उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया
भारतास का मानवमात्रा
स्फुरणदायि ती दांडीयात्रा
सत्याग्रहि नवनीर निघाले
अन्यायाचे मूळ हराया
मिठास होता महाग भारत
तुज मुंगीचे कळे मनोगत
तुझ्या हृदयिचा उठला ईश्वर
दास्यमुक्त हा देश कराया
मीठ त्या क्षणि ठरले अमृत
निद्रित जनता झाली जागृत
नमली सत्ता, सरले शोषण
काय नाव या दयावे विजया
लोकसेवका, लोकनायका
लोकशक्तिच्या धन्य मांत्रिका
देशोन्नतिचे सत्पथ सारे
भिडती येउन तुझ्याच पाया