उत्सवाची मागणी - करुणदेवास विनंति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १२-६-१९३०
उत्सव तूझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
करुणेने आळवीतो । उत्सव सिद्धी मी मागतो ॥२॥
आम्हां लेकरांचे साठी । नट येथे जगजेठी ॥३॥
करुणामय प्रगटावे । कारुण्याने अनुग्रहावे ॥४॥
कोण सांग वालि आम्हां । तुजविण परंधामा ॥५॥
करुणेची दे जाणीव । कारुण्याचा अनुभव ॥६॥
करुण तूज बोलताती । करुण तूज वर्णिताती ॥७॥
करुण मूर्ति येथे ठाक । आम्हां देई आतां भाक ॥८॥
देई आम्हां आर्शिर्वाद । होई नाथा तूं वरद ॥९॥
करुणेने आम्हां पाही । करुणेने ये लवलाही ॥१०॥
करुणेचे आश्वासन । द्यावे तुंवा करुणाघन ॥११॥
आम्हांवरी करुणा करी । आम्हांठायी तिच भरी ॥१२॥
करुणरस तव कार्यात । होवो उत्कर्षे उद्भूत ॥१३॥
तुजपाशी करुणा आहे । म्हणुनि धांव लवलाहे ॥१४॥
करुणेविण धांवण्यासी । कोण करी लगबगेसी ॥१५॥
जेथे आहे करुणा जाण । तेथेच वसे प्रियपण ॥१६॥
करुणेविण प्रियतमांही । प्रेमपान्हा नाही नाही ॥१७॥
आई बाप तूज म्हणतो । करुणा लक्षण लक्षितो ॥१८॥
करुणा हाच विशेष जाणा । म्हणुनी तुम्हां प्रियपणा ॥१९॥
आमुचे ऋण असे करुणा । तुजपाशी नारायणा ॥२०॥
करुणेने लीन करी । आमुचा तूं नरहरी ॥२१॥
कारणे याच प्रार्थितसो । साक्षात्कारा मागतसो ॥२२॥
तूझे कार्य सिद्ध व्हावे । यश जगी प्रगटावे ॥२३॥
बडिवार आमुचा व्हावा । तूजसाठी रमाधवा ॥२४॥
सकळ सिद्धता करावी । न्यूनता कांहीही नसावी ॥२५॥
संपूर्ण व्हावे तुझे कार्य । व्हावे आम्हां पूर्ण साह्य ॥२६॥
आपणचि करोनियां । महत्व आम्हां देवोनियां ॥२७॥
भक्तवात्सल्याते दावी । ऐशी थोर कृपा व्हावी ॥२८॥
करुणा सिंधू तुझे नाम । सार्थ करी परंधाम ॥२९॥
विनायक पद दास । पुरवावि याची आस ॥३०॥
==
गुरुवार ता. १९-६-१९३०
उत्सव कार्य तूझे जवळि पातले । पाहिजे सिद्ध केल कृपावंता ॥१॥
सामर्थ्य तूझेच साधन तूझेच । बळ बा तूझेच सर्व कांही ॥२॥
संपन्नता सारी नाथ बा तुझीच । येथे माझे साच काय आहे ॥३॥
संकल्प तूझाच घटना तूझीच । संपत्ति तूझीच रमाकांता ॥४॥
सकळ करणे  सकळ शोधणे । किंवा साधवणे तूझे दत्ता ॥५॥
तूच यजमान धनी तूं चाकर । तुझे शिरी भार सर्व कांही ॥६॥
देवा आम्हालागी तूंच नाचविसी । करवोनी घेसी तव इच्छे ॥७॥
येथे काय आहे आम्हां अभिमान । सकळ विंदान तूझे दत्ता ॥८॥
विनायक म्हणे एक तूं समर्थ । पुरवावा अर्थ उत्सवाचा ॥९॥
==
गुरुवार ता.१३-११-१९३०
उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
वाढवाया महिमान । तैसे नाम संकीर्तन ॥२॥
साक्षात्कारे प्रगटोनी । कार्य दावी हे करोनी ॥३॥
साहाय्य द्यावे निज कृपेचे । मजलागी देवा साचे ॥४॥
सदोदित माझ्या पाठी । उभा राही जगजेठी ॥५॥
निज कार्यास्तव देवा । प्रगटवी निज वैभवा ॥६॥
साक्षात्कारे प्रगटावे । वैभव निज विस्तारावे ॥७॥
लक्ष्मी सहित प्रगटपणा । धरणे येथे नारायणा ॥८॥
विनायक हात जोडी । ह्याचे मन न तूं मोडी ॥९॥
==
आजवरी निज कार्य । करविले दत्तात्रेय ॥१॥
निमित्त मात्र करुनी मजला । कार्य साधिसी दयाळा ॥२॥
सकळ वैभवेसी कार्य । करिसी तूं अत्रितनय ॥३॥
अनुभव आजवरी । आम्हां आहे नरहरी ॥४॥
तोच आतां मी स्मरोनी । कृतज्ञ ह्रदयी बनोनी ॥५॥
तुझे पाय धरुनीयां । शिर पायीं अर्पूनीयां ॥६॥
कार्य तुज निवेदितो । आशीर्वाद मी मागतो ॥७॥
कार्य तुझे जवळी आले । ह्रदय माझे विकासले ॥८॥
आनंदाचा भर येवो । भजन रंगाते की पावो ॥९॥
जयजयकार तव नामाचा । दुमदुमो येथे साचा ॥१०॥
विनायक प्रार्थनेसी । करितो साधा निजकार्यासी ॥११॥
==
गुरुवार ता. २०-११-३०
साक्षात्कारे येथे स्वामी प्रगटावे । कार्य करवावे आम्हां करवी ॥१॥
तुझाच संकल्प तुझीच योजना । गुरु दयाघना सिद्ध व्हावी ॥२॥
अनुग्रह केला मज पामराला । यशस्वी जाहला पाहिजे की ॥३॥
थारांनी संग्रह जयाचा करिला । विफ़ल तो भला कैसा होय ॥४॥
कैसा झालो तरी तुमचा मी आहे । नाम सांगताहे तुमचे मी ॥५॥
कैसा झालो तरी तुमचा माणूस । मजलायशास देणे तुम्हां ॥६॥
नामधारक मी तुमचा दयाघना । करित कीर्तना तुमच्याच ॥७॥
तरी मज यश देणे गुरुनाथा । श्रीगुरु समर्था वासुदेवा ॥८॥
विनायक आहे तुमचा अंगिकृत । तुम्हां अवधूत अभिमान ॥९॥
==
गुरुवार ता.  २०-११-१९३०
तुमच्या घरचे कार्य दत्त देवा । विजयी करावा निजदास ॥१॥
उद्धार कराया आपुल्या जनाचा । मार्ग भजनाचा प्रसारिला ॥२॥
निमित्त मज केले स्थान स्थापियेले । यश विस्तारिले जनोद्धारा ॥३॥
लोकसंग्रहाचेसाठी वासुदेवा । मार्ग तुम्ही नवा योजिला हा ॥४॥
माझ्याठायी केला आपुला संसार । कराया विस्तार भजनाचा ॥५॥
उपासना मार्ग प्रसृत कराया । भजनी लावाया जनलोक ॥६॥
स्थान हे निर्मिले माझ्या हाती दिले । मज आज्ञापिले भजनाला ॥७॥
मज पुढे केला सांगोनी मजला । करिन सिद्धतेला मीच जाण ॥८॥
निमित्त तुज उभा पुढती धरिला । जन नयनांला दिसावया ॥९॥
परी कार्यकर्ता मीच वासुदेव । माझा प्रगट भाव तुझ्यापाठी ॥१०॥
करिन सिद्धता सकळ सामुग्रीची । भजन पूजनाची सांगे मज ॥११॥
गुह्य हेच येथे आहे या स्थानासी । देव उभा पाठिसी सदा आहे ॥१२॥
विनायक म्हणे अवघा वासुदेव । त्याचा कृपाभाव माझ्यापाठी ॥१३॥
==
वार्षिक हे कार्य दत्तजयंतीचे । जवळिक साचे पातलेसे ॥१॥
सिद्ध करा नाथा स्वये प्रगटोनी । समृद्धि देवोनी सर्व कांही ॥२॥
सर्व आनुकूल्ये प्रगट करावी । प्रसन्नता यावी थोर येथे ॥३॥
जयजयकार व्हावा तुझिये स्थानाचा । तुझीये नामाचा भजनाचा ॥४॥
तुझे कीर्तनाचा तुझे माहात्म्याचा । तुझीये यशाचा जयजयकार ॥५॥
जयजयकार व्हावा उत्सव कार्याचा । तुझीये भक्तांचा सेवकांचा ॥६॥
जयजयकार व्हावा तव उपासनेचा । तैसा कार्यक्रमाचा जयजयकार ॥७॥
समृद्ध कार्य व्हावे परम सौभाग्याचे । परम भाग्याचे दत्तात्रेया ॥८॥
न्यून कांही येथे मुळि न पडावे । सकळ संपादावे कार्य नाथा ॥९॥
सर्व देवमय सर्व शक्तिमय । सर्व सिद्धिमय प्रगटावे ॥१०॥
प्रगटोनी ऐसा दावी चमत्कार । करी साक्षात्कार दत्तनाथा ॥११॥
विनायक ठेवी माथा चरणावरी । कार्य अंगिकारी द्त्तनाथा ॥१२॥
==
बुधवार ता. २६-११-१९३०
उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
शरण आहे पायांतळी । धनी माझा आतुर्बळी ॥२॥
आजवरी करविले । तुवांच हे संपादिले ॥३॥
सकळ सिद्ध देवा केले । आनुकुल्या मज दिले ॥४॥
तैसेच नाथ आतां करणे । कार्य निज संपादणे ॥५॥
स्वये नाथा प्रगटणे । पदरांत मज घेणे ॥६॥
विनायक करी मागणी । पुरवावी चक्रपाणी ॥७॥
==
गुरुवार ता. २७-११-१९३०
उत्सव तुमचा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
अभ्युदय की साधेल । माझ्या मनिंचे होईल ॥२॥
जरी कृपा तुझी होय । अर्थ मज साध्य होय ॥३॥
म्हणुनि झटतो अर्थासाठी । कृपा करा जगजेठी ॥४॥
तुजलागी सर्व चिंता । करणारा तूं सिद्धता ॥५॥
पुरवावी माझी आळी । निजवचनासी पाळी ॥६॥
निजब्रीदासी राखावी । वात्सल्याते मिरवावे ॥७॥
विनायक म्हणे करा । हेतु माझा सिद्ध उदारा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP