एकादशी महात्म्य - पुत्रदा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘हे कृष्णा, मधुसूदना, श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय हे मला कृपा करुन सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘धर्मराजा, पुत्रदा नावाच्या श्रावण शुध्द एकादशीची पापहरण करणारी कथा मी सांगतो ती लक्षपूर्वक ऐक. ही कथा ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते. पूर्वी द्वापारयुग सुरु झाले तेव्हा माहिष्मती नगरीत महीजित नावाचा राजा आपल्या राज्याचे पालन करीत होत. त्या राजाला पुत्र नव्हता. त्यामुळे त्याला राज्य सुखप्रद वाटत नसे. कारण त्याला वाटत होते की ज्याला पुत्र नाही त्याला या लोकी व परलोकी सुख नाही. त्याने पुत्रप्राप्तीकरता पुष्कळ प्रयत्न केले. पण खूप काळ लोटला तरी सर्व मनुष्यांना सौख्य देणारा पुत्र त्याला मिळाला नाही. आपले उतारवय झाले आहे असे पाहून राजाला फार चिंता वाटू लागली. त्याने आपल्या प्रजाजनांची सभा भरवली. आणि त्या सभेत राजा म्हणाला, ‘लोकांनो, मी या जन्मात काहीही पाप केले नाही. द्रव्य अन्यायाने संपादन केले नाही किंवा कोषागारात ठेवले नाही. ब्राह्मणांचे किंवा देवाचे द्रव्य मी घेतले नाही. अपहार केल्याने खूप पाप लागते हे माहीत असल्याने दुसर्‍यांची ठेव मी कधी बुडवली नाही. मी माझ्या प्रजेचे रक्षण औरसपुत्राप्रमाणे केले. आणि क्षात्रधर्माप्रमाणे वागूनच पृथ्वी जिंकली. जे लोक मला भावाप्रमाणे व मुलाप्रमाणे होते, त्यांनीही दुष्टपणा केल्यावर त्यांना योग्य ते शासन केले. जे शिष्ट किंवा मोठे पुरुष माझा द्वेष करीत असत, त्यांचेही गुण जाणून मी त्यांचा सत्कार केला व पूजा केली. तेव्हा प्रजाजनांनो, मी याप्रमाणे धर्मयुक्त मार्गाने वागत असूनही माझ्या घरामध्ये पुत्रजन्म का होत नाही, याबाबत आपण विचार करा.’
राजाचे हे भाषण ऐकून प्रजानन उपाध्याय यांच्यासह श्रेष्ठ ब्राह्मण राजाचे हित कशाने होईल याचा विचारविनियम करण्याकरता गहन अरण्यात गेले. तेथे ऋषींनी भरलेले आश्रम शोधत असता त्यांना लोमश ऋषी दिसला. तो घोर तपश्चर्या करीत होता. तो चितस्वरुपी आनंदात मग्न होता. त्याला दु:ख नव्हते. तो कसलाच आहार घेत नसे. त्याने सर्व इंद्रिये जिंकली होती. आणि क्रोधावर विजय मिळवला होता. धर्माचे तत्त्व त्याला माहीत होते. तो सर्व शास्त्रांत पारंगत होता. त्याला फार मोठे दीर्घायुष्य लाभले होते. तो ब्रह्मदेवाची बरोबरी करीत असे. एक कल्प गेल्यानंतर त्याच्या अंगावरचा एक केस गळून पडत असे. म्हणून त्या श्रेष्ठ व त्रिकालज्ञ मुनीला लोमश असे नाव पडले होते. त्या ऋषीला पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वजण त्याच्या जवळ गेले आणि रीतीप्रमाणे त्यांनी मुनीला नमस्कार केला. आमच्या भाग्यानेच हा श्रेष्ठ मुनी आम्हाला भेटला असे ते एकमेकांत म्हणू लागले.
नम्र झालेल्या त्या लोकांच्या समुदायाला लोमश ऋषी म्हणाला,
‘लोकांनो, तुम्ही येथे कोणत्या कामासाठी आला आहात ते सांगा. माझ्या दर्शनाने तुम्हाला का आनंद झाला आहे ? तुम्ही माझी स्तुती का करता ? तुमचे हित होईल असेच काम मी नि:संशय करीन. कारण आमच्या सारख्यांचा जन्म केवळ परोपकार करण्यासाठीच असतो !’
लोक म्हणाले,
‘ऋषिश्रेष्ठा, आम्ही का आलो आहोत ते ऐका. ब्रह्मदेवाहूनही तुम्ही श्रेष्ठ आहात. तुमच्यापेक्षा जगात कोण श्रेष्ठ आहे ? आमचा संशय दूर व्हावा व आमचे कार्य साधावे, यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहोत. आमचा महिजित नावाचा राजा सांप्रत पुत्रहीन आहे. आम्ही त्याचे प्रजानन आहोत. तो राजा आमचे पुत्राप्रमाणे पालन करतो. पुत्र नसल्याने तो दु:खी होत आहे. हे पाहून आम्हीही दु:खी झालो आहोत. हे ऋषिश्रेष्ठा, आम्ही दृढ विचार करुन निष्ठेने तपश्चर्या करण्याकरिता या अरण्यात आलो आहोत. राजाच्या भाग्यानेच आम्हाला तुमचे दर्शन झाले. महात्म्यांच्या दर्शनानेच मनुष्यांची कार्यसिध्दी होत असते. म्हणून हे ऋषिश्रेष्ठा, ज्यामुळे राजाला पुत्र होईल, असा एखादा उपाय आम्हाला सांगा.’ प्रजाजनांचे हे बोलणे ऐकून त्या ऋषीने क्षणभर ध्यान केले. योगबलाने राजाचा पूर्वजन्म व पूर्वकर्म त्याला समजले.
नंतर तो ऋषी म्हणाला,
‘प्रजाजनांनो, तुमचा हा राजा पूर्वजन्मी दरिद्री व क्रूर कर्मे करणारा वाणी होता. तो व्यापार करीत गावोगावी फिरत असे. एकदा ज्येष्ठ शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी तो एका गावाच्या सीमेवर पोहोचला. ती वेळ भर दुपारची होती. तो तहानेने व्याकूळ झाला होता. तेथे एक पाण्याचा रम्य झरा पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला. इतक्यात तेथे नुकतीच व्यालेली एक सवत्स गाय आली. ती उन्हाने तापली होती आणि तहानेने व्याकूळ झाली होती ती गाय वाण्याचे पाणी पिऊ लागली. ती पाणी पीत असताना वाण्याने तिला हाकलून दिले व स्वत: ते पाणी तो प्याला. त्या दुष्कर्मामुळे या जन्मी तो राजा पुत्रहीन झाला आहे. पण त्याने पूर्वंजन्मी केलेल्या पुण्यामुळे त्याला या जन्मी निष्कंटक राज्य मिळाले.’
प्रजानन म्हणाले,
‘मुनिश्रेष्ठा, पुण्य मिळवल्याने पापांचा क्षय होतो, असे आम्ही पुराणात ऐकले आहे. ज्यामुळे पापांचा क्षय होईल असा उपदेश आम्हाला करावा. तुमच्या प्रसादाने राजाला पुत्र होऊ दे.’
लोमश ऋषी म्हणाला,
‘प्रजाजनांनो, श्रावण शुक्ल पक्षात पुत्रदा नावाची एकादशी प्रसिध्द आहे. त्या एकादशीचे व्रत शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे तुम्ही सर्वजण करा. रात्री जागरण करा. मग एकादशीचे निर्मल पुण्यफळ तुम्ही तुमच्या राजाला अर्पण करा. असे केल्यास राजाला निश्चितपणे पुत्रप्राप्ती होईल.’ लोमश ऋषीचे हे बोलणे ऐकून सर्व लोकांचे नेत्र आनंदाने चमकू लागले. ऋषीला नमस्कार करुन ते सर्व घरी जायला निघाले. श्रावणमास आल्यावर लोमशऋषीचे सांगणे आठवून त्या सर्वांनी श्रध्दायुक्त अंत:करणाने एकादशीचे व्रत विधिपूर्वंक केले. द्वादशीचे दिवशी सर्व प्रजाजनांनी एकादशीचे पुण्य राजाला दिले. असे पुण्य मिळाल्यावर राणीने कल्याणकारक गर्भ धारण केला. दिवस भरल्यावर तिला तेजस्वी पुत्र झाला. हे धर्मराजा, अशी ही एकादशी पुत्रदा या नावाने प्रसिध्द आहे. ज्याला या जगात व परलोकात सुख मिळावे अशी इच्छा असेल त्याने या एकादशीचे व्रत करावे. या एकादशीचे माहात्म्य ऐकल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो, त्याला पुत्रसुख लाभते व शेवटी स्वर्गलोक मिळतो.

॥ भविष्योत्तर पुराणातील पुत्रदा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP