पहाटेसी उठोनि भक्त हर्षुनियां चित्तीं ।
दत्तगुरुप्रति भेटूं येती सह्याद्रीवरती ॥ध्रु०॥
कृतवीर्यात्मज सहस्त्रबाहू अर्जुन तो पुढती ।
कयाधुसुत जो भागवतोत्तम प्रहलाद सुमती ॥१॥
ययातिसुत यदु ज्याच्या वंशा देवही वंदीती ।
मदालसेचा नंदन चौथा अलक जया म्हणती ॥२॥
सुरतपानामक भूसुर मुनिवर विष्णुदास सुमती ।
अन्यहि येती सुरमौनितती करिती ते प्रणती ॥३॥
अनसूयेच्या बाळा दत्ता करितो तुज विनती ।
उठी उठी विमला, अरुण उदेला सरली हे राती ॥४॥
मंगलधामा मेघश्यामा, उठी उठी तुं निगुती ।
अरुण उदेला, प्रकाश पडला पक्षी गलबलती ॥५॥
कुंकुंम माखुनि प्राचीकामिनी हर्षुनि आत्मपती ।
येतो म्हणुनि ये लगबगुनी लाटीनम पुढती ॥६॥
द्विजाती उठती वेदा पुढती वासुदेव प्रार्थी ।
उठी उठी दत्ता श्रीगुरुनाथा दावी सुखदीप्ती ॥७॥