मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|एकादशी महात्म्य|

विष्णुशयन आणि चातुर्मासातील व्रते

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


आषाढ शुक्ल एकादशीलाच शयनी एकादशी म्हणतात. या एकादशीला सुरु करावयाचे विष्णुशयनव्रत आणि चातुर्मासातील इतर व्रते ग्रहण करणयाचा विधी भविष्योत्तर पुराणात सांगितला आहे. तो खालीलप्रमाणे आहे.
श्रीकृष्ण म्हणाले,
‘हे धर्मराजा, या आषाढ शुध्द एकादशीलाच शयनी एकादशी असे म्हणतात. ज्यांना मोक्षाची इच्छा असेल त्यांनी या एकादशीचे दिवशी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी श्रीविष्णूचे शयन व्रत करावे. हे राज्यशार्दुला, चातुर्मासातील व्रतांचा आरंभ याच दिवशी करावा.
युधिष्ठिराने विचारले, ‘श्रीकृष्णा, श्रीविष्णूचे शयनव्रत कसे करायचे असते ? तसेच चातुर्मासातील व्रताचे नियम कोणते आहेत ? ते सर्व सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘पार्था, विष्णुशयनव्रत मी सांगतो ते ऐक. तसेच चातुर्मासातील व्रतांचे विधीही सांगतो ते ऐक. सूर्य कर्कराशीत आला असता आषाढातील शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान जगन्नाथाला निजवावे व तुला राशीत सूर्य आला असता कार्तिकातील शुध्द एकादशीला मधुसूदनाला पुन्हा जागे करावे. आषाढ शुध्द एकादशीला उपवास करावा आणि चातुर्मासात जी व्रते करायची असतील त्यांचा संकल्प करुन आरंभ करावा.
शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली व पीतांबर परिधान केलेली श्रीविष्णूची प्रतिमा तयार करावी. प्रतिमेच्या मुद्रेवर सौम्य भाव असावेत. पलंगावर कापसाची गादी घालून व पलंगपोस वगैरे घालून त्यावर ही प्रतिमा स्थापन करावी. इतिहास, पुराण व वेद यांत पारंगत असलेल्या ब्राह्मणांकडून त्या प्रतिमेला दूध, दही, तूप, मध, साखर व शुध्द पाणी यांचे स्नान घालावे. वस्त्रालंकार अर्पण करुन सुगंधी चंदनाची उटी लावावी. नंतर पुष्कळ फुले, धूप, दीप वगैरे अर्पण करुन साग्रसंगीत पूजा करावी. पूजा झाल्यावर श्रीविष्णूची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. ‘हे जगन्नाथा, तुम्ही झोपला की हे चराचर विश्व झोपी जाते. आणि तुम्ही जागे झाला की हे चराचर विश्व जागे होते.’
युधिष्ठिरा, अशाप्रकारे विष्णुप्रतिमेची पूजा केल्यावर विष्णूपुढे हात जोडून उभे रहावे आणि पुढीलप्रमाणे व्रतांचा संकल्प करावा. ‘आजपासून आरंभ करुन कार्तिकातील विष्णूचे प्रबोधन होईपर्यंत पावसाळ्याचे चार महिने मी शुध्द नियम व व्रते ग्रहण करीत आहे. भगवंता, माझी ही व्रते निर्विघ्नपणे पार पाडा.’
देवाची अशी प्रार्थना करुन माझ्या स्त्री किंवा पुरुष भक्ताने शुध्द होऊन नियम व व्रते ग्रहण करावीत. या व्रतांचा आरंभ करण्याकरता श्रीविष्णूंनी पुढील पाच काळ सांगितले आहेत. ते असे :
एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी व कर्कसंक्रांत या पाच दिवसांपैकी कोणत्याही दिवशी व्रताचा आरंभ विधिपूर्वक करावा. व्रत केव्हाही सुरु केले असले तरी त्या व्रताची समाप्ती कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशीलाच करावी. चातुर्मासातील व्रतांचा आरंभ करताना गुरु-शुक्रांचे अस्त, बाल्य किंवा म्हातारपण किंवा खंडतिथी वगैरे दोषांची काळजी करु नये. व्रत करणारा शुध्द असो किंवा अशुध्द असो, स्त्री असो की पुरुष असो, त्याने घेतलेले व्रत पूर्ण केल्यास त्याची सर्व पापातून मुक्तता होते. जो कोणी भगवंताचे स्मरण करुन दरवर्षी कोणते ना कोणते व्रत करतो तो मृत्युनंतर सूर्यासारख्या अतितेजस्वी विमानात बसून विष्णुलोकात जातो आणि तेथे प्रलयकाळपर्यंत आनंदाने राहतो. युधिष्ठिरा, चातुर्मासातील वेगळ्या वेगळ्या नियमांचे काय वेगळे वेगळे फळ मिळते ते आता मी सांगतो.
मंदिरात किंवा देवघरात रोज केर काढून, सडा टाकून, गाईच्या शेणाने सारवणे व त्यावर रांगोळ्या काढणे, असा एक नियम आहे. जो मनुष्य हा नियम चातुर्मासात आळशीपणा न करता करतो आणि समाप्तीला ब्राह्मणभोजन घालतो, तो पुढच्या सात जन्मात सत्य धर्माने वागणारा श्रेष्ठ ब्राह्मण होतो.
हे राजा, जो मनुष्य चातुर्मासात पूजा करताना विधिपूर्वक दूध, दही, तूप, मध व साखर या पंचामृतांनी देवाला स्नान घालील, तो शेवटी विष्णुस्वरुपता मिळवतो आणि अक्षय सुख उपभोगतो.
जो राजा देवाला उद्देशून सत्पात्र ब्राह्मणाला सुवर्णासह भूमिदान देतो व त्याबरोबर फळे व दक्षिणाही देतो, तो राजा जणू दुसरा इंद्र असल्याप्रमाणे अक्षय स्वर्गसुख उपभोगतो व शेवटी विष्णुलोकाला जातो यात संशय नाही. जो चातुर्मासात नित्य तुलसीपत्रे वाहून विष्णूची पूजा करतो व समाप्तीच्या दिवशी सोन्याची तुळस करुन ब्राह्मणाला दान देतो, तो सुवर्णाचे विमानात बसून विष्णुलोकाला जातो. हे बुध्दिवंत धर्मराजा, जो चातुर्मासात रोज देवाला गुग्गुळाचा धूप व दीप अर्पण करतो, व समाप्तीला धुपाटणे व दिवा दान देतो तो भाग्यशाली, व ऐश्वर्य उपभोगणारा श्रीमंत होतो.
जो मनुष्य चातुर्मासात रोज पिंपळाला किंवा विष्णुला, प्रदक्षिणा घालतो तो नि:संशय विष्णुलोकाला जातो. पायापुढे पाऊल टाकणे, हात जोडणे, मुखाने देवाची स्तुती करणे व हृदयात भगवंताचे ध्यान करणे ही प्रदक्षिणेची चार अंगे आहेत. जो चातुर्मासात रोज देवालयात किंवा ब्राह्मणाच्या घरात दिवा लावतो, व समाप्तीला दिवा, वस्त्र व सोने यांचे दान करतो तो या जगात तेजस्वी होतो व अंती वैकुंठ मिळवतो. जो विष्णूच्या पायाचे तीर्थ रोज प्राशन करतो तो विष्णुलोकाला जातो व पुन्हा या लोकी जन्म घेत नाही. जो चातुर्मासात रोज सकाळी, दुपारी व सायंकाळी गायत्री मंत्राचा जप विष्णूच्या मंदिरात करतो त्याला कोणत्याही पापाचा स्पर्श होत नाही. जो चातुर्मासात रोज पुराण किंवा धर्मशास्त्र ऐकतो आणि समाप्तीला सुवर्णासह पुस्तक-दान करतो, मोठा धार्मिक होतो, तो पुण्यवान, संपत्तिवान, ऐश्वर्य उपभोगणारा, सत्याने चालणारा, शुचिर्भूत, ज्ञानी होतो. त्याला कीर्ती मिळते व खूप शिष्य मिळतात.
जो चातुर्मासात शंकराच्या किंवा विष्णूच्या नाममंत्राचा जप करतो व समाप्तीला देवाची सोन्याची प्रतिमा दान देतो तो पुण्यवान, सर्व दोषांपासून मुक्त व गुणांचे आश्रयस्थान होतो. जो रोजची संध्या वगैरे झाल्यावर सूर्यमंडळात मध्यवर्ती असलेल्या जनार्दनाचे ध्यान करुन सूर्याला अर्घ्यदान देतो, व समाप्तीला सोने, लाल वस्त्र, व गाय दान देतो तो निरोगी, बलवान, शतायुषी, ऐश्वर्यवंत व कीर्तीवंत होतो. जो चातुर्मासात व्रतस्थ राहून १०८ किंवा २८ या संख्येने गायत्री मंत्राने होम करतो आणि समाप्तीला तिळपात्राचे दान करतो तो बुध्दिवान मनुष्य काया-वाचा-मनाने केलेल्या संचित पापातून मुक्त होतो, त्याला रोगाची पीडा होत नाही व उत्तम संतती मिळते. जो चातुर्मासात आळशीपणा न करता भाताचा होम करतो, व समाप्तीला तुपाने भरलेला कुंभ वस्त्रासह व सोन्यासह दान देतो, त्याला आरोग्य, अनुपम तेज, पुत्र, ऐश्वर्य व संपत्ती प्राप्त होते, त्याच्या शत्रूंचा नाश होतो, आणि तो जणू प्रती ब्रह्मदेवच होतो.
जो चातुर्मासात रोज पिंपळाची सेवा करतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णुभक्त होतो, व त्याला कधीही रोग होत नाहीत. समाप्तीला त्याने सुवर्णदान व वस्त्रदान करावे. ‘हे धर्मराजा, जो मनुष्य चातुर्मासात विष्णूला आवडणारी व कल्याणकारक अशी तुळशीची माळ धारण करतो, आणि समाप्तीला विष्णूच्या प्रीतीकरता ब्राह्मण-भोजन घालतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णुलोकाला जातो.
हे कुरुश्रेष्ठा, चातुर्मासात भगवान निद्रिस्त असताना रोज सकाळी मस्तकावर दुर्वा धारण करावी, त्या वेळी पुढील ध्यान मनात करावे. ‘हे दुर्वे, तू अमृतात जन्मली आहेस, सर्व देव तुला नमस्कार करतात. मला संतती व सौभाग्य देऊन कृपा कर.’ व्रताच्या समाप्तीला सोन्याची दुर्वा तयार करावी, व पुढील मंत्र म्हणून दक्षिणेसह दान द्यावी. ‘हे दुर्वे, तू जशी या पृथ्वीवर शाखा-उपशाखांनी पसरलेली आहेस, त्याप्रमाणे मलाही विच्छिन्न न होणारी अक्षय संपत्ती दे.’ याप्रमाणे जो कोणी दुर्वाव्रत करतो, तो सर्व पापांतून मुक्त होतो. त्याने कधीही अमंगल होत नाही. तो इहलोकी सर्व भोग भोगून शेवटी स्वर्गातही मान मिळवतो.
चातुर्मासात देवाधिदेव विष्णुपुढे किंवा शंकरापुढे नित्य गीतगायनाचे व्रत करावे. असे व्रत करणाराने देवाला चांगल्या आवाजाची घंटा अर्पण करावी. घंटेची देवता सरस्वती असते, व्रत करणार्‍याने सरस्वतीची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. ‘हे सरस्वती, तू विश्वाची स्वामिनी आहेस. या जगाच्या अज्ञानाचा तूच नाश करतेस. हे ब्रह्मदेवपत्नी, विष्णू, रुद्र, देवही तुझी स्तुती करतात. तू लोकांना पावन करतेस. या घंटानादाने तू प्रसन्न हो. मी गुरुची अवज्ञा करुन जे अध्ययन केले असेल, त्याचा दोष नाहीसा होऊ दे. माझ्या बुध्दीचे जडत्व जाऊ दे.’
चातुर्मासात जो मनुष्य भक्तीने ब्राह्मण हाच विष्णू आहे असे समजून त्याच्या पायाचे तीर्थ घेतो, तो कायिक, वाचिक, व मानसिक पापातून मुक्त होतो. त्याला रोगांची पीडा होत नाही. त्याचे ऐश्वर्य व आयुष्य वाढते. या व्रताच्या समाप्तीला त्याने दोन गाई. किंवा पुष्कळ दूध देणारी एक गाय दान द्यावी. हे करायला तो असमर्थ असेल तर त्याने एक धोतरजोडा दान द्यावा. ब्राह्मण हाच देवमय समजून जो विद्वान ब्राह्मणाला रोज नमस्कार करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन कृतकृत्य होतो. या व्रताच्या समाप्तीला त्याने ब्राह्मण-भोजन घालावे म्हणजे त्याला आयुष्य व संपत्ती प्राप्त होते. जो मनुष्य चातुर्मासात रोज कपिला गाईला स्पर्श करुन नमस्कार करतो, व समाप्तीला तीच सवत्स अलंकृत करुन दक्षिणेसह ब्राह्मणाला देतो, तो प्रतापी, सार्वभौम राजा होतो. त्याला दीर्घायुष्य लाभते. आणि त्या गाईच्या अंगावर जितके केस असतील, तितकी वर्षे तो इंद्राप्रमाणे स्वर्गात राहतो.
चातुर्मासात जो रोज सूर्याला किंवा गणपतीला नमस्कार घालतो, तो दीर्घायुषी, निरोगी, ऐश्वर्यवान व उत्तम कांतीचा होतो. गणपतीच्या प्रसादाने तो सर्वत्र विजय मिळवतो. व त्याला इच्छा केलेले फळ मिळते यात शंकाच नको. व्रतसमाप्तीला त्याने सिंदूर वर्णाचा सोन्याचा गणपती व अरुण वर्णाचा सोन्याचा सूर्य ब्राह्मणाला दान द्यावा, म्हणजे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जो शंकराच्या कृपेकरता चातुर्मासात रोज रुप्याचे किंवा तांब्याचे दान देतो, त्याला शंकरभक्तीत तत्पर असलेले पुत्र होतात. व्रतसमाप्तीला त्याने चांदीचे पात्र मधे भरुन द्यावे किंवा तांब्याचे पात्र गूळ भरुन द्यावे. जो चातुर्मासात आपल्या शक्तीनुसार धोतर-जोडी किंवा तिळासह सोन्याचे दान देतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन येथे ऐश्वर्य उपभोगतो व शेवटी कैलासाला जातो. जो चातुर्मासामध्ये गंध, फुले वाहून ब्राह्मणाची पूजा करतो, आणि ‘विष्णू मला प्रसन्न होवो’ असा संकल्प करुन वस्त्रदान करतो, त्याला अक्षय सुख व कुबेरासारखे धन प्राप्त होते. समाप्तीला त्याने शय्या, वस्त्र व सोने दान द्यावे.
जो चातुर्मासात रोज गोपीचंदन दान देतो, त्याच्यावर लक्ष्मीपती विष्णू प्रसन्न होतो. व त्याला ऐश्वर्य व मुक्ती देतो. समाप्तीला त्याने चारशे तोळे, दोनशे तोळे, किंवा शंभर तोळे गोपीचंदन वस्त्रासह व दक्षिणेसह दान द्यावे.
चातुर्मासात भगवान विष्णू निद्रिस्त असताना रोज दक्षिणेसह गूळ किंवा साखर यांचे दान द्यावे. समाप्तीला कृपणपणा न करताना शक्तीनुसार बत्तीस तोळ्याचे एक पात्र किंवा सोळा तोळ्याचे एक पात्र अशी आठ पात्रे, चार पात्रे, किंवा एक पात्र साखरेने भरुन व त्यावर फळ, वस्त्र व दक्षिणा ठेवून ते धान्यासह ब्राह्मणाला दान द्यावे. त्यावेळी पुढील प्रार्थना मनात करावी. ‘वस्त्र, साखर व सुवर्ण यांसह असलेले हे तांब्याचे पात्र सूर्याला संतुष्ट करते. ते मनुष्याच्या पापाचा नाश करते. ते रोगनाशक, पुष्टी देणारे, कीर्ती वाढवणारे व अक्षय संतती देणारे आहे. हे पात्र मनातील सर्व इच्छा पूर्ण करते, आयुष्य वाढवते व स्वर्गाची प्राप्ती करुन देते. म्हणून या ताम्रपात्राच्या दानाने माझी किर्ती अक्षय होऊ दे.’ असा संकल्प मनात करावा व हे दान द्यावे. ‘धर्मराजा, जो हे व्रतो करतो त्याला मिळणारे पुण्यफळ ऐक. तो गायन-विद्येत निपुण होतो व सर्व स्त्रियांचा आवडता होतो. ज्याला राज्याची इच्छा असेल, त्याला राज्य प्राप्त होते, ज्याला पुत्र हवे असतील त्याला पुत्र लाभतात, ज्याला द्रव्य हवे असते, त्या द्रव्य मिळते. व जो निष्काम बुध्दीने दान देतो, त्याला मोक्ष मिळतो.
जो मनुष्य हे चार महिने त्यावेळी मिळतील त्या शाकभाजा व कंदमुळे आपल्या शक्तीप्रमाणे दान देतो आणि व्रतसमाप्तीला ब्राह्मणाला दक्षिणा व धोतरजोडा देतो, तो चिरकाल सुखी होऊन राजयोगी होतो. दानाच्या वेळी पुढील मंत्र मनात म्हणावा. ‘ही भाजी सर्व देवांना प्रिय आहे. व मनुष्यांची तृप्ती करणारी आहे, ती मी दान देत आहे. या दानाने देवांनी माझे निरंतर कल्याण करावे.’
भगवान नारायण निद्रिस्त असताना चार महिने दररोज सुशील ब्राह्मणाच्या कुटुंबाला पुरेल इतके सुंठ, मिरे व पिंपळी दक्षिणेसह व वस्त्रासह दान द्यावीत. त्यावेळी पुढील दानमंत्र म्हणावा, ‘सुंठ, मिरे व पिंपळी हे तीन तिखट पदार्थ सर्व प्राण्यांच्या रोगांचा नाश करतात. म्ह्णून या दानाने भगवान भास्कर प्रसन्न होवो.’ व्रतसमाप्तीला शहाण्या माणसाने सुंठ, मिरे व पिंपळी सोन्याची करावी आणि ती वस्त्र व दक्षिणा यासहित विद्वान ब्राह्मणाला दान द्यावीत. असे व्रत जो करील त्याला शंभर वर्षांचे आयुष्य मिळेल. त्याचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण होतात व तो शेवटी स्वर्गाला जातो.
‘राजा, ‘जो चातुर्मासात रोज ब्राह्मणाला मोत्ये दान करतो, त्याच्याजवळ खूप धनधान्य साठते, तो ऐश्वर्यवंत, कीर्तिवंत होतो.’ जो जितेंद्रिय मनुष्य चातुर्मासात विडा वर्ज्य करतो, किंवा लाल वस्त्र दान देतो, तो रोगविरहित होतो. त्याला अतिशय लावण्य प्राप्त होते. तो शहाणा, बुध्दिवान, ऐशवर्यवंत व उत्तम आवाजाचा होतो. शेवटी तो गंधर्व होतो. व स्वर्गलोकाला जातो. विडा दान देताना पुढील दानमंत्र स्मरावा. ‘हा विडा ऐश्वर्य देणारा व कल्याण करणारा आहे. या विडयाच्या ब्रह्मा, विष्णू व शिव या देवता आहेत. या विडयाच्या दानाने आम्हाला पुष्कळ संपत्ती मिळते.’ चातुर्मासात स्त्रीने किंवा पुरुषाने गौरी व लक्ष्मीला उद्देशून ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला रोज हळदीकुंकू द्यावे. व्रतसमाप्तीला हळदीकुंकवाने भरलेले चांदीचे पात्र दक्षिणेसह भक्तिपूर्वक द्यावे. त्यावेळी या दानाने ‘देवी माझ्यावर प्रसन्न होऊ दे.’ असा संकल्प करावा. असे दान देणारा पुरुष पत्नीसह सुख भोगतो. स्त्री आपल्या पतीसह सुख भोगते. हे व्रत करणारे अक्षय सौभाग्य, धन, धान्य, पुत्र, ऐश्वर्य व सुंदर रुप मिळवतात, व शेवटी देवीलोकात उच्च पद मिळवतात.
चातुर्मासातील प्रत्येक दिवशी उमा-महेश्वरांना उद्देशून ब्राह्मणाच्या जोडप्याची पूजा करावी. ‘यामुळे उमा-महेश्वर संतुष्ट होवोत.’ असा संकल्प करावा. नंतर शक्तीप्रमाणे ब्राह्मणला सोने व दक्षिणा द्यावी. व्रतसमाप्तीला शंकर-पार्वतीची सोन्याची प्रतिमा करावी, पंचोपचाराने त्या मूर्तीची पूजा करावी. नंतर ती मूर्ती गाय व बैल यांसह दान द्यावी, व मिष्टान्नाचे भोजन घालावे. हे धर्मराजा, हे व्रत केले असता काय फळ मिळते ते ऐक. या व्रतामुळे अक्षय संपत्ती व कीर्ती प्राप्त होते. व्रत करणारा मनुष्य या पृथ्वीवर सर्व सुखे उपभोगतो, व शेवटी कैलास लोकाला जातो. जो मनुष्य चातुर्मासात नियमाने फळांचे दान करतो, व समाप्तीला उत्तम फळे ब्राह्मणाला दान देतो, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. आणि त्याला अक्षय संतती प्राप्त होते. या फलदानाच्या माहात्म्यामुळे तो शेवटी नंदनवनात आनंदाने राहू लागतो. चातुर्मासात रोज फुले दान करण्याचे व्रत घ्यावे. समाप्तीला सोन्याची फुले दान करावीत. असे व्रत करणार्‍याला पूर्ण ऐश्वर्य प्राप्त होते आणि शेवटी गंधर्व-पद मिळते. चातुर्मासात भगवान विष्णू झोपले असताना रोज षड्रस अन्नासह दहीभाताचे भोजन ब्राह्मणाला घालावे. किंवा दहीभात दान द्यावा. मात्र एकादशीला व ग्रहणाला भोजन देऊ नये. असे दान रोज देण्याचे सामर्थ्य नसेल तर अष्टमी, अमावास्या, पौर्णिमा व दोन्ही पक्षांतील द्वादशा या पाच पर्वाचे दिवशी भोजन व दान द्यावे. किंवा प्रत्येक रविवारी किंवा शुक्रवारी असे भोजनदान किंवा दहीदान द्यावे. या व्रताच्या समाप्तीला सामर्थ्य असेल तर सोने, वस्त्र व जोडा यांचे दान द्यावे. यापासून अक्षय धनधान्य प्राप्त होते. पुत्र, नातू व ऐश्वर्य मिळते. तो भगवंताचा नित्य भक्त होतो. आणि शेवटी विष्णुलोकाला जातो. चातुर्मासात जो रोज, अलंकार घातलेली व पुष्कळ दूध देणारी सवत्स व शुभलक्षणी गाय दक्षिणेसह दान देतो, तो सर्वज्ञ होतो. तो दुसर्‍याच्या आधीन राहत नाही. शेवटी तो ब्रह्मलोकात जातो. व पितरांसह अक्षय सुख मिळवतो. जो चातुर्मासात रोज प्राजापत्य व्रत करतो व समाप्तीला दोन गायी दान देऊन ब्राह्मण-भोजन घालतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन सनातन ब्रह्मपद मिळवतो. चातुर्मासात धारणा-पारणा व्रत करावे. म्हणजे एक दिवस उपोषण व एक दिवस पारणे. समाप्तीला एका नांगराला दोन बैल जोडून असे आठ नांगर वस्त्र, सोने व दक्षिणा यांसह दान द्यावे. त्यावेळी पुढील दानमंत्र स्मरावा. ‘दोन बैलांसह व जमीन नांगरण्याला उपयुक्त साहित्यासह हा नांगर भगवंताच्या प्रीतीकरता मी दान देत आहे. चातुर्मासात केवळ भाजी, कंदमुळे, व फळे खाऊन राहण्याचा नियम करावा व समाप्तीला एक गाय दान द्यावी. असे व्रत करणारा वैकुंठलोकाला जातो.
चातुर्मासात केवळ दुधावर राहण्याचा नियम करावा. समाप्तीला पुष्कळ दूध देणारी गाय दान द्यावी. असे व्रत करणारा शेवटी अविनाशी ब्रह्मलोकात जातो. चातुर्मासात रोज केळीच्या पानावर जेवण्याचा नियम करावा. समाप्तीला धोतरजोडा व काशाचे भांडे दान द्यावे. त्यावेळी पुढील दानमंत्राने संकल्प करावा. ‘कासे हे ब्रह्मा, शिव, लक्ष्मी, सूर्य, या देवतांचे स्वरुप आहे. ते विष्णुमय आहे. म्हणून हे प्रभो, या दानाने मला सुख व शांती लाभू दे.’ चातुर्मासात पळसाच्या पानावर जेवण्याचा नियम करावा. व तेल लावून अभ्यंगस्नान करु नये. ज्याप्रमाणे अग्नी कापसाच्या ढिगाचा नाश करतो, त्याप्रमाणे या व्रतामुळे पापराशीचा नाश होतो. खोटे बोलणारे, स्त्रीघातक, व्यभिचार करणारे असे सर्व पातकी हे व्रत केल्यास त्या पापातून मुक्त होतात. या व्रताच्या समाप्तीला दोनशे छपन्न तोळे वजनाचे काशाचे भांडे आणि अलंकार घातलेली, पुष्कळ दूध देणारी, सवत्स गाय वस्त्रालंकारासह विद्वन ब्राह्मणाला दान द्यावी. चातुर्मासात जमीन शेणाने सारवून तिच्यावर भगवंताचे स्मरण करीत भोजन करावे. समाप्तीला शक्तीप्रमाणे पाणथळ व सुपीक जमीन दान द्यावी. असे व्रत करणारा निरोगी होतो व पुत्रसंमतीने युक्त असलेला धार्मिक राजा होतो. त्याला शत्रूचे भय राहत नाही. शेवटी तो विष्णुलोकाला जातो. चातुर्मासात अयाचित व्रत करावे. शेवटी सोन्यासह व चंदनासह वृषभ दान द्यावा. षड्‍रस अन्नासह भोजन घालावे, म्हणजे व्रत करणारा मोक्षपद मिळवतो. चातुर्मासात जो नक्त भोजनाचे व्रत करतो व समाप्तीला ब्राह्मण भोजन घालतो, तो शेवटी शिवलोकात आनंदाने राहतो. जो मनुष्य एकभुक्त राहून या चार महिन्यांत वासुदेवाची रोज पूजा करतो, तो, स्वर्गलोकाचा अधिकार मिळवतो. व्रतसमाप्तीला ब्राह्मण भोजन घालून शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी. चातुर्मासात भगवान निद्रिस्त असताना जमीनीवर झोपण्याचा नियम करावा. समाप्तीला सर्व साहित्यासह शय्या-दान करावे. हे व्रत करणारा शिवलोकातही पूज्य होतो. चातुर्मासात पायाला तूप तेल लावण्याचे वर्ज्य करावे. समाप्तीला ब्राह्मण-भोजन घालावे व दक्षिणा द्यावी. हे व्रत करणारा विष्णुलोकाला जातो. आषाढ वगैरे चातुर्मासाच्या चार महिन्यांत जो नखे काढण्याचे वर्ज्य करतो, तो निरोगी, ऐश्वर्यसंपन्न पुत्रवान असा धार्मिक राजा होतो. जो चातुर्मासात गौरीशंकर प्रसन्न व्हावे म्हणून, खीर, मीठ, मध, तूप व फळे वर्ज्य करतो आणि वर्ज्य केलेले पदार्थ कार्तिकी द्वादशीला ब्राह्मणाला दान देतो तो या रुद्रव्रताच्या प्रभावाने कैलासाला जातो. जो चातुर्मासात केवळ जवाचे अन्न किंवा कल्याणकारक तांदुळाचे अन्न जेवण्याचा नियम करतो तो आपल्या मुला-नातवांसह शिवलोकात राहतो. जो व्रत घेणारा विष्णुभक्त चातुर्मासात अंगाला तेल लावून अभ्यंगस्नानाचा त्याग करतो आणि विष्णूची पूजा करतो तो शेवटी विष्णुलोकाला जातो. त्याने व्रतसमाप्तीला काशाचे भांडे तेलाने भरुन सुवर्णासह व दक्षिणेसह ब्राह्मणाला दान करावे. चातुर्मासाचे चार महिने सर्व भाज्या वर्ज्य कराव्या. व्रत समाप्तीच्या दिवशी चांदीचे भांडे वस्त्राने वेढून त्यात दहाप्रकारच्या भाज्या भराव्या. व्रत संपूर्ण होण्यासाठी हे भाडे देवाचे स्मरण करुन वेदविद्या-पारंगत ब्राह्मणाला दान द्यावे. दान देताना ब्राह्मणाची पूजा करावी व दक्षिणाही द्यावी. म्हणजे व्रत करणारा शंकराच्या कृपाप्रसादाने मोक्ष मिळवतो व शंकराशी एकरुप होऊन जातो. चातुर्मासामध्ये गव्हाचे पदार्थ न जेवण्याचा नियम करावा. कार्तिक महिन्यात समाप्ती करताना सोन्याचे गहू तयार करुन ते वस्त्रासह दान द्यावेत, म्हणजे अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. दान देताना पुढील मंत्र मनात आणावा. ‘गहू सर्व प्राण्यांचे बल व पुष्टी वाढवणारे आहेत. देवांच्या हवनद्रव्यामध्ये व पितरांच्या अन्नामध्ये तेच प्रमुख आहेत. म्हणून या दानाने ते मला ऐश्वर्य मिळवून देवोत !’ असा संकल्प करुन दान द्यावे. आषाढ वगैरे चार महिनेपर्यंत वांगी, कार्ली, दुधभोपळा व पडवळ खाणे सोडावे. आपल्याला जी फळे आवडती असतील तीही सोडावीत. चातुर्मास-समाप्तीचे वेळी सोडलेली फळे चांदीची बनवून घ्यावी. त्यामध्ये पोवळी भरावी. आणि ब्राह्मणांची पूजा करुन त्यांना ती दान द्यावीत. दानाचे वेळी इष्ट देवतेचे स्मरण करावे आणि ‘देव मला प्रसन्न होवो.’ अशी प्रार्थना करुन दान करावे. म्हणजे त्याला दीर्घायुष्य, मुले, नातू, आरोग्य, सौंदर्य, अक्षय संपत्ती व कीर्ती लाभते. स्वर्गलोकातही तो पूज्य होतो.
श्रावण महिन्यात भाज्या वर्ज्य कराव्या, भाद्रपदात दही वर्ज्य करावे, आश्विन महिन्यात दूध वर्ज्य करावे, आणि कार्तिक महिन्यात द्विदल धान्य आणि खूप बिया असलेली फळे वर्ज्य करावीत. चार महिन्यातील ही चार व्रते ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी व संन्यासी या चारही आश्रमातील लोकांनी, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे चारही वर्णातील लोकांनी नित्य नियमाने पाळावी. चातुर्मासात सर्वांनी कोहाळे, चवळ्या, मुळे, गाजरे, ऊस, मसुरा, महाळुंग, वांगी हे सर्व पदार्थ सोडावेत. धर्मराजा, चातुर्मासात ही व्रते नित्य करावीत असे पंडितांचे म्हणणे आहे. चातुर्मासात भगवान निद्रिस्त असताना बोरे, आवळे व चिंच वर्ज्य करावी. चातुर्मासात पलंग किंवा खाट यावर झोपणे वर्ज्य करावे व ब्रह्मचर्य पाळावे. चातुर्मासात मायाळू, शेवगा, वर्ज्य करावे. चातुर्मासात जो मनुष्य पांढरे वांगे, कलींगड, बेलफळ, उंबर, करपलेले अन्न पोटात जिरवतो त्या पासून भगवान फार दूर असतो. उपवास, नक्तभोजन, एकभुक्त व्रत किंवा अयाचित व्रत ही व्रते ज्या अशक्त मनुष्याला करता येणार नाहीत त्याने खंड न पाडता सकाळ-संध्याकाळ स्नान करुन भगवंताचे पूजन करावे. म्हणजे तो विष्णुलोकाचा अधिकारी होईल. चातुर्मासात विष्णूपुढे गायन करणारा व वाद्य वाजवणारा शेवटी गंधर्व लोकाला जातो. चातुर्मासात मधाचा त्याग करणारा राजा होतो. गुळाचा त्याग करणार्‍याला वंश चालवणारी मुले-नातवांची संपत्ती प्राप्त होते. राजा, चातुर्मासात तेलाचा त्याग करणारा सुंदर शरीराचा होतो. करडईचे तेल सोडले तर शत्रूंचा नाश होतो. मोहरीचे तेल सोडले तर उत्तम ऐश्वर्य प्राप्त होते.
तिखट, कडू, आंबट, गोड, तुरट व खारट या सहा रसांचा त्याग चातुर्मासात केल्यास मनुष्याला केव्हाही कुरुपपणा येत नाही, व त्याच्या अंगाला दुर्गंधी येत नाही. जो मनुष्य फुले वगैरेंचा उपभोग घ्यायचे सोडून देतो, तो स्वर्गात विद्याधर होतो. योगाभ्यास करणारा मनुष्य ब्रह्मपदवी मिळवतो. जर रोगी मनुष्याने चातुर्मासात तांबुल (विडा) वर्ज्य केला, तर तो लगेच रोगातून मुक्त होतो. हे धर्मराजा, पायाला व मस्तकाला अभ्यंग लावण्याचे सोडले तर तो मनुष्य कांतिमान होतो व कुबेराच्या द्रव्याचा मालक होतो. चातुर्मासात जो मनुष्य दूध व दही यांचा त्याग करतो, त्याला शेवटी गोलोक लाभतो. चातुर्मासात जो थाळीत शिजवलेले अन्न वर्ज्य करतो, त्याला शेवटी इंद्रलोक मिळतो. जो मनुष्य धारणा-पारणा व्रत करतो त्याची ब्रह्मलोकातही पूजा होते. चातुर्मासात जो मनुष्य नखे व केस धारण करतो तो ब्रह्मलोकात एक कल्प वर्षे रहातो. जो मनुष्य ‘नमो नारायण’ या मंत्राचा जप करतो त्याला मोजता येणार नाही, असे फळ मिळते. जो रोज भगवंतांचे चरण कमलांना स्पर्श करतो तो कृतकृत्य होतो. जो विष्णूला एक लक्ष प्रदक्षिणा घालून त्याची सेवा करतो, तो शेवटी हंस लावलेल्या विमानामध्ये बसून वैकुंठ लोकाला जातो, चातुर्मासात जो त्रिरात्र उपोषण करतो, त्याला स्वर्गात देवाप्रमाणे सुखोपभोग मिळतात.
चातुर्मासात परान्न वर्ज्य केले असता मनुष्याला देवत्व प्राप्त होते. चातुर्मासात जो प्राजापत्य व्रत करतो तो कायिक, वाचिक, व मानसिक अशा सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतो, यात संशय नाही. जो मनुष्य तप्तकृच्छ व अतिकृच्छ ही व्रते करुन चातुर्मास घालवतो त्याची पुनर्जन्मातून सुटका होते व तो मोक्षपद मिळवतो. राजा, जो मनुष्य चांद्रायण व्रत करुन चातुर्मास घालवतो तो दिव्य देहाचा होऊन शिवलोकाला जातो. चातुर्मासात जो मनुष्य अन्न भक्षण करीत नाही, तो भगवंताचे सायुज्य-पद मिळवतो व पुन्हा जन्माला येत नाही. जो मनुष्य चातुर्मासात भिक्षान्न मिळवून भोजन करतो तो वेद पारंगत ब्राह्मण होतो. हे राजा, जो मनुष्य पयोव्रत करुन संपूर्ण चातुर्मास घालवितो त्याच्या वंशाचा कधीही नाश होत नाही. चातुर्मासात नित्य नियमाने पंचगव्य प्राशन केले असता चांद्रायण व्रताच फळ मिळते. चातुर्मासात तीन दिवस पाण्याचा त्याग केल्यास मनुष्याला रोगाची पीडा कधीही होत नाही.
धर्मराजा, या सर्व व्रतांच्या आचरणामुळे भगवान विष्णू संतुष्ट होतात. भगवान क्षीरसमुद्रामध्ये आषाढ शुध्द एकादशीच्या दिवशी निद्रिस्त होतात आणि कार्तिक शुध्द एकादशीच्या दिवशी भगवंताच्या प्रीतीसाठी जो मनुष्य अनन्य भावाने उपवास करतो, त्याला गरुड-वाहन विष्णू मोक्ष मिळवून देतात.

॥ याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील विष्णूच्या शयनी एकादशीचे माहात्म्य आणि व्रतांच्या फळांचे वर्ण संपूर्ण झाले. ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP