वासुदेव जयंती - विनायक-वासुदेव ऐक्यभावद

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


वासुदेव वासुदेव । माझ्या देहींचा हा जीव ॥१॥
अंतरात्मा माझा हाच । सद्गुरु माझा एक हाच ॥२॥
हाच गुरु परमात्मा । हाच मज आनंदात्मा ॥३॥
हाच जीवींचे जीवन । हाच माझे सर्व जाण ॥४॥
माझी आस वासुदेव । भूक तहान वासुदेव ॥५॥
वासुदेव प्रिय मज । वासुदेव माझे निज ॥६॥
प्रियरुप वासुदेव । प्रिय हाच त्याचा भाव ॥७॥
वासुदेवी मिसळलो । दु:ख सर्व विसरलो ॥८॥
सुखमय असे झालो । किती सांगूं सुखावलो ॥९॥
विश्रांतीचा माझा भाव । स्वामी एक वासुदेव ॥१०॥
माझ्याठायी संचरला । ह्रदयांत तो भरला ॥११॥
माझे वाचेने स्फ़ुरत । तेणे प्रत्ययासी येत ॥१२॥
वासुदेव माझे रुप । वासुदेव हा उमोप ॥१३॥
आदि-अंत त्यासी नाही । अनाद्यंत असे पाही ॥१४॥
अनंत प्रभु वासुदेव । सकळ विश्व हे वैभव ॥१५॥
सगुणाचा हा विस्तार । वासुदेव रुपे साचार ॥१६॥
वासुदेवमय झालो । वासुदेवी मी विरालो ॥१७॥
कोठे शोधूं मी आपणा । कोठे करु अन्वेषणा ॥१८॥
सकळ तेजचि भरले । तेजोमय सकळ झाले ॥१९॥
अग्निमाजी अग्नि जैसा । दीपामाजी दीप जैसा ॥२०॥
तेजामाजी तेज तैसे । मिसळोनी गेले कैसे ॥२१॥
आतां गवस पडेना । गेली द्वैताची भावना ॥२२॥
विनायक वासुदेव । झाला असे ऐक्य भाव ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP