र खेरडी ग्रामांत । शेबेकर वासुदेवाप्रत । आज्ञा जाहली श्रीगुरुंची ॥४८॥
उत्तम करोनी मंदिर तेथें । स्थापिले रघुवीरा । सेवा करिती मनोहर ।  पूर्वपातकें नाशाया ॥४९॥
सातपुडीं राममंदिर । भिल्लगृहीं परिसा चतुर । एकदां एकले गुरुवर । नर्मदातटीं चालिलें ॥५०॥
निबिड घोर कानन । भिल्लांची वस्ती तेथें गहन । पाहतां श्रीगुरुनिधान । धांवोन आले दुष्ट ते ॥५१॥
सतेज दिसे भाग्यवंत । वदती भला हा श्रीमंत । जवळी जावोन गांठी पहात । तंव दिसे गोसावी ॥५२॥
श्रीगुरु कफनी काढोन । देती आंगावर फेंकून । वदती न व्हा उदासीन । ऊर्णावस्त्र मोलाचें ॥५३॥
क्षण एक घडतां संगती । तयांसी झाली उपरती । सिध्दपुरुष हो निश्च्तिती । म्हणोनि चरणीं लागले ॥५४॥
आश्रम पुनित करावा । कांही फलहार घ्यावा । आम्हांसी प्रसाद द्यावा । म्हणोनियां विनवितीं ॥५५॥
वद्ले तेव्हां श्रीगुरु । तुम्ही पातकी वाटमारू । तेथें आम्ही प्रसाद करुं । तरी दोष आम्हांसी ॥५६॥
परी आग्रह धरिला त्यांनी । गोठणीं जाती घेवोनी । फळे देती आणोनी । अत्याग्रह मांडिला ॥५७॥
समर्थ वदती तयांसी । फळें नको तुमची आम्हांसी । बहुत दिसती गाईम्हशी । पय:पान कांही करुं ॥५८॥
भिल्ल वदती दोहनवेळ । होवोन गेलीजी दयाळ । रानटी जनावरें ओढाळ । या समयीं न देती ॥५९॥
समर्थ वदती भिल्लांसी । ही लठठ दांडगी महिषी । दोहन करूं स्वयें इजसीं । पात्र आण सत्वरीं ॥६०॥
छे: ही अति बुजरटा । मारकी आहे बहु खट । तुम्ही न धरा वाट । व्यंग करील देहासी ॥६१॥
समर्थ वदती तुम्हांस कांही । याची चिंता करणें नाहीं । ऐसे बोलत लवलाही । महिषीसी कुरवाळिलें ॥६२॥
तेव्हां ती स्थिर राहिली । समर्थे तिजसी दोहिली । द्विगुणित पात्रें क्षीरें भरलीं । आश्चर्य वाटलें भिल्लांसी ॥६३॥
वारंवार वंदन करिती । आणिक करिती विनंती । पावन करा आम्हाप्रंती । दुष्टकर्मी आम्हीं असों ॥६४॥
समर्थ वदती जरी तुम्हीं । द्रव्य वेचाल सत्कर्मी । तरी रामभक्ति शिकवूं आम्हीं । पावन व्हाल सर्वत्र ॥६५॥
भिल्ल वदती सर्वस्व दिलें । तेव्हां मंदिर बांधविलें । उपासने शिकविले । अनुग्रह दिला तयांसी ॥६६॥
असो ऐसे रानटी लोक । भजनीं लावी श्रीसद्‍गुरुनायक । येणेंपरी मंदिरें अनेक । स्थापिते झाले गुरुराव ॥६७॥
ठाई ठाई उपासना । ठाय़ी ठायीं अन्नदाना । तैसीच रामनामस्मरणा । सीमा नाहीं ॥६८॥
समस्त मंदिरवासी जनां । आज्ञा करी गुरुराणा । जेणेंकरुन यमयातना । सुटतील बहुतांच्या ॥६९॥
मंदिरवासी संतजन । ऐका एक हितवचन । अखंड करा नामस्मरण । आणि करवा बहुतांकरवीं ॥७०॥
अतिथी विन्मुख न दवडावा । तया रामचि मानावा । अन्नोदकें तृप्त करावा । यथाशक्ती ॥७१॥
अतिथीचा आदर करणें । हेचि ब्रीद राखणें । शक्ति नसता मागणें । निस्पृह भिक्षा ॥७२॥
कोणा घालो नये संकट । नम्रत्वें आसावें धीट । रामचरणीं भाव निकट । ठेवितां उणें पडो नेदी ॥७३॥
भूतीं असावी नम्रता । परनारी तितुकी माता । रामनामावाचून वृथा । श्वान जावों देवो नये ॥७४॥
उष:कालीं देह शुध्द । करोनि आळवा गोविंद । सडे रांगोळ्या भूमि शुध्द । मंदिर सोज्वळ असावें ॥७५॥
तदनंतर काकडआरती । भावें ओवाळा रघुपती । समस्तांसि द्या जागृती । भूपाळिया दीर्घस्वरें ॥७६॥
गणेश शारदा सद्‍गुरु । रामकृष्ण हरिहरु । तीर्थे परम योगेश्वरू । करुणा स्वरें आळवावें ॥७७॥
सुगंध सुमनें आणोनी । हार गुंफ निर्मळ मनी । तुळसीदळें आदिकरुनि । शक्य तितुकें मेळवावे ॥७८॥
स्नानसंध्या आन्हिक कर्म । करावे आपुले आश्रमधर्म । वेदप्रणित मार्ग दुर्गम । शक्य तितुके साधावे ॥७९॥
तिर्थोदक पंचामृत । न्हाऊं घाला भगवंत । वस्त्रें उपवस्त्रें समस्त । सर्वेश्वर पूजा ॥८०॥
धूप दीप नीरांजन । नैवेद्य दाखवा षड्र्सान्न । तांबूल दक्षणा देवोन । धूपारती करावी ॥८१॥
करावें दासबोध पठण । नित्यनेम समास दोन । मनबोध श्लोक गहन । दीर्घस्वरें म्हणावें ॥८२॥
इच्छित संख्या नामजप । करावा यथा संकल्प । सर्वकाल अजपाजप । करणेचा अभ्यास असावा ॥८३॥
रामह्रदय नित्यपाठ । सहस्त्र नामाचा घडघडाट । पूजासमयीं वेदपाठें । मंत्रोच्चार करावा ॥८४॥
पवमान आणि पुरुषसूक्त । पठणें संतोषें रघुनाथ । रुद्राभिषेकें वायुसुत । भक्तिभावें पुजावा ॥८५॥
उपासनेचे बहु प्रकार । लिहितां होय विस्तार । साधितां प्रपंचव्यवहार । अध्यात्मविवरण करावें ॥८६॥
मंदिर म्हणजे सध्दर्मशाळा । बहुत जीवां लावा चाळा । दावोन उपासना सोहळा । दुर्बुध्द सुबुध्द करावे ॥८७॥
सायंकाळी करावें भजन । टाळ-वीणा मृदंगवादन । लहानथोर मिळवोन । रामभजनीं लावावें ॥८८॥
अष्टकें सवाया धावे । धूप दीप नैवेद्य बरवे । आरती मंत्रपुष्प अर्पावे । रामरायासी ॥८९॥
कापूरआरती शेजारती । नित्य करावी रघुपती । तैसाचि नमावा मारुती । मंदिरवासी जनांनी ॥९०॥
असो ऐसी मंदिरें बहुत । बांधविती श्रीगुरुनाथ । उपासना वाढविती बहुत । वर्णिता वाणी खुंट्ली ॥९१॥
असो मानसपूजा बहुतांशी । प्रिय असे श्रीगुरुसी । प्रत्यक्ष पूजेहुनि मानसीं । होय चित्त एकाग्र ॥९२॥
बहुतांसी साक्षात्कार होती । कांही चुकतां खूण देती । पुष्पें घालितां परिमळ सुटती । ज्या त्यापरी प्रत्यक्ष ॥९३॥
मानस पूजा नाहीं केली । प्रत्यक्ष असोन भेटी झाली । नाही वदे गुरुमाऊली । खूण अंतरसाक्षीची ॥९४॥
हा बहुतांसी अनुभव । मानसपूजा शुध्द भाव । नामस्मरणीं गुरुदेव । करितां पावे तात्काळ ॥९५॥
पुढील अध्यायीं निरुपण । सद्‍गुरु करिती कथन । भक्तिमार्गी अज्ञजन । कैसे कैसे लाविले ॥९६॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणें स्वानंदसोहळा । पुरविती रामदासी याचा लळा । कृपाकटाक्षें ॥९७॥
 इति श्रीसद‍ गुरुलीलामृते नवमोध्यायांतर्गत चतुर्थ समास:। ॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥ श्रीसीतारामचंद्राय नम: ।  श्रीरामसमर्थ । श्री हनुमान महारुद्रकी जय । अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद । श्रीसद्‍गुरु ब्रह्मचैतन्यमहाराजकी जय ।  ओवीसंख्या ॥९७॥
॥ एकंदर अध्यायाची ओवीसंख्या ३२९ ॥
॥ इति नवमोध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP