श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुचरणारविंदाभ्योनम: । श्रीराम समर्थ ।
नमो पुरुषा गणपती । शारदा सुविद्या प्रकृती । नमो स्वयंसिध्द ज्योती । चैतन्यब्रम्ह ॥१॥
नमो सकळ श्रोतेजन । धन्य तुमचें कृपादान । वारंवार प्रोत्साहन । देऊन ग्रंथ वदविला ॥२॥
ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ति । उपजली कोणे रीति । कोणेपरिनें समाप्ति । जाहली ती परिसावी ॥३॥
घेतां श्रींनी समाधी । तीन संवत्सर गेली अवघी । परि श्रीचरित्रासंबंधी । कोणी कांहीच बोलेना ॥४॥
श्रींचे शिष्य ज्ञानी । एकाहुनि एक द्विगुणी । प्राचीन आर्वाचीन दोन्ही । शास्त्रांमाजिं प्रवीण ॥५॥
कांही अपरोक्षज्ञानी सिध्द । जयांवरी सद्‍गुरुप्रसाद । अधिकारी मठपती प्रसिध्द । सांप्रदाय वाढविते ॥६॥
परि कारण तें वेगळें । कांहीनीं लिहों आरंभिलें । तयां श्रीगुरु वदले । लिहूं नये कोणीहि ॥७॥
ग्रंथ लिहिणार वेगळा असे । तो लिहील आनायासें । उचित काळी पहा खासे । तुम्हीं स्थीर रहावें ॥८॥
ऐसी झाली मागें भाक । तेणें स्थीर सकल लोक । नातरी एकाहून एक अधिक । ज्ञानी चतुर गुरुभक्त ॥९॥
आणिक एक मुख्य कारण । आत्मश्लाघा निष्कारण । श्रवणीं न पडावी म्हणोन । आज्ञा न देती कवणासी ॥१०॥
तो काल निघोन गेला । परि भाव तैसाचि उरला । आज्ञा नसे कवणाला । प्रसाद कोणा कळेना ॥११॥
कोणी प्रयत्न करूं जातां । तया निवारिती सर्वथा । तुम्हांसि नसे पात्रता । पुण्य पुरुष पाहिजे ॥१२॥
माहिती कोणा न देती । प्रसंग आल्याहि छपविती । स्फूर्तिदाते गुरुमूर्ति । दोष नसे कवणाचा ॥१३॥
असो इतुक्याहि प्रसंगांत । आम्हां स्फूर्ति अवचित । झाली परि वदाया मात । वाव कोठें दिसेना ॥१४॥
विद्या नाहीं दीक्षा नाहीं । सहवास सेवा बहुत नाहीं । वैभव मान्यता कांहीच नाही। स्फूर्तिमात्र दुणावली ॥१५॥
श्रीसमाधीनंतर । ब्रह्मानंद भक्त थोर । गुरुरुप मानिती साचार । सकलहि गुरुभक्त ॥१६॥
तयांसि कैसें पुसावें । सूर्यापुढती जैसें काजवे । स्वयें कैसें प्रकाशावें । श्लाध्य नोहे ॥१७॥
यास्तव चरित्रदिद्गर्शन । नमस्कारत्रायोदशीं म्हणोन । श्लोक रचिले हेतु धरोन । चरित्र लेखनाचा ॥१८॥
तेहि हरिदास यांचेकरवीं । दावोनि आज्ञा घेतली बरवी । तेणे टवटवी आली नवी । स्फूर्तीसि सिध्द वाक्यें ॥१९॥
याउपरी औदासिन्य । माहिती अभावी आलें गहन । गुरुभक्त उघडिती न वदन । तोंहि एके दूर केलें ॥२०॥
कागवाडकर रामदासी । पत्र देती हरिदासांसी । उभयतां मिळोन मजसी । साह्य केलें मनोभावें ॥२१॥
कांही ग्रंथ पाहिल्यावरी । प्रासादिक वदलीं सारी । मग माहिती पुरी अपुरी । कांही देवो लागले ॥२२॥
गोखले उपनामी भले । लेखनसाह्य त्यांनी केलें । बहुतीं प्रोत्साहन दिलें । वरी छाया गुरुकृपा ॥२३॥
शके अठराशें चाळिस । पुण्यतिथि मार्गशीर्ष । ग्रंथारंभ गोंदावलीस । श्रीसन्निध जाहला ॥२४॥
बुधग्रामीं साग्र लिहिला । श्रीकृपें पूर्ण झाला । अठराशेबेचाळिसाला । अर्पण केला गुरुचरणीं ॥२५॥
श्रीकृपेची उत्तरें । वेडिवाकुडीं लिहिलीं बरें । सेवन करा क्षीरनीरें । हंसदृष्टि देवोनी ॥२६॥
बहुत मतें एकवटोनी । कांही स्वानुभव घेवोनी । कथा लिहिल्या ग्रंथसदनी । सत्य आणि निवडक ॥२७॥
सद्‍गुरुलीला अनंत अपार । काव्य काय उतरील पार । कांही सत्य आणि साधार । असती त्या घेतल्या ॥२८॥
क्वचित्‍ शब्दभेद झाला । तरी बाध नये तत्वाला । तत्वदृष्टि घेऊन चाला । श्रोतेजन भाविकहो ॥२९॥
घुगरदरे सोलापूरकर । श्रींचे आप्त आणि चतुर । यांनीहि चरित्र मधुर । गद्य लिहिलें श्रींचें ॥३०॥
धीट पाठ प्रासादिक । करि गद्यपद्यात्मक । श्रींचें दरबारीं अनेक । सेवा करिती यथाशक्ति ॥३१॥
आरती सवाई अष्टक । पद अभंग आणि श्लोक । भूपाळि गद्येंहि अनेक । भक्त स्तविती श्रीगुरु ॥३२॥
कोकिळकंठ प्रेमळवाणी । रुपलावण्य इंद्रियें देखणीं । कवित्वशक्ति चातुर्य खाणी । देणें भगवंताचें ॥३३॥
कांही जे उपजत ज्ञानी । एकपाठी असती कोणी । सरळ नासिका गौवर्णी । देणे हें भगवंताचें ॥३४॥
राजयासी पुत्र झाला । आणि पांगुळाच निपजला । ईश्वरीकरणी तयाला । मानव बापुडें काय करी ॥३५॥
हिरण्यकश्यपूसि प्रल्हाद । हा ईश्वरी प्रसाद । सुररिपुच्या गृहीं शुध्द । देवभक्त निपजला ॥३६॥
तैसें साधन ना भजन । नाही केले शास्त्राध्यायन । परी गुरुकृपा गहन । देणें भगवंताचें ॥३७॥
कर्ता तो वेगळाचि असे । देहबुध्दी लावी पिसें । अहंकार माथा बैसे । अधोगति न्यावया ॥३८॥
भाग्यें कामधेनु आली । तेणें संपत्ति दुणावली । कृपणत्वें खादाड दिसली । मग मांडिला विक्रय ॥३९॥
धेनु धन सकल गेलें । दैन्यवाणें उगाचि शिणले । यास्तव देहबुध्दीवेगळें । साधकें असावें ॥४०॥
तैसी ही प्रसादवाणी । लिहविता सद‍गुरु धनी । गुरुबंधू आयतनी । कथा कथिते ॥४१॥
लेखक द्विज चितपावन । ऋग्वेद शाखा आश्वलायन । अत्रिगोत्र फडके म्हणून । उपनामें संबोधिती ॥४२॥
वासस्थान तासगांव । विष्णु यशोदा जनकदेव । गोपाल ऐसें वदती सर्व । तुम्हीं श्रोते जाणावें ॥४३॥
रामदासीबुवा ऐसे । सद्‍गुरुमाय वदतसे । ग्रंथी निर्दैश तोचि असे । श्रोतीं आक्षेप न धरावा ॥४४॥
वामनबुवा मठ मोरगिरी । सद्‍गुरुसेवा मानोन बरी । शुध्द लिपी लिहोनि सत्वरी । बहुपरी साह्य केलें ॥४५॥
ग्रंथ नव्हे हा प्राचीन । सरणी नव्हे अर्वाचिन । कोणा वाटे अधिक न्यून । तरी क्षमा असावी ॥४६॥
ग्रंथ नव्हे सुलभ गद्य । ग्रंथ नव्हे गूढपद । वेडेवाकुडे दोन शब्द । गुरुचरणीं अर्पिले ॥४७॥
श्रृंगार हास्य शोकात्मक । रस जे रजतमात्मक । साधका होती बाधक । तोहि येथें त्यागिले ॥४८॥
भक्तिरस सत्वप्रधान । सद्‍गुरुचा महिमा गहन । उपदेशवचनें प्रमाण । घेतली संतउच्चिष्ठें ॥४९॥
वेदांत सिध्दांत धादांत । नीतिव्यवहार परमार्थ । गुरुभक्तांचा अनुभव येथ । शोधित सत्य वर्णिला ॥५०॥
गुरुलीला ही साधार । परि कांही सोडिला प्रकार । जेणें दुखवेल परांतर । ऐसें दृष्टातें त्यागिले ॥५१॥
कांही भाग लिहिला होता । परि दृष्टांत होय अवचिता । निंदकाचे गुण वर्णिता । लाभ काय तुह्मांसी ॥५२॥
असो प्रत्यक्ष असतां श्रीगुरुवर । निंदकां करिती उपकार । तैसाच ग्रंथगर्भी प्रकार । गुरुआज्ञेनें जाहला ॥५३॥
गुरु दयेची माउली । गुरु शांतीची साउली । गुरु आनंदा घरकुली । गुरु माय सर्वाची ॥५४॥
षड्‍गुणैश्वर्यसंपन्न । सद्‍गुरु माझें निधान । भक्तांसि सदा प्रसन्न । स्वानंदरस वर्षतसे ॥५५॥
असो महात्म्य श्रीगुरुचें । शब्दातीत अगम्य वाचे । शब्दस्वरुप दिधलें काचें । ह्मणूनि क्षमा भाकितों ॥५६॥
सद‍गुरु एक बुध्दिदाता । कर्ता वक्ता आणि श्रोता । सूक्ष्म देहअहंता । समरस होवो श्रीचरणीं ॥५७॥
जें जें कांही घडे कर्म  । तें तें अर्पावें हा धर्म । तैसी अहंताहि दुर्गम । श्रीसेवें लाविती ॥५८॥
समर्थ सद्‍गुरुंची कीर्ति । साधकां मार्गदर्शी ज्योति । जे कोणी भावें गाती । प्रसाद होय तयांवरी ॥५९॥
सद्‍गुरुलीला करितां श्रवण । अखंडा होय समाधान । नाना शंकाचें निरसन । होय येथें ॥६०॥
प्रपंच साधोन परमार्थ । कैसा साधावा निजस्वार्थ । हेंहि सद‍गुरु समर्थ । बोधिती या ठायीं ॥६१॥
सद्‍गुरुच्या प्रतिमा अनेक । त्यांहूनि विशेष हें रुपक । येथें साक्षात्‍ गुरुनायक । वास करिती अक्षरीं ॥६२॥
वेद तोचि विश्वंभर । तैसी लीला गुरुवर । येथें रोकडा साक्षात्कार । भाविकांसि होईल ॥६३॥
रामायण हरिवंश । पूजित प्रसन्न जगदीश । पूजितां सदगुरुलीलेस । गुरुमाय संतोषे ॥६४॥
या ग्रंथाची सेवा करितां । सद्‍गुरु देईल विसावा । तातत्रयांतून जीवा । सोडविल धरा विश्वास ॥६५॥
सद्भावें ग्रंथ श्रवण करितां । जाईल समंध भूतव्यथा । चेडेंचेटुका वार्ता । न चले येथें ॥६६॥
देह प्रारब्धाधीन । हें पूर्वीच गेलें नेमोन । उपाय करितां अधिकन्यून । समर्थकृपें होतसे ॥६७॥
निपुत्रिकां पुत्रप्राप्ती । दरिद्रिया धनप्राप्ती । रोगग्रस्तां रोगमुक्ती । सद्‍गुरुमाय देईल ॥६८॥
बध्दासि होय अनुताप । मुमुक्षुसि साधन स्वल्प । साधकासि ज्ञानदीप । गुरुमाय दावील ॥६९॥
दृढ श्रध्दा विमल भाव । असतां जवळीच गुरुराव । मग त्रिविधताप मायोद्भव । दूर जाती पळोनि ॥७०॥
सद्भावें सेवा करितां । वाहील सद्‍गुरु त्याची चिंता । भवसिंधुवरोनि तारिता । युक्ति प्रयुक्ति होईल ॥७१॥
सेवेचे बहुविध प्रकार । मुख्य श्रवणमनन आचार । सप्ताह पूजा नमस्कार । प्रदक्षिणा ही उपांगें ॥७२॥
जैशी असेल कालगति । जैसी ज्याची शक्ति मति । तैसी भजावी गुरुमूर्ति । परमपावन गुरुलीला ॥७३॥
सद्‍गुरु माय दयावंत । भोळाभाव सिध्दीस नेत । यास्तव न धरितां किंत । यथाशक्ती आळवावी ॥७४॥
बहुत श्रोते प्रश्न करिती । सप्ताह करावा कवणें रीति । कैसी होय फलप्राप्ति । कथन करावें ॥७५॥
वक्ता वसे बरवें पुसिलें । वंदन करोनि गुरुपाउलें । कथितों अवधान द्या भले । श्रोते तुम्ही भाविक ॥७६॥
अंत:शुची बाह्यशुची । स्थानशुची द्रव्यशुची । श्रोतृसमुदाय शुची । शक्य तितुकें साधावें ॥७७॥
निष्काम पाठ मुख्य धर्म । सकाम हा उपधर्म । दोही ठायी हरती श्रम । सद्‍गुरु दयावंत ॥७८॥
स्नानसंध्या करोनि । भक्तिभावें पूजोनि । सोज्वळ दीप ठेवूनि । ग्रंथारंभ करावा ॥७९॥
ओवी वाचिल्यावरी । श्रीराम म्हणा सत्वरी । ऐसी प्रति ओवीसि वैखरी । श्रीरामी लावावी ॥८०॥
येणें सद्‍गुरु तोष पावे । येणें फल दुणावें । सेतु बांधिला जैसा देवें । तैसा परमार्थ साधेल ॥८१॥
ही गुरुघरची सरणी । श्रोते नीट धरा ध्यानी । नित्य दोन अध्याय वाचोनि । नैवेद्य आरती करावी ॥८२॥
सात्विक आहार मृदुवचन । ब्रह्मचर्य नामस्मरण । इतुकें होता तात्काळ विघ्न । गुरुकृपें निसेल ॥८३॥
तीन दिनी अध्याय सहा । चवथे दिनीं सातवा पहा । मननरुपें वाचावा हा । पान करा बोधामृत ॥८४॥
पुढें तीन दिनपर्यंत । प्रतिदिनी दोहींप्रत । वाचोन सप्ताह समाप्त । सांगता करावी ॥८५॥
सांगता मुख्य लक्षण । नामस्मरण अन्नदान । सात्विक द्रव्य मेळवून । यथाशक्ति करावें ॥८६॥
आषाढ शुध्द पौर्णिमेसी । अवश्य करा सप्ताहासी । गुरुपूजा ते दिवशीं । उत्सव प्रिय गुरुभक्तां ॥८७॥
कली प्रबल झाला मोठा । श्रध्देसि मारिला चपेटा । परि प्राचीन सुलभ वाटा । साधकें न सोडाव्या ॥८८॥
वरी दिसले मोहक । अंतरी अति भयानक । साधकें नसावें वंचक । लोकेषणें कदापि ॥८९॥
दुरित दुखाविणें परांतर । सुकृत दया सदाचार । साधन रामनाम सार । वैराग्य परम वैभव ॥९०॥
शेवटी एक विनवणी । लय लागो नामस्मरणीं । घेऊं जगदीश नेमोनी । गुरुचरणीम विसावा ॥९१॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणी स्वानंदसोहळा । पुरविती रामदासी यांचा लळा । कृपाकटाक्षें ॥९२॥

इति श्रीसद‍ गुरुलीलामृते त्रयोदशोऽध्यायांतर्गत चतुर्थ समास :। श्रीसद्‍गुरुचरणारविंदार्पणमस्तु । श्रीराम समर्थ ।
एकुण अध्याय १३ । समाप्त ५६ । ओवीसंख्या ४३८८ । अध्याय ओवीसंख्या ३११ । श्रीसद्‍गुरु ब्रह्मचैतन्य
महाराजकीजय । जयजय रघुवीरसमर्थ ॥ श्रीराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP