८१.

यीन आली पावनी करीन म्हणल घाट, यीन गेली बघून पहाट, करायच नव्हत का मी करन्याची नव्हती ?

यीन आली पावनी, भाकरी होत्या शिळ्या तर ताज्या करावयाच्या राहूनच गेल्या, का मी करण्याची नव्हती का करणारी नव्हती ?

यीन आली पावनी, करीन म्हणल रोटी तर गहू खपलीच्या पोटी, म्हणून राहून गेली करायची पोळी तर मी का करायजोगी नव्हती का करणारी नव्हती ?

यीन आली पावनी, करीन म्हटल भात तर तांदूळ साळी अंबार्‍याच्या आत, तर मग राहूनच गेल, का मी करणारी नव्हती का करायजोगी नव्हती ?

यीन आली पावनी, घेईन म्हटल बोर, यीनीच्या माग खंडीभर पोर, तर राहूनच गेल का मी करण्याजोगी नव्हती का करायची नव्हती ?

यीन आली पावनी, भरील म्हणल कांकण तर कासाराला आल दुखण, का मी करण्याजोगी नव्हती का करणारी नव्हती ?

यीन आली पावनी, बस म्हणती खाली तर घर निघाल वल्ल, म्हणून बसायला टाकीन म्हटल पोत, तर मुंबईला पोत राहूनच गेल ! तशी बसाय टाकायच बी राहूनच गेल म्हणून का करायची नव्हती का करणारी नव्हती ?

यीन आली पावनी, करील म्हटल भाकरी तर तवाच चिलटान नेला ! म्हणून राहून गेल तर का मी करायची नव्हती का करण्याजोगी नव्हती ? नव्ह तुमीच सांगा.

यीन आली पावनी, घेईल म्हटल लुगड तर चाटयाच दुकानच नव्हत उघड, म्हणून राहूनच गेल. तर का मी करावयाची नव्हती का करणारी नव्हती ?

यीन आली पावनी, भरील म्हटल तिची वटी तर वाण्याच्या दुकानी नव्हती खोबर्‍याची वाटी, आता काय कराव बाई ? म्हणताना कशाच्या तरी नादात राहूनच गेल, म्हणून का मी करण्याजोगी नव्हती का करणारी नव्हती ? शप्पत हाय खर सांगा.

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती वजरटीक. पण आधी पिकू दे बालेघाट न्‌ मग दिऊ म्हणाव वजरटीकी आठ.

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती वजरटीकीला गोंड येऊद्यात म्हणाव पैशाच हाड मग दिऊ वजरटीकीला गोंड.

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती हातची काकण, घरी होऊद्यात म्हणाव सराफाची दुकान मग दिऊ हातची काकण.

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती तांब्याची परात, बोली केली घरात तवा तर नाही ठरल न्‌ आता कुठली वो तांब्याची परात ?

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती तांब्याची घागर लेक दिली नागर न्‌ आता कुठली म्हणाव तांब्याची घागर ?

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती घंगाळी न्‌ झारी, घाला म्हणाव आदी नवरीला सोन्याची सरी न्‌ मग दिऊ तुमाला घंगाळी न्‌ झारी.

या यीनीबाई मांडवात, यीन रुसली काय मागती ? मागती पलंगावर गादी, म्हणाव पडू द्या पाऊस, येऊद्या नदीला पाणी, पिकू द्या कापूस आधी अन्‌ दिऊ म्हणाव मग पलंगावर चांगली गादी.

८२.

मांडवाच्या दारी पेरले धणे, विहीणबाईच्या बेंबीत बेडूक कन्हे.

८३.

मांडवाच्या दारी पडला डबा, विहीणबाईच्या बेंबीवर दीडशे शिपाई उभा.

८४.

मांडवाच्या दारी सांडला ओवा, विहीणबाईच्या बेंबीत बागुलबुवा.

८५.

मांडवाच्या दारी, सजावटीची शोभा, विहीणबाईचा मोडला खुबा, तर विहीणदादान डॉक्टर केला उभा.

८६.

मांडवाच्या दारी, मकेची खंदाडी आणि विहीणबाईला विहीणदादांचा व्हंडा बैल हुंदाडी.

८७.

मांडवाच्या दारी, मकेची कणस, वाईट उखाणे घालू नका, आम्ही लायकीची माणस.

मांडवाच्या दारी करवंदाची जाळी, विहीणबाईंच्या झिंज्याखाली माकड ऊन टाळी.

मांडवाच्या दारी, रुखवत आला भाराचा कमरी करदोरा मोराचा, पायात तोडा कुलपाचा, अंगात बंडी झिलमिली, पहातात नगरच्या नारी, दृष्ट झाली लालाला; काजळ लावते गालाला, पुढाईताला आणा पुढ आणि आमच्या नवरदेवाला घाला कंठयाबद्दल सोन्याच कड.

८८.

मांडवाच्या दारी, बरमाई काळी मोरी, तिच्या बंधूच्या आहेराच शिंग वाजविती शिवेवरी.

८९.

मांडवाच्या दारी आहे रंगीत पाळणा, सया नारीला सांगू किती करवलीचा आहे गोपा तान्हा.

९०.

मंडपाच्या दारी हलगी शिंगाडी कुणीकडे, नवरा मांगाच्या वाडयापुढे.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP