जो जो जो जो रे घनश्यामा । निज बाळा गुणधामा ।
जोगी आलासे विश्रामा । स्वामी दाविन तुम्हां ॥जो०ध्रु०॥
जोगी दिसतो विचित्र । त्याला तीन नेत्र ।
चर्मा वेगळें नसे वस्त्र । म्हणवी तुझा मित्र ॥जो जो॥१॥
आंगीं लावुनियां विभूति । अर्धांगीं पार्वती ।
वृषभारुढ तो पशुपती । त्रिशूळ डमरु हातीं ॥जो जो॥२॥
आणिक एक नवल दयाळा । कंठ दिसतो निळा ।
मस्तकीं जळ वाहे झुळझुळा । नेत्रीं अग्निज्वाळा ॥जो जो॥३॥
जोगी आलासे अंगणीं । तुळसी वृंदावनीं ।
तुजला देखील नयनीं । घालीत लोटांगणीं ॥जो जो॥४॥
आळ घेतली न राहे । जोगी दावी माये ।
सर्वांभूषणीं तो आहे । परब्रह्म पाहे ॥जो जो॥५॥
गोकुळीं जन्मलें निधान । परब्रह्म तें जाण ।
तयाचे चरणीं शरण । एकाजनार्दन ॥जो जो ॥६॥