द्वितीय स्कंधाचा सारांश
या स्कंधांत अध्याय १०, मूळ श्लोक ३९१, त्यांवरील अभंग ६०
मोक्षप्राप्तीचे उपाय, मृत्युकाल समीप येत चालला असतां काय करावें ? धारणा कशी करावी. ज्याची धारणा करावयाची त्या विराट पुरुषाचें वर्णन, सकाम कर्माचे दोष, विधिनिषेधरुप सर्व कर्मांची आसक्ति सुटून मीच आत्मस्वरुप आहें या बोधापेक्षां ज्ञात्यास अन्य कांहींही प्राप्त करुन घ्यावयाचें नसतें. आत्म्यावर कालाचा परिणाम होऊं शकत नाही; हें जाणून घ्यावयाचें नसतें. आत्म्यावर कालाचा कांहींच परिणाम होऊं शकत नाही; हें जाणूण देहत्याग कसा करावा, ब्रह्मलोकांत जाणारांच्या तीन गति, भक्तांची ईशपदीं लीन होण्याची प्रक्रिया हे महत्त्वाचे विषय सांगून नंतर विविध कामनापूर्तीसाठी कोणाची उपासना करावी आणि ईश्वरप्राप्तीसाठीं काय करावें तें सांगितलें आहे. हरिभक्तीवांचून सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. असें प्रतिपादून पुढें परीक्षितीनें शुकाचार्यास अनेक महत्त्वाचे प्रश्न केले आहेत. त्याचीं उत्तरें देण्यापूर्वी श्रीशुकांनीं परमेश्वराची स्तुति केली व पूर्वी नारदांनीं ब्रह्मदेवाला हेच प्रश्न केले असतां त्यानें जी उत्तरें दिलीं तींच उत्तरें राजाला दिलीं आहेत. त्यांत ब्रह्मदेव कोणाची उपासना करितो, सृष्टीची उत्पत्ति कोण करितो, त्या उत्पत्तीचा क्रम कसा आहे, तिच्या स्तिति व लयाचा प्रकार, ईश्वरभक्तीचा प्रभाव. ईश्वरचे कार्यरुप, गुणरुप आणि भक्तरुपी अवतार इत्यादि. पुढें ईश्वराच्या विशेष अवतारांची ब्रह्मदेवानें नारदास माहिती सांगितली आहे. एक वेळ भूरज:कणांचीही गणनां होऊं शकेल परंतु भगवंताच्या लीलांची गणना होऊं शकणार नाहीं. त्याच्या मायेचा अंत नाहीं तिचें यथार्थ स्वरुप फारच थोडया भक्तांना कळलें आहे. तेव्हां नारदा, तूं त्या निर्गुण परमात्म्याचें वर्णन करुन लोकांच्या मनात त्याची भक्ती रुजेल असें कर; असें ब्रह्मदेवानें नारदांस सांगितलें. हें ऐकून राजा शुकांना म्हणाला, देव आणि मानव यांत भेद काय ? कल्प कशाला म्हणतात ? त्याच प्रमाणें विविध लोकांचे धर्म कोणते ? या व अशा अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठीं शुकांनीं मायेचें वर्णन, ब्रह्मदेवास झालेलें वैकुंठदर्शन, त्याला भगवंतांनीं सांगितलेलें चतु:श्लोकी भागवत इत्यादि विषय सांगितले. पुढे शुकांनीं राजाला सर्ग, विसर्ग, स्थान इत्यादि भागवतांत आलेले अनेक विषय, नारायण नांवाची उपपत्ति, ईश्वराचें स्थूल स्वरुपवर्णन इ. पुढील अभंगांत वाचा.
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP