भागवतमाहात्म्य - अध्याय ४ था
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
२४
सज्जनहृदयीं भक्ति आविर्भूत - । होतां, भगवंत तेथें ॥१॥
वनमाळी घन:श्याम मनोहर । शोभे पीतांबर भरजरी ॥२॥
मुकुट कुंडलें कौस्तुभही शोभे । कोटि मन्मथांचे रुप जया ॥३॥
चंदनचर्चित आनंदस्वरुप । मधुर तें रुप मुरलीधारी ॥४॥
वासुदेव म्हणे भक्तिभावें हरि । प्रगटे यापरी हृदयामाजी ॥५॥
२५
गुप्तरुपें उद्धवादि । कथा श्रवणासी येती ॥१॥
होई थोर जयजयकार । कथारसीं येई पूर ॥२॥
अबिर, बुक्का उधळिती । बहु शंखनाद होती ॥३॥
श्रोत्यांसी न राहे भान । जाती देहही विसरुन ॥४॥
पाहूनियां ते अवस्था । हर्ष होतसे नारदा ॥५॥
पशु-पक्षीही निष्पाप । झाले अपूर्व हा शोध ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा । थोर महिमा सप्ताहाचा ॥७॥
२६
सदा पापरत तेही उद्धरती । कुमार सांगती महिमा ऐका ॥१॥
कामी, क्रोधी तेंवी कुटिलही जन । सप्ताहें पावन कलीमाजी ॥२॥
अनृतवादी जे मातृपितृद्वेष्टे । आश्रमत्यागी जे तृष्णाकुल ॥३॥
दांभिक, मत्सरी, हिंसकही जन । सप्ताहें पावन कलीमाजी ॥४॥
निर्दय जे क्रूर पंचमहापापी । लुटिती विप्रांसी व्यभिचारी जे ॥५॥
काया-वाचा-मनें पातकी जे घोर । त्यांचाही उद्धार सप्ताहानें ॥६॥
वासुदेव म्हणे पुरातन एक । कथिती वृत्तांत ऐका मुनि ॥७॥
२७
तुंगभद्रातीरीं पुण्यनगरासी । धार्मिक जनांची वसती बहु ॥१॥
‘आत्मदेव’ नामें विप्र एक तेथ । ‘धुंधुलि’ नामक कांता तया ॥२॥
संपन्न त्या विप्रा नव्हतें अपत्य । तेणें जन्म व्यर्थ वाटे तया ॥३॥
अंती तो तपार्थ काननांत जाई । एके दिनीं पाही यति एक ॥४॥
सरोवरतीरीं दु:खी ब्राह्मणासी । पाहूनि यतीसी दया येई ॥५॥
पुशितां यतीसी कथी विप्र वृत्त । वासुदेव चित्त द्यावें म्हणे ॥६॥
२८
विप्र म्हणे मुने, धेनूही ते वंध्या । सदनांत माझ्या काय करुं ॥१॥
आम्रवृक्ष द्वारीं लावितां तयासी । पुष्प फळ कांहीं येईचिना ॥२॥
ऐकूनियां पाही दिव्यज्ञानें यति । म्हणे न तुजसी पुत्र बापा ॥३॥
सप्तजन्म तुझे शोधूनि पाहतां । वैराग्याचा पंथा योग्य तुज ॥४॥
विप्र म्हणे व्यर्थ वैराग्य संन्यास । देईं मज पुत्र दयावंता ॥५॥
पुत्राविण मज वाटे सर्व व्यर्थ । सोडीन समक्ष प्राण आतां ॥६॥
वासुदेव म्हणे तदा दयाशीलें । विप्रास अर्पिलें फळ एक ॥७॥
२९
यति म्हणे फळ भक्षावें उभयांनीं । सत्यव्रत जनीं होऊनियां ॥१॥
एकभुक्त तव पत्नी एक अब्द । होतां पुत्रलाभ तिजसी घडे ॥२॥
बोलूनियां गेला संन्यासी यापरी । विप्र तैं सत्वरी सदनीं आला ॥३॥
निवेदूनि वृत्त कांतेसी सकळ । अर्पूनियां फळ रमला कायीं ॥४॥
वासुदेव म्हणे अतर्क्यचि देव । करीतसे खेळ पहा केंवी ॥५॥
३०
विप्राची त्या कांता धुंधली खटयाळ । भक्षूनियां फळ म्हणे क्लेश ॥१॥
अन्नद्वेष तेंवी उदर विशाल । प्रसूतीचे हाल, अडतां नाश ॥२॥
अथवा द्वादश वर्षे शुकासम । घडतां ते श्रम केंवी सोसूं ॥३॥
चिंतूंनियां ऐसें कथी भगिनीसी । दिवस तिजसी गेले होते ॥४॥
बाळ माझें तुज देईन ती म्हणे । धेनूसी सौख्यानें अर्पी फल ॥५॥
वासुदेव म्हणे योजूनियां ऐसें । अर्पिलें धेनूतें फल तदा ॥६॥
३१
भक्षियेलें फल कथूनि पतीतें । गर्भारपणाचें करी सोंग ॥१॥
भगिनि प्रसूत होतां अर्पी बाळ । संतुष्ट तैं विप्र पुत्रलाभें ॥२॥
करी दानधर्म अत्यानंदें विप्र । जातकर्मादिक कर्म करी ॥३॥
कांता म्हणे दुग्ध नसे मजप्रती । मृतापत्या ताई गृहीं आणा ॥४॥
अनुज्ञा विप्रानें दिधली तियेसी । दिन ऐशारीति कंठिताती ॥५॥
धुंधुकारी नाम तयासी ठेविलें । वासुदेव बोले पुढती ऐका ॥६॥
३२
ऐसे तीन मांस होतां बालकासी । जाहल धेनूसी पुत्ररत्न ॥१॥
सर्वांगसुंदर दिव्य कनकप्रभ । साश्चर्य तो विप्र करी विधि ॥२॥
कौतुकें धेनूचा पुत्र अवलोकाया । जन तया ठाया धांव घेती ॥३॥
रहस्य कोणाही नकळेचि परी । विस्मय अंतरीं करिती जन ॥४॥
धेनूसम कर्ण होते त्या बाळाचे । ‘गोकर्णचि’ ऐसें नाम त्याला ॥५॥
वासुदेव म्हणे विप्राच्या सदनीं । यौवनीं पातलीं दोन्हीं बाळें ॥६॥
खल, दुर्जन तो झाला ‘धुंधुकारी’ । ज्ञाता सदाचारी ‘गोकर्ण’ तो ॥१॥
अगारदाहक पापकर्मी रत । चांडालाभिरत पाशहस्त ॥२॥
वेश्याकुसंगानें वित्तहीन झाला । माता-पितरांला ताडी स्वयें ॥३॥
अंतीं विप्र म्हणे भलें तें वंध्यत्व । दु:खद कुपुत्र काय करुं ॥४॥
वासुदेव म्हणे निराश विप्रासी । ‘गोकर्ण’ उपदेशी वैराग्यातें ॥५॥
३४
असार संसार कोणी न कोणाचें । सौख्य विरक्ताचें इंद्राहूनि ॥१॥
त्यागूनियां सर्व जावें वनामाजी । विप्र म्हणे कैसी वेळ घोर ॥२॥
गोकर्ण तयासी म्हणे हे ममता । त्यागूनि वनाचा मार्ग कंठीं ॥३॥
त्यागूनियां काम राग त्या गोविंदा । भजतां आनंदा पावसील ॥४॥
ऐकूनियां ‘आत्मदेव’ वनीं जाई । दशम तो गाई नियमें स्कंध ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णदर्शन । पावूनियां धन्य विप्र अंतीं ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 31, 2019
TOP