उठिं उठिं बा दत्तात्रेया । भानु करुं पाहे उदया ।
करणें दीनांवरती दया । चरण दावें वेगेंसी ॥ध्रु०॥
मंद वायूही सूटला । पक्षी करिताती किल्बिला ।
दीपवर्ण शुभ्र जाला । पूर्व दिशा उजळली ॥१॥
करुनि कृष्णेचें सुस्नान । घेऊनि पूजेचें सामान ।
सकळां लागलें तव ध्यान । कपाट केव्हां उघडेल ॥२॥
आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना ।
संतोषोनि आपल्या मना । तीर्थप्रसाद अर्पावा ॥३॥
गुरु त्रैमूर्ति साचार । करिसी पतितांचा उद्धार ।
म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटीं भक्तां रक्षिसी ॥४॥
रामदास लागे पायीं । मागे इच्छा हेंचि देई ।
तूंचि माझी बाप मायी । प्रतिपाळावें भक्तांसी ॥५॥